Thursday, 29 February 2024

स्थानिक शेतकऱ्यांनी अळिंबी उत्पादनाद्वारे उत्पन्न वाढवावे: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 विद्यापीठात एकदिवसीय धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षणास मोठा प्रतिसाद

शिवाजी विद्यापीठात आयोजित धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर डॉ. प्रकाश राऊत.



शिवाजी विद्यापीठात आयोजित धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करताना पुणे कृषी महाविद्यालयाचे कवकशास्त्रज्ञ डॉ. अशोक जाधव. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवर.


शिवाजी विद्यापीठात आयोजित धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थींसमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्यासह (डावीकडून) नामदेव देसाई, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. श्रीकृष्ण महाजन, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. अशोक जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रवीणकुमार पाटील, डॉ. किरण कुमार शर्मा, डॉ. अविनाश भाले.

(धिंगरी अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रमाच्या उद्घाटन सत्राची लघु-चित्रफीत)



कोल्हापूर, दि. २९ फेब्रुवारी: स्थानिक शेतकऱ्यांनी अळिंबी उत्पादनाद्वारे त्यांचे उत्पन्न वाढवावे, तसेच विद्यार्थ्यांनीही याकडे व्यावसायिक संधी म्हणून पाहावे, यासाठी शिवाजी विद्यापीठात अळिंबी लागवड प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज येथे केले. प्रशिक्षणात अनुसूचित जाती-जमातींतील प्रशिक्षणार्थींसह सुमारे २५० हून अधिक शेतकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले.

शिवाजी विद्यापीठाचे एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फौंडेशन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभाग, सामाजिक वंचितता व समावेशक धोरण केंद्र आणि अखिल भारतीय समन्वित अलिंबी संशोधन केंद्र, कृषी महाविद्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय धिंगरी अळिंबी (ऑयस्टर मशरूम) लागवड, व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्याच्या उद्घाटन समारंभात कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. पदार्थविज्ञान विभागाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अळिंबी उत्पादनाचे अनेक व्हिडिओ समाजमाध्यमांवर असतात. अळिंबी उत्पादनातून लखपती व्हा, अशा जाहिरातीही असतात. मात्र, कोणतेही यश हे परिश्रमाखेरीज साध्य होत नाही. अळिंबी उत्पादन असो वा अन्य कोणताही व्यवसाय, तेथे कठोर परिश्रमाला पर्याय नाही. त्यासाठी योग्य व्यक्तींकडून प्रशिक्षण घेणेही आवस्यक असते. स्थानिक शेतकरी व विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी शिवाजी विद्यापीठाने खास पुण्याहून तज्ज्ञांना पाचारण केले आहे. देशभरातील नागरिकांना ते मार्गदर्शन करीत असतात. त्याचा लाभ निश्चितपणे प्रशिक्षणार्थींना होईल. त्याचप्रमाणे हा केवळ एका दिवसाचा कार्यक्रम न राहता सातत्याने अशा प्रकारची प्रशिक्षणे आयोजित केली जायला हवीत. विद्यापीठाच्या परिसरातही अशा प्रकारचे अळिंबी उत्पादनाचे कायमस्वरुपी प्रकल्पस्थळ निर्माण करण्यात यावे आणि तेथे प्रशिक्षणार्थींचे छोटे-छोटे गट बोलावून त्यांना प्रशिक्षित करावे आणि त्यांच्या समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, विकसित भारत या संकल्पनेच्या सर्वांगीण यशस्वितेसाठी असे वैविध्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जाणे अपेक्षित आहे. अळिंबी उत्पादनाच्या क्षेत्रातील आव्हाने, संधी, बाजारपेठांची उपलब्धता अशा चौफेर बाबींची माहिती प्रशिक्षणार्थींनी तज्ज्ञांकडून जाणून घ्यावी, असे त्यांनी सांगितले.

पुणे कृषी महाविद्यालयाचे कवकशास्त्रज्ञ व प्रशिक्षक डॉ. अशोक जाधव यांनी थोडक्यात अळिंबी उत्पादनाचे महत्त्व विषद केले. ते म्हणाले, अळिंबी हा प्रथिनांनी समृद्ध असा पदार्थ आहे. कोरोना काळात त्याचे महत्त्व नागरिकांच्या लक्षात आले. त्यामुळे अळिंबी उत्पादन आणि सेवन यांचे प्रमाण वाढले. अळिंबी उत्पादनात महाराष्ट्र देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे. अळिंबी उत्पादनासाठी मोठे क्षेत्रही लागत नाही. अगदी कमी जागेमध्ये ते घेता येते. त्यामुळे तरुणांनी व्यवसाय संधी म्हणून या क्षेत्राचा गांभिर्याने विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात कार्यशाळेतील पहिल्या सहा नोंदणीकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते अळिंबी उत्पादनाच्या साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागाचे प्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील, सामाजिक वंचितता केंद्राचे सहाय्यक संचालक डॉ. अविनाश भाले, पदार्थविज्ञान अधिविभाग प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे, कृषी सहाय्यक नामदेव देसाई, डॉ. हेमराज यादव, चेतन भोसले आदी उपस्थित होते. सुरवातीला इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेसचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. अभिजीत गाताडे यांनी सूत्रसंचालन केले, तर एसयूके-आरडीएफचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. प्रकाश राऊत यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment