शिवाजी विद्यापीठाच्या आढावा बैठकीप्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे स्वागत करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे |
शिवाजी विद्यापीठाच्या आढावा बैठकीप्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे. |
कोल्हापूर, दि. १२
फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठ हे आबालवृद्धांसाठी ज्ञानपर्यटनाचे ठिकाण व्हावे, या
दृष्टीने विद्यापीठाने अभिनव उपक्रमांची कॅम्पसवर निर्मिती करावी. त्यासाठी राज्य
शासन तसेच जिल्हा नियोजन मंडळ यांच्या माध्यमातून सर्वोतोपरी मदत मिळवून देण्यासाठी
प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा कोल्हापूरचे
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.
शिवाजी
विद्यापीठामध्ये मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आज दुपारी आढावा बैठक घेतली. त्यावेळी
ते बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील,
कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ.
महादेव देशमुख, डॉ. श्रीकृष्ण महाजन, अधिसभा सदस्य भैय्यासाहेब माने, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ.
रघुनाथ ढमकले आदी उपस्थित होते.
बैठकीच्या सुरवातीला
प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी विद्यापीठाच्या प्रगतीचा आलेख मंत्री श्री. मुश्रीफ
यांच्यासमोर सादर केला. त्यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के यांनीही शासनाकडे प्रलंबित
असणाऱ्या बाबींचे सादरीकरण केले. सादरीकरण पाहून समाधान व्यक्त करताना मंत्री
मुश्रीफ म्हणाले की, विद्यापीठाने नवीन शैक्षणिक धोरण, संशोधन व विकास यांसह
विद्यार्थी विकास, नवोन्मेष व नवनिर्मिती आदींच्या बाबतीत चालविलेली प्रगती अतिशय
उत्साहवर्धक आहे. स्टार्ट-अपना प्रोत्साहनाच्या बाबतीतही खूप चांगले काम झाले आहे.
या पलिकडे विद्यापीठाचे जलस्वयंपूर्ण होण्याचे कार्य स्तुत्य आहे. आता कॅम्पसवरील रिकाम्या
जागा हेरून तिथे सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारून ऊर्जेच्या बाबतीतही स्वयंपूर्ण
व्हावे. त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात येईल. यापुढे जाऊन विद्यापीठाचा
एक अत्याधुनिक मत्स्यालय उभारण्याचा मानस आहे. ते तर उभारावेच, पण त्यासारखे आणि
लीड बॉटेनिकल गार्डनसारखे आणखी काही नाविन्यपूर्ण उपक्रम, प्रकल्प परिसरात
उभारावेत, जेणे करून शालेय विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठ नागरिक आणि अगदी
पर्यटकांनीही ते पाहण्यासाठी येथे आवर्जून भेट द्यावी. विद्यापीठ हे नॉलेज टुरिझम
डेस्टीनेशन म्हणून उदयास यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
शिवाजी
विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सव निधीमधील अद्याप अप्राप्त असणारा २७ कोटींचा निधी
लवकरात लवकर प्रदान करण्यात यावा, यासाठी पाठपुरावा सुरू केला आहेच. पुनश्च एकदा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करू, अशी ग्वाही मंत्री मुश्रीफ
यांनी दिली. त्याचप्रमाणे विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणारे मत्स्यालय, छत्रपती
शिवाजी महाराज अभ्यास केंद्र, शाहू लोकविद्या आणि लोकसंस्कृती केंद्र
यांच्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याबाबतही त्यांनी
आश्वस्त केले.
यावेळी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे डॉ. सुधीर
देसाई आणि डॉ. वैशाली भोसले यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यासमोर आभासी वास्तविकता
तंत्रज्ञान प्रणालीचे सादरीकरण केले. आठवी ते दहावीच्या अभ्यासक्रमातील विविध
वैज्ञानिक शैक्षणिक संकल्पनांचे सुलभीकरण करण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने हे विशेष
अॅप विकसित केले आहे. कोल्हापूर जिल्हा नियोजन मंडळाच्या अर्थसाह्यातून त्याच्या
पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यातील संशोधन विकासासाठी निधी
सत्वर प्रदान करण्याचे निर्देश यावेळी मंत्री मुश्रीफ यांनी जिल्हा नियोजन
अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरुन दिले.
No comments:
Post a Comment