Thursday, 29 February 2024

अमृतकाळ हा आदिवासी समुदायासाठी जीवनदायी ठरावा: डॉ. सोनाझारीया मिंझ

 विद्यापीठात ‘अमृतकाळ आणि भारतातील आदिवासींचे समावेशन’ विषयावर राष्ट्रीय परिषद

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेत बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर (डावीकडून) प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. अविनाश भाले. 

कोल्हापूर, दि. २९ फेब्रुवारी: आदिवासींच्या विकासातील सहभाग वाढला तर समावेशानास उपयुक्त ठरेल. स्वाभिमानाने जगता आले तरच समावेशन सार्थक होते. त्यासाठी प्रभावी शिक्षण आवश्यक आहे. अमृतकाळ हा आदिवासींसाठी जीवनदायी ठरवा अशा धोरणांची आवश्यकता आहे. असे प्रतिपादन जेएनयुच्या प्राध्यापक डॉ. सोनाझारीया मिंझ यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक वंचितता व समावेशक धोरण अभ्यास केंद्राच्या वतीने ‘अमृतकाळ आणि भारतातील आदिवासींचे समावेशन’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी त्या बीजभाषक म्हणून बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्रमुख अतिथी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.  

डॉ. मिंझ म्हणाल्या, निसर्गाच्या अवकाशात सहसंबंधाची स्वयंपूर्ण जीवनशैली आदिवासींनी जपली आहे. हवामानातील बदल आणि निरंतर विकासाच्या प्रक्रियेत ती विचारात घेतली तरच योग्य धोरणे आकाराला येतील.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, आत्मनिर्भरता निर्देशांक एकपेक्षा कमी आहे, पण तो एकपेक्षा जास्त झाल्यास विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होऊन अमृतकाळात आपण ज्ञानसत्ता बनण्याचा विचार केला पाहिजे.

अध्यक्षीय समारोप करताना कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आदिवासी हे ज्ञानसमृद्ध आहेत; त्यामुळे संपूर्ण समाजाचा त्यांच्याशी सुसंवाद आवश्यक आहे. योग्य धोरणासाठी निर्देशांक काढून अमृतकाळात आदिवासी समुदायाला विकासाची संधी मिळवून देणे ही प्रत्येक सुजाण नागरिकाची जबाबदारी आहे.

कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले. सूत्रसंचलन डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी केले, डॉ. अविनाश भाले यांनी आभार मानले.

या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेस देशभरातून संशोधक व अभ्यासक उपस्थित राहिले. आदिवासी समाज आणि सामाजिक वंचितता, वंचिततेचे शास्त्रीयदृष्ट्या मोजमाप, आदिवासींच्या समावेशनासाठी करण्यात आलेल्या संविधानात्मक तरतुदी आणि कायदे, शासकीय धोरणे व उपाययोजना, आदिवासींच्या सामाजिक समावेशनातील अडथळे आणि उपाय, वन्यजीवनमान आणि भारतातील आदिवासी समाज यांचे संबंध, शास्वत विकासाची उद्दिष्ट्ये व आदिवासी समाज इत्यादी विषयांवर परिषदेत शोधनिबंध सादर करण्यात आले.

      यावेळी डॉ. अनिल वर्गीस, प्रा. विजय माने, कॉ. संपत देसाई, प्रा. प्रकाश पवार, संतोष पावरा, डॉ. अमोल मिणचेकर, आकाश ब्राह्मणे इत्यादी उपस्थित होते. कार्यशाळेच्या यशस्वी संयोजनासाठी डॉ. किशोर खिलारे, श्री. शरद पाटील, डॉ. पी. एन. देवळी, चारुशीला तासगावे, सुशांत पंडित, भारत रावण, साहिल मेहता, विक्रम कांबळे आदींनी परिश्रम घेतले.

       

स्थानिक शेतकऱ्यांनी अळिंबी उत्पादनाद्वारे उत्पन्न वाढवावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 विद्यापीठात एकदिवसीय धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर डॉ. प्रकाश राऊत.



शिवाजी विद्यापीठात आयोजित धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना पुणे कृषी महाविद्यालयाचे कवकशास्त्रज्ञ डॉ. अशोक जाधव. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.


शिवाजी विद्यापीठात आयोजित धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींसमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह (डावीकडून) नामदेव देसाई, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अशोक जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रवीणकुमार पाटील, डॉ. किरण कुमार शर्मा, डॉ. अविनाश भाले.

(धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राची लघु-चित्रफीत)



कोल्हापूर, दि. २९ फेब्रुवारी: स्थानिक शेतकऱ्यांनी अळिंबी उत्पादनाद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवावे, तसेच विद्यार्थ्यांनीही याकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहावे, यासाठी शिवाजी विद्यापीठात अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. प्रशिक्षणात अनुसूचित जाती-जमातींतील प्रशिक्षणार्थींसह सुमारे २५० हून अधिक शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.

शिवाजी विद्यापीठाचे एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभाग, सामाजिक वंचितता व समावेशक धोरण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित अलिंबी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय धिंगरी अळिंबी (ऑयस्टर मशरूम) लागवड, व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याच्या उद्घाटन समारंभात कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. पदार्थविज्ञान विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अळिंबी उत्पादनाचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर असतात. अळिंबी उत्पादनातून लखपती व्हा, अशा जाहिरातीही असतात. मात्र, कोणतेही यश हे परिश्रमाखेरीज साध्य होत नाही. अळिंबी उत्पादन असो वा अन्य कोणताही व्यवसाय, तेथे कठोर परिश्रमाला पर्याय नाही. त्यासाठी योग्य व्यक्तींकडून प्रशिक्षण घेणेही आवस्यक असते. स्थानिक शेतकरी व विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने खास पुण्याहून तज्ज्ञांना पाचारण केले आहे. देशभरातील नागरिकांना ते मार्गदर्शन करीत असतात. त्याचा लाभ निश्चितपणे प्रशिक्षणार्थींना होईल. त्याचप्रमाणे हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न राहता सातत्याने अशा प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जायला हवीत. विद्यापीठाच्या परिसरातही अशा प्रकारचे अळिंबी उत्पादनाचे कायमस्वरुपी प्रकल्पस्थळ निर्माण करण्यात यावे आणि तेथे प्रशिक्षणार्थींचे छोटे-छोटे गट बोलावून त्यांना प्रशिक्षित करावे आणि त्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विकसित भारत या संकल्पनेच्या सर्वांगीण यशस्वितेसाठी असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जाणे अपेक्षित आहे. अळिंबी उत्पादनाच्या क्षेत्रातील आव्हाने, संधी, बाजारपेठांची उपलब्धता अशा चौफेर बाबींची माहिती प्रशिक्षणार्थींनी तज्ज्ञांकडून जाणून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

पुणे कृषी महाविद्यालयाचे कवकशास्त्रज्ञ व प्रशिक्षक डॉ. अशोक जाधव यांनी थोडक्यात अळिंबी उत्पादनाचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, अळिंबी हा प्रथिनांनी समृद्ध असा पदार्थ आहे. कोरोना काळात त्याचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे अळिंबी उत्पादन आणि सेवन यांचे प्रमाण वाढले. अळिंबी उत्पादनात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अळिंबी उत्पादनासाठी मोठे क्षेत्रही लागत नाही. अगदी कमी जागेमध्ये ते घेता येते. त्यामुळे तरुणांनी व्यवसाय संधी म्हणून या क्षेत्राचा गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात कार्यशाळेतील पहिल्या सहा नोंदणीकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते अळिंबी उत्पादनाच्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील, सामाजिक वंचितता केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. अविनाश भाले, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे, कृषी सहाय्यक नामदेव देसाई, डॉ. हेमराज यादव, चेतन भोसले आदी उपस्थित होते. सुरवातीला इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अभिजीत गाताडे यांनी सूत्रसंचालन केले, तर एसयूके-आरडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी आभार मानले.

शिवाजी विद्यापीठाचा गोखले इन्स्टिट्यूसमवेत सामंजस्य करार

 धोरणनिश्चिती कार्यात सहभागासाठी उद्युक्त करणारा करार: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमवेत सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि अधिष्ठाता डॉ. प्रशांत बनसोडे यांच्यासह प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. जगन कराडे, डॉ. प्रतिमा पवार, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. पूजा पाटील, कोमल ओसवाल, आकाश ब्राह्मणे.


(गोखले इन्स्टिट्यूटसमवेत सामंजस्य कराराची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. २९ फेब्रुवारी: धोरणनिश्चितीच्या कार्यात सहभागाच्या अनुषंगाने शिवाजी विद्यापीठातील संशोधक, अभ्यासकांना माहिती होण्याच्या दृष्टीने गोखले इन्स्टिट्यूटसमवेत होणारा सामंजस्य करार उपयुक्त ठरेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला.

पुणे येथील नामांकित गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्स या संस्थेसमवेत शिवाजी विद्यापीठाचा काल सामंजस्य करार झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील,  गोखले इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता डॉ. प्रशांत बनसोडे उपस्थित होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, गोखले इन्स्टिट्यूसमवेत होणारा हा करार विद्यापीठाच्या दृष्टीने प्रतिष्ठेचा आहे. ज्ञानाचा वापर समाजासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने कसा करावा, सामाजिक-आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर धोरणकर्त्यांना मार्गदर्शन कसे करावे, याचा वस्तुपाठ या संस्थेने गेल्या अनेक वर्षांत घालून दिलेला आहे. धोरणनिश्चितीच्या कामी एखादी शैक्षणिक संस्था किती महत्त्वाचे योगदान देऊ शकते, हे त्यांनी दाखवून दिले आहे. अशा पद्धतीचे कार्य करण्यासाठी शिवाजी विद्यापीठातील शिक्षक, संशोधक आणि विद्यार्थी यांना संस्थेकडून योग्य मार्गदर्शन घेता येईल. संस्थेचे ग्रंथालयही अनेक महत्त्वाच्या अहवालांनी समृद्ध आहे, त्या अहवालांचा अभ्यास करून अनुषंगिक संयुक्त संशोधन प्रकल्पही हाती घेता येऊ शकतील. सहकार क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी संयुक्त प्रशिक्षण कार्यक्रमही राबविता येऊ शकतील. समाजासाठी उत्तम काम करण्याची संधी या कराराद्वारे उपलब्ध झाली आहे, तिचा संशोधकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी डॉ. प्रशांत बनसोडे म्हणाले, गोखले इन्स्टिट्यूटने सुरवातीपासूनच अनेक सामाजिक-आर्थिक महत्त्वाच्या विषयांवर संशोधन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाने स्थानिक विद्यापीठांशी सहकार्य करून त्या माध्यमातून स्थानिक समस्यांचे विश्लेषण करून त्यांच्या निराकरणाचे उपाय सुचविण्याचे निर्देश दिले आहेत. त्या दृष्टीने शिवाजी विद्यापीठाशी होणारा करार महत्त्वाचा आहे. दोन्ही संस्थांना संयुक्तरित्या संशोधन समस्येची निवड करून त्यावर काम करता येईल. गेल्या पाच वर्षांत संस्थेने विविध ४० संशोधन प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्य शासनाच्या महाउन्नत अभियानाच्या अंतर्गत शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना संस्थेत इंटर्नशीपही करता येईल. त्याखेरीज संस्थेच्या संशोधन पद्धतीशास्त्रावरील सहा महिन्यांच्या अभ्यासक्रमासारखे विविध अभ्यासक्रमही करता येतील. ज्ञानाचे आदानप्रदान आणि सामाजिक समस्या सोडविण्यासाठी अभिनव मार्ग शोधण्यासाठीही काम करणे शक्य आहे.

या सामंजस्य करारावर गोखले इन्स्टिट्यूटच्या वतीने डॉ. बनसोडे यांनी तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी स्वाक्षरी केल्या. या सामंजस्य कराराचे समन्वयक तथा समाजशास्त्र अधिविभागाचे डॉ. जगन कराडे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर अधिविभाग प्रमुख डॉ. प्रतिमा पवार यांनी आभार मानले. यावेळी विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, समाजशास्त्र अधिविभागातील शिक्षक डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. पूजा पाटील, कोमल ओसवाल, आकाश ब्राह्मणे आदी उपस्थित होते.



Wednesday, 28 February 2024

हरितऊर्जा संशोधनात शिवाजी विद्यापीठाचे योगदान महत्त्वाचे: प्रा. हॅन्स-एरिक निल्सन

 स्वीडनच्या विद्यापीठासमवेत शिवाजी विद्यापीठाचा सामंजस्य करार

स्वीडनमधील एम.आय.डी. स्वीडन विद्यापीठासमवेत सामंजस्य करार प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सागर डेळेकर, स्वीडनचे प्रा. जोहान सिडन, प्रा. जोनास आर्टिग्रेन, उप-कुलगुरू प्रा. हॅन्स-एरिक निल्सन, डॉ. एस.बी. सादळे, डॉ. आशिष देशमुख, डॉ. किरण कुमार शर्मा, डॉ. सचिन पन्हाळकर आदी.

(स्वीडनच्या विद्यापीठासमवेत सामंजस्य कराराची लघु-चित्रफीत)

कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: हरित ऊर्जा साधनांच्या संशोधनात भारतातील शिवाजी विद्यापीठ करीत असलेले संशोधनकार्य महत्त्वाचे असून या विद्यापीठाशी सामंजस्य करार करीत असताना मोठा आनंद होत आहे, अशी भावना स्वीडन येथील एम.आय.डी. स्वीडन विद्यापीठाचे उप-कुलगुरू प्रा. हॅन्स-एरिक निल्सन यांनी व्यक्त केली.

येथील शिवाजी विद्यापीठ आणि एम.आय.डी. स्वीडन विद्यापीठ यांच्यादरम्यान आज एक महत्त्वाचा सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, स्वीडन विद्यापीठाच्या संगणकशास्त्र विभागाचे प्रा. जोहान सिडन आणि विज्ञान, तंत्रज्ञान व माध्यम विभागाचे प्रा. जोनास ऑर्टिग्रेन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.

प्रा. निल्सन म्हणाले, स्वीडन विद्यापीठ हे अत्याधुनिक ऊर्जा साधनांच्या निर्मितीच्या अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर संशोधन करीत आहे. त्यासाठी नॅनो आणि मटेरियल सायन्समधील संशोधन महत्त्वाचे आहे. शिवाजी विद्यापीठ या क्षेत्रातील संशोधनात एक भारतातील अग्रेसर विद्यापीठ आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठासमवेत अकादमिक आणि संशोधकीय सहकार्यवृद्धी करण्याच्या दृष्टीने हा करार करण्यात येत आहे. हरित ऊर्जा साधनांचा मागणीच्या तुलनेत तुटवडा मोठ्या प्रमाणात आहे. त्याचप्रमाणे ऊर्जासाधनांची निर्मितीक्षमता वाढविण्याच्या अनुषंगाने सिलीकॉन नॅनो पार्टकलसह नॅनोतंत्रज्ञानाच्या संदर्भातही दोन्ही विद्यापीठांना संयुक्त संशोधनाला मोठी संधी आहे.

प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी यावेळी शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या संशोधनकार्याची व सुविधांची माहिती दिली. ते म्हणाले, शिवाजी विद्यापीठात सौरऊर्जा उपकरणांसह आधुनिक हरित ऊर्जाविषयक संशोधन सुरू आहे. दक्षिण कोरिया, तैवान, जपान आदी देशांतील विद्यापीठांसमवेत शिवाजी विद्यापीठाचे सामंजस्य करार झाले असून त्यांच्यासमवेत संयुक्त संशोधन प्रकल्पही सुरू आहेत.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, युरोपियन इरॅस्मससारख्या आंतरराष्ट्रीय प्रकल्पामध्ये शिवाजी विद्यापीठ आपले योगदान देत आहे. अशा आंतरराष्ट्रीय प्रकल्पांच्या संधी दोन्ही विद्यापीठांनी शोधल्या पाहिजेत आणि त्याद्वारे जागतिक समुदायाला योगदान द्यायला हवे. दोन्ही विद्यापीठांतील विद्यार्थी, शिक्षक आणि संशोधक यांच्यासाठी या सामंजस्य कराराने संयुक्त संशोधन विकासाच्या अनेक संधींची कवाडे खुली केली आहेत. त्यांचा लाभ घ्यायला हवा.

यावेळी स्वीडन विद्यापीठाच्या वतीने प्रा. निल्सन यांनी, तर शिवाजी विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या. या कार्यक्रमात स्वीडन विद्यापीठातील विद्यमान संशोधक व शिवाजी विद्यापीठाच्या माजी विद्यार्थिनी मनिषा फडतरे या ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाल्या. यावेळी विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिकेजेस केंद्राचे डॉ. सागर डेळेकर, आंतरराष्ट्रीय साहचर्य केंद्राचे डॉ. एस.बी. सादळे, प्राणीशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, नॅनो-सायन्स व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. किरण कुमार शर्मा, भूगोल अधिविभागाचे डॉ. सचिन पन्हाळकर आदी उपस्थित होते.



शिवाजी विद्यापीठात आता पिकणार ‘मोत्यांची शेती’

शिवाजी विद्यापीठाच्या मोती उत्पादन, संशोधन केंद्राचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. सरिता ठकार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. आशिष देशमुख, डॉ. नितीन कांबळे, दिलीप कांबळे 
 

शिवाजी विद्यापीठाच्या मोती उत्पादन, संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी गोड्या पाण्यातील मोत्यांच्या निर्मितीविषयी दिलीप कांबळे यांच्याकडून जाणून घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. सरिता ठकार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. आशिष देशमुख, डॉ. नितीन कांबळे


शिवाजी विद्यापीठाच्या मोती उत्पादन, संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. नितीन कांबळे, दिलीप कांबळे, डॉ. एस.आर. यन्कंची,डॉ. सरिता ठकार, डॉ. आशिष देशमुख, डॉ. सुनील गायकवाड आदी

(मोती उत्पादन व संशोधन केंद्राच्या उद्घाटनाची लघु-चित्रफीत)


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: अभिनव आणि नवोन्मेषी उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे शिवाजी विद्यापीठ आता खऱ्याखुऱ्या मोत्यांची शेती पिकविण्यास सिद्ध झाले आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाने घेतलेल्या पुढाकारातून गोड्या पाण्यातील मोती संवर्धन, संशोधन आणि उत्पादन केंद्राचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन झाले.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना सडोली दुमाला येथील मोती उत्पादक व प्रशिक्षक दिलीप कांबळे यांच्याविषयी माहिती समजल्यानंतर त्यांनी प्राणीशास्त्र अधिविभागाला त्यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्याविषयी चाचपणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज विद्यापीठात हे मोती पिकविणारे केंद्र श्री. कांबळे यांच्याच सहकार्यातून उभे राहिले आहे. विभागातील प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे हे त्याचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.

प्राणीशास्त्र अधिविभागाच्या सकारात्मक प्रतिसादातून हे केंद्र उभे राहिले, त्याबद्दल उद्घाटन प्रसंगी विभागाचे अभिनंदन करून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाचा प्राणीशास्त्र अधिविभाग अनेक वर्षांपासून अनेकविध समाजाभिमुख उपक्रम राबवित आहे. त्याचा विद्यार्थ्यांनाही लाभ होतो आहे. विभागातील रेशीमशेतीचा सॉईल टू सिल्क प्रकल्प, फुलपाखरू उद्यान आणि अलिकडच्या काळात सुरू केलेला शोभेच्या मत्स्यउत्पादनाचा प्रकल्प ही याची काही उदाहरणे आहेत. आपल्या विभागातील विद्यार्थी आणि नागरिक यांना सगळे समुद्रीजीव एकाच ठिकाणी पाहता येतील, अशा पद्धतीचे भव्य मत्स्यालय उभारण्याचाही मनोदय आहे. आज कार्यान्वित करण्यात आलेले गोड्या पाण्यातील मोत्यांच्या उत्पादन व संशोधनाचे केंद्र हेही या मालिकेतील महत्त्वाचे पाऊल आहे. ही मोत्यांची शेती विद्यापीठ पैशांसाठी करीत नसून ज्ञानसंवर्धनासाठी करीत आहे. पर्ल फार्मिंग या विषयाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश करावा आणि किमान दर वर्षी काही उद्योजक, व्यावसायिक आपल्या विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षित करावे, अशी सूचनाही त्यांनी या प्रसंगी केली.

यावेळी डॉ. नितीन कांबळे आणि दिलीप कांबळे यांनी कुलगुरूंसह उपस्थितांना मोत्यांचे फार्मिंग कशा प्रकारे करण्यात येते, याचे सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखविले. तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते केंद्राच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते दिलीप कांबळे यांना ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. एस.आर. यन्कंची, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 27 February 2024

विद्यापीठात इनोव्हेशन, स्टार्टअप्स स्पर्धेत ७४ जणांचा सहभाग

 

शिवाजी विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त आयोजित इनोव्हेशन, स्टार्टअप स्पर्धा व प्रदर्शनाचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. सागर डेळेकर, डॉ. अपूर्व गुलेरिया, डॉ. प्रभात सिंग आदी.

शिवाजी विद्यापीठात विज्ञान दिनानिमित्त आयोजित इनोव्हेशन, स्टार्टअप स्पर्धा व प्रदर्शनाची पाहणी करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सागर डेळेकर आदी.


 

कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने नवोपक्रम, नवसंशोधन आणि साहचर्य केंद्राच्या वतीने इनोव्हेशन, उद्योजकता आणि स्टार्टअप्स यांचे भित्तीचित्र प्रदर्शन आणि मॉडेल सादरीकरण यांची स्पर्धा झाली. स्पर्धेत ७४ जणांनी सहभाग नोंदविला.

स्पर्धेचे उदघाटन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

या प्रदर्शन व स्पर्धेमध्ये ७४ पदवी, पदव्युत्त विद्यार्थ्यांसह संशोधक आणि नवउद्योजक सहभागी झाले. त्यांनी आपले संशोधन, उद्योग संकल्पना आणि उत्पादने यांचे सादरीकरण केले. स्पर्धे शाश्वत विकासाबाबत पर्यावरणीय संकल्पना, टाकाऊपासू टिकाऊ स्तू बनवणे, फौंड्रीतील टाकाऊ वाळूपासू विटांची निर्मिती रस्त्याकरिता पुनर्वापर, पौष्टिक खाद्यपदार्थ निर्मिती द्धती, नॅनो-पदार्थापासून औषधे, रंग निर्मिती, जैविक खते, र्जा निर्मिती, हायड्रोजन आणि क्सिजन निर्मितीची उपकरणे इत्यादी संशोध प्रकल्प सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी मुंबईच्या भाभा णु संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. पूर्व गुलेरिया डॉ. प्रभात सिंग, डॉ. प्रतिभा पाटणकर, डॉ. आसावरी जाधव, डॉ. संतोष सुतार यांनी रीक्षक म्हणून काम पाहिले. विद्यापीठाच्या इनोव्हेशन व इनक्युबेशन केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संयोजन करण्यात आले.

यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. एस.एन. सपली, डॉ. के. एम. गरडकर, डॉ. अनिल घुले, डॉ. मुरलीधर भानारकर, डॉ. ईरान्ना उडचान, डॉ. हेमराज यादव, डॉ. अभिजीत गाताडे, चेतन भोसले, डॉ. क्रांतीवीर मोरे, डॉ. साजिद मुल्लाणी आदी उपस्थित होते. या प्रदर्शनाला विद्यापीठातील विविध अधिविभागांसह शहरातील शाळांतील विद्यार्थी, शिक्षकांनी भेट दिली.