Friday, 30 September 2022

भारत आत्मनिर्भर होण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना जोपासली पाहिजे - प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील

 


कोल्हापूर, दि.30 सप्टेंबर - आत्मनिर्भर भारत करण्यासाठी देशभक्ती, देशप्रेम, निष्ठा, राष्ट्रीय आत्मीयता आणि बंधुत्वाची भावना विद्यार्थ्यांनी जोपासली पाहिजे, असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीनदिवसीय राष्ट्रीय/राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराच्या समारोप समारंभाच्या अध्यक्षस्थानावरून प्र-कुलगुरू डॉ.पाटील बोलत होते.

राष्ट्रीय सेवा योजन क्षेत्रीय कार्यालय, पुणे, युवा कार्य क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई आणि राष्ट्रीय सेवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिबिराच्या समारोप समारंभामध्ये प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुखडॉ.प्रशांतकुमार वनंजे, भारत सरकारच्या युवा कार्य क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन प्रमुख उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील म्हणाले, उत्कृष्ट नमुना होण्यासाठी विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला पाहिजे.यामधून आपल्या कलागुणांना वाव मिळतो आणि आपल्यामधील नेतृत्वगुण उजागर होतात. राष्ट्रीय सेवा योजनेचे हे शिबिर विद्यार्थ्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये कलाटणी देणारे आहे. आयुष्यामधील वळणबिंदू म्हणून या शिबिराकडे पाहता येईल.विद्यार्थ्यांनी स्वत:चे करियर घडविण्यासाठी आपल्या आवडीचे क्षेत्र कोणते आहे, हे प्रथम ओळखले पाहिजे.त्यानुसार पुढील वाटचाल करणे संयुक्तीक ठरेल.आपल्या देशामध्ये 'आझादी का अमृत महोत्सव' देशभर साजरा करण्यात येत आहे.संघ बांधणी आणि विद्यार्थ्यांच्या क्षमतेमध्ये वाढ करण्यासाठी राज्यातील कृषी आणि अकृषी विद्यापीठे एकत्रित येवून या राज्यस्तरीय शिबिराचे आयोजन केले हे सर्वांसाठी अधिक प्रोत्साहात्मक आहे.

भारत सरकारच्या युवा कार्य क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन म्हणाले, शिवाजी विद्यापीठामधील राष्ट्रीय सेवा योजना हा विभाग विविध कार्यक्रमांचे यशस्वीरित्या आयोजन करून खुप चांगले योगदान देत आहे. उत्कृष्ट नियोजनामुळेराष्ट्रीय आणि अंतरराष्ट्रीय स्तरावरील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम आयोजित करण्याबाबत हे ठिकाण सकारात्मक आहे.या शिबीरांमध्ये शिकवली जाणारी शिस्त विद्यार्थ्यांनी त्यांच्या सामाजिक जीवनामध्ये आचरणात आणली पाहिजे.छोटया-छोटया प्रयत्नातून विद्यार्थ्यांनी सामाजिक समस्या सोडविण्यासाठी हिरहिरीने भाग घेतला पाहिजे.

राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ.प्रशांतकुमार वनंजे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध कार्यक्रमांच्या आयोजनामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होण्यास असे शिबिर सहाय्यभूत ठरतात.राज्याच्या विविध भागांमधील विद्यापीठांमध्ये असे शिबीर राबविण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले जात आहेत. 

प्रभारी कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांचेसह संघ व्यवस्थापक डॉ.निर्मला जाधव, डॉ.पवन शिनगारे, डॉ.गांधी पुष्कर, डॉ.कल्याण सावंत, स्वयंसेवक कु.सृष्टी क्षीरसागर, सार्थक पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर मानव्य विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.एम.एस.देशमुख, क्षेत्रीय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ.शरद बनसोडे, महाराष्ट्र शासनाचे मंगेश खैरनार, रमेश देवकर, कॅप्टन प्रशांत पाटील, कॅप्टन राहूल मगदूम उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ.अभय जायभाये यांनी केले.डॉ.स्नेहल राजहंस, डॉ.संदीप पाटील यांनी सूत्रसंचलन केले. तर युवा अधिकारी अजय शिंदे आणि जिल्हा समन्वयक डॉ.एस.एन.पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्यभरातील 29 विद्यापीठांचे 280 रासेयो स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

------



Wednesday, 28 September 2022

राष्ट्रीय सेवा योजनेचे सुसंस्कार आयुष्यभर जपा: डी. कार्तिकेयन

 शिवाजी विद्यापीठात राज्यस्तरीय पथसंचलन निवड शिबिराचे उद्घाटन

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवड शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवड शिबिराच्या उद्घाटन समारंभात बोलताना भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन.

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या निवड शिबिराच्या उद्घाटन समारंभात अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील.


कोल्हापूर, दि. २८ सप्टेंबर: राष्ट्रीय सेवा योजनेचा सुसंस्कार आयुष्यभर जपण्यावर स्वयंसेवकांनी भर द्यावा, असे आवाहन भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठात आज सकाळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या तीनदिवसीय राष्ट्रीय/ राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलन निवड चाचणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या समारंभाचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय कार्यालय, पुणे, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई आणि राष्ट्रीय येवा योजना, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या राज्यस्तरीय शिबिराच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, राष्ट्रीय येवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. प्रशांतकुमार वनंजे प्रमुख उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात कार्यक्रम झाला.

श्री. कार्तिकेयन म्हणाले, राज्यभरातील विद्यापीठांमध्ये सध्या ३ लाख ५४ हजार राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक आहेत. त्यामधून मोजक्या ३८० स्वयंसेवकांना राष्ट्रीय व राज्यस्तरीय प्रजासत्ताक दिन पथसंचलनाच्या निवड शिबिरात सहभागाची संधी मिळालेली आहे. या संधीचे सोने करण्यासाठी सर्वच सहभागी स्वयंसेवकांनी शर्थीचे प्रयत्न करावेत. येथून आणंद येथील पश्चिम विभागीय शिबिरासाठी आणि तेथून राष्ट्रीय संचलनासाठी निवड केली जाईल. आपल्यातील काही जणांना ती संधी मिळणार असली तरी शिबिरार्थींनी आपल्या भावी जीवनातही राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार जपण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. शिबिराच्या नेटक्या आयोजनासाठी शिवाजी विद्यापीठाने घेतलेल्या पुढाकाराबद्दल विद्यापीठाचे आणि राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

डॉ. प्रशांतकुमार वनंजे

राज्य संपर्क अधिकारी डॉ. प्रशांतकुमार वनंजे म्हणाले, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार राज्यातील राष्ट्रीय येवा योजनेच्या स्वयंसेवकांची संख्या साडेतीन लाखांवरुन पाच लाखांवर नेण्याचे उद्दिष्ट बाळगले आहे. त्या दृष्टीने प्रत्येक महाविद्यालयात एनएसएसचे युनिट सुरू करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचे संस्कार सदैव अंगी बाणवल्यामुळेच जल व हरित संवर्धनाच्या कामी सातत्यपूर्ण योगदान देऊ शकलो. त्यामुळे उपस्थित स्वयंसेवकांनीही प्रत्येक उपक्रमात कृतीशीपणे सहभागी व्हावे आणि उत्तम प्रदर्शन करावे. एनएसएसचे संस्कार कधीही विसरू नका, असे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय मनोगतामध्ये प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, राष्ट्रीय सेवा योजनेचा येथे आलेला प्रत्येक स्वयंसेवक हा आपापल्या विद्यापीठाचा सदिच्छादूत आहे. त्यांनी हे सदिच्छेचे व मानवतेचे मूल्य आपल्यासोबत सदैव बाळगले पाहिजे. कोविड-१९च्या कालखंडात शिवाजी विद्यापीठाच्या स्वयंसेवकांनी नागरिकांना समुपदेशनासह विविध प्रकारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदतीमधून प्रभावी भूमिका बजावली आहे. महापूर काळातही नागरिकांच्या बचावकार्यासह मदत व पुनर्वसन कामी स्थानिक जिल्हा प्रशासनास एनएसएस स्वयंसेवकांनी तत्परतेने सहकार्य केले. ही सामाजिक बांधिलकी आयुष्यभर जपावी. त्याचप्रमाणे राष्ट्रीय पथसंचलनात महाराष्ट्राचा टक्का वाढावा, यासाठी संचलनासाठी विद्यापीठांच्या स्तरावर सातत्याने शिबिरांचे आयोजन करण्याची आवश्यकता आहे. शिवाजी विद्यापीठ स्वयंसेवकांच्या सरावासाठी आपले सिंथेटिक ट्रॅकही उपलब्ध करून देईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी मंचावर क्षेत्रीय कार्यालयाचे युवा अधिकारी अजय शिंदे, उन्नत भारत अभियानाचे संचालक डॉ. टी.आर. पाटील, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, महाराष्ट्र शासनाचे मंगेश खैरनार, रमेश देवकर, श्री. कारखानीस, कॅप्टन प्रशांत पाटील, कॅप्टन राहुल मगदूम उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये यांनी केले. संदीप पाटील व डॉ. स्नेहल राजहंस यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. उमाजी पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास राज्यभरातील २९ विद्यापीठांचे २८० एनएसएस स्वयंसेवक, कार्यक्रम अधिकारी व संघ व्यवस्थापक उपस्थित होते.

Tuesday, 27 September 2022

शिवाजी विद्यापीठास ‘युजीसी’कडून ‘कॅटेगरी-१’ दर्जा बहाल



कोल्हापूर, दि. २७ सप्टेंबर: येथील शिवाजी विद्यापीठाला नुकताच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने कॅटेगरी-१ विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) विद्यापीठांना श्रेणीबद्ध स्वायत्तता देण्याचा निर्णय २०१८मध्ये घेतला. त्यानुसार नॅक (बंगळूर) यांचे ३.५१ सीजीपीए गुणांकन आणि त्यावरील गुणांकनप्राप्त विद्यापीठांसाठी कॅटेगरी-१, ३.२६ ते ३.५० या दरम्यान गुणांकनप्राप्त विद्यापीठे कॅटेगरी-२ आणि त्याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठे कॅटेगरी-३ अशी ही श्रेणीरचना करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाला नॅकच्या ३.५२ सीजीपीए गुणांकनासह ‘A++’ मानांकन प्राप्त झाले आहे. त्यामुळे युजीसीकडून विद्यापीठाला कॅटेगरी-१ दर्जा प्रदान करण्यात आला आहे. यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अनेकविध सोयीसुविधा प्राप्त होण्यास विद्यापीठ पात्र ठरले आहे. याचा लगोलग विद्यापीठाला झालेला लाभ म्हणजे विद्यापीठाच्या दूरशिक्षण केंद्राला युजीसीकडून सलग पाच वर्षांसाठी मान्यता मिळालेली आहे. यापूर्वी दरवर्षी ही प्रक्रिया करावी लागत असे. त्याचप्रमाणे विद्यापीठास स्वतःचे संचलित महाविद्यालय चालवावयाचे असल्यास त्यासही मान्यता मिळू शकते. शिवाजी विद्यापीठ आता ऑनलाईन अभ्यासक्रम राबविण्यासही पात्र ठरले आहे. त्यानुसार विद्यापीठ आता पुढे जात असून आवश्यक कन्टेन्ट विकसित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. नजीकच्या काळात याचे आणखीही लाभ शिवाजी विद्यापीठाला पर्यायाने विद्यार्थ्यांना होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

Sunday, 25 September 2022

शिवाजी विद्यापीठात पंडित दिनदयाळ उपाध्याय जयंती



कोल्हापूर, दि. २५ सप्टेंबर: शिवाजी विद्यापीठात आज पंडित दिनदयाळ उपाध्याय यांची जयंती तथा अंत्योदय दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रमुख डॉ. पी.एन. वासंबेकर यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.


Thursday, 22 September 2022

शिवाजी विद्यापीठात कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती उत्साहात



 

कोल्हापूर, दि. २२ सप्टेंबर: थोर समाजसुधारक शिक्षण प्रसारक कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

आज सकाळी शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनात प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. तत्पूर्वी, प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील कर्मवीर पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासही पुष्प वाहून अभिवादन केले. याप्रसंगी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, राष्ट्रीय सेवा योजना संचालक अभय जायभाये, भूगोल अधिविभाग प्रमुख डॉ. संभाजी शिंदे, डॉ. जगदीश सपकाळे, सुनिल जाधव, आनंदा वारके, श्रीमती सुरेखा डके यांच्यासह शिक्षक, अधिकारी, प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.