Thursday 22 February 2024

‘शिवस्पंदन’मध्ये उद्या लोकवाद्य महोत्सव आणि प्रदर्शन

 

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवांतर्गत सादर करण्यात आलेली शिवचरित्रावरील लघुनाटिका 

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवांतर्गत सादर करण्यात आलेले एक मूकनाट्य


कोल्हापूर, दि. २२ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या तीनदिवसीय शिवस्पंदन महोत्सवात उद्या (दि. २३) अखेरच्या दिवशी विशेष लोकवाद्य महोत्सव आणि प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. देशभरातील ७५ लोकवाद्यांच्या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन संचालक डॉ. प्रकाश गायकवाड यांनी केले आहे.

डॉ. गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, आजादी का अमृतमहोत्सवानिमित्त देशभरातील ७५ लोकवाद्यांचे वादन आणि प्रदर्शन शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्याचा मनोदय कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी व्यक्त केला होता. त्यांच्याच संकल्पनेतून आणि प्रेरणेतून लोकवाद्य महोत्सव व प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. उद्या, शुक्रवारी सकाळी ७.३० ते ९.३० वा. या कालावधीत लोकवाद्य वादन महोत्सव होईल. देशाच्या चार दिशांकडील राज्यांतील वाद्ये विद्यापीठाच्या परिसरात चार दिशांना वाजविण्याचा हा उपक्रम आहे. त्यानुसार, छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील हिरवळ, क्रांतीवन परिसर, संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाशेजारील तलाव व कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील हिरवळ या चार ठिकाणी हे वादन सादरीकरण होईल. दुपारी १.३० ते ३.३० या कालावधीत राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात या लोकवाद्यांचे पुन्हा एकत्रित सादरीकरण होईल. सकाळी १० ते १ आणि सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत या लोकवाद्यांचे राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात प्रदर्शन मांडण्यात येईल.

या लोकवाद्यांचे होईल वादन

शिवाजी विद्यापीठात आयोजित लोकवाद्य वादन व प्रदर्शनात पुढील वाद्यांचा समावेश आहे.

ढोलकी, ढोलक, पखवाज, मृदुंगम, खोळ, घटम, गंजिरा, खंजिरी, दिमडी, हलगी, पराई, शाहिरी डफ, डफ, डफड, फायबर हलगी, खमक, बुगचू, भपंग, चौंडकं, डमरू, इडक्का, डवर, उडुक्काई, बगलबच्चा, दड्ड, छिंद, डहाका, उरुमी, याकबेर, थाविल, पंबई इसाई, मोडा, कोट्टू, ताशा, चंडा, तुलूनाडू थासे, चेंडा, तबला, संबळ, सनई, बासरी, सुन्द्री, शंख, खालू सनई, नादस्वरम, तोटा, तुणतुणे, तुंबी, मोरसिं, गोंगणा, एकतारी, दामलाई डुमलाई, खालुबाजा, खालूची टिमकी, ढोल, पुणेरी ढोल, धनगरी ढोल, पंजाबी ढोल, कच्ची ढोल, थमरू, मोंदल, मुरासू, थापढोल किंवा डोल, नगारा, चौघडा, मांदल, डुग्गी, काटो, तिबेटियन बाऊल किंवा गाँग, इडतालम, खैताळ, घाटी, खुळखुळा, झांज, चिमटा, घुंगरू, करताल, मंजिरी, लेझी, घोळकाटी, टाळ, चिपळी, घंटा, बडुंगडुप्पा, साप, भोरताल, झेंगाट, बिहू ढोल, बंगाली ढोल, ढाक, पहाडी मांदल.

मूकनाट्य, लघुनाटिकांनी गाजविला दिवस

शिवस्पंदन महोत्सवात आज दिवसभरात मूकनाट्ये, नकला आणि लघुनाटिका सादर करण्यात आल्या. विद्यार्थ्यांनी गंभीर तसेच हलकेफुलके विषय मोठ्या ताकदीने सादर केले आणि उपस्थितांची वाहवा मिळविली. सामाजिक व कौटुंबिक एकोपा, राजकारण, मोबाईलचं व्यसन आणि एकूणच सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणारी उत्तम मूकनाट्ये सादर झाली. त्यानंतर नकलांच्या विविध विषयांवर परिस्थितींवर चिमटे काढत हास्याची पिकवण करण्यात आली. लघुनाटिकेच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय, कौटुंबिक, वैश्विक आणि भावनिक विषयांवर उल्लेखनीय सादरीकरण झाले.


उद्या बक्षीस वितरण

महोत्सवात उद्या, शुक्रवारी (दि. २३) सायंकाळी ६.३० वाजता तीन दिवस चाललेल्या शिवस्पंदन महोत्सवाचा बक्षीस वितरण समारंभ कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात होईल. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात येथेच एकल नृत्य व समूहनृत्य प्रकारांचे सादरीकरण होईल.

No comments:

Post a Comment