शिवाजी विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन उत्साहात
शिवाजी विद्यापीठात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रकाश बिलावर, डॉ. धनंजय सुतार, डॉ. भगवान हिर्डेकर आणि डॉ. सचिनकुमार पाटील. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात बोलताना डॉ. भगवान हिर्डेकर |
कोल्हापूर, दि. १६
ऑक्टोबर: माणसाला त्याच्या
जगण्याचे प्रयोजन वाचनातून सापडते, असे मत ज्येष्ठ विचारवंत व शिक्षणतज्ज्ञ डॉ.
भगवान हिर्डेकर यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचा बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि ग्रंथालय व
माहितीशास्त्र अधिविभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वाचन प्रेरणा
दिनाच्या निमित्ताने ‘का
वाचावे? आणि काय वाचावे?’ या विषयावर डॉ. हिर्डेकर यांचे विशेष व्याख्यान
आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के होते.
डॉ. हिर्डेकर म्हणाले, माणसाप्रमाणे उन्नत होण्याची क्षमता अन्य
प्राणीमात्रांत नाही. माणसाच्या विचार करण्याच्या क्षमतेमुळे त्याने ही उन्नती
साध्य केली आहे. मेंदूच्या सातत्यपूर्ण मशागतीमधून ही विचारक्षमता साधली आहे आणि
त्यामध्ये वाचन कळीची भूमिका बजावते. मेंदू कार्यक्षम ठेवण्याचे कार्य वाचन करते.
मेंदू ताजातवाना आणि जिवंत ठेवण्याचा वाचन हा एक महत्त्वाचा आणि अत्यंत साधासोपा
मार्ग आहे. वाचनाने माणूस वेडा होत नाही, तर ‘वाचनवेडा’
होतो आणि त्यातून जग बदलण्याच्या प्रेरणा त्याच्यात निर्माण होतात.
डॉ. हिर्डेकर पुढे म्हणाले, पुस्तके माणसाला शांत करतात, अशांतही करतात; ती माणसाला समंजस बनवितात आणि
बंडखोरही बनवितात. पुस्तके ही आपले 'ब्रेन'वेअर आणि 'हार्ट'वेअरही बदलतात. ती आपल्याला
सहृदय बनवितात. भूमिका घ्यायला शिकवितात. त्यामुळे माणसाने आपल्या विषयाबरोबरच
विषयबाह्यही वाचन करायला हवे. पर्याप्त विषय आणि अन्य विषयांचं किमान ज्ञान देणारे
वाचन असले की त्यातून नव्या गोष्टी समजण्याबरोबरच कृतीशीलतेच्या प्रेरणाही मिळतात.
आजच्या काळात विविध ज्ञानशाखांमधील भिंती पाडण्याची गरज आहे. वाचन हा माणसाला
समृद्ध करणारा प्रवास आहे. या प्रवासात मिळणारा आनंद हा शब्दातीत प्रेरक आहे.
वाचन माणसाला प्रगल्भ बनविते, असे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, वाचन
प्रेरणा दिन केवळ एक दिवस नव्हे, तर वर्षभर दैनंदिन स्वरुपात साजरा व्हायला हवा.
विद्यापीठाच्या ग्रंथालयात अनेक दुर्मिळ पुस्तकांचा खजिना वाचकांच्या प्रतीक्षेत
आहे. त्याचप्रमाणे दर वर्षी लाखो रुपयांची पुस्तके खरेदी केली जातात, त्यांचा
लाभही विद्यार्थ्यांनी घेण्याची गरज आहे.
यावेळी गौरी चिंचणे, आकाश कांबळे, शिवाजी चव्हाण या विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांतील
उताऱ्यांचे अभिवाचन केले. सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते माजी
राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून
अभिवादन करण्यात आले. ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. धनंजय सुतार यांनी
स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रकाश बिलावर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
सुधाराणी हजारे आणि प्रियांका मुजुमदार-भिडे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. वाय.जी.
जाधव यांनी आभार मानले. यावेळी मंचावर ग्रंथालय व माहितीशास्त्र अधिविभागाचे
प्रमुख डॉ. सचिनकुमार पाटील उपस्थित होते.
No comments:
Post a Comment