वाद्यमहोत्सव आणि प्रदर्शनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवांतर्गत आयोजित लोकवाद्य महोत्सवात मुख्य प्रशासकीय इमारतीसमोरील परिसरात सादरीकरण करताना विद्यार्थी |
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवांतर्गत आयोजित लोकवाद्य महोत्सवात कर्मवीर भाऊराव पाटील पुतळा परिसरात सादरीकरण करताना विद्यार्थी |
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवांतर्गत आयोजित लोकवाद्य महोत्सवात संगीत व नाट्यशास्त्र तलाव परिसरात सादरीकरणाचा आनंद घेताना आवाबलवृद्ध नागरिक |
शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन महोत्सवांतर्गत आयोजित लोकवाद्य महोत्सवात क्रांतीवन परिसरात सादरीकरण करताना विद्यार्थी |
कोल्हापूर, दि. २३ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने सुरू असलेल्या
तीनदिवसीय शिवस्पंदन महोत्सवात आज (दि. २३) अखेरच्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या
विशेष लोकवाद्य महोत्सवामुळे विद्यापीठ परिसर लोकवाद्यांच्या निनादाने अक्षरशः
न्हाऊन निघाला. ज्या वाद्यांचा आवाज आणि संगीत हे कित्येकदा सांगितिक ध्वनीफीती
अथवा चित्रपटांमधूनच कानी येतात, अशा वाद्यांना प्रत्यक्ष पाहणं आणि त्यांचं
नादावून टाकणारं संगीत ऐकणं, ही नागरिकांसाठी मोठी पर्वणीच ठरली. देशभरातील ७५
लोकवाद्यांच्या वादनाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांनी उत्स्फूर्त उपस्थिती
दर्शविली आणि हा उपक्रम आयोजित केल्याबद्दल विद्यापीठास विशेष धन्यवादही दिले.
भारताच्या स्वातंत्र्यास ७५ वर्षे पूर्ण होत असताना
देशभरातील ७५ लोकवाद्यांचे वादन आणि प्रदर्शन शिवाजी विद्यापीठात आयोजित करण्याचा कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांचा मानस होता. त्यांच्याच संकल्पनेतून आणि प्रेरणेतून
लोकवाद्य महोत्सव व प्रदर्शनाचे आज आयोजन करण्यात आले. आज सकाळी ७.३० ते ९.३० वा.
या कालावधीत लोकवाद्य वादन महोत्सव संपन्न झाला. या उपक्रमांतर्गत देशाच्या चार
दिशांकडील राज्यांतील वाद्ये विद्यापीठाच्या परिसरात चार दिशांना वाजविण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोरील परिसरात
सकाळी साडेसात वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी हलगी वाजवून या उपक्रमाचे
सांगितिक उद्घाटन केले. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी ढोल, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी डफ आणि अधिसभा सदस्य
धैर्यशील यादव यांनी चौडकं वाजवून या उद्घाटन समारंभात रंगत आणली. त्याखेरीज
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळ्यासमोरील परिसर, संगीत व नाट्यशास्त्र
विभागाशेजारील तलाव आणि क्रांतीवन या
ठिकाणीही विविध लोकवाद्यांचे वादन करण्यात आले. सर्व मान्यवरांनी संयोजन समितीच्या
सदस्यांसह सदर सादरीकरणांचा आस्वाद घेतला आणि वादक विद्यार्थ्यांना प्रोत्साहन
दिले आणि त्यांचे अभिनंदन केले.
या सर्व लोकवाद्यांचे सकाळी १० ते १ आणि सायंकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत राजमाता
जिजाऊसाहेब सभागृहात प्रदर्शन मांडण्यात आले. त्यामध्ये प्रत्येक वाद्याचा माहितीफलकही
देण्यात आला. विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह महाविद्यालयीन विद्यार्थी, शालेय
विद्यार्थ्यांनीही या प्रदर्शनाला भेट देऊन या वाद्यांची माहिती घेतली. दुपारी
१.३० ते ३.३० वा. या कालावधीत राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात या
लोकवाद्यांचे पुन्हा एकत्रित सादरीकरण करण्यात आले.
दीपक बीडकर आणि संदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आलेल्या या
उपक्रमात ऋषीकेश देशमाने, शंतनू पाटील, नितीन शिंदे, तेजस गोविलकर, गणेश इंडीकर, मयुरेश
शिखरे, अभय हावळ, सुजल कांबळे, कौस्तुभ शिंदे, अनिकेत देशपांडे, प्रशिक कांबळे, प्रतीक
जाधव, सुमंत कुलकर्णी, हर्षदा परीट, सूरज कांबळे, धीरज खोत, अक्षय कडोले आणि पृथ्वीराज
माळी यांनी विविध वाद्यांचे सादरीकरण केले. संयोजन समितीच्या सर्व सदस्यांनी
उपक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात राजमाता जिजाऊसाहेब बहुउद्देशीय सभागृहात शिवस्पंदन
महोत्सवातील अखेरच्या एकल नृत्य आणि समूह नृत्य स्पर्धा पार पडल्या.
‘भारताच्या सांगितिक परंपरेशी विद्यापीठाचे नाते वृद्धिंगत’
शिवाजी विद्यापीठाने देशभरामध्ये वाजविल्या जाणाऱ्या
विविध लोकवाद्यांचा महोत्सव आयोजित करून त्यांचे वादन आणि प्रदर्शन या माध्यमातून
देशाच्या सांगितिक परंपरेशी असणारे आपले नाते अधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न
केलेला आहे. यंदा पहिला उपक्रम आहे. यातून ही परंपरा जतन करण्याबरोबरच त्यांची
माहिती नागरिकांना होणे, ही भावनाही त्यापाठी आहे. दरवर्षी अशा प्रकारचा उपक्रम
विद्यापीठात आयोजित केला जावा, त्यामध्ये अधिकाधिक वाद्यांची भर पडावी आणि रसिक
कोल्हापूरकर नागरिकांना त्यांचा आस्वाद घेता यावा, या दृष्टीने प्रयत्न करण्यात
येतील, अशी ग्वाही कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी यावेळी बोलताना दिली.
या लोकवाद्यांचे झाले वादन
शिवाजी विद्यापीठात आयोजित लोकवाद्य वादन व प्रदर्शनात पुढील वाद्यांचा समावेश
राहिला. ढोलकी, ढोलक, पखवाज, मृदुंगम, खोळ, घटम, गंजिरा, खंजिरी, दिमडी, हलगी, पराई, शाहिरी डफ, डफ, डफड, फायबर हलगी, खमक, बुगचू, भपंग, चौंडकं, डमरू, इडक्का, डवर, उडुक्काई, बगलबच्चा, दड्ड, छिंद, डहाका, उरुमी, याकबेर, थाविल, पंबई इसाई, मोडा, कोट्टू, ताशा, चंडा, तुलूनाडू थासे, चेंडा, तबला, संबळ, सनई, बासरी, सुन्द्री, शंख, खालू सनई, नादस्वरम, तोटा, तुणतुणे, तुंबी, मोरसिंग, गोंगाणा, एकतारी, दामलाई डुमलाई, खालुबाजा, खालूची टिमकी, ढोल, पुणेरी ढोल, धनगरी ढोल, पंजाबी ढोल, कच्ची ढोल, थमरू, मोंदल, मुरासू, थापढोल किंवा डोल, नगारा, चौघडा, मांदल, डुग्गी, काटो, तिबेटियन बाऊल किंवा गाँग, इडतालम, खैताळ, घाटी, खुळखुळा, झांज, चिमटा, घुंगरू, करताल, मंजिरी, लेझीम, घोळकाटी, टाळ, चिपळी, घंटा, बडुंगडुप्पा, साप, भोरताल, झेंगाट, बिहू ढोल, बंगाली ढोल, ढाक, पहाडी मांदल.
No comments:
Post a Comment