Monday 23 October 2023

विद्यापीठात ‘अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहा’चे उद्घाटन

 दिवंगत मुलीप्रती प्रेमाचे, ज्ञानाप्रती आस्थेचे चिरंतन प्रतीक: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या आणि रजनी व पंडित मारुलकर या दांपत्याच्या हस्ते कोनशिला अनावरणाने झाले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित मान्यवर.

शिवाजी विद्यापीठाच्या अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाच्या इमारतीत फीत कापून प्रवेश करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. केदार मारुलकर, पंडित मारुलकर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, रमेश पोवार, डॉ. रघुनाथ ढमकले, रजनी मारुलकर, डॉ. रामचंद्र पवार, डॉ. जगदीश सपकाळे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. तानाजी चौगुले.


कोल्हापूर, दि. २३ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाचे अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृह हे आईवडिलांचे आपल्या दिवंगत मुलीप्रती प्रेमाचे आणि ज्ञानाप्रती आस्थेचे चिरंतन प्रतीक म्हणून ओळखले जाईल, अशी भावपूर्ण अपेक्षा कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे माजी सहाय्यक कुलसचिव पंडित सदाशिव मारुलकर आणि त्यांच्या सुविद्य पत्नी रजनी मारुलकर यांनी त्यांची दिवंगत कन्या अस्मिता हिच्या स्मरणार्थ विद्यापीठास दिलेल्या ३५ लाख रुपयांच्या निधीमधून विद्यापीठात उभारण्यात आलेल्या अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.

अस्मिता मारुलकर हिच्या स्मृतींचा गहिवर तिच्या आईवडिलांसह या कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या मनी दाटलेला होता. त्यामुळे मारुलकर कुटुंबियांच्या सत्पात्री दानातून साकार झालेला हा उद्घाटन समारंभ अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या वसतिगृहाच्या रुपाने अस्मिताचे भव्य आणि चिरंतन स्मारक विद्यापीठात उभे राहिल्याचे समाधान मारुलकर दांपत्याच्या मनी दाटून आले. एका डोळ्यांत तिच्या आठवणींचे आसू, अन् दुसऱ्यात समाधानाचे हसू अशी त्यांची अवस्था झाली होती.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, मारुलकर दांपत्याने शिवाजी विद्यापीठास दिलेला ३५ लाखांचा निधी हा आजपर्यंत कोणत्याही व्यक्तीने व्यक्तीगत पातळीवर दिलेला सर्वाधिक निधी आहे. यातून त्यांनी विद्यापीठाशी चिरंतन नाते जोडले आहे. या त्यांच्या दातृत्वातून केवळ हे एकच वसतिगृह साकार झाले आहे, असे नाही; तर यातूनच लोकवर्गणीतून विद्यार्थिनींसाठी लोकस्मृती वसतिगृह निर्माण करण्याची संकल्पना साकार झाली असून त्या दृष्टीने लवकरच कार्यवाही करण्यात येईल.

यावेळी डॉ. भारती पाटील यांनी संशोधक विद्यार्थिनींच्या गरजा लक्षात घेऊन या वसतिगृहाची विचारपूर्वक उभारणी केल्याचे लक्षात येते, असे सांगितले. यावेळी पंडित मारुलकर यांनी अस्मिता हिच्या स्मृतींना उजाळा दिला आणि विद्यापीठाने सव्वा वर्षाच्या विक्रमी कालावधीत या वसतिगृहाची देखणी इमारत उभी केल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह विद्यापीठ प्रशासनास धन्यवाद दिले. कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, रजनी मारुलकर, अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले, डॉ. जगदीश सपकाळे, डॉ. केदार मारुलकर, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, रमेश पोवार, अभियांत्रिकी उपकुलसचिव रणजीत यादव, विद्यार्थिनी वसतिगृह मुख्य अधीक्षक डॉ. प्रतिमा पवार, डॉ. माधुरी वाळवेकर, अमित कांबळे यांच्यासह अभियांत्रिकी व विद्युत विभागाचे कर्मचारी आणि संशोधक विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृह

वसतिगृहाविषयी थोडक्यात...

अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाची इमारत तळमजला व पहिला मजला (प्रत्येकी १७५० चौरस फूट असे एकूण ३५०० चौरस फूट बांधकाम) अशी दुमजली आहे. इमारतीमधील आठ प्रशस्त खोल्या स्वच्छतागृह संलग्न असून प्रत्येक मजल्यावर पॅन्ट्री, वेटिंग फॉयर यांची सुविधा आहे. इमारतीसमोर पेव्हिंग ब्लॉक्स बसविले आहेत. या इमारतीचे आरसीसी डिझाईन विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागाने केलेले आहे.

मारुलकर दांपत्याच्या दातृत्वास विद्यापीठाचा सकारात्मक प्रतिसाद

अस्मिता मारुलकर या आपल्या विकलांग मुलीच्या भवितव्याची तरतूद म्हणून रजनी व पंडित मारुलकर या दांपत्याने सुमारे ३५ लाख रुपयांची बचत केलेली होती. तथापि, तिच्या अकाली निधनानंतर अस्मिताचाच अधिकार असलेला हा निधी स्वतःसाठी न वापरता समाजासाठी वापरण्याचा निर्णय या ज्येष्ठ दांपत्याने घेतला आणि शिवाजी विद्यापीठाकडे गतवर्षी १५ ऑगस्ट २०२२ रोजी ३५ लाखांचा निधी सुपूर्द केला. त्यातून विद्यापीठाने १५ दिवसांत कमवा व शिका विद्यार्थिनी वसतिगृहाच्या शेजारील जागा निश्चित करून ३० ऑगस्ट रोजी मारुलकर दांपत्याच्याच हस्ते संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाची पायाभरणी केली. त्यानंतर अवघ्या सव्वा वर्षांच्या कालावधीत अस्मिता संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाची देखणी इमारत उभी राहिली आणि तिचे उद्घाटनही झाले. विद्यापीठाच्या या सकारात्मक कृतीचे मारुलकर कुटुंबियांनी मनापासून कौतुक केले.

No comments:

Post a Comment