डॉ. भिलावे, डॉ. कोळी यांच्या वन्यजीव संवर्धनविषयक ग्रंथाचे प्रकाशन
शिवाजी विद्यापीठात 'कन्झर्व्हिंग वाइल्डलाइफ टूगेदर' या ग्रंथाचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. माधव भिलावे, डॉ. सुनील कोळी, विश्वास देशपांडे आदी. |
कोल्हापूर, दि. ७
ऑक्टोबर: मानवाने वेळीच आपल्या
हव्यासाला आळा घातला नाही, तर पुढच्या पिढ्या नैराश्याच्या खाईत लोटल्या जातील,
असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले.
शिवाजी विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागातील प्राध्यापक डॉ. माधव भिलावे
आणि डॉ. सुनील कोळी यांनी संपादित केलेल्या ‘कन्झर्व्हिंग वाइल्ड लाइफ टूगेदर’ या ग्रंथाचे वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने कुलगुरू
डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कुलसचिव
डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, निसर्गाच्या प्रत्येक बाबतीमध्ये मानवाने
सातत्याने हस्तक्षेप केला आहे. जगण्याच्या गरजा मर्यादित असल्या तरी आपल्या
राक्षसी महत्त्वाकांक्षांपायी निसर्गाला ओरबाडून तो अधिकाधिक हानी करीत चालला आहे.
गरज आणि हव्यास यामधील सीमारेषा त्याने कधीच ओलांडली आहे. त्यामुळेच आज आपल्यावर
सर्वच गोष्टी वाचविण्याचा प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. पाणी, जमीन आदी पर्यावरणीय
घटक वाचविण्याबरोबरच अगदी प्राणी, वनस्पती वाचविण्यासाठीही जागृती करण्याची वेळ
आली आहे. इतकेच नव्हे, तर आपल्याला आता ‘लेक
वाचवा’सारखे अभियानही हाती
घ्यावे लागत आहे. याचाच अर्थ, आपल्या प्रजातीला वाचविण्यासाठीही धडपड करण्याची वेळ
मानवावर आली आहे. आपण सारे काही नष्ट करीत चाललो आहोत, हे आधी मान्य करू या आणि मग
त्या वाचविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करू या. ही आजघडीची मोठी गरज आहे. डॉ. भिलावे
यांनी या पुस्तकाद्वारे वन्यजीवांना वाचविण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांचा
ऊहापोह केलेला आहे. ही जाणीव शालेय विद्यार्थ्यांपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रादेशिक
भाषांमध्ये त्याचा अनुवाद होणे आवश्यक आहे.
कुलसचिव डॉ. शिंदे म्हणाले, आपल्या स्वार्थापायी जैवविविधता नष्ट करत चाललो
आहोत, हे थांबविले पाहिजे. वन्यजीव विपरित वागत आहेत, याची कारणे मानवाने आपल्या
वर्तनामध्ये शोधणे आवश्यक आहे. मानवतेसमोर कृत्रिम बुद्धिमत्तेसारखी अनेक आव्हाने उभी
ठाकत आहेत. त्यांच्या अनुषंगाने आपल्याला मानवी भवितव्याविषयी अजून खूप काही करणे
आवश्यक याचे भान निर्माण करण्यासाठी अशा प्रबोधनपर पुस्तकांची गरज आहे.
प्रकाशक विश्वास देशपांडे यांनी यावेळी आपल्या प्रकाशनाकडील दर दहा
पुस्तकांमधील किमान एक पुस्तक सामाजिक जाणीव जागृतीपर प्रकाशित करण्याची आपली
भूमिका असल्याचे सांगितले. तसेच सदर २१० पृष्ठांच्या ग्रंथामध्ये एकूण २५ लेख असून
ते विविध सहा विद्यापीठांमधील एकूण ४६ तज्ज्ञ लेखक, संशोधकांनी लिहीले आहेत, असेही
त्यांनी सांगितले.
यावेळी डॉ. भिलावे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राहुल तायडे यांनी आभार
मानले. यावेळी ग्रंथाचे अनेक सहलेखकही कार्यक्रमास उपस्थित होते.
No comments:
Post a Comment