Sunday, 29 January 2023

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धा:

रोहतकचे महर्षी दयानंद विद्यापीठ सर्वसाधारण विजेते; ‘चंदीगढ’ उपविजेते

 शिवाजी विद्यापीठाच्या शुभम सिंदनाळेला रौप्यपदक


शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक रोहतकच्या महर्षी दयानंद विद्यापीठ संघास प्रदान करताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. सोबत प्रवीणराजे घाटगे (कागलकर), डॉ. सुरेश कुमार मलिक, डॉ. महादेव देशमुख, डॉ. शरद बनसोडे, डॉ. प्रकाश गायकवाड आदी.


शिवाजी विद्यापीठात झालेल्या ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेतील १३० किलो वजनी गटातील पदक विजेत्यांसमवेत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह डॉ. सुरेश कुमार मलिक, डॉ. महादेव देशमुख, डॉ. शरद बनसोडे.

१३० किलो वजनी गटातील ग्रीको-रोमन कुस्तीच्या उपांत्य सामन्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या शुभम याने कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या केवल सिंगला अस्मान दाखविले तो क्षण.



कोल्हापूर, दि. २९ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात गेले आठवडाभर सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल व ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेचा आज शानदार समारोप झाला. गेल्या तीन दिवसांत झालेल्या ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेमध्ये रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धेचेही सर्वसाधारण विजेतेपद याच विद्यापीठाने पटकावले आहे.

ग्रीको-रोमन स्पर्धेत चंदीगढ येथील पंजाबी विद्यापीठ उपविजेते ठरले, तर भटिंडा येथील गुरू काशी विद्यापीठास तृतीय स्थान मिळाले. यजमान शिवाजी विद्यापीठाच्या शुभम सिंदनाळे याने १३० किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावले.

शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रवीणराजे घाटगे (कागलकर) सरकार, भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेश कुमार मलिक, विद्यापीठाच्या मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात पुरस्कार प्रदान समारंभ पार पडला.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांच्या हस्ते विजेतेपदाच्या ट्रॉफींचे वितरण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, स्पर्धा संचालक दिलीप पवार, तांत्रिक संचालक बंकट यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री नवनाथ ढमाळ, विजयसिंह यादव, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते. डॉ. विजय रोकडे यांनी कार्यक्रमाचे स्वागत केले, तर क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे यांनी आभार मानले.

स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठाचे दहा कुस्तीपटू सहभागी झाले. त्यांनी उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केले. आज १३० किलो वजनी गटामध्ये विद्यापीठाच्या शुभम सिंदनाळे याने रोहतक येथील महर्षी दयानंद विद्यापीठाच्या सतीश याला अत्यंत जोरदार टक्कर दिली. अत्यंत तुल्यबळ झालेल्या अंतिम लढतीत सतीशने शुभमवर ५-१ अशी गुणांवर मात केली. त्यामुळे शुभमला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. शुभम हा गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाचा कुस्तीपटू आहे. काल याच महाविद्यालयाच्या रोहन रंडे याने ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये ९७ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकावले आहे. अक्षय मंगावडे याने फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये १२५ किलो वजनी गटात विद्यापीठास कांस्य पदक मिळवून दिले आहे.

आज झालेल्या ८७ किलो वजनी गट ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये विद्यापीठाच्या विजय डोईफोडे यानेही उत्कृष्ट खेळीचे प्रदर्शन करीत पाचवे स्थान प्राप्त केले. विजय हा मुरगूडच्या सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयाचा कुस्तीपटू आहे.

स्पर्धेत आज तिसऱ्या, अखेरच्या दिवशी ८७ किलो व १३० किलो वजनी गटांतील स्पर्धा पार पडल्या. त्यामध्ये सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्राप्त करणाऱ्या कुस्तीपटूंची नावे अनुक्रमे पुढीलप्रमाणे:-

८७ किलो: मोहित खुकर (चौधरी चरणसिंग विद्यापीठ, मीरत), सुरजीत सिंग (एमजेपी रोहिलखंड विद्यापीठ, बरेली, उत्तर प्रदेश), करमबीर (राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर), रामसिंग बलिया (जननायक चंद्रशेखर विद्यापीठ, बल्लिया, उत्तर प्रदेश).

१३० किलो: सतीश (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), शुभम सिंदनाळे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), आशिष (सिंघानिया विद्यापीठ, झुनझुनू, राजस्थान), दीपांशू (आयटीएम विद्यापीठ, ग्वाल्हेर).

 

आदर्श व पारदर्शक स्पर्धेचा वस्तुपाठ: डॉ. मलिक

शिवाजी विद्यापीठाने कुस्ती स्पर्धा किती पारदर्शक पद्धतीने घ्याव्यात, याचा आदर्श वस्तुपाठच या स्पर्धांच्या आयोजनाद्वारे घालून दिलेला आहे, असे कौतुकोद्गार भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेश कुमार मलिक यांनी आज कुस्ती स्पर्धेच्या समारोप समारंभात बोलताना काढले. यजमान शिवाजी विद्यापीठाने क्रीडापटूंसह सर्वच संघ व्यवस्थापक, प्रशिक्षक आदींची अतिशय उत्कृष्ट व्यवस्था केली. उत्तम सोयीसुविधा पुरविल्या. ही बाबही सर्वांसाठीच आदर्श स्वरुपाची आहे. त्याबद्दल भारतीय विद्यापीठ महासंघाच्या वतीनेही त्यांनी विद्यापीठाचे अभिनंदन केले.

Saturday, 28 January 2023

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती (पुरूष) स्पर्धा २०२२-२३:

शिवाजी विद्यापीठाच्या रोहन रंडे यास रौप्यपदक

 दुसऱ्या दिवशीही पंजाब, हरियाणाच्या विद्यापीठांना सुवर्णपदके

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत ९७ किलो वजनी गटात रौप्य पदक मिळविणारा शिवाजी विद्यापीठाचा कुस्तीपटू रोहन रंडे (२). सुवर्णपदक मिळविणारा सोनू (१) आणि कांस्य मिळविणारे रविंदर व रॉबिन सिंग (३).


कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेत आज दुसऱ्या दिवशी शिवाजी विद्यापीठाच्या रोहन रंडे या कुस्तीपटूने ९७ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकले. विद्यापीठाचे या स्पर्धेतील हे दुसरे पदक आहे.

सदर स्पर्धेमध्ये  पंजाब आणि हरियाणा येथील विद्यापीठांच्या कुस्तीपटूंनी चार विविध गटांमध्ये सुवर्णपदके जिंकली. उद्या स्पर्धेचा अखेरचा दिवस आहे. स्पर्धेत देशभरातील १३१ विद्यापीठांचे ८९४ कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात गेल्या २२ जानेवारीपासून राष्ट्रीय कुस्त्यांचा थरार पाहायला मिळतो आहे. कालपासून सुरू झालेल्या ग्रीको-रोमन स्पर्धेमुळे तर सामने अधिकच रंगतदार बनले आहेत. अत्यंत चपळतेने व चुरशीने होत असलेले हे सामने पाहण्यासाठी कुस्ती शौकिनांचीही गर्दी होते आहे.

स्पर्धेमध्ये पंजाब-हरियाणाच्या कुस्तीपटूंचे निर्विवाद वर्चस्व असले तरी यजमान शिवाजी विद्यापीठाच्या कामगिरीकडेही सर्वांचेच लक्ष लागून आहे. विद्यापीठाचे स्पर्धेत सहभागी दहा कुस्तीपटू बाद फेरीच्या सामन्यांमध्ये अत्यंत चुरशीने प्रतिस्पर्ध्यांना झुंजवित आहेत. पदकाच्या दृष्टीने कालचा दिवस सुना गेला असला तरी आज रोहन रंडे याने ही उणीव भरून काढली. ९७ किलो वजनी गटात त्याने अंतिम फेरीपर्यंत धडक मारली, मात्र अमृतसरच्या गुरू नानक देव विद्यापीठाच्या सोनू याच्याकडून त्याला पराभव पत्करावा लागला. रोहनला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. रोहन हा गडहिंग्लजच्या शिवराज महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे.

६० किलो वजनी गटात शिवाजी विद्यापीठाच्या संतोष हिरुगडे याने अत्यंत चिवट खेळीचे प्रदर्शन करीत उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारली. मात्र, त्याला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तो अर्जुननगरच्या देवचंद महाविद्यालयाचा कुस्तीपटू आहे.

आज ९७ किलो, ७७ किलो, ६७ किलो आणि ६० किलो अशा चार वजनी गटांचे कुस्ती सामने खेळविण्यात आले. यामध्ये अनुक्रमे गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर (पंजाब), लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा (पंजाब), महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक (हरियाणा) आणि कुरुक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र (हरियाणा) या चार विद्यापीठांनी सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.

आज झालेल्या विविध वजनी गटांचा निकाल अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके यानुसार पुढीलप्रमाणे:

६० किलो: हर्ष राणा (कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र), हरदीप सिंग (पंजाब विद्यापीठ, चंदीगढ), अजीत कुमार (महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी), दिनेश कुमार (चौधरी रणबीरसिंह विद्यापीठ, जिंद, हरियाणा).

६७ किलो: अनिल (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), सौरभ (कलिंगा विद्यापीठ, छत्तीसगढ), अंकित (देश भगत विद्यापीठ, मंडी), अमित कुमार (पंडित दीनदयाळ उपाध्याय शेखावती विद्यापीठ, शिखर).

७७ किलो: करण (लव्हली प्रोफेशनल विद्यापीठ, फगवाडा), रोहित बूरा (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), अभिमन्यू (पंजाब विद्यापीठ, चंदीगढ), सागर (कुरूक्षेत्र विद्यापीठ, कुरूक्षेत्र).

९७ किलो: सोनू (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, पंजाब), रोहन रंडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर), रविंदर (तंत्रज्ञान विद्यापीठ, जयपूर), रॉबिन सिंग (बाबा मसिनाथ विद्यापीठ, रोहतक).

भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक यांच्यासह क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, स्पर्धा संचालक दिलीप पवार, तांत्रिक संचालक बंकट यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री नवनाथ ढमाळ आदींच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा अत्यंत सुरळीत व नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत आहेत.

उद्या स्पर्धेचा अखेरचा दिवस असून ८७ व १३० किलो वजनी गटांतील कुस्ती स्पर्धा सकाळच्या सत्रात ८ वाजल्यापासून घेण्यात येतील. त्यानंतर दुपारच्या सत्रात पुरस्कार वितरण कार्यक्रमाने आठवडाभर सुरू असलेल्या या स्पर्धेचा समारोप होईल.

शिवाजी विद्यापीठाच्या ‘सैफ’ सेंटरला केंद्र सरकारकडून एक कोटीचा निधी मंजूर

 अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणाची खरेदी करणार

शिवाजी विद्यापीठाचे सैफ सेंटर येथे केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाच्या स्तुती उपक्रमांतर्गत आलेले शास्त्रज्ञ व सहभागींसमवेत डॉ. राजेंद्र सोनकवडे (संग्रहित छायाचित्र.)

शिवाजी विद्यापीठाच्या सैफ सेंटरमधील अत्याधुनिक शास्त्रीय विश्लेषण उपकरणे


कोल्हापूर, दि. २८ जानेवारी: शिवाजी विद्यापीठाच्या सोफिस्टीकेटेड एनालिटिकल इन्स्ट्रुमेंट फॅसिलिटी’ (SAIF) अर्थात सैफ सेंटरला भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाकडून अत्याधुनिक शास्त्रीय उपकरण खरेदीसाठी एक कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्राचे संचालक डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी ही माहिती दिली.

डॉ. सोनकवडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने (डी.एस.टी.) सन २०१३ मध्ये शिवाजी विद्यापीठाला सैफ केंद्र मंजूर केले. त्यावेळी विद्यापीठास ५ कोटी ६० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता. चार उपकरणेही मंजूर झाली. सध्या हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित असून सार्वजनिक तसेच खाजगी क्षेत्रासाठी विश्लेषणाचे काम कार्यक्षमतेने करीत आहे. गेल्या डिसेंबरमध्ये नवी दिल्ली येथे सैफ केंद्राच्या समितीसमोर विद्यापीठातर्फे प्रभावी सादरीकरण करण्यात आले. परिणामी डी.एस.टी.ने विद्यापीठाच्या सैफ केंद्राला अत्याधुनिक उपकरणाच्या खरेदीसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.

विद्यापीठाला सैफ केंद्राच्या मंजुरीनंतर प्रथमच इतका मोठा निधी मंजूर झाला आहे. सन २०१३-१४ मध्ये कोट्टायम, शिवपू, पाटणा, धारवाड आणि कोल्हापूर अशी देशभरात चार सैफ केंद्रे मंजूर झाली होती. शिवाजी विद्यापीठातील सैफ केंद्र त्याची सेवा व विश्लेषणाची विश्वासार्हता यामुळे खूप लोकप्रिय बनले. वापरकर्ते विविध नमुन्यांच्या विश्लेषणासाठी या केंद्राला पसंती देतात. त्याचप्रमाणे विविध वित्तपुरवठा करणाऱ्या संस्थांनादेखील या केंद्राचे आकर्षण वाटते. हे केंद्र अव्याहतपणे सुरू ठेवण्यासाठी आणि येथील क्षमतावर्धनासाठी सातत्याने सहकार्य व मार्गदर्शन करणारे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचेही डॉ. सोनकवडे यांनी आभार मानले आहेत.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनीही डॉ. सोनकवडे यांच्यासह संपूर्ण सैफ, डी.एस.टी., सी.एफ.सी. येथील कार्यरत सहकाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.

Friday, 27 January 2023

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती (पुरूष) स्पर्धा २०२२-२३:

ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेवर पंजाब-हरियाणाच्या कुस्तीपटूंचे वर्चस्व

शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धांमधील सलामीची कुस्ती लावून स्पर्धेस प्रारंभ करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवर.




शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ ग्रीको-रोमन कुस्ती स्पर्धेमधील विविध गटांतील सामन्यांमधील चुरशीचे क्षण. (छायाचित्रे: सचिन कामत व अमर खोत)


मोहाली, चंदीगढ, भटिंडा, राजस्थान विद्यापीठांना सुवर्णपदके

कोल्हापूर, दि. २७ जानेवारी: मल्लांची ताकद, चिवटपणा आणि निर्णयक्षमता यांचा कस पाहणाऱ्या ग्रीको-रोमन प्रकारांतील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धांना शिवाजी विद्यापीठात आजपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी पंजाब-हरियाणाच्या कुस्तीपटूंनी जबरदस्त खेळाचे प्रदर्शन करीत स्पर्धेवर वर्चस्व गाजविले. आज चार विविध वजनी गटांच्या कुस्तींमध्ये चंदीगढ विद्यापीठ (मोहाली), पंजाब विद्यापीठ (चंदीगढ), गुरू काशी विद्यापीठ (भटिंडा) आणि सिंघानिया विद्यापीठ (राजस्थान) या चार विद्यापीठांनी सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली.

पुरूषांच्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा गेल्या २२ जानेवारीपासून विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात सुरू आहेत. या स्पर्धेतील फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धांचा पहिला टप्पा २२ ते २४ जानेवारी या कालावधीत पार पडल्यानंतर आजपासून (दि. २७) ग्रीको-रोमन प्रकारांतील कुस्ती स्पर्धांना प्रारंभ झाला. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील १३१ विद्यापीठांचे ८९४ कुस्तीपटू सहभागी झाले आहेत.

ग्रीको-रोमन स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ५५ किलो, ६३ किलो, ७२ किलो आणि ८२ किलो या चार वजनी गटांतील कुस्ती स्पर्धा झाल्या. स्पर्धकांच्या तयारीचा कस पाहणाऱ्या या स्पर्धेतील अनेक लढती डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या होत्या. काही लढती अत्यंत लक्षवेधी ठरल्या. विशेषतः ७२ आणि ८२ किलो वजनी गटांतील लढती अत्यंत चुरशीच्या झाल्या. तुल्यबळ प्रतिस्पर्ध्यांवर मात करण्यासाठीची झटापट आणि त्याला चकित करण्यासाठीची धडपड यांचा सुरेख मेळ घालत स्पर्धक स्वतःला सिद्ध करीत एकेक फेरी पार करीत राहिले. शिवाजी विद्यापीठाच्या खेळाडूंची वाटचाल या चार गटांमध्ये बाद फेऱ्यांतच थांबली. आता उर्वरित सहा वजनी गटांमध्ये त्यांना पदकासाठी परिश्रम करावे लागतील.

आज झालेल्या विविध वजनी गटांचा निकाल अनुक्रमे सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके यानुसार पुढीलप्रमाणे:

५५ किलो: ललित (सिंघानिया विद्यापीठ, झुनझुना, राजस्थान), संजीव (देश भगत विद्यापीठ, मंडी, पंजाब), हिमांशू सिंग (राजस्थान विद्यापीठ, जयपूर), अनुप कुमार (डॉ. राम मनोहर लोहिया अवध क्रीडा विद्यापीठ, अयोध्या, उत्तर प्रदेश)

६३ किलो: रवी (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा), अश्वनीकुमार सिंग (महात्मा गांधी काशी विद्यापीठ, वाराणसी), अंकित (चौधरी रणबीरसिंह विद्यापीठ, जिंद, हरियाणा), राम परवेश (वीर बहादूर सिंग पूर्वांचल विद्यापीठ, जौनपूर, उत्तर प्रदेश)

७२ किलो: विशाल (पंजाब विद्यापीठ, चंदीगढ), जगमल सिंह (पंडित दीनदयाळ उपाध्याय शेखावती विद्यापीठ, शिखर), सचिन (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा), साहील (गुरू नानक देव विद्यापीठ, अमृतसर, पंजाब)

८२ किलो: अंकित बूरा (चंदीगड विद्यापीठ, मोहाली), अंकित (चौधरी रणबीरसिंह विद्यापीठ, जिंद, हरियाणा), अमन (महर्षी दयानंद विद्यापीठ, रोहतक), सुंदर (गुरू काशी विद्यापीठ, भटिंडा)

दरम्यान, आज सकाळी शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते मॅटपूजन व विविध वजनी गटांतील सलामीच्या कुस्त्या लावून स्पर्धेस प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, भारतीय विद्यापीठ महासंघाचे (एआययू) निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, स्पर्धा संचालक दिलीप पवार, तांत्रिक संचालक बंकट यादव, आंतरराष्ट्रीय रेफ्री नवनाथ ढमाळ आदी उपस्थित होते.

स्पर्धेत उद्या, शनिवारी ६० किलो, ६७ किलो, ७७ किलो आणि ९७ किलो या वजनी गटांतील, तर अखेरच्या दिवशी, रविवारी (दि. २९) ८७ व १३० किलो गटांतील सामने होतील.

शिव-वार्ता व महाखेल युट्यूब वाहिन्यांद्वारे थेट प्रक्षेपण

शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या या स्पर्धेचे विद्यापीठाच्या शिव-वार्ता आणि महाखेल कुस्ती या युट्यूब वाहिन्यांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येत असून शेकडो कुस्तीप्रेमी नागरिक व विद्यार्थी या स्पर्धेचा ऑनलाईन आनंदही घेत आहेत.

Thursday, 26 January 2023

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिन उत्साहात

शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.
 
शिवाजी विद्यापीठात प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजवंदनानंतर उपस्थितांना शुभेच्छा देताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह मान्यवर.



कोल्हापूर, दि. २६ जानेवारी: भारताचा ७४वा प्रजासत्ताक दिन आज शिवाजी विद्यापीठात मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते सकाळी ठीक आठ वाजता ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी सामूहिक राष्ट्रगीत गायन व विद्यापीठ गीताचे सादरीकरण करण्यात आले. कुलगुरूंसह मान्यवरांनी विद्यापीठ प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, भारतीय विद्यापीठ महासंघाचे निरीक्षक डॉ. सुरेशकुमार मलिक, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभाग व राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रभारी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. शिवलिंगप्पा सपली, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पोवार, व्यवस्थापन परिषद राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Wednesday, 25 January 2023

शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय मतदार दिवस

 



कोल्हापूर, दि. २५ जानेवारी: शिवाजी विद्यापीठात आज १३व्या राष्ट्रीय मतदार दिवसानिमित्त लोकशाही परंपरांचे पालन करण्याची प्रतिज्ञा घेण्यात आली.

विद्यापीठात आज सकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रतिज्ञा ग्रहण उपक्रम आयोजित करण्यात आला. विद्यापीठाच्या इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अँड इलेक्शन्स फॉर गुड गव्हर्नन्सच्या वतीने कार्यक्रम झाला.

केंद्राचे समन्वयक डॉ. प्रल्हाद माने यांनी मतदारांसाठीच्या प्रतिज्ञेचे वाचन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार, मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, डॉ. तृप्ती करेकट्टी आदी उपस्थित होते.