Wednesday, 31 January 2018

खगोलप्रेमी कोल्हापूरकरांची चंद्रग्रहण पाहण्यास विद्यापीठात मोठी उपस्थिती



ब्लडमून पाहण्यासाठी विद्यापीठाच्या टेरेसवर खगोलप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली.










ग्रहणकाळातील चंद्राच्या विविध कला. (छायाचित्रे: डॉ. प्रमोद कसबे व हर्षल कांबळे, नॅनोतंत्रज्ञान विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर)


कोल्हापूर, दि. ३१ जानेवारी: ग्रहणाच्या संदर्भातील साऱ्या श्रद्धा-अंधश्रद्धांना फाटा देत कोल्हापूरच्या खगोलप्रेमी नागरिकांनी आजचे विशेष खग्रास चंद्रग्रहण पाहण्यासाठी शिवाजी विद्यापीठात मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. ग्रहणाच्या सुरवातीपासून ते ग्रहण संपुष्टात येईपर्यंत अनोख्या सुपरमून, ब्लूमून आणि ब्लडमून अशा तिहेरी नैसर्गिक चमत्कृतीचा आस्वाद घेतला.
शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाच्या अवकाश निरीक्षण केंद्रातर्फे आज सायंकाळी चंद्रग्रहणाच्या निरीक्षणासाठी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या टेरेसवर दुर्बिणीसह व्यवस्था करण्यात आली होती. हे कोल्हापुरातील सर्वात उंच ठिकाण असल्याने येथून ग्रहणाचे निरीक्षण अगदी व्यवस्थितरित्या करता येते. त्याचा लाभ घेण्याचा आवाहन विद्यापीठातर्फे काल करण्यात आले होते. त्याला विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. यातून कोल्हापूरच्या नागरिकांचे एकूणच खगोलप्रेम अधोरेखित झाले.
सुपरमून म्हणजे नेहमीपेक्षा पृथ्वीच्या अधिक नजीक आलेला चंद्र, ब्लूमून म्हणजे एकाच महिन्यात आलेली दुसरी पौर्णिमा आणि ग्रहण कालावधीत चंद्र जेव्हा पृथ्वीच्या गडद छायेतून जातो, तेव्हा प्रकाशकिरणांचे विकिरण होऊन बहुतांश निळ्या रंगाच्या छटा शोषल्या जाऊन नारंगी लाल रंग तितकाच शिल्लक राहतो, तेव्हा ग्रहण स्थितीत चंद्र लालसर दिसतो, ही अवस्था म्हणजे ब्लडमून. असा तिहेरी योग यापूर्वी ३१ मार्च १८६६ रोजी म्हणजे सुमारे १५२ वर्षांपूर्वी आलेला होता. त्यामुळे असा दुर्मिळ खगोलीय आविष्कार पाहण्याची संधी आज नागरिकांना लाभली.
विद्यापीठाच्या टेरेसवर सायंकाळी साडेपाच वाजल्यापासूनच विद्यार्थी-विद्यार्थिनींसह शहरातील आबालवृद्ध, महिला, शिक्षक यांचे आगमन होण्यास सुरवात झाली. अवकाश संशोधन केंद्राच्या टेलिस्कोपभोवती या सर्वांचा गराडा पडला होता. सर्वांनाच चंद्रोदयाची प्रतीक्षा लागलेली होती. साधारणपणे पावणेसातच्या सुमारास ग्रासलेल्या अवस्थेतच पूर्व दिशेला चंद्राचे दर्शन झाले. सुरवातीला धूसर असणारे चंद्रबिंब पुढे त्या धूसरपणाकडून अधिक गडद लाल रंगाकडे झुकले आणि टप्प्याटप्पाने प्रकाशमान होत गेले. एका क्षणी डायमंड रिंगसारख्या अवस्थेचे दर्शन घडवून तेथून ग्रहण सुटण्यास सुरवात झाली आणि पुनश्च दीप्तीमान सुपरमूनचे दर्शन खगोलप्रेमींना होत गेले.
उपस्थित सर्वच खगोलप्रेमींनी हा सोहळा उघड्या डोळ्यांसह सोबत आणलेल्या दुर्बिण, कॅमेरे तसेच टेलिस्कोप यांच्या माध्यमातून पाहिला. हातातल्या मोबाईल कॅमेऱ्यांमध्येही हे चंद्रबिंब टिपण्याचा प्रयत्न केला जात होता. ग्रहण सुटेपर्यंत नागरिकांनी या खगोलीय आविष्काराचा आनंद लुटला. त्याचप्रमाणे अवकाश संशोधन केंद्राचे डॉ. राजीव व्हटकर यांच्यासह त्यांचे विद्यार्थी हेरंब गायकवाड, ओंकार गुरव यांच्याकडून या सर्व नैसर्गिक चमत्काराची माहितीही घेतली.
यावेळी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, शैक्षणिक सल्लागार डॉ. डी.आर. मोरे, अधिष्ठाता डॉ. ए.एम. गुरव यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोल्हापूरकरांच्या खगोलप्रेमाचे दर्शन: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे
आजच्या अनोख्या नैसर्गिक खगोलीय चमत्काराचे निरीक्षण करण्यासाठी कोल्हापुरातील नागरिकांनी इतक्या मोठ्या संख्येने विद्यापीठात उपस्थिती दर्शविली, ही बाब आनंदाची आहे. कोल्हापूरकर नागरिक हा विज्ञानप्रेमी आहे, त्यांच्यात मोठी जिज्ञासा आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी ते अशा उपक्रमांना मोठ्या संख्येने प्रतिसाद देतात, हे आज दिसून आले. हा प्रतिसाद अत्यंत सुखावह असून त्यामुळे यापुढील काळातही अशा प्रकारच्या उपक्रमांचे विद्यापीठातर्फे आयोजन करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केली.
कुलगुरूंनी स्वतः सर्व ठिकाणी फिरुन अवकाश दर्शनासाठी जमलेल्या लोकांशी संवाद साधला. त्यांनी विद्यापीठाच्या टेलिस्कोपसह नागरिकांनी आणलेल्या विविध प्रकारच्या दुर्बिणी व कॅमेऱ्यांतूनही चंद्रग्रहणाची पाहणी केली. हौशी विद्यार्थ्यांनी काढलेल्या उत्तम छायाचित्रांचे त्यांनी कौतुकही केले.

शारदाबाई पवार यांचे पुणे लोकल बोर्डावरील कार्य आदर्शवत: डॉ. एन.डी. पाटील



शिवाजी विद्यापीठात आयोजित एकदिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी कै. श्रीमती शारदाबाई पवार यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना डॉ. एन.डी. पाटील. सोबत डावीकडून डॉ. भारती पाटील, कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, सौ. सरोजताई पाटील, सौ. विजया पाटील.
बुबनाळच्या सरपंच आस्मा जमादार यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे.



कोल्हापूर, दि. ३१ जानेवारी: कै.श्रीमती शारदाबाई पवार यांचे पुणे लोकल बोर्डावर सामाजिक जाणिवेच्या भावनेतून केलेले कार्य आदर्शवत स्वरुपाचे आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ.एन.डी.पाटील यांनी केले. 
शिवाजी विद्यापीठाच्या कै.श्रीमती शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन केंद्राच्या वतीने विद्यापीठाच्या छ.शाहू सिनेट सभागृहामध्ये 'स्थानिक राजकारणातील स्त्रिया : काल आज' या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  कार्यशाळेच्या द्घाटन प्रसंगी 'शारदाबाई गोविंदराव पवार यांचे व्यक्तित्व पुणे लोकल बोर्डातील कार्य' या विषयावर ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील यांचे बीजभाषण झाले. त्यावेळी ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी उपस्थित होते.  सौ.सरोजताई पाटील, सौ.विजया पाटील, बुबनाळच्या सरपंच सौ.आस्मा जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती.
Dr. N.D. Patil
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन.डी. पाटील म्हणाले, १९३८ साली शारदाबाई पुणे लोकल बोर्डावर निवडून गेल्या. या बोर्डाच्या त्या चौदा वर्षे सदस्या होत्या. त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांनी अनेकांना चांगल्या सामाजिक कामासाठी प्रोत्साहन दिले. लोकल बोर्डाच्या धोरणावर त्यांच्या कार्याचा चांगला ठसा उमटला. अस्पृश्यता निवारणाचे प्रश्न, सामाजि कार्य, शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.  १९३८ ते १९५२ सालापर्यंत लोकल बोर्डाच्या सभागृहावर त्यांच्या कार्यर्तृत्वाचा आणि सामाजिक जीवनाचा मोठा प्रभाव होता.
डॉ. पाटील पुढे म्हणाले, शारदाबाई पवार यांना आयुष्या सातत्याने अडथळ्यांच्या शर्यतीतू जावे लागले.  कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील वळीवडे या छोट्या खेडेगावा त्यांचा जन्म झाला. शारदाबाई पवार या अतिशय र्तृत्ववान व्यक्तीमत्वाच्या होत्या. संसाराचा गाडा अतिशय समर्थपणे निभावताना मुला-मुलींना उच्चशिक्षण घेण्यास प्रवृत्त केले. त्यांनी कधीही मुलगा, मुलगी असा भेदाभेद केला नाही. मुलींना जीवनाभिमु शिक्षण मिळावे, ही त्यांची इच्छा होती. त्यासाठी त्या धडपडत होत्या. शारदाबाईंनी पुण्या शिक्षणासाठी न्यायमूर्ती रानडे यांच्या सेवासदनमध्ये प्रवेश घेतला. या ठिकाणी सर्व प्रकारचे कौशल्य त्यांना मिळाले. पवार कुटुंबामध्ये आल्यानंतर मूर्तीमंत जिद्द बाळगून आलेल्या आणि त्यामध्ये आपले जीवन व्यति करणाऱ्या शारदाबाई यांच्या जिद्दीमुळेच मला वकीलीची सनद काढणे शक्य झाले. शारदाबाई आणि गोविंदराव पवार दोघेही कर्तबगार होते. शारदाबाई पवार यांची ओळख केवळ शरद पवारांची आई अशी करुन देणे म्हणजे त्यांच्या अफाट कर्तृत्वावर अन्याय केल्यासारखे होईल. मुलांच्या जडणघडणीत त्यांनी जातीपातीचा कोणताही स्पर्श हो दिला नाही, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय मनोगता कुलगुरु डॉ. देवानंद शिंदे म्हणाले, शारदाबाई गोविंदराव पवार अध्यासन हे मातृशक्ती, स्त्रीशक्तीचे प्रतिनिधीत्व करणारे केंद्र आहे. १९३८ साली कै.श्रीमती शारदाबाई पवार सामाजिक क्षेत्रा आल्या. त्यावेळी सामाजिक, आर्थिक, मानसिक पातळीवर संघर्ष करीत असताना शारदाबाईंनी मोठ्या दूरदृष्टीने प्रशासकीय कामकाज केले. येणाऱ्या काळा प्रशासनाती स्त्रियांचा सहभाग वाढविणे ही काळाची गरज आहे. समाजातील विविध क्षेत्रा परिवर्तन आणावयाचे असेल तर स्त्रियांचा कृतीशील सहभाग असणे आवश्यक आहे. स्त्रीही ज्ञानपीठ असते. हे ज्ञान अनुभवातून मिळविलेले असते. अंतिमत: संस्कारातून आपले मूल या देशाचे एक सक्षम विचार करणारे जबाबदार नागरिक व्हावे, या हेतूने त्या कार्यरत असतात.
यावेळी बुबनाळ येथील महिला ग्रामपंचायतीच्या सरपंच आस्मा जमादार, उपसरपंच सोनाली शहापुरे यांच्यासह सर्व सदस्य महिलांचा कुलगुरू डॉ. शिंदे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. त्याचप्रमाणे त्यांच्या अनुभव कथनाचा कार्यक्रमही यावेळी झाला.
अध्यासनाच्या समन्वयक डॉ.भारती पाटील यांनी प्रास्ताविक केले. शीतल भोसले यांनी सूत्रसंचालन केले तर कविता ड्राळे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांच्यासह विद्यापीठातील विविध अधिविभागातील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.