Monday, 26 February 2024

सार्वभौमत्व हे शिवस्वराज्याचे महत्त्वाचे वैशिष्ट्य: डॉ. सुमित्रा कुलकर्णी

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. सुमित्रा कुलकर्णी.

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. सुमित्रा कुलकर्णी. यावेळी मंचावर (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. नीलांबरी जगताप.


(कार्यक्रमाची लघु-चित्रफीत)


कोल्हापूर, दि. २६ फेब्रुवारी: लोककल्याण आणि सहिष्णुता हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्वराज्याचा पाया होता, तर सार्वभौमत्व हे महत्त्वाचे वैशिष्ट्य होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ तथा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माजी इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. सुमित्रा कुलकर्णी यांनी केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अधिविभागातर्फे ३५०व्या शिवस्वराज्य दिनाच्या निमित्ताने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज व्याख्यानमालेअंतर्गत आज मराठा स्वराज्य निर्मिती: एक अवलोकन या विषयावरील व्याख्यानात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे प्रमुख उपस्थित होते.

डॉ. सुमित्रा कुलकर्णी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्मितीचा वेध घेत असताना स्वराज्याचे बाह्यरंग, अंतरंग, कार्यपद्धती आणि व्याप्ती या बाबींची अत्यंत अभ्यासपूर्ण मांडणी केली. त्या म्हणाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे त्या काळच्या सामंतशाहीच्या विपरित निर्माण झालेले होते. उत्तर प्रदेशापासून ते तमिळनाडू प्रांतापर्यंत संपूर्ण देशाला त्यातून प्रेरणा देण्याचे कार्य या घटनेने केले. हे स्वराज्य मध्ययुगीन राष्ट्रभावनेचा प्रभावी आविष्कार ठरले. अनेक घटक आणि अनेक प्रक्रियांच्या एकत्रीकरणातून ही स्वराज्यनिर्मिती झाली. छत्रपतींच्या आज्ञापत्रांतून राज्य, स्वराज्य, महाराष्ट्रभूमी अशा शब्दांनी स्वराज्याचे वर्णन दिसून येते. राज्याच्या संकल्पनेमध्ये लोकसंख्या, विशिष्ट लोकसमूहांचा भूप्रदेश, शासनसंस्थेचे लोकाभिमुख स्वरुप आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे सार्वभौम हक्क यांचा समावेश होतो. ही सार्वभौमिकता हे छत्रपतींच्या स्वराज्याचे व्यवच्छेदक लक्षण म्हणून सामोरे येते.

डॉ. कुलकर्णी पुढे म्हणाल्या, स्वराज्यामध्ये राजकीय प्रक्रिया ही कायद्याची बाब म्हणून सामोरी येत असली तरी त्यामध्ये अंतर्भूत सामाजिक-सांस्कृतिक प्रक्रिया आणि आकलन होणाऱ्या मानसिक प्रक्रिया या स्वराज्यनिर्मितीसाठी परस्परपूरक भूमिका बजावतात. यामुळे महाराष्ट्रातील सर्व भूमीपुत्रांसाठी उदयाला आलेले राज्य म्हणून स्वराज्याकडे पाहायला हवे. त्यामध्ये सर्व धर्म, जात, पंथ आदींच्या लोकांचा समावेश आहे. ही भूमी कोणा बादशहाची नव्हे, तर तुमची आमची आहे, ही आपलेपणाची भावना लोकांच्या मनात निर्माण झाली, हे छत्रपती शिवाजी महाराजांचे देणे आहे. त्यांनी तत्कालीन जहागीरदार, वतनदारांचे लक्षही सुलतानांच्या राजनिष्ठेकडून स्वराज्य प्रेरणेकडे वळविले. वतनदार हे वतनाकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे प्रतीक म्हणून पाहायचे, त्यामुळे ती दृढमूल बनलेली होती, हे दोष लक्षात घेऊन महाराजांनी त्यावर नियंत्रण आणण्याचे काम केले. वतने राखली, पण महसूल गोळा करण्याच्या पद्धतींवर नियंत्रण आणले. यातून वतन पद्धतीवर आपल्या मध्यवर्ती राज्य प्रशासनाचा वचक बसविला. त्याचप्रमाणे राज्याभिषेक पट्टीतून लोकांना स्वराज्याचे अस्तित्व मान्य करावयास भाग पाडले. सुशासनातून आपल्या स्वराज्याचे वेगळेपण दाखवून दिले. महाराजांची आज्ञापत्रे स्वराज्याचे प्रशासकीय तत्त्वज्ञान कळवितात. व्यापारवृद्धी करीत असताना सर्वसामान्य शेतकऱ्याच्या अभ्युदयासाठी त्यांनी सत्तेचा वापर केला. एकछत्री अंमल चालविताना स्वराज्य एकतंत्री होणार नाही, याची दक्षताही त्यांनी घेतली. महाराजांचे राज्य उत्क्रांत होत होत राज्याभिषेकापर्यंत पोहोचले. शिवराज्याभिषेक ही शिवाजी महाराजांनी आरंभलेल्या स्वराज्यनिर्मितीच्या चळवळीची उच्चतम अवस्था आहे. त्याद्वारे पारंपरिक राज्यपदाच्या पलिकडे महाराजांनी आपल्या राजपदाच्या कक्षा व्यापक केल्या. या व्याप्तीनेच ते लोकनायक राजाठरले.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, स्वराज्यनिर्मितीची प्रक्रिया ही महाराष्ट्राच्या इतिहासातील, लोकजीवनातील फार महत्त्वाची प्रक्रिया आहे. या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी घडविलेल्या राजकीय, सामाजिक-सांस्कृतिक आणि मानसिक अभिसरणातून येथील लोकांचे जीवनमान, राहणीमान यांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊ शकला. स्वराज्यप्रेरणेतून त्यांच्या मनी स्वाभिमान जागृत झाला. डॉ. कुलकर्णी यांची अत्यंत शास्त्रीय व अभ्यासपूर्ण मांडणी प्रत्येक घटकासाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या व्याख्यानाची पुस्तिका विद्यापीठाच्या छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्राच्या वतीने प्रकाशित करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या प्रस्तावाला डॉ. कुलकर्णी यांनी अनुमोदन दिले.

कार्यक्रमाच्या सुरवातीला इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. नीलांबरी जगताप यांनी आभार मानले. यावेळी मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे, ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. अरुण भोसले, डॉ. एम.ए. लोहार, डॉ. कपिल राजहंस, डॉ. दत्तात्रय मचाले यांच्यासह विविध महाविद्यालयांतील शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 




No comments:

Post a Comment