Monday 26 February 2024

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष:

यकृताच्या कर्करोगावरील संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठास भारतीय पेटंट

डॉ. शंकर हांगिरगेकर यांचे कर्करोगास कारणीभूत पेशींवर अभिनव संशोधन

डॉ. शंकर हांगिरगेकर

डॉ. रुतीकेश गुरव


अक्षय गुरव




कोल्हापूर, दि. २६ फेब्रुवारी: यकृताच्या कर्करोगावरील उपचारप्रसंगी केवळ कर्करोगाच्याच पेशींना लक्ष्य करणाऱ्या अभिनव संशोधनासाठी शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधकांना भारतीय पेटंट मिळाले आहे. डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्यासह संशोधक विद्यार्थी डॉ. रुतीकेश गुरव व अक्षय गुरव यांनी हे संशोधन केले.

या संदर्भात डॉ. हांगिरगेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यकृताच्या कर्करोगावर इतर सर्वसामान्य पेशींना कोणताही अपाय न करता केवळ कर्करोगाच्याच पेशींना लक्ष्य करणाऱ्या डायहैड्रोपिरिमिडोन्सया सेंद्रिय संयुगांची निर्मिती करण्यात यश प्राप्त झाले आहे. या संयुगाची कर्करोगाच्या पेशींवर यशस्वी चाचणीही घेण्यात आली आहे. या चाचणीच्या अहवालात असे आढळून आले की, ही संयुगे कर्करोगाच्या पेशींना पूर्णपणे नष्ट करतात. ते करीत असताना शरीरातील इतर सामान्य पेशींना अपाय करत नाहीत. त्यामुळे ही संयुगे कर्करुग्णावर उपचारांसाठी सुरक्षित आहेत.

सध्या जगभरात आणि भारतातही यकृत कर्करोगाच्या रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढ आहे. जागतिक स्तरावर यकृताचा कर्करोग स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. यकृताच्या कर्करोगामुळे होणारा पुरुषांचा जागतिक मृत्युदर अधिक आहे. यकृताचा कर्करोग हा एक खूपच जटील आजार आहे. आतापर्यंत यकृत कर्करोगाच्या उपचारासाठी सर्जरी, केमोथेरपी, रेडीओथेरपी, अँटीबॉडीज् अशा विविध प्रकारच्या उपचार पद्धती विकसित करण्यात आल्या. परंतु या उपचार पद्धतींमध्ये रूग्णाला उपचारादरम्यानच्या दुष्परिणामांना (साईड इफेक्ट्स) सामोरे जावे लागते. कर्करोगावरील केमोथेरपी उपचारांमध्ये काही औषधांचा उपयोग केला जातो, परंतु या औषधांचा इतर सामान्य पेशींवरही दुष्परिणाम होतो. सध्या वापरात असलेली कर्करोगावरील औषधे ही कर्करोगाच्या पेशी व इतर सामान्य पेशी यात फरक करण्यास असमर्थ ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर, शिवाजी विद्यापीठातील रसायनशास्त्र अधिविभागातील संशोधक डॉ. शंकर हांगिरगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.रुतीकेश गुरव आणि अक्षय गुरव यांनी बारा नवीन ‘डायहैड्रोपिरिमिडोन्स’ सेंद्रिय संयुगे प्रयोगशाळेमध्ये तयार केली. त्यांची चाचणी एच..पी.जी.- या यकृताच्या कर्करोगाला कारणीभूत असणाऱ्या पेशींवर केली. ही संयुगे खूपच निवडकरित्या कर्करोग पेशी नष्ट करतात, असे संशोधनांती आढळून आले. या संयुगांच्या सदर निवडकतेच्या गुणधर्मामुळेच या संशोधनास भारतीय पेटंट प्राप्त झाले आहे.

शिवाजी विद्यापीठातील दर्जेदार संशोधनावर पुनश्च शिक्कामोर्तब: कुलगुरू डॉ. शिर्के

यकृताच्या कर्करोगावरील उपचारांसाठी अतिशय नाविन्यपूर्ण संशोधनास पेटंट प्राप्त झाल्याने शिवाजी विद्यापीठाच्या दर्जेदार व गुणवत्तापूर्ण संशोधनावर पुनश्च एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. यापूर्वी या विभागातील डॉ. गजानन राशिनकर यांनीही स्तनांच्या कर्करोगावरील उपचाराच्या अनुषंगाने केलेल्या संशोधनासही पेटंट मिळाले आहे. जागतिक आरोग्य क्षेत्राच्या दृष्टीने ही संशोधने अत्यंत उपयुक्त आहेत. या संशोधनासाठी डॉ. हांगिरगेकर आणि त्यांचे संशोधक विद्यार्थी यांचे मनापासून अभिनंदन करतो. विद्यापीठातील अन्य संशोधकांनीही असे समाजाभिमुख संशोधन प्रकल्प आवर्जून हाती घ्यावेत, असे आवाहन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी याप्रसंगी केले.

No comments:

Post a Comment