Sunday, 28 September 2025

विद्यापीठांनी संशोधनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूलच्या इमारतीचे उद्घाटन

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीचे कोनशिला अनावरणाने उद्घाटन करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित अधिकारी व मान्यवर

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी फीत सोडवून इमारतीत प्रवेश करताना करताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह उपस्थित अधिकारी व मान्यवर

शिवाजी विद्यापीठात यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या इमारतीच्या उद्घाटन समारंभात बोलताना उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील. मंचावर (डावीकडून) डॉ. नितीन माळी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव व वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटची नूतन इमारत


कोल्हापूर, दि. २८ सप्टेंबर: विद्यापीठांनी आता संशोधनाकडे गांभीर्यपूर्वक लक्ष देणे आवश्यक असून त्यासाठी त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करण्याची शासनाची भूमिका आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या (वाय.सी.एस.आर.डी.) नूतन इमारतीच्या उद्घाटन समारंभ प्रसंगी ते आज बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, विद्यापीठ स्तरावर अध्यापनाबरोबरच प्राध्यापकांनी संशोधनाकडे लक्ष पुरविणे ही काळाची गरज आहे. शिवाजी विद्यापीठाचे वीस संशोधक जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये स्थान मिळवून आहेत, ही अभिमानाची बाब आहे. ही संख्या अधिक वाढविण्यासाठी नव्या पिढीमध्ये संशोधनाची आस वाढविणे आवश्यक आहे. प्राध्यापकांना त्यासाठी प्रेरित करणेही गरजेचे असते, याचे भान शासनाला आहे. त्यामुळे संशोधनासाठी लागेल तितका निधी देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकासासाठीही मदत करण्यात येईल. पॉलिटेक्निक शैक्षणिक संस्थांच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी देण्यामागे शासनाची हीच भूमिका आहे. आपल्याला व्यक्ती आणि समाज यांना आवश्यक भौतिक सुविधांच्या उपलब्धतेबरोबरच जीवन जगण्याची उत्तम पद्धती प्रदान कराव्या लागणार आहेत, जेणे करून चांगला माणूस घडेल. भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासक्रमाकडून आमची हीच अपेक्षा आहे. परकीय आक्रमकांनी इथली संस्कृती, कला आणि परंपरा पुसून टाकण्याचे काम केले. युरोपातील ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या परंपरेविषयी आपल्याला सांगितले जाते. तथापि, ऑक्सफर्डपूर्वी आपल्याकडे नालंदा विद्यापीठ होते. ऑक्सफर्डच्या काळातच तक्षशीला विद्यापीठ होते. या समृद्ध वारशाप्रती आपण सजग झाले पाहिजे. त्यासाठी आज इनोव्हेशन, पेटंट आणि रॉयल्टी या तिन्ही अंगांनी संशोधनाची कास पकडली पाहिजे. त्या माध्यमातून व्यक्ती आणि राज्य यांची चौफेर प्रगती होण्यासाठी कटिबद्ध व्हायला हवे, असे आवाहन त्यांनी केले.

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटच्या विस्तारवृद्धीसाठी विद्यापीठाकडून वाढीव मजल्याचा प्रस्ताव प्राप्त झाला असून तो मंजूर करण्याच्या बाबतीत आपण सकारात्मक असल्याचेही मंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले की, महाराष्ट्र शासनाच्या सकारात्मकतेमुळे आणि मंत्री श्री. पाटील यांच्या प्रयत्नांमुळे यशवंतराव चव्हाण स्कूलच्या इमारतीस मूर्त स्वरुप प्राप्त झाले आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या सहकार्यामुळेच विद्यापीठातील विद्यार्थी, शिक्षक आणि अभ्यागतांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या पूर्व-पश्चिम भागास जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे कामही मार्गी लागू शकले. या दोन्ही बाबींसाठी विद्यापीठ परिवार त्यांच्याप्रती कृतज्ञ आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

सुरवातीला मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करून आणि फीत कापून इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांनी फिरून इमारतीची पाहणी केली आणि झालेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ऊर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले, तर संचालक डॉ. नितीन माळी यांनी आभार मानले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित तोंदले यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, वास्तुविशारद, कंत्राटदार यांचा कुलगुरूंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर, माजी बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. व्ही.एम. पाटील, डॉ. रघुनाथ ढमकले, स्वागत परुळेकर, डॉ. गिरीष कुलकर्णी, रमेश पवार, उपकुलसचिव रणजीत यादव, अमित कांबळे, विजय पोवार, वैभव आर्डेकर, शिवकुमार ध्याडे यांच्यासह स्कूलचे शिक्षक, अभियांत्रिकी विभागाचे कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कुलगुरूंच्या कारकीर्दीचा मंत्र्यांकडून गौरव

मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आपल्या भाषणामध्ये कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या कारकीर्दीचा गौरव केला. ते म्हणाले, डॉ. शिर्के यांच्या रुपाने एक अतिशय चांगले कुलगुरू येत्या ६ ऑक्टोबरला पदउतार होत आहेत. त्यामुळे मंत्री म्हणून माझ्यासमोर व्हॉट नेक्स्ट?’ असा प्रश्न उभा राहिला आहे. त्यांनी आपल्या कारकीर्दीत विद्यापीठाचे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यासाठी शासनाकडे अथक पाठपुरावा केला. त्यामुळे विद्यापीठासाठी शासनाकडून निधीसह आवश्यक ते सर्व सहकार्य प्राप्त करवून घेण्यात त्यांना यश आले, असेही ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी कुलगुरू डॉ. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

नूतन इमारतीविषयी...

यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटची नूतन इमारत तळमजला अधिक दोन मजले अशी नियोजित असून प्रथम टप्प्यात तळमजला प्रस्तावित होता. ते काम पूर्ण झाले असून त्यामध्ये २८६१.३० चौरस मीटरचे बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये संचालक व शिक्षकांसाठी कक्ष, वर्गखोल्या, ग्रंथालय आदी कक्षांचा समावेश आहे.

 

Friday, 26 September 2025

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यामुळेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापुरात: मंत्री शंभुराज देसाई

विचारधनग्रंथाचे शिवाजी विद्यापीठात प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात 'विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधीमंडळातील भाषणे भाग-१' या ग्रंथाचे प्रकाशन करताना महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई आणि सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर. मंचावर (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, डॉ. विजय चोरमारे, अशोकराव पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


शिवाजी विद्यापीठातील ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात बोलताना मंत्री शंभुराज देसाई.

शिवाजी विद्यापीठातील ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमात बोलताना मंत्री प्रकाश आबिटकर


(ग्रंथ प्रकाशन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २६ सप्टेंबर: लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या तळमळीमुळेच कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठ होऊ शकले, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनातर्फे विचारधन: लोकनेते बाळासाहेब देसाई यांची विधीमंडळातील भाषणे भाग-१ या डॉ. विजय चोरमारे संकलित व संपादित ग्रंथाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील उपस्थित होते.

मंत्री देसाई म्हणाले, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे असावे की सातारा येथे, याविषयी दुविधा त्यावेळी होती. मंत्रीमंडळासमोर याविषयीचा प्रस्ताव येणार असल्याचे समजताच प्रकृतीअस्वास्थ्य असतानाही बाळासाहेब देसाई त्या बैठकीसाठी पोहोचले आणि स्वतः साताऱ्याचे असूनही कोल्हापूर येथेच विद्यापीठ होण्यासाठी आग्रह लावून धरला. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज आणि कोल्हापूर या तीन बाबी त्यांच्या हृदयाच्या जवळच्या होत्या. त्यामुळे गेटवे ऑफ इंडियापासून ते राज्यभरात ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे त्यांनी उभारले. तसेच अखेरपर्यंत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राहिले. गोरगरीबांच्या मुलांच्या कल्याणाचा विचार करून त्यांच्या हितासाठी, शेतकरी हितासाठी त्यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांचे विचार आणि वारसा यांची जाणीव ठेवून वाटचाल करण्याचा आमचा प्रयत्न आहे. विद्यापीठातील देसाई अध्यासनाला अधिक चांगले स्वरुप देण्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने विविध महान व्यक्तीमत्त्वांच्या नावे अध्यासने उभारून त्यांच्या विचार व कार्याचा अभ्यास व संशोधन करण्याचा उपक्रम महत्त्वाचा आहे. आजच्या कालखंडात समाजापेक्षा व्यक्तीगत स्वार्थ मोठा होत आहे. या पार्श्वभूमीवर बाळासाहेब देसाईंसारखे निस्वार्थ सामाजिक भावनेतून कार्य करणारे आदर्श आपल्याला मार्गदर्शक ठरतात. मंत्री शंभुराज देसाई हे बाळासाहेबांचे आदर्श नातू म्हणून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे घेऊन जात आहेत, याचा अभिमान वाटतो. माझे चुलते खटाव येथे होते, ते बाळासाहेब देसाई यांचे कार्यकर्ते होते. त्यांच्या आठवणी ते आम्हाला सांगायचे. आज मी त्यांच्या नातवासमवेत काम करतो आहे, याचा आनंद आहे, असेही ते म्हणाले.

एक महत्त्वाची कार्यपूर्ती साध्य केल्याचा हा आनंदाचा क्षण असल्याचे सांगून संपादकीय मनोगतामध्ये डॉ. विजय चोरमारे म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या नेतृत्वाच्या विचारांचे दस्तावेजीकरण या निमित्ताने संकलित करता आले. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, लोकनेते बाळासाहेब देसाई आणि शरद पवार या चार नेत्यांप्रती महाराष्ट्राने सदैव कृतज्ञ राहायला हवे, इतके त्यांचे ऋण आहेत. देसाई यांच्या शैक्षणिक धोरणामुळे महाराष्ट्राची पहिली पिढी शिक्षणाच्या प्रवाहात येऊ शकली. प्रशासनात त्यांचा मोठा दरारा होता. अत्यंत अभ्यासू, संयमी आणि प्रगल्भ व्यक्तीमत्त्वाच्या देसाई यांनी आपल्या विरोधकांचाही सदैव आदरच राखला. त्यांचे कार्य आजच्या पिढीसाठी आदर्शवत स्वरुपाचे आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, लोकनेते बाळासाहेब देसाई यांनी कोल्हापुरात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण केले. ही कृतज्ञता त्यांच्या मनी सदैव असावी, त्यामुळेच कदाचित ते शिवाजी विद्यापीठ येथे होण्याविषयी आग्रही राहिले असावेत. डॉ. विजय चोरमारे यांनी देसाई यांच्या भाषणांचे संकलन करून मोठे काम केले आहे. तथापि, त्यांच्या कार्याचे बरेचसे संकलन अद्यापही बाकी आहे. त्यामुळे पुढील भागांच्या कामालाही त्यांनी सुरवात करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. मंत्री शंभुराज देसाई आणि मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते यावेळी ग्रंथ प्रकाशन करण्यात आले. अध्यासनाचे समन्वयक डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, सल्लागार समितीचे सदस्य डॉ. अरुण भोसले, डॉ. भारती पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. विश्वनाथ पानस्कर, अशोकराव पाटील, जयराज देसाई, राजेंद्र देसाई, पृथ्वीराज देसाई, यशराज देसाई यांच्यासह देसाई कुटुंबातील सदस्य, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Thursday, 25 September 2025

जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे २० संशोधक

अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाची सन २०२५ साठीची क्रमवारी जाहीर

डॉ. प्रमोद पाटील

(जागतिक २ टक्के संशोधकांतील शिवाजी विद्यापीठाचे संशोधक)







कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर: जगभरातील आघाडीच्या दोन टक्‍के संशोधकांची सन २०२५ साठीची यादी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने नुकतीच जाहीर केली आहे. यात शिवाजी विद्यापीठाच्या २० संशोधकांनी स्थान प्राप्त केले आहे.

स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक आघाडीच्या दोन टक्के संशोधकांत शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू तथा ज्येष्ठ संशोधक डॉ. प्रमोद पाटील (पदार्थविज्ञान) यांच्यासह निवृत्त प्रा. ए. व्ही. राव (पदार्थविज्ञान), निवृत्त प्रा. सी. एच. भोसले (पदार्थविज्ञान), डॉ. केशव राजपुरे (पदार्थविज्ञान), डॉ. विठोबा पाटील (पदार्थविज्ञान), निवृत्त डॉ. संजय गोविंदवार (जैवरसायनशास्त्र), डॉ. ज्योती जाधव (जैवरसायनशास्त्र), डॉ. अण्णासाहेब मोहोळकर (पदार्थविज्ञान), डॉ. सागर डेळेकर (रसायनशास्त्र), डॉ. कल्याणराव गरडकर (रसायनशास्त्र), डॉ. तुकाराम डोंगळे (नॅनोसायन्स), डॉ. सुशीलकुमार जाधव (नॅनोसायन्स), डॉ. हेमराज यादव (रसायनशास्त्र), डॉ. संजय लठ्ठे (पदार्थविज्ञान), डॉ. के. के. पवार (जैवतंत्रज्ञान), सचिन ओतारी (जैवतंत्रज्ञान), डॉ. अनिल घुले (रसायनशास्त्र), डॉ. शरदराव व्हनाळकर (पदार्थविज्ञान), डॉ. तेजस्विनी भट (पदार्थविज्ञान) आणि डॉ. मानसिंग टाकळे (पदार्थविज्ञान) यांचा समावेश आहे. गत वर्षभरातील संशोधकीय कामगिरीच्या आधारे स्टॅनफोर्ड विद्यापीठाने ही निवड केली आहे. या २० संशोधकांव्यतिरिक्त राज्यासह जगभरात अन्य शिक्षण संस्था, विद्यापीठांत कार्यरत असणारे शिवाजी विद्यापीठाचे अनेक माजी विद्यार्थीही या दोन टक्के संशोधकांत समाविष्ट आहेत.

सार्वकालिक कामगिरीच्या आधारेही संशोधकांची एक यादी तयार करण्यात आली असून त्यामध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह डॉ. ए.व्ही. राव, डॉ. केशव राजपुरे, डॉ. ज्योती जाधव आणि डॉ. सी.एच. भोसले या पाच संशोधकांचा समावेश आहे.

गेली सहा वर्षे सातत्याने शिवाजी विद्यापीठाचे संशोधकीय महत्त्व जगाच्या नकाशावर हे संशोधक अधोरेखित करीत आहेत, ही अत्यंत अभिमानाची व आनंदाची बाब आहे, अशी भावना व्यक्त करीत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या सर्व संशोधकांचे अभिनंदन केले आहे. कुलगुरू डॉ. शिर्के यांनी म्हटले आहे की, या संशोधकांना जागतिक यादीमध्ये स्थान मिळण्यामागे त्यांनी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ अव्याहतपणे केलेले संशोधन कारणीभूत आहे. या सर्वांनी विद्यापीठात एक संशोधन शिस्त निर्माण केली. त्यामुळे विद्यापीठात उत्तम संशोधन परंपरा निर्माण झाली आहे. हा वारसा पुढे घेऊन जाण्यास नवसंशोधकांनी सिद्ध व्हायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

 

स्टॅनफोर्ड विद्यापीठाची रँकिंग प्रक्रिया

संशोधनाची गुणवत्ता निर्धारित करण्यासाठी अमेरिकेतील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने शोधनिबंधाला मिळणारी सायटेशन्स, एच निर्देशांक, सहलेखकत्व, संशोधन लेखकाची नेमकी भूमिका या घटकांचा सारासार विचार करून सर्वसमावेशक आणि सर्वमान्य अशी संयुक्त सूचक (सी स्कोर) निर्देशांक काढून ही जागतिक आघाडीच्या २ टक्के संशोधकांची क्रमवारी प्रसिद्ध केली जाते. ही प्रणाली आयसीएसआर लॅबद्वारे एल्सव्हियरने प्रदान केलेल्या स्कोपस डेटाचा वापर करते. दरवर्षी ही प्रमाणित क्रमवारी जाहीर करण्यात येते. या रँकिंगमुळे केवळ एका विषयातीलच नव्हे, तर सर्व विषयांमधील गुणवत्तेची तुलना करणे शक्य झाले. स्कोपस' डेटाबेसवर आधारित 'एल्सव्हिअर'ने तयार केलेल्या यादीसाठी १९६० ते २०२५ या कालावधीमध्ये संशोधकीय योगदान देणार्‍या संशोधकांची सार्वकालिक कामगिरी आणि वार्षिक कामगिरी अशा दोन निकषांवर निवड करण्यात आली आहे. २२ विज्ञान विषय आणि १७४ उपविषयांमधील संशोधनाची यात दखल घेतली गेली. जागतिक आघाडीच्या २% शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान मिळवणे हीच एक मोठी उपलब्धी असते. गेल्या पाच वर्षात या यादीत शिवाजी विद्यापीठातील संशोधकांनी स्थान टिकवून ठेवले आहे, ही बाब महत्त्वाची आहे.

Tuesday, 23 September 2025

महिलांचे निर्णयप्रक्रियेत समावेशन आवश्यक: खासदार सुप्रिया सुळे

शिवाजी विद्यापीठात कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२ पुस्तकाचे प्रकाशन

शिवाजी विद्यापीठात डॉ. भारती पाटील संपादित 'कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना खासदार सुप्रिया सुळे. 

शिवाजी विद्यापीठात डॉ. भारती पाटील संपादित 'कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात बोलताना खासदार सुप्रिया सुळे. मंचावर (डावीकडून) डॉ. भारती पाटील, सरोज पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे.  

(कार्यक्रमाची लघुचित्रफीत)



कोल्हापूर, दि. २३ सप्टेंबर: महिलांना निर्णयप्रक्रियेत सामावून घेऊन त्यांना त्यासाठी ताकद देणे यातून त्यांचे खऱ्या अर्थाने सक्षमीकरण शक्य आहे, असे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या कै. श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासनातर्फे आयोजित कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२ या डॉ. भारती पाटील संपादित पुस्तकाच्या प्रकाशन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून स्त्री सक्षमीकरण: आव्हाने व संधी या विषयावर त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि सरोज (माई) पाटील प्रमुख उपस्थित होते.

खासदार सुळे म्हणाल्या, महिला सक्षमीकरणासाठी महिला शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिक आघाड्यांवर आत्मनिर्भर बनल्या पाहिजेत. राज्याची, देशाची आर्थिक घडी बसविण्यामध्ये त्यांचा सहभाग असला पाहिजे. धोरणात्मक निर्णयप्रक्रियेमध्ये त्यांचे मोठ्या प्रमाणात समावेशन होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मुली-महिलांनी आपले निर्णयस्वातंत्र्य अबाधित राखून आपल्या मताशी ठाम राहायला हवे. तसेच वेळप्रसंगी ठामपणे नाही म्हणायलाही शिकायला हवे. स्त्री सन्मानाची सुरवात आपल्या घरापासून केली पाहिजे. स्त्री मुक्तीच्या दिशेने वाटचाल करीत असताना पुरूषांचा द्वेष करण्याची आवश्यकता नाही. किंबहुना, फुले, शाहू, आंबेडकर यांच्यासारख्या महापुरूषांमुळे या देशात स्त्री-पुरूष समतेचे आणि स्त्री सन्मानाचे वारे निर्माण झाले आहे. त्यामुळे या प्रवासात आपण पुरूषांना सोबत घेऊन वाटचाल करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

यावेळी सुळे यांनी आपल्या व्यक्तीगत आयुष्यातील अनेक दाखले देत आपल्याला कधीही लिंगभेदाचा सामना करावा लागला नसल्याचे सांगितले. प्रत्येक मुलीला, महिलेला या प्रकारचे पर्यावरण उपलब्ध करून देण्यासाठी समाजाने प्रयत्न करावा, असे आवाहनही केले.

यावेळी सरोज पाटील म्हणाल्या, कोणतेही मूल विद्वत्ता घेऊनच जन्मते. त्याची गुणवत्ता पाहून त्याला योग्य पैलू पाडणे गरजेचे असते. सुप्रिया सुळे यांनी केलेली प्रगती अभिमानास्पद असून त्यापाठी तिच्या आईवडिलांचे मोठे योगदान असल्याचेही त्यांनी सांगितले. आपल्या मातोश्री शारदाबाई पवार यांच्या जीवनसंघर्षाबद्दलही त्यांनी उपस्थितांना अवगत केले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते शारदाबाई पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अध्यासनाच्या समन्वयक डॉ. भारती पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर, ऊर्मिला दशवंत यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

पुस्तकाविषयी थोडक्यात...

डॉ. भारती पाटील यांनी कोल्हापुरातील कर्तृत्ववान स्त्रिया: भाग-२ हे पुस्तक संपादित केलेले असून कोल्हापुरातील स्वातंत्र्य चळवळीसह शैक्षणिक, राजकारण, अर्थकारण आणि समाजकारण या क्षेत्रांमध्ये कर्तृत्व गाजविणाऱ्या ३४ स्त्रियांच्या कार्याचा वेध यामध्ये घेण्यात आला आहे. यातील बहुतांश कर्तृत्ववान महिलांसह त्यांच्याविषयी लिहीणाऱ्या लेखिकाही आजच्या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित होत्या. पुस्तकाची पृष्ठसंख्या ४०० आहे. 

Monday, 22 September 2025

शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात

 

कोल्हापूर, दि.22 सप्टेंबर - शिवाजी विद्यापीठात आज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.




शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळयास पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले.  त्याच बरोबर मुख्य प्रशासकीय इमारतीमध्ये कर्मवीर पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.  यावेळी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, वित्त लेखाधिकारी डॉ.सुहासिनी पाटील, वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.श्रीकृष्ण महाजन, क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, आजीवन अध्ययन अधिविभागप्रमुख डॉ. रामचंद्र पवार, डॉ.धनंजय सुतार, प्राचार्य बी.पी.मरजे, डॉ.अवनिश पाटील, उपकुलसचिव डॉ.प्रमोद पांडव, भूगोल अधिविभागप्रमुख डॉ.सचिन पन्हाळकर, डॉ.संभाजी शिंदे, डॉ.धनश्री पोतदार, डॉ.मीना पोतदार, डॉ.ज्ञानेश्वर पवार, डॉ.प्रशांत पाटील, डॉ.सुधीर पोवार,   डॉ.अभिजित पाटील, विजय गावडे, शुभम गिरीगोसावी यांच्यासह संशोधक विद्यार्थी, विद्यार्थिनी प्रशासकीय सेवक उपस्थित होते.

----&