Wednesday, 31 August 2016

विद्यापीठाच्या सुरक्षा ताफ्यात नूतन वाहन दाखल






कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाच्या ताफ्यात आज एक नवीन वाहन दाखल झाले. कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी स्वतःच हे वाहन चालवून त्याची चाचणी घेतली.
शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागात पेट्रोलिंगसाठी एक आधुनिक मोटार कार्यरत आहे. तथापि, त्या वाहनाची निर्लेखनाची मुदत जवळ आली असल्याने नवीन वाहन घेण्याची आवश्यकता होती. त्यानुसार आज एक नवीन जीप विद्यापीठाच्या वाहन ताफ्यात दाखल झाली. या प्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड, सुरक्षा विभागाचे उपकुलसचिव संजय कुबल, डॉ. गिरीश कुलकर्णी, विभा अंत्रेडी, सुरक्षा अधिकारी वसंत एकले यांच्यासह अधिकारी व सेवक उपस्थित होते.
दरम्यान, कुलगुरू डॉ. शिंदे यांनी नवीन वाहनाचे सारथ्य स्वतः करीत अधिकाऱ्यांना विद्यापीठ परिसराची छोटी सैर घडविली.

'ओळखपत्र बंधनकारक'
विद्यापीठाची सुरक्षा व्यवस्था कडक करण्याचे निर्देश कुलगुरू डॉ. शिंदे यांनी काल अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. त्यानुसार विद्यापीठातील प्रत्येक शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी यांना विद्यापीठ परिसरात वावरताना सोबत ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीची सुरवात कुलगुरूंनी स्वतःपासूनच केली. कुलगुरूंच्या गळ्यातील ओळखपत्र पाहून या आदेशाचे गांभीर्य पटून अन्य कर्मचाऱ्यांनीही आपापली ओळखपत्रे गळ्यात अडकवली.

'जलयुक्त विद्यापीठ' उपक्रम आदर्शवत: जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी



 शिवाजी विद्यापीठाच्या भाषा भवन तलावाची कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्यासमवेत पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार.


 शिवाजी विद्यापीठातील पुनरुज्जिवित शिंदे विहीरीनजीक जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार.

 शिवाजी विद्यापीठात निर्माण करण्यात आलेल्या शेततळ्यांची  कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व अन्य अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार.


 शिवाजी विद्यापीठाच्या संगीत अधिविभागाशेजारच्या तलावाची कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे व अन्य अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करताना जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार.

कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांनी शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील भव्य शिवपुतळ्याचे दर्शन घेतले.

शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात बहरलेल्या पुष्पवैभवात रमलेले कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, कोल्हापूर महापालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार. सोबत कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे व परीक्षा नियंत्रक महेश काकडे.

कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राबविलेली 'जलयुक्त आवार' ही मोहीम अत्यंत आदर्शवत आहे. या महत्त्वपूर्ण उपक्रमासाठी जिल्हा प्रशासनाचे विद्यापीठाला नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी आज येथे केले.
एका बैठकीच्या निमित्ताने जिल्हाधिकारी डॉ. सैनी यांच्यासह कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार विद्यापीठात आले होते. बैठकीनंतर त्यांनी विद्यापीठाने केलेल्या जलसंधारण कामे पाहण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे आदी अधिकाऱ्यांसह त्यांनी विद्यापीठ कॅम्पसमधील जलसंधारण कामांची पाहणी केली. यामध्ये वि.स. खांडेकर भाषा भवनानजीकचा तलाव, नव्याने निर्माण केलेली तीन शेततळी, पूर्णतः पुनरुज्जिवित केलेली शिंदे विहीर आणि संगीत अधिविभागाशेजारचा तलाव या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. सर्वच अधिकाऱ्यांनी विद्यापीठाला लाभलेल्या निसर्गसौंदर्याचे आणि ते जपण्यासाठी विद्यापीठ करत असलेल्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले.

दरम्यान, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाशेजारच्या मैदानावर सध्या विविधरंगी पुष्पवैभव बहरले आहे. ती फुले पाहून या अधिकाऱ्यांनाही या फुलांचे जवळून दर्शन घेण्याचा मोह आवरला नाही. कॅम्पसभर पसरलेली रंगीबेरंगी फुलांची पखरण पाहून साऱ्यांचेच मन प्रसन्न झाले. या नैसर्गिक वातावरणात सर्वच अधिकाऱ्यांनी आनंदाचे दोन क्षण अनुभवले. येथे छायाचित्र काढून घेण्याचा मोह त्यांना आवरला नाही.
त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचे दर्शन घेताना पुन्हा हे सर्वच अधिकारी भारावून गेले. या शिवपुतळ्याचे इतक्या जवळून दर्शन घेताना अंगावर रोमांच उभे राहिल्याची भावना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

विद्यापीठात लवकरच पथदर्शी जैव ऊर्जा प्रकल्प: कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे






कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठात जैव-ऊर्जा व कचरा व्यवस्थापनावर आधारित आधुनिक पथदर्शी प्रकल्प लवकरच उभारण्यात येईल. त्या दृष्टीने येत्या १५ दिवसांत अंतिम प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी आज येथे दिले.
इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (मुंबई) आणि चाणक्य इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक लीडरशीप (सीआयपीएल, मुंबई) यांच्या सहकार्याने शिवाजी विद्यापीठात आज 'जैविक ऊर्जा व कचरा व्यवस्थापन'विषयक विशेष सादरीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
या सादरीकरणास जिल्हाधिकारी अमित सैनी, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुणाल खेमनार यांच्यासह प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, बीसीयुडी संचालक डॉ. डी.आर. मोरे, परीक्षा नियंत्रक महेश काकडे, डॉ. ज्योती जाधव, डॉ. पी.डी. राऊत, डॉ. गिरीश कुलकर्णी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. शिंदे म्हणाले, आधुनिक ज्ञान व तंत्रज्ञानाच्या आधारावर पर्यावरण सुसंगत व प्रदूषणविरहित प्रकल्पांची उभारणी करणे ही काळाची गरज आहे. त्या अनुषंगाने स्थानिक उद्योगांना अद्यावत ज्ञान व तंत्रज्ञान यांच्यासंदर्भात अवगत करण्याबरोबरच त्यांच्याशी संवाद वाढविण्यासाठी विद्यापीठ सातत्याने विविध उपक्रम राबवित आहे. उद्योगांना उपयुक्त ठरेल, असे इनोव्हेशन ॲन्ड इनक्युबेशन तंत्रज्ञान सेंटर विद्यापीठात असावे, या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. समाजाच्या व्यापक लाभासाठी नवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने असे प्रकल्प राबविण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. त्याचा विद्यापीठ परिक्षेत्रातील स्थानिक उद्योगांना लाभ होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी सीआयपीएलचे संचालक रणजीत शेट्टी यांनी 'ग्रीन वेस्ट टू सॉलिड फ्युएल टू पॉवर' या विषयावर सादरीकरण केले. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठात सीआयपीएल संस्थात्मक सामाजिक दायित्वाच्या (सी.एस.आर.) अंतर्गत पथदर्शी प्रकल्प उभा करून देईल. विद्यापीठातील कचरा, जैविक कचरा यामध्ये वापरण्यात येईल. या प्रकल्पात विद्यापीठाची नॉलेज पार्टनर म्हणून महत्त्वाची भूमिका राहील.
ते म्हणाले, सीआयपीएलच्या माध्यमातून सुप्रशासनाशी संबंधित मार्गदर्शन करण्याबरोबरच कचऱ्यातून संपत्तीची निर्मिती करण्याचे ध्येय बाळगून अनेक प्रकारचे संशोधन करण्यात येत आहे. विशेषतः खेड्यांमध्ये चुलीच्या धुरामुळे महिलांना आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी प्रदूषणविरहित आणि किफायती तंत्रज्ञान निर्माण करण्यात येत आहे. यासाठी त्या तंत्रज्ञानाची उपयुक्तता, आर्थिकदृष्ट्या किफायती, पर्यावरणपूरक आणि सामाजिकदृष्ट्या स्वीकारार्हता या चार गोष्टी पायाभूत महत्त्वाच्या ठरणार आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी हे 'झिरो वेस्ट' तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरणारे आहे.
सुरवातीला डॉ. ज्योती जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.

शिवाजी विद्यापीठात मतदार जागृती रॅली



सुदृढ लोकशाहीसाठी मतदार नोंदणी करा
- डॉ. व्ही.एन. शिंदे यांचे आवाहन

कोल्हापूर, दि. ३१ ऑगस्ट: युवा विद्यार्थ्यांनी भारतीय लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करावे, तसेच ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही मतदार नोंदणी केलेली नाही, त्यांनी विद्यापीठाच्या नवमतदार नोंदणी कक्षाद्वारे तातडीने त्यासाठी अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी काल येथे केले
शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अधिविभागाद्वारे काल विद्यापीठ परिसरातून मतदार जागृती फेरी काढण्यात आली. त्यावेळी मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून नवमतदार जनजागृतीच्या कामी विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश विद्यापीठे आणि महाविद्यालयांना देण्यात आले आहेत. त्याअंतर्गत शिवाजी विद्यापीठात राज्यशास्त्र अधिविभागातर्फे आज नवमतदार जनजागृती फेरी काढण्यात आली. विद्यार्थ्यांनी सुदृढ लोकशाहीसाठी मतदार नोंदणी करण्याचे तसेच मतदान करण्याचे आवाहन करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.
विद्यापीठाचे नोडल अधिकारी डॉ. भगवान माने, अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, डॉ. भारती पाटील, डॉ. वासंती रासम यांच्या मार्गदर्शनाखाली रॅली काढण्यात आली. विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसमोर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक डॉ. डी.के. गायकवाड यांनी रॅलीचे स्वागत केले. याठिकाणी पुन्हा एकदा मतदार नोंदणीबाबत आवाहन करणाऱ्या घोषणा देण्यात येऊन रॅली विसर्जित करण्यात आली.