Saturday, 30 January 2021

‘मूलद्रव्यांची दुनिया’ विविध भाषांत अनुवादित व्हावे: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले साहित्य पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठातर्फे उपकुलसचिव व विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा सत्कार करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील. सोबत कुलसचिव डॉ.विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे.
 
शिवाजी विद्यापीठात उपकुलसचिव व विज्ञान लेखक डॉ. व्ही.एन. शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासमवेत अधिकारी वर्ग.


शासनाच्या साहित्य पुरस्काराबद्दल विद्यापीठात डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा गौरव

कोल्हापूर, दि. ३० जानेवारी: ‘आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाचा अनुवाद विविध प्रादेशिक भाषांत होऊन सर्वच भाषांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी काल सायंकाळी येथे व्यक्त केली.

शिवाजी विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्या आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा सन २०१९साठी उत्कृष्ट विज्ञान ग्रंथ म्हणून महात्मा जोतिराव फुले पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त डॉ. शिंदे यांचा शिवाजी विद्यापीठातर्फे गौरव करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विज्ञान लेखन करीत असताना त्यामधील वस्तुनिष्ठतेला कोणताही धक्का न लावता अत्यंत ओघवत्या गोष्टीरुप पद्धतीने समजावून सांगण्याची शैली डॉ. शिंदे यांना साधली आहे. त्यामुळे वाचकाला ते आपल्याशेजारी बसून सांगताहेत की काय, असा भास निर्माण होतो. त्यामुळे अवघड विषय समजावून घेणे सोपे जातेच, शिवाय ते कायमस्वरुपी लक्षात राहते. आवर्तसारणीसारखा क्लिष्ट विषयही त्यांच्या या शैलीमुळे अत्यंत वाचनीय झाला आहे. शिक्षक, विद्यार्थी, पालकांसह सर्वसामान्य वाचकालाही हा विषय रुक्ष वाटणार नाही, तर विज्ञानाची गोडीच निर्माण होईल, असा त्यांनी मांडला आहे. हे पुस्तक हिंदी, इंग्रजीसह कन्नड, तेलगू, तमीळ आदी विविध भारतीय भाषांतून अनुवादित झाल्यास देशातील प्रादेशिक विद्यार्थ्यांचीही मोठी सोय होईल. त्यांनी असेच लिहीते राहावे आणि स्वतःबरोबरच शिवाजी विद्यापीठाचाही लौकिक वृद्धिंगत करावा, अशा सदिच्छा त्यांनी व्यक्त केल्या.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, डॉ. शिंदे यांच्यात विद्यार्थी दशेपासूनच सातत्याने काही तरी वेगळे करीत राहण्याची ऊर्मी आहे. ती आजतागायत अबाधित आहे, याचा आनंद व अभिमान वाटतो. त्यांची लेखन व निवेदन शैली अत्यंत रंजक असून वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद त्यांच्या लेखनात आहे. या पुढील काळातही त्यांनी विज्ञान लेखनातील आपली वाटचाल जोमाने चालू ठेवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सत्काराला उत्तरादाखल बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, वाचन आणि लेखनाच्या प्रेरणा माझ्यात जागृत करण्याचे काम माजी कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी केले. तेव्हापासून विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून माझ्या प्रत्येक पुस्तकाचे लेखन केले. एका लेखापासून सुरू झालेला प्रवास केवळ विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेपोटी आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया या पुस्तकापर्यंत येऊन ठेपला. या पुस्तकाला महाराष्ट्र शासनाचा महात्मा फुले यांच्या नावे देण्यात येणारा पुरस्कार लाभला, ही माझ्यासाठी अत्यंत समाधानाची व जबाबदारीची जाणीव करून देणारी बाब आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, ग्रंथ, विद्यापीठाचे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन डॉ. शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक गजानन पळसे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, जनसंपर्क अधिकारी डॉ. आलोक जत्राटकर यांनी अभिनंदनपर मनोगते व्यक्त केली. यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, ज्येष्ठ कवी संजय कृष्णाजी पाटील, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. भारती पाटील यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

डॉ. व्ही.एन. शिंदे यांचा लेखन प्रवास

डॉ. शिंदे यांनी एककांचे मानकरी, असे घडले भारतीय शास्त्रज्ञ, हिरव्या बोटांचे किमयागार आणि आवर्तसारणी व मूलद्रव्यांची दुनिया ही पुस्तके लिहीली आहेत. क्रायोजेनिक्स अँड इट्स एप्लीकेशन्स या पुस्तकाचे सहसंपादन व सक्सेस गाईड फॉर एमएचसीईटी या पुस्तकाचे सहलेखन केले आहे. एककांचे मानकरी हे पुस्तक पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एम.ए. भाग-१ या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आले आहे. डॉ. शिंदे यांनी विविध वृत्तपत्रांतून स्तंभलेखन केले आहे. अनेक दिवाळी अंकातून लिहीले आहे. ब्लॉगलेखनही ते नियमितपणे करीत असतात. त्यांच्या कार्यासाठी अनेक पुरस्कारही लाभले आहेत. त्यामध्ये क्रायोजेनिक्स विषयातील संशोधनासाठी प्रा. एम्.सी. जोशी पुरस्काराचे सहमानकरी, वसुंधरा पर्यावरण संरक्षण व संशोधन संस्था, वारणानगर यांचा राज्यस्तरीय वसुंधरा निसर्ग मित्र पुरस्कार, एककांचे मानकरी या पुस्तकाला दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेचा प्रतिष्ठेचा कृ. गो. सुर्यवंशी पुरस्कार तसेच मिरजेच्या चैतन्य शब्दांगण संस्थेचा पुरस्कार यांचा समावेश आहे.

 

Friday, 29 January 2021

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांकडून

स्तनांच्या कर्करोगावरील औषधाबाबत महत्त्वपूर्ण संशोधन

संशोधनास भारतीय पेटंट प्राप्त

 

डॉ. गजानन राशिनकर                           डॉ. प्रकाश बनसोडे


 

सोने, प्लॅटिनम व चांदी यांची संयुगे (वरुन खाली या क्रमाने)

कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी स्तनांच्या कर्करोगाबाबत सर्वसामान्य पेशींना अपाय न करता केवळ कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करणाऱ्या औषधाविषयी यशस्वी संशोधन केले असून नुकतेच त्याचे भारतीय पेटंट या शास्त्रज्ञांना प्राप्त झाले आहे. रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. गजानन राशिनकर आणि त्यांचे विद्यार्थी डॉ. प्रकाश बनसोडे यांनी ही बहुमोल कामगिरी केली आहे.

या संशोधनाविषयी माहिती देताना डॉ. गजानन राशिनकर म्हणाले, गेल्या काही दशकांमध्ये जगभरात तसेच भारतातही कर्करोगाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. विशेषतः महिलांमधील स्तनांच्या कर्करोगाचे प्रमाण खूप वाढले आहे. या कर्करोगामुळे महिलांचा जागतिक मृत्यूदर अधिक आहे. स्तनांचा कर्करोग हा जटील आजार आहे़. सदर कर्करोगाच्या उपचारासाठी सर्जरी, केमोथेरपी, रेडिओथेरपी, अँटीबॉडीज अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती विकसित केल्या आहेत; परंतु या उपचार पद्धतींमध्ये रुग्णाला उपचारादरम्यान होणाऱ्या दुष्परिणामांना (साईड इफेक्ट्स) सामोरे जावे लागते़. तसेच  कर्करोगावरील औषधांमध्ये  आढळणाऱ्या प्रतिरोधामुळे (ड्रग रेजिस्टन्स)  सातत्याने नवनवीन  संशोधनातून विकसित केलेल्या  औषधांची गरज भासत असते. शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागामध्ये यासंदर्भात महत्त्वपूर्ण संशोधन झाले असून नुकतेच या संशोधनाचे पेटंट प्राप्त झाले आहे.

काय आहे संशोधन?

डॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बनसोडे यांनी "सिंथेटिक स्टडीज इन न्यू अँटीकॅन्सर थेराप्युटिक्स" या विषयावर पी.एच.डी.चे संशोधन केले. कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये चांदी, सोने व प्लॅटिनम या राजधातूंना  त्यांच्या विशिष्ट  जैविक  गुणधर्मांमुळे विशेष महत्व आहे; परंतु या धातूंचे सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतात. तसेच कर्करोगावरील औषधेही सामान्य पेशी व कर्करोगाच्या पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरतात. यामुळे  रुग्णांना केमोथेरपी उपचारांदरम्यान या औषधांच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. स्तनांच्या कर्करोगावर उपयुक्त टॅमॉक्सीफेन या औषधाचे दुष्परिणाम कमी करण्यासाठी व उपचाराची उपयुक्तता वाढविण्यासाठी फेरोसीन हा घटक वापरून फेरोसीफेन हे उपयुक्त औषध तयार करण्यात संशोधकांना यश आले आहे़. फेरोसिन हा घटक मानवी शरीरास अपायकारक नाही,  हे या संशोधनातून सिद्ध झाले आहे़. त्यामुळे फेरोसीनचा वापर करून स्तनांच्या कर्करोगावर अत्यंत प्रभावी व सुरक्षित औषध विकसित करता येईल  या हेतूने डॉ. बनसोडे यांनी डॉ. राशिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली "फेरोसीन लेबल्ड एन-हेटरोसायक्लिक कारबिन कॉम्प्लेक्स ऑफ सिल्वर, गोल्ड अँड प्लॅटिनम" या विषयावर संशोधन पूर्ण केले. सदर संशोधनात त्यांनी फेरोसीन तसेच एन- हेटरोसायक्लिक कारबिन या घटकांचा वापर करून चांदी, सोने व प्लॅटिनम यांची एकूण दहा संयुगे (कॉम्प्लेक्स) प्रयोगशाळेत तयार केली. रसायनशास्त्रातील विविध तंत्रज्ञानाचा वापर करून सदर संयुगांची रचना अभ्यासली़. टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल यांच्या ॲडव्हान्स्ड सेंटर कॅन्सर ट्रीटमेंट, रिसर्च अँड एज्युकेशन, नवी मुंबई  येथे स्तनांच्या कर्करोगाच्या पेशींवर या संयुगांची चाचणी करण्यात आली. या चाचणीच्या अहवालात असे आढळून आले की, ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात; परंतु शरीरातील सामान्य पेशींना मात्र अपाय करीत नाहीत. इतकी ती सुरक्षित आहेत़.

संशोधनाला भारतीय पेटंट प्रदान

डॉ. राशिनकर यांनी या महत्त्वपूर्ण संशोधनाची १४ मार्च २०१८ रोजी भारतीय पेटंटसाठी नोंदणी केली होती. विविध स्तरांवरील शास्त्रीय व पेटंट कायदे विषयक परीक्षणानंतर भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाने २२ जानेवारी २०२१ रोजी या संशोधनाचे पेटंट डॉ. गजानन राशिनकर व डॉ. प्रकाश बनसोडे यांना प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.

कर्करोगग्रस्त महिलांसाठी वरदान: कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के

शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी स्तनांच्या कर्करोगाच्या अनुषंगाने संशोधित केलेले संयुग हे महिलांसाठी एक प्रकारे वरदानच आहे. या आजाराने ग्रस्त महिलांचे प्रमाण पाहता शरीरातील सर्वसामान्य पेशींना अपाय न पोहोचविता केवळ कर्करोगग्रस्त पेशींवर प्रभाव दाखविणारे हे औषध असल्याने कर्करोगावर अधिक जलदगतीने उपचार होण्याची शक्यता वाढली आहे. डॉ. राशिनकर, डॉ. बनसोडे आणि अधिविभाग प्रमुख डॉ. जी.एस. गोकावी यांचे या पेटंटप्राप्त संशोधनासाठी मनापासून अभिनंदन करतो, अशी प्रतिक्रिया कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केली.

 

Thursday, 28 January 2021

कवितेनं जगणं समृद्ध व्हावं: राजन गवस

 

शिवाजी विद्यापीठात ज्येष्ठ साहित्यिक राजन गवस यांच्या हस्ते पंडित आवळीकर पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यावेळी (डावीकडून) डॉ. गवस, सुप्रिया आवारे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, दिनकर मनवर, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, नामदेव कोळी, गणेश वसईकर, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. प्रकाश पवार.

पंडित आवळीकर पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना डॉ. राजन गवस

पंडित आवळीकर पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलताना डॉ. राजन गवस. सोबत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.


वसईकर, मनवर, आवारे, कोळी यांना पंडित आवळीकर काव्य पुरस्कार प्रदान

कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: कविता म्हणजे अक्षरांतून वाहणारे वारेच जणू. त्या वाऱ्याची एखादी झुळूक आपल्याही आत खोलवर पसरावी, रुजावी आणि त्या झुळुकेनं अवघं जगणं समृद्ध होऊन जायला हवं, असा तिचा परिणाम साधला जावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी आज येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रदान करण्यात येणाऱ्या पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के तर प्रमुख उपस्थितीत प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील होते.

शिवाजी विद्यापीठाचा मराठी अधिविभाग आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने साजऱ्या करण्यात आलेल्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचा समारोप समारंभ आणि पंडित आवळीकर काव्य पुरस्कार वितरण असा संयुक्त समारंभ आज विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झाला.

शिवाजी विद्यापीठाने मराठी भाषेत प्रसिद्ध होणाऱ्या सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहासाठी मराठी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक, समीक्षक पंडित आवळीकर यांच्या नावे पंडित आवळीकर काव्य पुरस्कार देण्याचे निश्चित केले आहे. त्यानुसार आवळीकर यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या देणगीमधून सदर पुरस्कार दोन वर्षातून एकदा देण्यात येतो. सन २०१४ ते २०२० या कालावधीतील एकूण चार काव्यसंग्रहांना एकाच वेळी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. सन २०१४-१५साठी गणेश आत्माराम वसईकर (मधल्या मध्ये), सन २०१६-१७ साठी दिनकर मनवर (अजूनही बरंच काही), सन २०१८-१९साठी सुप्रिया आवारे (न बांधल्या जाणाऱ्या घरात) आणि सन २०२०साठी नामदेव कोळी (काळोखाच्या कविता) यांना आज डॉ. राजन गवस यांच्या हस्ते पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोख रक्कम, शाल, श्रीफळ, प्रशस्तीपत्र आणि शिवाजी विद्यापीठाचे स्मृतिचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप आहे. परीक्षक म्हणून प्राचार्य डॉ. गोविंद काजरेकर (बांदा) आणि प्रा. नंदकुमार मोरे यांनी काम पाहिले.

यावेळी बोलताना डॉ. गवस म्हणाले, पंडित आवळीकर हे समीक्षक म्हणून नावाजलेले, पण ते मूळचे कवी होते. कवितेवर त्यांचे मनापासून प्रेम होते. त्यामुळे विद्यापीठाने त्यांच्या नावे पुरस्कार देण्याला वेगळा अर्थ आहे. आपले रोजचे जीवन गद्यप्राय जगण्याच्या नादात अगदी दगड बनून गेलेले असत्. मात्र कवितेसाठी द्रव मानसिकता फार महत्त्वाची असते. उत्तम कविता झरण्यासाठी कवींमध्ये ही द्रव मानसिकता असणे फार आवश्यक असते. संवेदनशीलता जागृत राखण्याचे काम ती करीत असते. ती जपणे अत्यंत गरजेचे असते.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कवीचं अंतर्मन आणि त्याच्या कवितेचे भावविश्व यांच्यात डोकावणे ही अवघड बाब असते. काव्यनिर्मितीतून सामाजिक जाणिवांच्या प्रेरणा जागृत राखण्याचे काम कवी करीत असतात. मराठी अधिविभागाने मराठी भाषा पंधरवड्याच्या निमित्ताने या पुरस्कारांसह अन्य राबविलेले उपक्रम हे अत्यंत सर्जनशील व म्हणून कौतुकास्पद आहेत. साहित्याच्या माध्यमातून सामाजिक संवेदना जागवण्याचे काम या उपक्रमांनी केले आहे.

प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील म्हणाले, कोणाही व्यक्तीने साहित्याच्या कोणत्याही परिभाषेद्वारे अभिव्यक्त होणे आवश्यक असते. मराठी विभागाने गेल्या १५ दिवसांत राबविलेले उपक्रम त्या दृष्टीने खूप महत्त्वाचे ठरले. यापुढील काळातही त्यांनी भाषा संवर्धनाचे असे उपक्रम राबवावेत.

यावेळी कवी गणेश वसईकर, दिनकर मनवर, सुप्रिया आवारे आणि नामदेव कोळी यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आपल्या कविता सादर करून उपस्थितांची मने जिंकली. अधिविभाग प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी परिचय करून दिला व आभार मानले. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, राज्यशास्त्र अधिविभागाचे डॉ. प्रकाश पवार, डॉ. पंकज पवार, कवी खलील मोमीन, वर्जेश सोळंकी, महेश लीला पंडित, बळवंत जेऊरकर यांच्यासह पंडित आवळीकर यांचे कुटुंबिय, विद्यार्थी आदी उपस्थित होते.

Tuesday, 26 January 2021

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात

 

शिवाजी विद्यापीठात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.


ध्वजवंदनानंतर उपस्थितांना शुभेच्छा देताना  कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य अधिकारी. 

ध्वजवंदनानंतर उपस्थितांना शुभेच्छा देताना  कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य अधिकारी.

प्रजासत्ताक दिनाच्या ध्वजवंदनानंतर सुरक्षा रक्षक पथकाकडून मानवंदना स्वीकारताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व अन्य अधिकारी.


कोल्हापूर, दि. २६ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

सकाळी ठीक आठ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. ध्वजवंदनापूर्वी संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, परीक्षा संचालक जी.आर. पळसे, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, विद्यार्थी कल्याण संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, आयक्यूएसीचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, राष्ट्रीय येवा योजना समन्वयक अभय जायभाये यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. चहापानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Monday, 25 January 2021

‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ उपक्रमांतर्गत

एका दिवसात २७० प्रकरणे निकाली

 

‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबिटकर आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिकचे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यात सीमाभागात अभ्यास केंद्रे व शैक्षणिक संकुल उभारण्याबाबत सामंजस्य करार झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर आणि मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश भोंडे यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी (डावीकडून) आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबिटकर, प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. 

मंत्री उदय सामंत यांचा अभिनव उपक्रमामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य

कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आज झालेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर या उपक्रमांतर्गत उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांकडून ऑनलाईन व ऑफलाईन स्वरुपात सुमारे १४२५ अर्जप्राप्त झाले होते. यापैकी ३९४ जणांना आपले प्रश्न मांडण्याची संधी मिळाली. त्यापैकी २७० प्रकरणे आज दिवसभरात निकाली काढण्यात आली, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कोविड-१९ साथीनंतर पुन्हा महाविद्यालये सुरू करण्यासाठी येत्या आठवड्यात आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या बैठकीमार्फत मा. मुख्यमंत्री यांच्या सल्ल्यानुसार निर्णय घेण्यात येईल, अशी माहितीही मंत्री श्री. सामंत यांनी यावेळी दिली.

विद्यार्थ्यांसह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्था यांचे विविध स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री सामंत यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात हा अभिनव उपक्रम घोषित केला. या उपक्रमाची सुरवात आज कोल्हापूर येथे शिवाजी विद्यापीठातून झाली. सकाळी साधारण साडेअकरापासून ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत म्हणजे सुमारे सहा तास मंत्री श्री. सामंत यांनी या सर्व घटकांच्या समस्या एक क्षणभरही मंच न सोडता मनापासून ऐकून घेतल्या आणि त्या समस्यांवर योग्य तोडगा सुचविण्याचे काम केले. त्यांच्या अर्जांवर स्वहस्ताक्षरात शेरे देऊन ते संबंधित यंत्रणांकडे पुढील कार्यवाहीसाठी तत्काळ सुपूर्द केले. त्यामुळे सभागृहातून बाहेर पडताना या सर्वच घटकांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होते. ज्यांच्या समस्यांमध्ये तांत्रिक अडचणी होत्या, त्यांनाही त्याविषयी खुलासेवार समजावून सांगून दिलासा देण्याचे काम मंत्री श्री. सामंत यांनी केले.

या अत्यंत महत्त्वपूर्ण उपक्रमानंतर त्याविषयी माहिती देण्याकरिता मंत्री श्री. सामंत यांनी सायंकाळी पत्रकार परिषदेस संबोधित केले. ते म्हणाले, या उपक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने वर्षभरातील एकूण ३६३५ प्रकरणांमधील आजच्या २७०सह एकूण ३०३४ प्रकरणे मार्गी लावण्यात यश आले आहे. अनुकंपा तत्त्वावरील प्रलंबित १७ पैकी सात प्रकरणे आज सकारात्मकपणे निकाली निघाली. त्यांना आज नियुक्ती आदेश देण्यात आले. शासनमान्य ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांच्या मागण्या सकारात्मक पद्धतीने सोडवित असताना ऑनलाईन वेतन थेट कर्मचाऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या योजनेचा प्रारंभ कोल्हापूर जिल्ह्यापासून करण्यात आला. त्यांना शासकीय ओळखपत्रे देण्याच्या उपक्रमाचा प्रारंभही येथून करण्यात आला.

सीमाभागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठीच्या योजनांविषयी सांगताना मंत्री श्री. सामंत म्हणाले, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची तीन अभ्यास केंद्रे सीमाभागात सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. आर.बी. माडखोलकर महाविद्यालय, चंदगड, म्हैसाळ महाविद्यालय, म्हैसाळ, ता. मिरज, जि. सांगली आणि कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, उमदी, ता. जत, जि. सांगली या तीन महाविद्यालयांच्या अभ्यास केंद्र मान्यतेची पत्रे संबंधित प्राचार्यांना देण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे शिनोळी (ता. चंदगड) या सीमाभागात बाळासाहेब ठाकरे शैक्षणिक संकुल उभारण्यासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाकडून पाच कोटी रुपये देण्याचेही प्रस्तावित करण्यात आले आहे. त्या संदर्भात शिवाजी विद्यापीठ व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक यांच्या दरम्यान सामंजस्य करार होतो आहे, ही आनंदाची बाब आहे. शासकीय तंत्रनिकेतनमध्ये ज्वेलरी अभ्यासक्रम हा नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यास आज मंजुरी देण्यात आली. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठात शिवभोजन थाळी आणि रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे.

 

 शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व्यवस्थेमुळे कामकाज सुरळित

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा हा उपक्रम जाहीर झाल्यानंतर नागरिकांची निवेदने दाखल करून घेण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने विशेष पोर्टल निर्माण केले. या पोर्टलमुळे काम सुरळित व गतीने झाले. विद्यापीठाचे हे पोर्टल उपयुक्त सिद्ध झाले असून अन्य विभागातील कार्यक्रमांसाठीही त्याचा वापर जरुर करू, असे कौतुकोद्गार मंत्री श्री. सामंत यांनी काढले.

विद्यापीठाच्या पोर्टलवर सुमारे ९०० निवेदने ऑनलाईन सादर झाली. त्यामध्ये आलेली तक्रार अगर निवेदन संबंधित विभागाकडे पाठवून त्याविषयीची सविस्तर माहिती घेतली गेली. नेमकी समस्या काय आहे, याचे विश्लेषण करणे त्यामुळे सोपे गेले आणि नागरिकांना योग्य तो निर्णय देता येणे शक्य झाले. ऑनलाईन निवेदने सादर केलेल्या प्रत्येक घटकास टोकन क्रमांक देण्यात आला. त्या क्रमानेच मंत्री महोदयांची भेट त्यांना देण्यात आली. त्यामुळे वेळ वाचून प्रकरणांचा निपटारा गतीने करणे शक्य झाले.

‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ उपक्रमास मोठा प्रतिसाद

प्रलंबित ३६३५ पैकी २७६४ प्रकरणे उपक्रमाआधीच निकाली

- उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती

उच्च शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमात बोलताना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

उच्च शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या उपक्रमासाठी जमलेले उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित घटक.

विविध घटकांच्या समस्या ऐकून घेताना मंत्री उदय सामंत.

विविध घटकांच्या समस्या ऐकून घेताना मंत्री उदय सामंत.


कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात हा अभिनव उपक्रम जाहीर केल्यानंतर हा पहिला कार्यक्रम होण्यापूर्वीच विभागांतर्गत प्रलंबित असलेल्या ३६३५पैकी सुमारे २७६४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. विशेषतः १७ पैकी १० व्यक्तींना अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती देण्याचे निश्चित करण्यात आले आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज येथे दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात आज सकाळी उच्च शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर या उपक्रमास प्रारंभ झाला. प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आलेलो असल्याने कोणत्याही प्रकारचे स्वागत वगैरेची औपचारिकता स्वीकारणार नाही, अशी भूमिका स्पष्ट करून यावेळी उपस्थित असलेल्या शैक्षणिक क्षेत्राशी निगडित विविध घटकांना संबोधित करून मंत्री श्री. सामंत यांनी वेळ न दवडता थेट निवेदकांची गाऱ्हाणी ऐकून घेण्यास सुरूवात केली.

यावेळी मंत्री श्री. सामंत म्हणाले, उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर या उपक्रमांतर्गत विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शैक्षणिक संस्थांच्या अडचणी सोडवण्यासाठी या उपक्रमाची येथून सुरुवात करण्यात येत आहे. हा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर सातवा वेतन आयोग अथवा वेतन निश्चितीच्या २३८ प्रकरणांपैकी २२० प्रकरणे निकाली निघाली आहेत. अनुकंपा तत्त्वावरील ४१ प्रकरणे आली होती, त्यातील ३४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. वेतन देयकात नाव समाविष्ट करण्याबाबत ८५ प्रकरणे प्राप्त झाली होती, त्यातील ८० निकाली निघाली आहेत. सेवानिवृत्ती वेतनाची ५३५ प्रकरणांपैकी ४९२ प्रकरणे निकाली निघाली आहेत. सेवानिवृत्ती उपदानाच्या ४०८ प्रकरणांपैकी ३४१ प्रकरणे निकाली निघाली आहेत. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतन निश्चितीची १४६ प्रकरणे प्रलंबित होती, त्यापैकी ९६ निकाली निघाली आहेत. अर्जित रजा रोखीकरणाच्या ५५ पैकी ४३ निकाली निघाली आहेत. भविष्य निर्वाह निधीच्या ४९०पैकी ४३३ निकाली, स्थाननिश्चितीच्या ६४७ पैकी ४८५ प्रकरणे निकाली निघाली आहेत. यांसह तात्पुरते सेवा निवृत्ती वेतन, वैद्यकीय देयके यासंदर्भातील प्रलंबित प्रकरणेही मार्गी लागल्याचे मंत्री श्री सामंत यांनी सांगितले.

सीमाभागात शैक्षणिक संकुल सुरू करण्यासंदर्भात राज्य शासनाने सकारात्मक पद्धतीने प्रयत्न केल्याचे सांगून मंत्री उदय सामंत म्हणाले, या शैक्षणिक संकुलास मूर्त स्वरुप येत असून जिल्हाधिकाऱ्यांनी त्यासाठी दहा एकर जागा निश्चित करून देण्याचे मान्य केले आहे. त्यानुसार आता तेथे शिवाजी विद्यापीठाच्या वतीने व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रारंभ करण्यात येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून शिक्षण घेता येणार नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी सीमाभागात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची तीन केंद्रे सुरू केली जाणार आहेत. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू संशोधन केंद्राच्या माध्यमातून मराठी भाषा संवर्धनासाठीचे उपक्रम राबविण्याचे नियोजन येत्या काळात केले जाईल. विद्यापीठातील बाळासाहेब देसाई अध्यासन केंद्रासाठी जाहीर केलेला एक कोटी रुपयांचा निधी येत्या १५ दिवसांत प्रदान करण्यात येईल. शासनाच्या धोरणानुसार प्रत्येक विद्यापीठात प्रबोधनकार ठाकरे यांच्या नावाने अध्यासन सुरू केले जाणार आहे. याला कुलगुरू, कुलसचिव यांनी संमती दिल्याचेही मंत्री श्री. सामंत यांनी सांगितले.

सुरूवातीला उच्चशिक्षण विभागाचे पुणे विभागीय संचालक डॉ. धनराज माने यांनी प्रास्ताविक केले. यावेळी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार जयंत आसगावकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार ऋतुराज पाटील, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Sunday, 24 January 2021

शिवाजी विद्यापीठात उद्या मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’

अभिनव उपक्रमाचे उच्चशिक्षण क्षेत्रातून स्वागत

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात सोमवारी (दि. २५ जानेवारी) आयोजित  ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या अभिनव उपक्रमाच्या तयारीची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात सोमवारी (दि. २५ जानेवारी) आयोजित  ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या अभिनव उपक्रमाच्या तयारीची पाहणी करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांच्यासह अन्य अधिकारी.

कार्यक्रमाच्या तयारीविषयी चर्चा करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर.

महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवाजी विद्यापीठात सोमवारी (दि. २५ जानेवारी) आयोजित  ‘उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर’ या अभिनव उपक्रमासाठी सुसज्ज झालेले राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृह.

कार्यक्रमानिमित्त विद्यापीठात उभारलेली स्वागत कमान.


कोल्हापूर, दि. २४ जानेवारी: महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या संकल्पनेतून उद्या (दि. २५ जानेवारी), सोमवारी शिवाजी विद्यापीठात होत असलेल्या उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर या उपक्रमासाठी आवश्यक ती सर्व तयारी शिवाजी विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आली आहे. मंत्री सामंत यांच्या या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांसह उच्चशिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घटकांच्या अडी-अडचणी सोडविल्या जाणार असल्यामुळे या उपक्रमाचे या घटकांनी स्वागत केले आहे. या उपक्रमासाठी सुमारे ९०० ऑनलाईन निवेदने सादर झाली आहेत.


विद्यार्थ्यां
सह पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी तसेच शैक्षणिक संस्था यांचे विविध स्तरावरील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय आपल्या विभागात हा अभिनव उपक्रम घोषित केला. या उपक्रमाची सुरवात उद्या सकाळी ११ वाजता शिवाजी विद्यापीठात उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूरने होणार आहे. हा उपक्रम यशस्वी करण्याचा निर्धार करून विद्यापीठ प्रशासनाने त्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहामध्ये मंत्री श्री. सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम होणार आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवांसह राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त, तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक, उच्च शिक्षण संचालक, कला संचालनालयाचे संचालक, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक, ग्रंथालय संचालनालयाचे संचालक, सह संचालक तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सर्व उच्चपदस्थ अधिकारी व कर्मचारी या उपक्रमात सहभागी होणार आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्राचार्य, शिक्षकेर कर्मचारी, विद्यापीठीय कर्मचारी, शैक्षणिक संस्था आदी घटकांच्या अडी-अडचणी सोडविण्यात येणार आहेत. त्यासाठी राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहात कोविड-१९च्या सर्व दक्षतांचे पालन करीत बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

या उपक्रमामध्ये सहभागी होणाऱ्या घटकांना निवेदने सादर करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने ऑनलाईन पोर्टल निर्माण केले आहे. त्याला उत्तम प्रतिसाद लाभला असून सायंकाळपर्यंत सुमारे ९०० व्यक्ती, संस्थांनी आपली ऑनलाईन निवेदने सादर केली आहेत.

दरम्यान, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील यांनी राजमाता जिजाऊ साहेब बहुउद्देशीय सभागृहास भेट देऊन तेथील तयारीची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. संबंधितांना आवश्यक त्या सूचना केल्या.

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालय @कोल्हापूर या उपक्रमासाठी कोविड-१९ साथीच्या अनुषंगाने शासन तथा युजीसी यांनी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करीत मंत्री महोदयांसाठी खुला कक्ष उभा करण्यात आला आहे. सुरक्षित शारिरीक अंतर राखून मंत्री महोदयांना संबंधित व्यक्ती, संस्था आदींचे प्रतिनिधी यांचे गाऱ्हाणे ऐकता येईल, त्यावर तोडगा काढता येईल, या पद्धतीने या सभागृहात मंत्र्यांसह लोकप्रतिनिधी, सचिव, आयुक्त तसेच अन्य सर्व अधिकारी, कर्मचारी व अभ्यागत यांची बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. विद्यापीठाच्या वतीने सॅनिटायझर, ताप तपासणी आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येणाऱ्या प्रतिनिधींनी मास्क लावणे व सुरक्षित शारिरीक अंतर यांचे पालन करावे, असे आवाहन कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांनी केले आहे.