Sunday, 18 February 2024

विद्यापीठे सक्षमीकरण योजनेअंतर्गत

शिवाजी विद्यापीठास २० कोटींचा निधी

 



कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: केंद्रीय उच्चशिक्षण विभागाच्या वतीने विद्यापीठे सक्षमीकरण निधी योजनेअंतर्गत येथील शिवाजी विद्यापीठाला वीस कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ही माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली आहे.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्चशिक्षण विभाग कार्यरत आहे. या विभागाच्या वतीने प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियान (PM-USHA) या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत ७८ राज्य विद्यापीठामध्ये शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठी १२,९२६.१० कोटी रुपये इतक्या भरीव निधीची तरतूद करण्यात आली आहे. या संदर्भातील प्रकल्प मंजुरी मंडळाची पहिली बैठक १७ व १८ जानेवारी २०२४ रोजी नवी दिल्ली येथे झाली. या बैठकीमध्ये बहुक्रमिक शैक्षणिक व संशोधकीय विद्यापीठे (MERU) आणि विद्यापीठे सक्षमीकरण निधी योजना (GSU) या दोन्ही योजनांसाठी पात्र विद्यापीठाची काल (दि. १७) विभागाकडून घोषणा करण्यात आली आहे. यापैकी विद्यापीठे सक्षमीकरण निधी योजनेसाठी देशभरातून केवळ ५२ विद्यापीठांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात राज्य विद्यापीठांचा समावेश असून शिवाजी विद्यापीठ त्यापैकी एक आहे. शिवाजी विद्यापीठास या योजनेअंतर्गत २० कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या निधीची उपयोग पायाभूत सुविधांचे नूतनीकरण, उपकरण खरेदी आणि शैक्षणिक गुणवत्तावाढीसाठीच्या विविध उपक्रमांसाठी करण्यात येणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता या उपक्रमांचे डिजीटल लाँचिंग करण्यात येणार असून या कार्यक्रमाचे शिवाजी विद्यापीठात थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. राजर्षी शाहू सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमास विदयापीठातील विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment