Monday 31 January 2022

‘जिल्हा ग्रीन चँपियन पुरस्कारा’चे शिवाजी विद्यापीठ मानकरी


हरित शिवाजी विद्यापीठ परिसर



जलसमृद्ध शिवाजी विद्यापीठ



जलसमृद्ध शिवाजी विद्यापीठ

जैवविविधता संपन्न शिवाजी विद्यापीठ


कोल्हापूर, दि. ३१ जानेवारी: येथील शिवाजी विद्यापीठ सन २०२१-२२साठीचा कोल्हापूर जिल्हा ग्रीन चँपियन पुरस्काराचे मानकरी ठरले आहे. केंद्रीय उच्च शिक्षण मंत्रालयांतर्गत असलेल्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत सदर स्पर्धा घेण्यात आली. ही माहिती परिषदेचे चेअरमन डॉ. डब्ल्यू. जी. प्रसन्न कुमार यांनी ई-मेलद्वारे विद्यापीठ प्रशासनाला दिली आहे.

केंद्र सरकारच्या महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण शिक्षण परिषदेमार्फत दर वर्षी स्वच्छ कॅम्पस इन्स्टिट्यूशनल पुरस्कार प्रदान करण्यात येतात. याअंतर्गत जिल्हा स्तरापासून ते केंद्रीय स्तरापर्यंत विविध शैक्षणिक संस्थांच्या परिसराची स्वच्छता आणि हरितपणा या मूलभूत निकषांवर निवड करून त्यांना पुरस्कार प्रदान करून प्रोत्साहित करण्यात येते. शिवाजी विद्यापीठाने यंदा प्रथमच या स्पर्धेत सहभाग नोंदविला आणि गेल्या काही वर्षांत जलव्यवस्थापन आणि पर्यावरण संवर्धनाच्या क्षेत्रात केलेल्या कामाच्या बळावर जिल्हा स्तरावर प्रथम पुरस्कार प्राप्त केला आहे.

सदर पुरस्कारासाठीच्या प्रमुख निकषांमध्ये जल व्यवस्थापन, सौर ऊर्जा वापर व ऊर्जा संवर्धन उपक्रम, हरितक्षेत्र व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन आणि भू-वापर व व्यवस्थापन यांचा समावेश होता.

या संदर्भात अधिक माहिती देताना प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे म्हणाले, शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत राबविलेल्या जल व्यवस्थापन अभियानामुळे विद्यापीठ परिसर पाणी वापराच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालेला आहे. दर मोसमात विद्यापीठ साधारण ३१ कोटी लीटर पाण्याचे संवर्धन करते. त्याचबरोबर दररोज ४ लाख लीटर सांडपाण्यावर पुनर्प्रक्रिया करून ते उद्यानांसाठी वापरले जाते. सौरऊर्जेचा वापरही विद्यापीठ टप्प्याटप्प्याने वाढवित आहे. सध्या एकूण वीज वापरापैकी १६ टक्के वीज ही सौरऊर्जेपासून मिळविली जाते. विद्यापीठाने आपल्या ८५३ एकर क्षेत्रावर वृक्ष लागवड मोठ्या प्रमाणात केली आहे. विद्यापीठ परिसरात विविध प्रजातींची १३ हजारांहून अधिक वृक्ष आहेत. यामुळे हा परिसर कोल्हापूर नगरीचे फुप्फुस म्हणून ओळखला जातो. गत वर्षी विद्यापीठाने १२०० रोपांची लागवड केली आहे. मियावाकी जंगल क्षेत्र विकसित करण्याचा प्रकल्प विद्यापीठ राबविते आहे. विद्यापीठ दररोज सरासरी ५७५ किलो घनकचऱ्याचे व्यवस्थापन यशस्वीरित्या करते. जैववैद्यकीय घनकचऱ्याचे व्यवस्थापनही विहीत निकषांनुसार केले जाते. पर्यावरण संवर्धनासाठी हरित विकास हा मूलमंत्र घेऊन विद्यापीठ वाटचाल करत आहे. या बळावरच विद्यापीठाला हे यश लाभले आहे.

ग्रीन प्रॅक्टीसेसमध्ये सर्वच घटकांचे योगदान मोलाचे: कुलगुरू डॉ. शिर्के

शिवाजी विद्यापीठाने जलसंवर्धनासह पर्यावरणपूरक संवर्धनशील हरित विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये विद्यापीठाचा अभियांत्रिकी व उद्यान विभाग देत असलेले योगदान लक्षणीय आहे. त्याचबरोबर परिसराच्या स्वच्छतेसह ग्रीन प्रॅक्टीसेस राबविण्याच्या बाबतीत येथे येणारे कर्मचारी, शिक्षक, विद्यार्थी आणि फिरावयास येणारे नागरिक हे सर्वच घटक अत्यंत सजग आणि दक्ष आहेत. या सर्वांमुळेच विद्यापीठ परिसराची हिरवाई आणि प्रेक्षणीयता अबाधित आहे. जिल्हा स्तरावर प्राप्त पुरस्कारासाठी या सर्वच घटकांचे अभिनंदन! या पुढील काळातही अशीच संवर्धनशील कामगिरी करीत राहण्याची प्रेरणाही या सर्वांना मिळाली आहे, अशी प्रतिक्रिया विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी व्यक्त केली.

Saturday 29 January 2022

दक्षिण आशिया क्षेत्रातील बहुविधतेमधील सौंदर्य जपायला हवे: प्रा. रोमिला थापर

प्रा. वेरा जबोत्किना

प्रा. रोमिला थापर

प्रा. रोमिला थापर

डॉ. गणेश देवी


कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के


शिवाजी विद्यापीठात तीन दिवसीय ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: बहुविधतेमधील सुंदरता हे दक्षिण आशियाई क्षेत्रातील देशांचे वैशिष्ट्य ऐतिहासिक कालखंडापासून पारंपरिकरित्या विकसित होत गेलेले आहे. हे सौंदर्य व सौहार्द जपण्याची जबाबदारी आधुनिक काळातील धोरणकर्त्यांनी स्वीकारायला हवी, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ प्रा. रोमिला थापर यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठातील विदेशी भाषा विभाग व मराठी अधिविभाग आणि द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज, रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को, रशिया (RSUH) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय ऑनलाईन परिसंवादाच्या उद्घाटन समारंभाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते.

‘दक्षिण आशिया: ‘अज्ञात’ अवकाशांचा शोध  (“Open Pages in South Asian Studies - IV”, Kolhapur, India) या शृंखलेतील ‘दक्षिण आशिया: समकालीन गतिमान वास्तव – २०२२’ (The Contemporary Dynamics of South Asia – 2022) या मध्यवर्ती  विषयावर आयोजित करण्यात आलेल्या या ऑनलाईन परिसंवादाचे उद्घाटन आज सकाळी देशविदेशांतील मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

प्रा. थापर म्हणाल्या, बहुसांस्कृतिकता, बहुविधता हे दक्षिण आशियाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य राहिले आहे. भारताने या क्षेत्राचे इतिहास काळापासून नेतृत्व केले आहे. इतिहासात या परिक्षेत्रात जसा संघर्ष झडला, तसाच सह-अधिवासही निर्माण झाला. येथे प्रत्येक बाबतीत सहिष्णुता होती, असे नव्हते; तसेच, प्रत्येक वेळी, प्रत्येक बाबतीत हिंसेचा मार्ग अवलंबला गेला, असेही घडले नाही. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय आदानप्रदानातून येथील इतिहास, भूगोल घडला आणि आकाराला आला. अगदी हिंदू-मुस्लीमांच्या देवाणघेवाणीतूनही या इतिहासाला सांस्कृतिक विकासाचे आयाम प्रदान केले आहेत. एकूणातच सौहार्द व साहचर्याने राहण्याचा इतिहास या विभागाला आहे. आधुनिक समकाळात सर्वांना समान संधीचे धोरण स्वीकारून सहिष्णु आणि अहिंसा तत्त्वांच्या अंगिकारातून येथील नागरिकत्वाच्या जाणीवा अधिक जागतिक करण्याची आवश्यकताही त्यांनी व्यक्त केली.

या कार्यक्रमात ज्येष्ठ भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी यांनी बीजभाषण केले. वसाहतवादाचा सिद्धांत आणि पाश्चात्य राजकीय विचारवंत, विश्लेषकांच्या प्रभावातून बाहेर पडून दक्षिण आशियाई विभागाचा फेरविचार करण्याची गरज डॉ. देवी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, दक्षिण आशिया विभागात जगाच्या एकूण ८०० कोटी लोकसंख्येपैकी साधारण ११९ कोटी लोक राहतात. याचा अर्थ जगाच्या अवघ्या साडेतीन टक्के इतक्या अल्प भूभागावर जगाची २५ टक्के लोकसंख्या राहते आहे. या लोकसंख्येचा येथील अधिवासाचा इतिहास सुमारे १२ हजार वर्षांपासूनचा आहे. मात्र, अमेरिकन, पाश्चिमात्य युरोपियन अशासारखी दक्षिण आशियाई अशी त्यांची स्वतंत्र जागतिक ओळख मात्र प्रस्थापित झालेली नाही. व्यामिश्र संस्कृती, व्यामिश्र भाषा आणि जातीभेद अशा वैविध्यतेने व्याप्त असलेल्या या विभागातील नागरिकांचा किमान राहणीमान दर्जा राखण्याची फार मोठी जबाबदारी धोरणकर्त्यांवर आहे. मानवी स्वातंत्र्याच्या निर्देशांकात दहाच्या पट्टीवर येथील देशांतील निर्देशांक ५ ते ६.५ या दरम्यानच आहेत. त्यातही भारत आणि नेपाळ हे दोनच देश लोकशाहीची बूज राखणारे आहेत, अशी निरीक्षणे आहेत. लैंगिक समानता व आरोग्य या बाबतीत या देशांची जागतिक क्रमवारी ९० ते १२५ या दरम्यान म्हणजे अतिशय खालची आहे. विकासाचा मुद्दा लक्षात घेता भारत कार्बन उत्सर्जन करणाऱ्या देशांत जागतिक तिसऱ्या क्रमांकाचा आहे. पर्यावरणीय ऱ्हास म्हणजे विकास नव्हे, हे अद्याप या नैसर्गिक साधनसंपत्ती, संसाधनांनी समृद्ध विभागातील देशांच्या धोरणकर्त्यांनी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

डॉ. देवी यांनी दक्षिण आशियाई राष्ट्रांच्या भाषिक व्यवहाराच्या अनुषंगानेही सविस्तर विश्लेषण केले. ते म्हणाले, जगात सध्या सुमारे ७००० भाषा आहेत, त्यातील २५ टक्के येत्या ३० वर्षांत अस्तंगत होतील. दक्षिण आशियाई देशांनी मात्र भाषा जगविण्याची कामगिरी केली आहे. या विभागात भाषा अस्तंगत होण्याचे प्रमाण अल्प आहे. तथापि, यामध्ये धोरणकर्त्यांचे कमी आणि नागरिकांचे योगदान मोलाचे आहे. उदाहरणादाखल, भारतात ५२ कोटी लोक हिंदी भाषिक दाखविले आहेत. त्यात पहाडी, भोजपुरी यांच्यासह विविध ठळक स्थानिक भाषांचे वेगळे अस्तित्व न दाखविता हिंदीमध्येच दाखविले आहे. अशी खेदजनक परिस्थिती सर्वच दक्षिण आशियाई देशांमध्ये आहे. ती बदलण्यासाठी सर्वस्तरीय प्रयत्नांची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे रशियन विद्यापीठांशी गेल्या ५० वर्षांहून अधिक काळ शैक्षणिक, संशोधकीय व सांस्कृतिक सौहार्दाचे संबंध आहेत. सदरचा परिसंवाद हा उभय देशांमधील हे शैक्षणिक, भाषिक तसेच सांस्कृतिक सहसंबंध अधिक दृढ व प्रगल्भ होण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

उद्घाटन समारंभात मॉक्सो येथील रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर ह्युमॅनिटीजच्या इंटरनॅशनल अफेअर्सच्या प्र-कुलगुरू प्रा. वेरा जबोत्किना आणि संचालक, रशियन हाऊस इन मुंबईच्या डॉ. इलेना रेमीजवा, प्रा. अलेक्झांद्र स्तल्यारव यांनी शुभेच्छा दिल्या. शिवाजी विद्यापीठाच्या विदेशी भाषा विभागाच्या प्रमुख डॉ. मेघा पानसरे यांनी स्वागत केले, तर इंदिरा गजीयेवा (रशिया) यांनी प्रास्ताविक केले. डॉ. अरुंधती पवार यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास रशियाचे भारतातील राजदूत निकोलाय कुदाशेव, शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, मराठी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे, डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. शरद नावरे आदी उपस्थित होते.



Friday 28 January 2022

भाषासंवर्धन पंधरवड्यानिमित्त शिवाजी विद्यापीठात कवी संमेलन

शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजित ऑनलाईन कवीसंमेलनात कविता सादर करताना प्रफुल्ल शिलेदार. शेजारी सहभागी कवी.

कविता सादर करताना सुप्रसिद्ध कवी सौमित्र तथा किशोर कदम.


कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: येथील शिवाजी विद्यापीठातील मराठीइतिहासराज्यशास्त्र ज्ञानमंडळ आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आज (दि. २८) आभासी माध्यमाद्वारे कवी संमेलन संपन्न झाले.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉडीटीशिर्के यांनी कवी संमेलनाचे उद्घाटन केलेमहाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्राराजा दिक्षित यांनी संमेलनासाठी शुभेच्छा दिल्याया कवी संमेलनामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवी सहभागी झाले. त्यात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच शेजारच्या गोवा राज्यातील कवीही सहभागी झाले

कवी प्रफुल्ल शिलेदारकिशोर कदम ऊर्फ सौमित्रमीनाक्षी पाटीलरमेश इंगळे-उत्रादकरप्रज्ञा दया पवारमनोज बोरगावकरसंदिप जगदाळेजयप्रभू कांबळेश्रीधर तिवळेकवयित्री नीरजा आदींनी आपल्या कवितांचे सादरीकरण केले संमेलनाचे सूत्रसंचालन कवी गोविंद काजरेकर यांनी केलेसर्वच कवींनी वर्तमानाला भिडणाऱ्यामानवी जीवनदर्शन घडविणाऱ्या, समकाळावर भाष्य करणाऱ्या कविता सादर केल्या.

ज्येष्ठ कवयित्री निरजा यांनी कवीसंमेलनाचे अध्यक्षस्थान भूषविलेसमकाळातील कवी साहित्यिक आणि कलाकार यांच्या सांस्कृतिक जबाबदरीचा तसेच वर्तमान स्थितीतील सांस्कृतिक राजकारणाचा परखड परामर्श घेतला, तसेच कवितांचेही वाचन केले संमेलनाचे प्रास्ताविक मराठी अधिविभाग प्रमुख डॉरणधीर शिंदे केलेविश्वकोश निर्मिती मंडळाकडून डॉजगतानंद भटकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. राजेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर  सुस्मिता खुटाळे यांनी आभार मानले.

 

Thursday 27 January 2022

‘लेखनाच्या केंद्रस्थानी माणूस असावा’

साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ‘लेखकांशी संवादात’ सूर




कोल्हापूर, दि. २७ जानेवारी: कोणत्याही लेखनाच्या केंद्रस्थानी माणूस असावा आणि त्या दृष्टीने भूमिका घेऊन लेखन केले जावे, अशी अपेक्षा पुरस्कारप्राप्त लेखकांशी संवादातून आज व्यक्त झाली.

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर आणि महाराष्ट्र शासन, कामगार कल्याण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने लेखक संवादया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक किरण गुरव, सोनाली नवांगुळ, संजय वाघ आणि प्रणव सखदेव या लेखकांनी प्रस्तुत कार्यक्रमात सहभाग घेतला.

आपल्या साहित्यनिर्मिती प्रक्रियेच्या अनुषंगाने पुरस्कारप्राप्त लेखकांनी उपस्थितांबरोबर संवाद साधला. यावेळी कादंबरीकार किरण गुरव म्हणाले, जगणे आणि लिहीणे आपण वेगळं मानू शकत नाही. लेखक, त्याची भाषा आणि त्याची साहित्यकृती ही नेहमी एकजीव असते. भाषा म्हणजे मन. बाळूच्या अवस्थांतराची डायरीया कादंबरीत खेडयातील जगणं व शहरातील जगणं याचं विश्लेषण आहे. मी जी गोष्ट लिहीतो, कादंबरी लिहीतो, त्यामध्ये मला माणूस आणि त्याची गोष्ट खूप महत्वाची वाटते. लिहीण्यात माणूस असला पाहिजे आणि त्याची गोष्टही असली पाहिजे. जुगाडकादंबरीत कामगाराचा जीवनप्रवास मांडला आहे. मंदीचा कालखंड व तेजीचा कालखंड याचे वर्णन केले आहे. मात्र तिथेही आजचा माणूस आणि त्याचं जगणंच मध्यवर्ती आहे.

सोनाली नवांगुळ यांनी पुरस्कारप्राप्त साहित्यकृतीच्या अनुवाद प्रक्रियेचा प्रवास उपस्थितांसमोर उलघडून दाखवला. त्या म्हणाल्या, प्रत्येकाची निश्चित दिशा असते. वाट बघणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी संयम महत्वाचा आहे. मध्यरात्रीनंतरचे तास' ही सलमाची कादंबरी आहे. ५८७ पानांची इंग्रजी कादंबरी अनुवादासाठी कविता महाजन यांनी माझयाकडे दिली. या अनुवादित कादंबरीला साहित्य अकादमी पुरस्कार मिळणे हा माझ्या आयुष्यातील उत्सव आहे. मी सलमा आणि माझ्यातलं साम्य शोधत होते. आमचे संघर्ष खूप वेगळे होते. ती धर्माच्या, पुरूषसत्ताक जगाच्या एका विशिष्ट चौकटीत अडकलेल्या बायकांची गोष्ट लिहीत होती. मी शारिरीक अपंगत्वामुळे एका चौकटीत अडकले होते. यात ४०-५० बायकांची चित्रं आहेत. बाई आणि तिचं जगणं या अनुषंगाने या कादंबरीशी जोडले गेले. त्यातून हा अनुवाद साकारला.

प्रणव सखदेव यांनी काळे करडे स्ट्रोककादंबरीची निर्मितीप्रक्रियेचा वेध घेतला. वाचक हा लेखकास मोठा करत असतो, ऊर्जा देत असतो, असे सांगून सखदेव म्हणाले, काळेकरडे स्ट्रोक्स' ही मुळात एक प्रेमकथा आहे. ही कथा लिहीण्याचे कारण मला माझ्या पिढीचे म्हणणे मांडायचे होते. या पिढीला नातेसंबंधांबद्दल काय वाटत, हे मला या कथेच्या माध्यमातून मांडायचं होतं. २००० सालानंतर आपले सर्वांचेच जगणे हे खूप तुटक, विखंडि झाले आहे. त्याला भिडण्याचा हा एक प्रयत्न आहे.

संजय वाघ यांनी आपल्या जडणघडणीतून साहित्यिक म्हणून आपण कसे घडलो, याबाबत उपस्थितांशी संवाद साधला. ते म्हणाले, लहानपणापासून कविता आणि पुढे पत्रकारिता या माध्यमातून अभिव्यक्त होत राहिलो, माझ्यातला लेखक जगवत राहिलो. २००८ साली मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याने मला नाशिकपासून मुंबईला ओढून नेले. १८ लोकांचा जन्म ते बलिदान असा प्रवास मांडला. हे माझे पहिले पुस्तक. २०१७ मध्ये जोकर बनला किंगमेकर' ही किशोर कादंबरी लिहीली. या कादंबरीत एकत्र कुटुंब व विभक्त कुटुंब यामधील फरक, माणसापासून दुरावलेली माणसं आणि आत्मविश्वास हरवलेली आताची पिढी यांच्यासाठी सव्वादोन फूट उंचीचा जोकर उभा केला. हा संपूर्ण गाव बदलू शकतो, तर आपण का बदलू शकत नाही, असा दिलासा, विश्वास पेरण्याचा हा प्रयत्न आहे.

कार्यक्रमात प्रारंभी अधिविभागप्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली. कामगार कल्याण विभागाचे अधिकारी विजय शिंगाडे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. नंदकुमार मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन सुस्मिता खुटाळे यांनी केले तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. आभासी माध्यमाद्वारे घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, रसिक साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

'‘दक्षिण आशिया: ‘अज्ञात’ अवकाशांचा शोध' या परिसंवादाच्या निमित्ताने...


 

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, भारत (SUK)

विदेशी भाषा विभाग आणि मराठी विभाग

आणि

रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को, रशिया (RSUH)

द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज

 

आंतरराष्ट्रीय बहुविद्याशाखीय परिसंवाद

“Open Pages in South Asian Studies - IV”, Kolhapur, India

“ओपन पेजेस इन साउथ एशियन स्टडीज - IV”, कोल्हापूर, भारत

दक्षिण आशिया: ‘अज्ञात’ अवकाशांचा शोध  

विषय

The Contemporary Dynamics of South Asia - 2022

दक्षिण आशिया: समकालीन गतिमान वास्तव - 2022

२९ - ३१, जानेवारी, २०२२

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, महाराष्ट्र, भारत.

 

"ओपन पेजेस इन द साउथ एशियन स्टडीज" ही एक आंतरराष्ट्रीय परिसंवादाची मालिका आहे. रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज (RSUH), मॉस्को, रशिया ही संस्था दक्षिण आशियातील इतर विद्यापीठांच्या सहकार्याने हे परिसंवाद आयोजित करते. "ओपन पेजेस इन साउथ एशियन स्टडीज” या मालिकेतील यापूर्वीचे परिसंवाद २०११ व २०१३ साली रशियातील मॉस्कोमध्ये आणि २०१९ मध्ये भारतातील गुवाहाटी, आसाम येथे पार पडले. दक्षिण आशियाच्या 'अज्ञात' अवकाशांचा ‘शोध’ घेत त्याची एक नवी प्रतिमा सादर करण्यात हे परिसंवाद अत्यंत यशस्वी ठरले. ही शोध शृंखला पुढे चालू ठेवण्याच्या उद्देशाने या मालिकेतील चौथ्या परिसंवादाचे आयोजन करत आहोत.

भाषा, साहित्य, कला, इतिहास, सामाजिक विज्ञान आणि मानव्यशास्त्र या विविध शैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी संशोधक आणि तरुण तज्ज्ञांना या परिसंवादात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करत आहोत.

दक्षिण आशिया

समकालीन दक्षिण आशियामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, भूतान, भारत, मालदीव, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका या आठ देशांचा समावेश होतो. सिंधू संस्कृतीचा एक भाग असलेल्या या देशांना सामाईक उगम आणि इतिहास आहे. सामाईक भूप्रादेशिक स्थान या देशांना आशियाचा उप-प्रदेश म्हणून सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या एकत्र आणते.

हिंदू आणि बौद्ध धर्म या जगातील दोन महान धर्मांचा उगम दक्षिण आशियात झाला आहे. परंतु तिथे मोठ्या प्रमाणात मुस्लिम, ख्रिश्चन आणि शीख धर्मीय लोकसंख्या आहे, तसेच इतरही विविध धर्मांच्या अनुयायांचे मोठे गट देखील आहेत.

वांशिक-भाषिक बहुलवाद हे दक्षिण आशियाई देशांचे एक महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. परंतु त्याचवेळी  सदस्य देशांमधील विवादित संबंध आणि उप-राष्ट्रवादी आणि फुटीरतावादी चळवळींच्या रूपात देशांतर्गत संघर्ष याचे देखील तो एक प्रमुख कारण आहे. हा प्रदेश दहशतवादाच्या समस्येचे माहेरघर आहे. या समस्येने केवळ मानवी आणि राष्ट्रीय विकासच खुंटला आहे असे नव्हे, तर त्याच्या परिणामी या प्रदेशातील देशांमधील परस्पर आकलन आणि सौहार्दपूर्ण संबंधांचा मार्ग देखील धूसर झाला आहे. शिवाय समकालीन जागतिक व्यवस्थेत दक्षिण आशियाई देशांमधील सीमासंघर्षातून हा प्रदेश अधिक अस्थिर आणि धोरणात्मकदृष्ट्या महत्त्वपूर्ण बनतो. ‘दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार्य संघटने’स (SAARC) दक्षिण आशियातील देशांमध्ये राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या एकात्मता निर्माण करणे अनिवार्य आहे. परंतु या देशांतील वादग्रस्त संबंधांमुळे एकात्मता आणि सहकार्याचे अपेक्षित परिणाम घडवून आणण्यात ती अपयशी ठरली आहे.

दक्षिण आशियाई देशांमधील राजकीय व्यवस्थांच्या स्वरूपामुळे हा प्रदेश राजकीय आणि भू-रणनीतिकदृष्ट्या आणखीनच वेगळा ठरतो. बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि मालदीव यांसारख्या देशांमधील अधूनमधून येणारी हुकूमशाही आणि लष्करी शासन यासह लोकशाही संक्रमण आणि एकत्रीकरणाचा दक्षिण आशियास मोठा इतिहास आहे. प्रादेशिक आकाराच्या दृष्टीने भूतान हा एक छोटासा देश असला तरी, ‘सकल राष्ट्रीय आनंदा’च्या (Gross National Happiness) या नवकल्पनेमुळे शाश्वत विकास आणि शांती संस्कृतीची हमी, त्यास प्रोत्साहन यामध्ये या प्रदेशाकडे जागतिक स्तरावर मोठे लक्ष वेधले गेले आहे.

देशाच्या सीमांपलीकडे स्थलांतर हा या प्रदेशात एक वादाचा मुद्दा आहे. दक्षिण आशियातील सर्व देशांमध्ये नव-उदारवादी आर्थिक धोरणांच्या एकत्रीकरणाने अनेक संधी आणि आव्हाने आणली आहेत. सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (जीडीपी) बाबतीत पाहिले तर या प्रदेशातील अनेक देशांनी लक्षणीय प्रगती पाहिली. परंतु त्याचबरोबर उत्पन्न आणि इतर सामाजिक सुरक्षा या क्षेत्रांमध्ये विषमता आहे. विषमतेसह वाढ यामुळे या प्रदेशातील लोकांच्यात आक्रोश आहे. कामगारांचे अनौपचारिकीकरण आणि अत्यावश्यक सेवांच्या वाढत्या खाजगीकरणामुळे पर्यावरण आणि सामान्य संसाधनांबद्दल चिंता तर वाढते आहेच, पण त्याचबरोबर विषमता आणि असुरक्षिततेच्या नवीन प्रकारांची भर पडली आहे.

हा प्रस्तावित परिसंवाद आंतरविद्याशाखीय स्वरूपाचा असेल. या परिसंवादात संबंधित देशांच्या परिप्रेक्ष्यातून, तसेच एक आंतरराष्ट्रीय प्रादेशिक घटक म्हणून दक्षिण आशियाच्या परिप्रेक्ष्यातून या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न होईल.

परिसंवादात विचारमंथनासाठी मुद्दे:

१. दक्षिण आशियाई देश: सामाईक ऐतिहासिक बंध

§  नवीन सैद्धांतिक संशोधनाच्या दृष्टीकोनातून दक्षिण आशियाई प्रदेशातील प्राचीन, वसाहतिक आणि उत्तर-वसाहतिक बंध

§  वसाहतीकरणाचा प्रभाव आणि निर्वसाहतीकरणाच्या प्रक्रिया

§  दक्षिण आशियाई प्रादेशिकतावाद आणि एकात्मता: प्रवाह, समस्या आणि संभावना

२. भाषा, कला, साहित्य आणि अनुवाद: प्रगती आणि शांततेच्या दिशेने

§  २१ वे शतक: नवीन प्रवाह. नवी दिशा. वे प्रयोग

§  रूढीबद्ध धारणा खंडन. नवीन कल्पनांची निर्मिती आणि प्रवास

§  जागतिक परिप्रेक्ष्यात दक्षिण आशियातील भाषा

§  भाषा आणि शिक्षण

§  पुरोगामी बदल आणि शांती यासाठी उत्प्रेरक म्हणून कलाकार/ लेखक/ कवी/ अनुवादक

३. दक्षिण आशिया: समाज आणि संस्कृती        

§  जागतिक संदर्भात दक्षिण आशियाचा सांस्कृतिक वारसा

§  वांशिक बहुलवाद, सांस्कृतिक बहुविधता आणि बहुसांस्कृतिकता यांसमोरील आव्हाने

§  जागतिकीकरण आणि संक्रमणावस्थेतील संस्कृती.

§  स्थलांतर आणि संघर्ष. अल्पसंख्याक आणि परिघावरील घटक

§  धर्म आणि जात. अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक मनोवृत्ती

§  विज्ञान आणि तंत्रज्ञान: युवक. समाजावरील प्रभाव.

§  राष्ट्रवाद आणि पार-राष्ट्रवाद

४. मानवी हक्क

§  मानवी हक्कांसाठी लोकांचा संघर्ष

§  भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासमोरील आव्हाने

५. लिंगभाव आणि सत्ता

§  दक्षिण आशियातील पितृसत्ताता

§  लिंग आणि वर्ग / जात / धर्म.

§  रूढीवादी विचार खंडन आणि मानवी हक्कांसाठी महिलांचा / तृतीय पंथीयांचा संघर्ष

§  लिंग ओळख. लिंगभाव समानतेच्या दिशेने.

६. पर्यावरण आणि शाश्वत विकास

§  २१ व्या शतकातील आव्हाने आणि प्रतिसाद

७. अर्थशास्त्र

§  २१व्या शतकातील दक्षिण आशिया आणि अर्थव्यवस्था

§  नव-उदारमतवादी आर्थिक धोरणे आणि दक्षिण आशियाई देश

 

८. रशिया आणि दक्षिण आशिया:

§  संबंध आणि आंतर-संबंध

 

९. मध्य आणि पूर्व आशियामधील दक्षिण आशिया

§  भूतकाळ आणि वर्तमान

 

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर परिसंवाद ऑनलाइन आयोजित होत आहे.    

आयोजक:

RSUH / RGGU/   : फॅकल्टी ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स अँड फॉरेन एरिया स्टडीज

  ऑफ द इन्स्टीटयूट  ऑफ हिस्टरी अँड अर्काइव्ह्ज्

  द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज,

                          रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को, रशिया (RSUH)

SUK                                 : विदेशी भाषा विभाग व मराठी विभाग,

                                      शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. महाराष्ट्र, भारत.

 

निमंत्रक:

प्रा. अलेक्सांद्र स्तल्यारव

संचालक,

द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज,

रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को, रशिया (RSUH)

डॉ. मेघा पानसरे

सहायक प्राध्यापक (रशियन भाषा) व प्रभारी विभागप्रमुख,

विदेशी भाषा विभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. महाराष्ट्र, भारत

डॉ. इंदिरा गजीयेवा

उप-संचालक,

द इंटरनॅशनल सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीज,

रशियन स्टेट युनिव्हर्सिटी फॉर द ह्युमॅनिटीज, मॉस्को, रशिया (RSUH)

प्रा. रणधीर शिंदे

विभागप्रमुख, मराठी विभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. महाराष्ट्र. भारत