Monday, 28 February 2022

‘मी कवितेपायी खाक जळाया आलो,

जगण्याच्या वाटा अन् उजळाया आलो...’

शिवाजी विद्यापीठात इंद्रजीत भालेराव, गोविंद पाटील यांच्या काव्यधारांत रसिक चिंब

शिवाजी विद्यापीठात आयोजित मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमात कविता सादर करताना ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव. छायाचित्रात (डावीकडून) डॉ. रणधीर शिंदे, डॉ. व्ही.एन. शिंदे, गोविंद पाटील, डॉ. नमिता खोत.
 

कवी इंद्रजित भालेराव


कवी गोविंद पाटील

कवी गोविंद पाटील. समोर उपस्थित काव्यरसिक


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: शेतामधी माझी खोप, तिला बोराटीची झाप, तिथं राबतो, कष्टतो, माझा शेतकरी बाप..., गावाकडं चल माझ्या दोस्ता... आणि मी कवितेपायी जळाया आलो, जगण्याच्या वाटा अन् उजळाया आलो... या आणि अशासारख्या कवितांच्या धारांमध्ये शिवाजी विद्यापीठातील काव्यरसिक विद्यार्थी-विद्यार्थिनी आज चिंब झाले.

या धारा बरसवणारे होते ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव आणि गोविंद पाटील. निमित्त होते विद्यापीठाच्या मराठी अधिविभागातर्फे मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या विशेष काव्यवाचन समारंभाचे! विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्र आणि हिंदी अधिविभागाच्या सहकार्याने ग्रंथालयामोरील उद्यानात हा कार्यक्रम झाला. अध्यक्षस्थानी प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे होते.

या प्रसंगी ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव यांनी कबीर ही आपली दीर्घकविता सादर करून कार्यक्रमास प्रारंभ केला.

देवाशिवाय धर्म, धर्माशिवाय आध्यात्म, म्हणजे तुझी कविता,

आध्यात्माने ओली केल्याशिवाय जमीन,

कसे अंकुरतील कोंब कवितेचे?

शेवटी कविता ही आध्यात्मच असतं ना,

म्हणून फकिरीतच रमतात खरे कवी...

अशा प्रकारे कबीराच्या साक्षीने समकाळावर टोकदार भाष्य करणाऱ्या या कवितेने सुरवातीलाच उपस्थितांना अंतर्मुख केले. त्यानंतर कवी भालेराव यांनी विद्यार्थ्यांत लोकप्रिय असणाऱ्या बाप आणि गावाकडं चल... या दोन कवितांचे गेयतापूर्ण सादरीकरण करून रसिकांची मने जिंकली.

कवी गोविंद पाटील यांच्या वैविध्यपूर्ण काव्य सादरीकरणाने रसिक नादावले. कवीवर्य सुरेश भट यांच्या लाभले अम्हास भाग्य... हे उपस्थितांना सामूहिकरित्या म्हणावयास लावून त्यांनी मराठी भाषा गौरव दिनाची उत्तम वातावरणनिर्मिती केली. त्यानंतर,

कवितेशीच जन्माचा मनापासून याराना,

जन्मता फोडला टाहो, तवापासून याराना...

ही कविता त्यांनी सादर केली. पन्नाशीतल्या नेटपार गुरुजींची प्रतिक्रिया या कवितेच्या माध्यमातून इंटरनेटच्या आभासी जगताच्या पलिकडे आपल्या विद्यार्थ्यांना निसर्ग, पर्यावरण आणि भोवतालाशी, वास्तविक जीवनाशी जोडू पाहणाऱ्या गुरूजी आणि त्यांच्या विद्यार्थ्यांचे नितांतसुंदर वर्णन केले. अशाच वास्तवाला भिडणाऱ्या कर्जात जन्मलो आम्ही... आणि माझा बाप... या कविताही सादर केल्या. तुझ्यासारखीने बघावे कशाला, सुचेना जगावे कसे आरशाला ही प्रेमकविता आणि एक विडंबनकाव्यही सादर केले.

मी कवितेपायी खाक जळाया आलो,

जगण्याच्या वाटा अन् उजळाया आलो

या कवितेने त्यांनी पुन्हा रसिकांना अंतर्मुख केले. कवीवर्य शंकर वैद्य यांच्या वाळवंटातून भीषण चालले जीवन ही कविता सादर करून त्यांनी या काव्यमैफिलीचा समारोप केला. रसिकांच्या आग्रहाखातर गोविंद पाटील यांनी लता मंगेशकर यांचे ऐ मेरे वतन के लोगों... हे गीत शीळेवर वाजवून उपस्थितांची वाहवा मिळविली.

या प्रसंगी मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. रणधीर शिंदे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. राजेश पाटील यांनी उपस्थितांचा परिचय करून दिला. सुश्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत, डॉ. आलोक जत्राटकर, ज्येष्ठ साहित्यिक दि.बा. पाटील, रविंद्र जोशी, धनाजी घोरपडे, सुजाता चोपडे, संध्या पाटील, कवी मंदार पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाचा क्युबा सरकारसमवेत

रेशीम संशोधनासंदर्भात सामंजस्य करार

  

क्युबा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाचे सेंटर फॉर रिसर्च इन प्रोटीन प्लँट्स अँड बायोनॅचरल प्रोडक्ट्स आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यादरम्यान कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. या प्रसंगी (डावीकडून) डॉ. ए.डी. जाधव, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, क्युबन सेंटरच्या संचालिका  अदिलैदिस रुईझ बार्सनेज, संशोधक कार्लोस डेव्हिडरुझ मेसा, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे डॉ. अनिल घुले.


जागतिक शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल: अदिलैदिस बार्सनाज

कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: येथील शिवाजी विद्यापीठासमवेत क्युबा येथील विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाच्या रेशीम संशोधनविषयक झालेल्या सामंजस्य कराराच्या माध्यमातून जागतिक शाश्वत विकासाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकले गेले आहे, असे प्रतिपादन क्युबाच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाच्या संचालिका श्रीमती अदिलैदिस रुईझ बार्सनाज यांनी आज येथे व्यक्त केले.

क्युबा सरकारच्या विज्ञान, तंत्रज्ञान व पर्यावरण मंत्रालयाचे सेंटर फॉर रिसर्च इन प्रोटीन प्लँट्स अँड बोनॅचरल प्रोडक्ट्स आणि शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या दरम्यान आज सकाळी रेशीम प्रकल्पविषयक सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्रीमती बार्सनाज म्हणाल्या, यापूर्वी क्युबा सरकारसमवेत सन २०१३ ते २०१८ या कालावधीत शिवाजी विद्यापीठाचा करार होता. त्याअंतर्गत उभय संस्थांमध्येही रेशीमशेतीच्या अनुषंगाने अतिशय उत्तम संशोधनकार्य झाले. त्यातून येथील संशोधक डॉ. ए.डी. जाधव यांचा क्युबा सरकारने पुरस्कार देऊन गौरवही केला. नव्या सामंजस्य कराराअंतर्गतही अशाच स्वरुपाचे भरीव संशोधन व शाश्वत विकासाचे कार्य साकार होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी शैक्षणिक व संशोधकीय आदान-प्रदानाबरोबरच रेशीम शेती क्षेत्रातील शाश्वत संशोधन व विकास या दृष्टीने उपयुक्त असे तंत्रज्ञान सदर सामंजस्य करारातून साकार व्हावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.

यावेळी सामंजस्य करारावर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी तर क्यबा सरकारच्या वतीने श्रीमती बार्सनाज यांनी स्वाक्षरी केली. यावेळी क्युबाचे संशोधन कार्लोस डेव्हीड रुझ मेसा, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्षाचे समन्वयक डॉ. अनिल घुले आदी उपस्थित होते.

असा आहे सामंजस्य करार...

सदरचा सामंजस्य करार सन २०२२ ते २०२७ असा पंचवार्षिक आहे. त्याअंतर्गत दोन्ही संस्थांकडून शैक्षणिक व संशोधकीय कार्यक्रम नियमितपणे राबविला जाईल. रेशीमशास्त्राअंतर्गत नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचे आदानप्रदान तसेच तुती, रेशीम कीटक, संगोपन तंत्रज्ञान, जैविक खते, मित्र कीड आणि रोग, मूल्यवर्धिक उत्पादने, रियाकलिंग ऑफ सेरीकल्चर वेस्ट इत्यादींच्या अनुषंगानेही संशोधनास चालना देण्यात येईल. तुती, रेशीम कीटक, वाणांचे आदानप्रदान यांसह दोन्ही देशांसाठी उपयुक्त असे तंत्रज्ञान विकसित करण्याच्या अनुषंगाने उभय देशांतील शास्त्रज्ञ-तंत्रज्ञांच्या भेटींचे आयोजन करण्यात येईल. दोन्ही संस्थांतील विद्यार्थीही शैक्षणिक व संशोधन प्रकल्पांवर एकत्रित काम करतील. शेतकऱ्यांनाही तंत्रज्ञानाची देवाणघेवाण करण्यात येईल. त्याचप्रमाणे दोन्ही देशांतील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन कार्यशाळा घेतील. विविध संशोधनांच्या अनुषंगाने रसायनशास्त्र, जैवतं६ज्ञान, जीवरसायनशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र आणि नॅनोतंत्रज्ञान आदी शाखांचेही सर्वसमावेशक धोरण ठरविण्यात सहकार्य घेण्यात येईल.

डॉ. ए.डी. जाधव यांना कुलगुरूंच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान

क्युबा सरकारचा 'इनोव्हेशन २०२१' पुरस्कार शिवाजी विद्यापीठाच्या रेशीमशास्त्र विभागाचे डॉ. ए.डी. जाधव यांना प्रदान करताना श्रीमती अदिलादैस रुईझ बार्सनेज आणि कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. सोबत (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, संशोधक कार्लोस डेव्हिडरुझ मेसा, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख. 


क्युबाचे तत्कालीन राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांनी शिवाजी विद्यापीठातील डॉ. ए.डी. जाधव यांची क्युबाच्या राष्ट्रीय रेशीम प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्ती केली. तेव्हापासून डॉ. जाधव गेली दहा वर्षे अत्यंत प्रामाणिकपणे आपले काम करीत आहेत. त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून क्युबा सरकारने त्यांचा इनोव्हेशन २०२१ पुरस्काराने गौरव केला. हा पुरस्कार डॉ. जाधव यांच्या वतीने डॉ. बार्सनाज यांनी स्वीकारला होता. तो त्यांनी या प्रसंगी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान केला. डॉ. जाधव यांच्याप्रती आम्हाला प्रचंड आस्था व आपुलकी असल्याचे उद्गार त्यांनी या प्रसंगी काढले. तर, हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. जाधव यांनी व्यक्त केली.

Wednesday, 23 February 2022

शिवाजी विद्यापीठात संत गाडगेबाबा जयंती

 



कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज संत गाडगेबाबा महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए.एम. गुरव, डॉ. केदार मारुलकर, डॉ. दीपा इंगवले, डॉ. अनुप मुळे, डॉ. रामदास बोलके, डॉ. गंधाली खारगे यांच्यासह प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

दरम्यान, आज संत गाडगेबाबा महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध अधिविभागांसह प्रशासकीय विभागांत अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

विशेष वृत्त:

गुळापासून साठहून अधिक पदार्थ बनविण्याचे प्रशिक्षण


 

गुळाच्या विविध उपपदार्थ उत्पादनांसमवेत डॉ. ए.एम. गुरव

विद्यापीठाच्या उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्राची कामगिरी

 

कोल्हापूर, दि. ३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्रामार्फत गुळापासून एक-दोन नव्हे, तर तब्बल साठपेक्षा अधिक प्रकारचे पदार्थ बनवण्याचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन गूळ उद्योजकांना दिले जाते आहे. गूळ कँडी, गूळ पावडर, काकवी, गुळाचा चहा, गुळाची चॉकलेट अशा पदार्थांचा यात समावेश आहे.

शिवाजी विद्यापीठातील उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्राचे समन्वयक डॉ. ए. एम. गुरव सातत्याने गुळवे आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन करीत असतात. स्वतः डॉ. गुरव वीस वर्षांहून अधिक काळ गुळावर संशोधन करीत आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठासह अन्यत्रही २५ गुळवे प्रशिक्षण शिबिरे घेतली आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या सहा गूळ प्रकल्प कार्यरत आहेत. यामध्ये सांगली, मजले, रहिमतपूर, पंचतारांकित एम.आय. डी.सी, नेज आणि कणेरी मठ येथील गूळ-उत्पादन प्रकल्पांचा समावेश आहे.

केंद्रामार्फत कोल्हापूरबरोबरच नागपूर, चंद्रपूर, भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी शंभरहून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. सध्या कोविड काळात कार्यशाळांचे प्रमाण कमी झाले असले तरी शक्य तिथे ऑनलाईन मार्गदर्शनही करण्यात येते.   

या संदर्भात बोलताना डॉ. गुरव म्हणाले, सध्याच्या आधुनिक युगात युवकांचा ओढा उद्योजकतेच्या दिशेने वाढतो आहे. त्यामध्ये नवनवीन उद्योगांचा समावेश आहे. त्यामध्येच शरीरासाठी अत्यंत लाभदायक असणाऱ्या गुळापासून विविध पदार्थ बनवण्याचा व्यवसाय वाढत आहे. या व्यवसायातून रोजगार निर्मितीही होत आहे. शिवाजी विद्यापीठाचे उद्योजकता आणि कौशल्य विकास केंद्र गेली अनेक वर्षे गूळ उद्योगासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडत आहे. सध्या कोल्हापूरजवळील ५ ते १० गुऱ्हाळघरांवर कार्यशाळा घेण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले.

डॉ. गुरव म्हणाले की, खरेदी विक्रीतील पारदर्शकता हेच कोणत्याही व्यवसायाच्या यशाचे गमक असते. गुळात साखरेची भेसळ करून गोडवा वाढवण्याचे प्रकार काही ठिकाणी घडतात. अशा भेसळीच्या प्रकारांपासून शेतकऱ्यांनी जाणीवपूर्वक दूर राहायला हवे. उत्पादनातील गुणवत्ता सांभाळली की आपोआप त्याची उत्तम विक्री होऊ शकते.

गुळापासून बनणाऱ्या पदार्थांचे उत्पादन घेण्यासाठी तरुण उद्योजक, बँका आणि शासनाची सकारात्मक भूमिका या तिन्हीची सांगड आवश्यक आहे. हा व्यवसाय सुरू करणे सुरवातीला थोडे खर्चिक असले तरी तरुणांनी एकत्र येऊन हा व्यवसाय सुरू करणे शक्य आहे. काही तरुणांनी या व्यवसायात कमी कालावधीत उत्तम यश संपादन केल्याचीही उदाहरणे आहेत. योग्य नियोजन आणि मार्गदर्शन यांच्या आधारे हा व्यवसाय यशस्वी होतो. गुळापासून बनवलेल्या उत्पादनांचा उपयोग सणा-सुदीला भेट देण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर होतो आहे. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागात अशा आरोग्यदायी उत्पादनांना चांगली बाजारपेठ उपलब्ध होते, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. गुरव २०१३ साली गुळापासून बनवलेल्या पदार्थांचे मार्केटिंग करण्यासाठी दुबईला गेले होते, त्यावेळी या उत्पादनांना उत्तम प्रतिसाद लाभल्याचा अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे.

या पदार्थांचा समावेश आहे गूळ उत्पादनांत...

गुळापासून बनविण्यात येणाऱ्या या पदार्थांमध्ये गुळाची ढेप, गूळ पावडर, गुळाचे वेगवेगळ्या आकाराचे क्यूब (घन), काकवी, मोदक, गुळाचे ग्रॅन्युल्स, गुळाचे कॅडबरीसदृश चॉकलेट्स, गुळाचे सरबत, गुळाची बिस्किटे, नाचणी-गुळाची बिस्किटे, गूळ चहा प्रि-मिक्स, गूळ कॉफी प्रि-मिक्स, गूळ लिंबूपाणी, चिक्की- शेंगदाणे, चणा डाळ, गूळ सुजी, डार्क चॉकलेट, गूळ कँडी ज्यात इलायचीसह नऊ वेगवेगळे फ्लेवर उपलब्ध आहेत. गुळाचा वापर करून बनाना आईस्क्रीम, मँगो आईस्क्रीम तयार केले आहे. चिरमुरा लाडू, राजगिरा लाडू, बुंदीचे लाडू, नाचणीचे लाडू, गुळाची रेवडी बनवले जातात. हळद आणि गुळ पावडर एकत्र करून त्यापासून कॅप्सूल तयार केली आहे, जी चेहऱ्याच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मिकी माऊस, ससा, बैल, हत्ती आदी खेळणी आणि भेटवस्तूही गुळापासून बनविता येतात. मऊ खारकेतील बी काढून त्यामध्ये उत्तम प्रतीचा गुळ भरून तुपाचे दोन थेंब घालून ते बंद केले जाते. ते आठ दिवस ठेवल्यानंतर अत्यंत चविष्ट पदार्थ तयार होतो. अशा प्रकारे गुळापासून विविध पदार्थ तयार केले जातात, ज्यामुळे गुळाला मागणी वाढून शेतकऱ्यांना त्यापासून नफा मिळू शकेल, असे डॉ. गुरव यांनी सांगितले.

Tuesday, 22 February 2022

परीघाबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंतही विज्ञानसंधी पोहोचाव्यात: डॉ. श्याम कोहली

शिवाजी विद्यापीठात आयोजित विज्ञान सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात बोलताना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विज्ञान सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात बोलताना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली. व्यासपीठावर (डावीकडून) डॉ. आर.जी. सोनकवडे, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, श्री. किरण ठाकूर, डॉ. आर.के. कामत.

शिवाजी विद्यापीठात आयोजित विज्ञान सप्ताहाच्या उद्घाटन समारंभात बोलताना केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली.

 


शिवाजी विद्यापीठात विज्ञान सप्ताहाचे उद्घाटन

कोल्हापूर, दि. २२ फेब्रुवारी: केंद्र सरकारने विज्ञान व तंत्रज्ञानाच्या सार्वत्रिकीकरणासाठी स्तुती हा उपक्रम हाती घेतला आहे. विद्यापीठीय परीघाबाहेरील विद्यार्थ्यांपर्यंत विज्ञानातील संधींची माहिती पोहोचविण्यासाठी या उपक्रमाचा लाभ व्हावा, अशी अपेक्षा केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे सल्लागार डॉ. श्याम कोहली यांनी आज येथे व्यक्त केली.

आजादी का अमृत महोत्सवाचे औचित्य साधून डीएसटी-स्तुती कार्यक्रमाअंतर्गत शिवाजी विद्यापीठात दिनांक २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या विज्ञान जागृती सप्ताहाच्या उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुमे म्हणून ते बोलत होते. राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील आणि तरुण भारत वृत्तपत्र समूहाचे अध्यक्ष व लोकमान्य को-ऑपरेटिव्ह मल्टिपर्पज सोसायटीचे चेअरमन किरण ठाकूर प्रमुख उपस्थित होते. विद्यापीठातील एसएआयएफ- डीएसटी केंद्राच्या वतीने हा उपक्रम आयोजिला आहे.

डॉ. कोहली म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त आजादी का अमृत महोत्सव हा उपक्रम देशातील सर्व राज्यांसह केंद्रशासित प्रदेशात १२ मार्च २०२१ पासून पुढील ७५ आठवडे राबविण्यात येत आहे. याअंतर्गत भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाकडून महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दल कुतूहल निर्माण व्हावे, वैज्ञानिक संशोधन विकासाबद्दल गोडी निर्माण व्हावी, यासाठी देशभरातील १३ केंद्रांची (हब) निवड करून तेथे हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातून एकमेव शिवाजी विद्यापीठाचा समावेश करण्यात आला आहे. डीएसटीकडून विविध योजना विद्यापीठांना प्रदान करण्यात येतात. त्यापैकी डीएसटी-फिस्टअंतर्गत शिवाजी विद्यापीठात सहा प्रकल्प सुरू आहेत. त्याचप्रमाणे डीएसटी-पर्स, डीएसटी-सैफ, डीएसटी-साथी, डीएसटी-सर्ब यांसह रामानुजन फेलोशीप आदी बाराहून अधिक उपक्रम व प्रकल्प येथे सुरू आहेत, ही अत्यंत समाधानाची बाब आहे. त्याअंतर्गत विकसित करण्यात आलेल्या साधनसुविधांचा लाभ विद्यापीठाने संशोधक विद्यार्थ्यांना करून देण्याबरोबरच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानविषयक गोडी निर्माण करण्यासाठी त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठीही प्रयत्न करणे अभिप्रेत आहे.

यावेळी ज्येष्ठ संपादक किरण ठाकूर म्हणाले, स्वातंत्र्योत्तर ७५ वर्षांच्या कालखंडात विज्ञान क्षेत्रात आपली किती प्रगती झाली, याचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारा हा केंद्र सरकारचा उपक्रम महत्त्वाचा आहे. भारताची क्षमता अफाट आहे, मात्र, त्यासाठी योग्य वेळी योग्य संधींची निर्मिती होणे आणि त्यांचा लाभ घेणेही महत्त्वाचे आहे. जगात शांतता नांदावयाची झाल्यास शांतीप्रिय भारताने महासत्ता बनून जगाचे नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे. आणि त्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्राचे योगदान अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे. त्यामुळे तरुणांनी शास्त्रज्ञ होण्यासाठी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, डॉ. विजय भटकर, डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्याप्रमाणे भारावून जाऊनच काम करण्याची गरज आहे. तसेच, या देशातील प्रत्येक व्यक्तीने आपण आहोत, त्या ठिकाणी राहून प्रामाणिकपणे देशसेवेत आपापले योगदान दिले, तरी सुद्धा देशाची प्रगती गतीने होणे शक्य आहे.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, विद्यार्थीदशेत प्रश्न पडणे, हे प्रगतीच्या आणि यशाच्या शक्यतेच्या दिशेने पडलेले पहिले पाऊल असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीडेवर मात करीत आपल्या शंकांचे समाधान करवून घेणे ही फार महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठात ज्ञानसंवर्धनाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. डीएसटीच्या माध्यमातून येथे अनेकविध प्रकल्प आणि साधनसुविधा उपलब्ध आहेत. त्यांची योग्य प्रकारे सर्वंकष माहिती घेऊन विज्ञान सप्ताहात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी येथून बाहेर पडताना काही ना काही उपयुक्त माहिती आपल्यासोबत घेऊन जावे. त्यातच या उपक्रमाचे यश सामावलेले आहे.

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकात शिवाजी विद्यापीठाच्या विविध विज्ञान अधिविभागांत उपलब्ध असलेल्या वैज्ञानिक उपकरणे, सुविधा आदींची माहिती दिली. 

कार्यक्रमाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून तसेच दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. आर.के. कामत यांनी स्वागत केले, तर डीएसटी-सैफ केंद्राचे प्रमुख डॉ. आर.जी. सोनकवडे यांनी आभार मानले. अश्विनी पाटील यांनी सूत्रसंचालन केले. 

विज्ञान सप्ताहांतर्गत आयोजित उपक्रम असे-

दि. २२ ते २८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित विज्ञान सप्ताहात अनुक्रमे शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही एन शिंदे, विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे अधिष्ठाता डॉ. आर के कामत, जैवतंत्रज्ञान अधिविभागाचे डॉ. व्ही. ए. बापट, विज्ञान लेखिका डॉ. माधुरी शानभाग, भौतिकशास्त्र अधिविभागाचे डॉ. एम.व्ही. टाकळे,  मराठी विज्ञान विश्वकोश मंडळाच्या जीवशास्त्र ज्ञानमंडळाचे अध्यक्ष डॉ. मोहन मदवण्णा यांची व्याख्याने होणार आहेत. या सप्ताहात विद्यापीठ परिक्षेत्रातील १४ कनिष्ठ महाविद्यालयांमधील दररोज १०० या प्रमाणे एकूण ७०० विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या महाविद्यालयांची भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणेप्रमाणे सामाजिक दुर्बल घटक आणि मुलींच्या सहभागाला प्राधान्य देण्यात आले आहे. दुर्गम आणि डोंगराळ भागातील विद्यार्थ्यांचा यात समावेश आहे. शाश्वत भविष्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये एकात्मिक दृष्टिकोन हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे.

Monday, 21 February 2022

‘भारतीय कंपनी सचिव संस्थान’समवेत

शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

 

शिवाजी विद्यापीठ आणि आयसीएसआय (नवी दिल्ली) यांच्या दरम्यान कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य करार झाला. या प्रसंगी सामंजस्य कराराचे हस्तांतरण करताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयचे पवन चांडक. सोबत (डावीकडून) डॉ. केदार मारुलकर, डॉ. एस.एस. महाजन, ऐश्वर्या तोरस्कर, ज्योतिबा गावडे, अमित पाटील आणि अमित पसारे.


सामंजस्य करार प्रसंगी मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के. समोर उपस्थित मान्यवर.

सामंजस्य करारावर स्वाक्षरी करताना प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयचे पवन चांडक.



कोल्हापूर, दि. २१ फेब्रुवारी: भारतीय कंपनी सचिव संस्थान (आयसीएसआय, नवी दिल्ली) यांचा शिवाजी विद्यापीठासमवेत झालेला सामंजस्य करार अत्यंत दिशादर्शक असा मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास संस्थेच्या पश्चिम विभागाचे चेअरमन राजेश तरपरा यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठ आणि नवी दिल्ली येथील भारतीय कंपनी सचिव संस्थान यांच्या दरम्यान सहकार्यवृद्धीच्या अनुषंगाने आज सामंजस्य करार करण्यात आला. ऑनलाईन व ऑफलाईन अशा संमिश्र स्वरुपात करण्यात आलेल्या या कार्यक्रमात श्री. तरपरा ऑनलाईन सहभागी होऊन बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील प्रमुख उपस्थित होते.

श्री. तरपरा म्हणाले, कंपनी सचिव पदासाठी आवश्यक प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र प्रदान करणारी आयसीएसआय ही एकमेव संस्था आहे. केंद्र सरकारचे कुशल भारत हे घोषवाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करण्यासाठी संस्था अधिकाधिक प्रशिक्षण कार्यक्रम व शैक्षणिक उपक्रम घेते आहे. शिवाजी विद्यापीठ आणि आयसीएसआय या दोन्ही संस्था आपापल्या क्षेत्रात प्रस्थापित आहेत. त्यांच्या अनुभवाचा लाभ परस्परांबरोबरच विद्यार्थ्यांनाही होईल. त्याचप्रमाणे विद्यापीठाने सेक्शन-८ कंपनी स्थापन केली असल्याचाही या कामी मोठा फायदा होईल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्रत्यक्ष उपस्थित असलेले संस्थेच्या पश्चिम विभागीय प्रादेशिक मंडळाचे सदस्य पवन चांडक म्हणाले, आयसीएसआयचे देशभरात व्यापक जाळे आहे. १६ आयआयएम संस्थांसह विविध मान्यवर विद्यापीठांशी संस्थेने ७५ सामंजस्य करार केले आहेत. त्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या रुपाने एका दमदार साथीदाराचा समावेश झाल्याचा आनंद वाटतो. विद्यापीठाच्या परिक्षेत्रात कंपनी सचिव पदाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांत व्यापक जाणीवजागृती करण्यासाठी संस्था सर्वोतोपरी प्रयत्नशील राहील.

अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के म्हणाले, कंपनी सचिव या क्षेत्रातील संधींविषयी अद्याप शहरी भागाखेरीजचे बहुसंख्य विद्यार्थी अनभिज्ञ आहेत. ग्रामीण, डोंगरी, दुष्काळी आदी दुर्गम भागांतील विद्यार्थ्यांना कंपनी सचिव क्षेत्रातील करिअर संधींची माहिती देण्याच्या दृष्टीने प्रशिक्षण, जागृती उपक्रम राबविण्याची गरज आहे. आंतरविद्याशाखीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षणाच्या अनुषंगाने उपयुक्त असे उपक्रम राबविले जावेत. या सामंजस्य कराराअंतर्गत वर्षभरात राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांचे विस्तृत नियोजन करावे आणि त्यानुसार वाटचाल करावी, तेव्हाच खऱ्या अर्थाने करार यशस्वी होईल. 

या प्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह आयसीएसआय कोल्हापूर शाखेच्या चेअरपर्सन ऐश्वर्या तोरस्कर, व्हाईस चेअरमन ज्योतिबा गावडे यांनी मनोगत व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे आणि आयसीएसआयकडून पवन चांडक यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. मान्यवरांच्या उपस्थितीत कराराच्या नस्तींचे हस्तांतर करण्यात आले.

सुरवातीला वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन यांनी स्वागत, प्रास्ताविक व परिचय करून दिला, तर डॉ. केदार मारुलकर यांनी आभार मानले. यावेळी आयसीएसआयचे अमित पसारे आणि अमित पाटील उपस्थित होते.

सामंजस्य कराराअंतर्गत समाविष्ट ठळक मुद्दे-

·         संयुक्त संशोधन प्रकल्प राबविता येणार

·         राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा, कार्यशाळा, प्रशिक्षण कार्यक्रम, परिसंवादांचे आयोजन करता येणार

·         नूतन अद्यावत व्यावसायिक अभ्यासक्रमांची आखणी करणे शक्य.

·         ट्रेन द ट्रेनर्स उपक्रम राबविता येणार

·         विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना आयसीएसआय सिग्नेचर पुरस्कार योजनेत सहभागी होता येणार

·         आयसीएसआयच्या सहकार्याने आवश्यकता भासल्यास विद्यापीठात स्टडी सेंटर उभारता येणार

·         परस्परांच्या तज्ज्ञांच्या पॅनलमध्ये शिक्षणतज्ज्ञ, शिक्षक, प्रशिक्षक तसेच सीएस व्यावसायिक यांना संधी मिळणार

·         आयसीएसआयची दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित आहेत. ती विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोफत उपलब्ध करून देणार

·         फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामची आखणी करणार

·         उपरोक्तखेरीज वेळोवेळी आवश्यक वाटतील असे उपयुक्त उपक्रमही राबविले जाणार