Friday, 23 February 2024

संख्याशास्त्रात करिअरच्या अनेक संधी: डॉ. अनिल गोरे

 विद्यापीठात संख्याशास्त्र परिसंवादास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठात आयोजित संख्याशास्त्र परिसंवादामध्ये मार्गदर्शन करताना डॉ. अनिल गोरे. मंचावर (डावीकडून) डॉ. सोमनाथ पवार, डॉ. आनंद करंदीकर, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. रंगनाथ रटिहळ्ळी व डॉ. शशीभूषण महाडिक.


कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांमध्ये करिअर व सेवेच्या अनेक संधी आहेत. जगाची दारे संख्याशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी उघडी आहेत, मात्र त्यासाठी नवनवीन बदलांना विद्यार्थ्यांनी सामोरे गेले पाहिजे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागाचे निवृत्त प्रमुख डॉ. अनिल गोरे यांनी आज येथे व्यक्त केले.

शिवाजी विद्यापीठाचा संख्याशास्त्र अधिविभाग आणि शिवाजी विद्यापीठ संख्याशास्त्र शिक्षक संघटना (सुस्टा) यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित दोन दिवसीय परिसंवादाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. 'दैनंदिन जीवनातील वास्तविक समस्यांचे सांख्यिकीय अन्वेषण' असा परिसंवादाचा विषय आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. प्रमुख अतिथी म्हणून पुण्याच्या मेट्रिक कन्सल्टन्सीचे संस्थापक-चेअरमन डॉ. आनंद करंदीकर आणि ज्येष्ठ संख्याशास्त्रज्ञ डॉ. रंगनाथ रटिहळ्ळी उपस्थित होते.

डॉ. अनिल गोरे म्हणाले, संख्याशास्त्र या विषयाचे महत्त्व प्रत्येक काळात अबाधित आहे. जिथे जिथे संख्या आहेत, डाटा आहे, तिथे विश्लेषणाची आवश्यकता आहेच. त्या प्रत्येक ठिकाणी संख्याशास्त्र उपयुक्त आहे. आज प्रत्येक क्षेत्रात संख्याशास्त्राचे उपयोजन आवश्यक आहे. बदलते तंत्रज्ञान आणि काळाची बदलती आव्हाने यामध्ये संख्याशास्त्रामधील सेवा, रोजगाराच्या संधीही जगभरात व्यापक प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यांचा लाभ करवून घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आज गरज आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी तत्पर राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

डॉ. आनंद करंदीकर म्हणाले, संख्याशास्त्रातील सिद्धांतांकडे विद्यार्थ्यांनी दुर्लक्ष करता कामा नये. या सिद्धांतांचा प्रत्यक्ष व्यवहारात उपयोजन करण्याच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. सांख्यिकीशास्त्राचा वास्तविक जीवनात उपयोग होणे महत्त्वाचे आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच प्रत्यक्ष अनुभवही महत्त्वाचा आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक केस स्टडी करायलाच हवा. एखाद्या प्रकरणाचा वास्तविक जगाच्या संदर्भात सविस्तर अभ्यास करणे भावी कारकीर्दीमधील शिस्तनिर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक संख्याशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. शशीभूषण महाडिक यांनी केले. डॉ. सोमनाथ पवार यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. डॉ. ‌सुकुमार राजगुरू यांनी आभार मानले.

यानंतर झालेल्या पहिल्या सत्रात 'ज्ञान बनो कर्मशील' या विषयावर डॉ. गोरे यांनी, तर 'केस स्टडी अप्रोच इन स्टॅटिस्टिक्स टिचिंग' या विषयावर डॉ. करंदीकर यांनी मार्गदर्शन केले. यानंतर संख्याशास्त्राच्या अध्यापनात येणाऱ्या अडचणी, नाविण्य आणि उपाययोजना याविषयी चर्चा झाली. सत्रसंचालन डॉ. अशोक दोरुगडे यांनी केले. सत्राध्यक्ष डॉ. रटिहळ्ळी यांनी, बारावीच्या विद्यार्थ्यांना संख्याशास्त्र विषय तसेच आय.एस.आय.च्या बी.स्टॅट., एम.स्टॅट. अभ्यासक्रमांची माहिती दिली पाहिजे, असे सांगितले.

दुसऱ्या सत्रात विविध क्षेत्रातील समस्यांची उकल करण्यासाठी संख्याशास्त्राचा कसा उपयोग करता येईल या विषयावर काही निवडक समस्या घेऊन चर्चा करण्यात आली. सत्रसंचालन डॉ. सुकुमार राजगुरू यांनी केले. परिसंवादात उद्या (शनिवार) विद्यार्थ्यांसाठी प्रकल्प सादरीकरण स्पर्धा आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

No comments:

Post a Comment