शिवाजी विद्यापीठामध्ये ‘ग्यान’ कार्यशाळेचा समारोप
कोल्हापूर, दि. २२ ऑक्टोबर: अक्षय ऊर्जेचा वापर
वाढवून पर्यावरणपूरकता जपण्याकडे जागतिक समुदायाचा कल वाढविण्याची गरज आहे, असे
प्रतिपादन डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी केले.
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र
विभागाच्या वतीने आयोजित पाचदिवसीय ‘ग्यान’ कार्यशाळेचा समारोप शुक्रवारी (दि. २०) झाला. या समारंभाचे प्रमुख
पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. कामत बोलत होते. राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल)
येथील वरिष्ठ संशोधक डॉ. पी. पी. वडगावकर यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. समारंभाच्या
अध्यक्षस्थानी अधिष्ठाता डॉ. एम. एस. देशमुख होते.
कुलगुरू डॉ. कामत म्हणाले, पदार्थ व ऊर्जा
(मटेरियल अँड एनर्जी) हे दोन्ही घटक केवळ एखाद्या देशाच्या नव्हे, तर अखिल मानवजातीच्या
प्रगतीसाठी अत्यावश्यक आहेत. खनिज उर्जासाधनांच्या अतिरेकी वापराचे दुष्परिणाम
पर्यावरणावर मोठ्या प्रमाणावर होत आहेत. त्यामुळे अपारंपरिक ऊर्जेचा वापर वाढविणे
आवश्यक आहे. दिवसेंदिवस पर्यावरणामध्ये होत असलेले बदल रोखण्याकरिता अक्षय उर्जेचा
वापर विविध कार्यात्मक पदार्थांच्या माध्यमातून करणे गरजेचे आहे. त्यातूनच कार्बन-डायऑक्साईड व इतर हरित
वायूंचे प्रमाण कमी होईल. त्यासोबतच हायड्रोजन वायूआधारित संशोधनाकडे संशोधकांनी
भर देणे आवश्यक आहे.
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. पी. पी. वडगावकर
म्हणाले, या कार्यशाळेच्या माध्यमातून संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना एक वेगळी
दिशा मिळेल. त्यातून साकारणारे संशोधन समाजोपयोगी असेल.
यावेळी समन्वयक डॉ. सागर डेळेकर यांनी या
कार्यशाळेचा आढावा घेतला. रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख डॉ. कैलास सोनवणे यांनी
पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. जी. बी. कोळेकर यांनी आभार मानले.
प्रा.
पी.व्ही. कामत यांचे सर्वंकष मार्गदर्शन
अमेरिकेतील नॉत्रे दॅम विद्यापीठातील
जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ प्रा. पी.व्ही. कामत यांनी पाच दिवसीय ‘ग्यान’
कार्यशाळेत शाश्वत ऊर्जा क्षेत्रातील अत्याधुनिक संशोधन व तंत्रज्ञान यांविषयी
सर्वंकष माहिती विविध व्याख्यानांतून दिली. अगदी आर्टिफिशिअल इंटेलिजन्सच्या
अनुषंगानेही त्यांनी मार्गदर्शन केले. प्रा. कामत यांनी कार्यात्मक पदार्थ व ऊर्जा
क्षेत्रातील नवनवीन संशोधन व तंत्रज्ञानाविषयी व्याख्याने दिली. कार्यात्मक
पदार्थांमध्ये प्रामुख्याने धातू व धातू ऑक्साईड संमिश्रे, कार्बन
संमिश्रे, नॅनो संमिश्रे, इत्यादींचा
वापर करून कमी खर्चिक व अधिक उपयुक्त सौरघट, ग्रीन
हायड्रोजन निर्मिती, प्रदूषके नियंत्रित करण्यासाठीच्या
प्रक्रिया यांवर त्यांनी भर दिला. तसेच, जागतिक स्तरावरील नेट कार्बन झिरो, मिशन
ग्रीन हायड्रोजन, प्रदूषके नियंत्रित करण्यासाठीची विविध
धोरणे इत्यादी
विषयांवर त्यांनी संशोधकांशी सविस्तर चर्चा केली.
No comments:
Post a Comment