विद्यापीठातील ‘इट राइट मिलेट
मेला’स तरुणाईसह
नागरिकांचा उत्साही प्रतिसाद
|
शिवाजी विद्यापीठात 'इट राइट मिलेट मेला'अंतर्गत आयोजित विविध उपक्रमांचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. इरान्ना उडचान, डॉ. एस.एन. सपली, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, देवदत्त जोशी, डॉ. के.यू. मेथेकर, श्रीमती के.के. जिथा, डॉ. सुहासिनी पाटील, डॉ. महादेव देशमुख आदी. |
|
शिवाजी विद्यापीठात 'इट राइट मिलेट मेला'अंतर्गत आयोजित भरडधान्य पदार्थ विक्री व प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आदी. |
|
शिवाजी विद्यापीठात 'इट राइट मिलेट मेला'अंतर्गत आयोजित भरडधान्य पदार्थ विक्री व प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आदी. |
|
शिवाजी विद्यापीठात 'इट राइट मिलेट मेला'अंतर्गत मनोरंजक ज्ञानखेळांची माहिती घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
कोल्हापूर, दि. २८ ऑगस्ट: भरडधान्य पदार्थ
विक्री व प्रदर्शनातून विद्यार्थ्यांमधील नव-उद्योजक होण्याची क्षमता सामोरी आलेली
आहे. हे क्षेत्र संधी मानून यामध्ये तरुणांनी करिअर करावे, असे आवाहन शिवाजी
विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले.
केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या भारतीय अन्न सुरक्षा व मानक
प्राधिकरण (एफ.एस.एस.ए.आय.-पश्चिम विभाग), शिवाजी विद्यापीठ, ज्युबिलंट फूड्स
प्रा.लि. (डॉमिनोज्) आणि परफेट्टी व्हॅन मिले यांच्या संयुक्त विद्यमाने
आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्षानिमित्त आज विद्यापीठात ‘इट राईट मिलेट मेला’ या एकदिवसीय उपक्रमांतर्गत भरडधान्य पदार्थ विक्री व
प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते व
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. त्यावेळी ते बोलत
होते.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, शारिरिक व मानसिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी युवकांनी स्थानिक भरडधान्यांचा
अवलंब आपल्या आहारामध्ये करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. विद्यापीठातील या
प्रदर्शनामुळे
विद्यार्थ्यांना नव-उद्योजक बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली
आहे. भारतीय भरडधान्यांचे महत्त्व जाणून शेतकर्यांनी नगदी पिकांच्या मागे न लागता ही
पारंपरिक पिके घेऊन देश सुजलाम् सुफलाम् करावा, यासाठी तरुणांनी
प्रयत्न करावेत. पालकांनीही या धान्यांचे वेगवेगळे पोषक व चविष्ट पदार्थ बनवून
मुलांना द्यावेत. जेणेकरून मुले ‘जंक फूड’च्या मागे लागून शरीराची हानी करून
घेणार नाहीत.
यावेळी कुलगुरूंसह सर्व
मान्यवरांनी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात ‘इट राइट मिलेट मेला’च्या अंतर्गत सुरू असलेल्या सर्व
उपक्रमांची फिरून पाहणी केली. विद्यार्थ्यांनी बनविलेल्या विविध पाककृती पाहून
त्यांनी त्यांच्या कल्पकतेची स्तुती केली. ही कल्पकता एका दिवसापुरती न ठेवता
त्याचे व्यापक रोजगार संधीत रुपांतर करण्याचे लक्ष्य बाळगण्याचे आवाहन त्यांनी
केले.
यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी
पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व
व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा
अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, एफ.एस.एस.ए.आय.च्या पश्चिम विभागाच्या सहसंचालक
श्रीमती के.के. जिथा, उपसंचालक डॉ. के.यू. मेथेकर, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ.
एस.एन. सपली, डॉ. प्रकाश राऊत, व्यवस्थापन परिषद सदस्य सिद्धार्थ शिंदे, फूड
सायन्स अँन्ड टेक्नॉलॉजीचे विभाग प्रमुख डॉ. पी.डी. पाटील, समन्वयक डॉ. इराण्णा
उडचान, एफ.एस.एस.ए.आय.च्या सहाय्यक संचालक ज्योती हर्णे, तांत्रिक संचालक देवांशी
चावला यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
‘डॉमिनोज्’चा भरडधान्यांचा पिझ्झा
यावेळी ज्युबिलंट फूड्सचे व्हाईस प्रेसिडेंट (क्वालिटी एश्यूरन्स) देवेंद्र
यादव यांनी पिझ्झासाठी जगप्रसिद्ध असणारा ‘डॉमिनोज्’ आज भरडधान्यांपासून बनविलेला
पिझ्झा खास तयार करून सादर करीत असल्याचे सांगितले. त्याचा तरुणांनी आस्वाद
घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
विद्यार्थ्यांसाठी भरडधान्याधारित ज्ञानखेळ
या मेळाव्यामध्ये उपस्थित विद्यार्थ्यांसाठी भरडधान्यांवर आधारित विविध
मनोरंजक आणि ज्ञानवर्धक खेळांचे आयोजनही करण्यात आले होते. यामध्ये आरोग्याची
सापशिडी आणि दोरीउड्या आदी खेळांचा समावेश होता.
विद्यार्थ्यांनी बनविल्या विविध भरडधान्य पाककृती
यावेळी विद्यापीठाच्या अन्न विज्ञान व तंत्रज्ञान अधिविभागातील
विद्यार्थ्यांसह परिसरातील विविध अन्नविज्ञान महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी भरडधान्यांपासून
अनेकविध कल्पक पाककृती सादर केल्या. बारामती येथील महाविद्यालयातील
विद्यार्थी-विद्यार्थिनींनीही आपले स्टॉल प्रदर्शनात मांडले होते. भरडधान्य भेळ, शेवचाट, मिश्र भरडधान्यांचे
मफिन्स, बाजरीची लापशी, पनीर, भरड टिक्की, खाकरा, उपवासाचा डोसा, नाचणीची अंबिल, नाचणीचे गुलाबजाम, नाचणी मिल्कशेक, भरडधान्य मिश्र कोल्ड
कॉफी, कटलेट, भरडधान्य ढोकळा, भरड धान्य मोदक, खीर, प्रोसो कढाई पुलाव, इलेट (इटालियन+मिलेट) नुडल्स, पॅन केक्स, इन्स्टंट बाजरी खीर, बाजरी स्वीट मोमोज्, नाचणी मोमोज्, नाचणीची इडली, बाजरीचे थालीपीठ, मिश्र भरडधान्य नाचोज् व भेळ, बाजरी खाकरा चाट, मिश्र भरडधान्य कोंथीबीर वडी, नाचणीचे चोको केक, बाजरी भेळ, बाजरी कोक चॅट, बाजरी आणि
राजगिरा-वरीचा मठ्ठा, बाजरीची स्मुदी, नाचणीची भाकरी, धपाटे, झुणका भाकर
इत्यादी पदार्थांचे स्टॉल होते. एकूण ३५ स्टॉलवर या पदार्थांची चव चाखण्यासाठी
खाद्यरसिकांची मोठी झुंबड उडाली होती.
त्याचप्रमाणे परिसरातील बचतगटांनाही भरडधान्यांसह पारंपरिक पदार्थ विक्री
करण्यासाठी १५ स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले होते. त्यांवर राजगिरा लाडू, शेंगदाणा चिक्की, खोबरे वडी, शेंगदाणा लाडू, तिखट पुरी , शेंगदाणा चटणी, शेंगदाणा पोळी, उडदाचे माडगं, नाचणी लाडू, उपवासाची मिसळ, उपवासाचे वरीचे थालीपिठ
आणि गुळाचा चहा इत्यादी
पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध होते.
विविध स्पर्धांना उत्तम प्रतिसाद
‘इट राइट मिलेट मेला’मध्ये आयोजित विविध स्पर्धांना
महाविद्यालयीन तसेच शालेय विद्यार्थ्यांचाही उत्तम प्रतिसाद लाभला. या विविध
स्पर्धांचे विजेते पुढीलप्रमाणे:-
भरडधान्यावर आधारित स्टॉल - प्रथम संघ – भक्ती
संजय पाटील, सय्यद उमर मोईन, अनिता शिवाजीराव राठोड, स्नेहल खंडू मोरे, अनुराधा
अनिल पाटील, द्वितीय संघ - संदेश जितेंद्र अणुस्करे, आदित्य मिलींद बर्वे, तेजस्विनी
रविंद्र शिंदे, ऋषीकेश रविंद्र भुले, तृतीय संघ - केतकी संतोष लब्दे, सुनिधी विनोद
कुलकर्णी, साक्षी मिनार यादव, सोनिया सुरेश पाटील, मंजू राजेश खांडोलकर.
छायाचित्रण स्पर्धा: प्रथम - प्रथम सर्वदे, द्वितीय – ओंकार अनिल म्हेत्रे, तृतीय - आदित्य सी. पोटे
तांत्रिक पोस्टर प्रदर्शन: प्रथम - आसावरी रामकृष्ण ठाकरे, द्वितीय - किरण संदीप अथणे, तृतीय
- ऋतुजा विवेक पाटील आणि अनिता अरूण कार्वेकर
पोस्टर निर्मिती (नववी ते बारावी गट-
मिलेट माईंडफुलनेस): प्रथम - अनुष्का शिंदे, (श्री. वसंतराव चौगुले
हायस्कूल, कोल्हापूर), द्वितीय - रूद्र कांथणे (कोल्हापूर पब्लिक स्कूल), तृतीय -
अनन्या रूद्र कुंभार (श्री वसंतराव चौगुले
हायस्कूल).
युजी/पीजी/पीएचडी मिलेटस् (भारतातील
कुपोषणाला पूर्णविराम): प्रथम - सिमीन सुहेल
बागवान (कमला कॉलेज, कोल्हापूर), द्वितीय - श्रावणी हिरानाथ सावंत (बी.टेक.- फुडटेक), तृतीय - ऋतुजा संजय वाडकर (कमला कॉलेज, कोल्हापूर)