शिवाजी विद्यापीठात तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारला प्रारंभ
'ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये बोलताना प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
'ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. |
'ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये बीजभाषण करताना ग्रीसच्या डॉ. रानिया लम्पाऊ. |
'ई-कचरा व्यवस्थापन आणि शाश्वत विकास' या विषयावर शिवाजी विद्यापीठात आयोजित आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये बीजभाषण करताना ग्रीसच्या डॉ. रानिया लम्पाऊ. |
कोल्हापूर, दि. १३
फेब्रुवारी: जगभरात दरवर्षी ६२.५ अब्ज डॉलर्स इतक्या किंमतीचा ई-कचरा
निर्माण होत असल्याचे संयुक्त राष्ट्रांचा पर्यावरणविषयक अहवाल सांगतो. त्यामुळे
आजघडीला ई-कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रामध्ये उद्योग निर्मितीच्या अनेक संधी
आहेत. त्यांचा लाभ घेऊन पर्यावरण स्वच्छ करण्यासाठी संशोधकांनी पुढे येण्याची गरज
आहे, असे प्रतिपादन ग्रीस मंत्रालयाच्या शैक्षणिक सल्लागार डॉ. रानिया लम्पाऊ
यांनी आज केले.
शिवाजी विद्यापीठाचा इलेक्ट्रॉनिक्स अधिविभाग आणि ई-कचरा व्यवस्थापन केंद्र
यांच्या संयुक्त विद्यमाने आज ‘इलेक्ट्रॉनिक
कचरा आणि शाश्वत विकास’
या विषयावरील तीनदिवसीय आंतरराष्ट्रीय वेबिनारला प्रारंभ झाला. त्यावेळी बीजभाषक
म्हणून त्या बोलत होत्या. तत्पूर्वी, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर
शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत
या परिषदेचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले.
डॉ. लम्पाऊ यांनी आपल्या बीजभाषणामध्ये इलेक्ट्रीकल आणि इलेक्ट्रॉनिक
कचऱ्यामुळे जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या पर्यावरणविषयक समस्यांचा वेध घेतला
आणि त्यावरील उपाययोजनांचाही वेध घेतला. ई-कचरा व्यवस्थापन उद्योग उभारणी हा सध्या
निर्माण झालेला ई-कचरा संपुष्टात आणण्याचा महत्त्वाचा पर्याय असल्याचे सांगून त्या
म्हणाल्या, दरवर्षी जगभरात निर्माण होणाऱ्या ई-कचऱ्याची किंमत ही जगातल्या कित्येक
देशांच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नापेक्षाही अधिक आहे, यावरुन त्याचे गांभीर्य
लक्षात यावे. एक टन सुवर्ण खनिजामध्ये जितके सोने सापडते, त्याहून शंभर पट अधिक
सोने हे एक टन ई-कचऱ्यामध्ये असते. इतर धातूंच्या बाबतीतही हीच अवस्था आहे.
त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने रितसर ई-कचरा व्यवस्थापन प्रकल्प उभारून त्याद्वारे कमीत
कमी प्रदूषण करून हे सारे धातू पुनर्वापरात आणणे अत्यावश्यक आहे. या बाबीचा विचार
होणे आवश्यक आहे.
डॉ. लम्पाऊ म्हणाल्या, ई-कचरा हा हवा, पाणी आणि जमीन या सर्व माध्यमातून
पर्यावरणात मिसळतो आणि अन्नसाखळी प्रदूषित व प्रभावित करतो. हे टाळण्यासाठीही
ई-कचऱ्याचे व्यवस्थापन आवश्यक ठरते. त्याच बरोबर ई-कचरा निर्मितीचे प्रमाण कमी
करण्याच्या दृष्टीने एखादी
इलेक्ट्रॉनिक वस्तू रिप्लेस (बदलणे) करण्यापेक्षा रिपेअर (दुरुस्ती), रियुज (पुनर्वापर)
आणि रिसायकल (प्रक्रिया करून पुन्हा वापरात आणणे) या त्रिसूत्रीचा अवलंब केला जाणे
आवश्यक आहे. आजकाल नव्या फीचर्सचा समावेश असणारी अद्यावत वस्तू बाजारात आली की थेट
जुनी टाकून देण्यात येते. किंवा जुन्या वस्तूमधील एखादा भाग खराब झाल्यास ती वस्तू
कित्येकदा ‘युज अँड थ्रो’ प्रकारची असल्याने टाकून द्यावी
लागते. अशा परिस्थितीत जर त्या वस्तूची सहज व स्वस्तात दुरुस्ती करण्याची सुविधा
झाल्यास तिचे ई-कचऱ्यात होणारे रुपांतर टाळता येते किंवा लांबविता येते. त्यामुळे
पूर्वीप्रमाणे दीर्घायु उत्पादनांची निर्मिती करण्यासाठी कंपन्यांना प्रोत्साहित
केले पाहिजे. युरोपियन युनियनमधील
देशांत अवघ्या ४० टक्के ई-कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात येते. ही रिसायकलिंगची
प्रक्रियाही देशनिहाय वेगवेगळी आहे. क्रोएशियामध्ये हे प्रमाण ८० टक्क्यांच्या
घरात तर माल्टामध्ये २० टक्के इतके अल्प आहे. जगभरात ही दरी खूप मोठी आहे. ती कमी
करण्याची आवश्यकता आहे. त्याचप्रमाणे ई-कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी चार्जिंग
साधनांमध्ये एकरुपता आणण्याचीही आवश्यकता आहे. त्या दृष्टीने युरोपियन युनियनमध्ये
२०२४च्या अखेरपर्यंत सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये चार्जिंगसाठी टाइप-सी पोर्ट
देणे बंधनकारक करण्यात आले आहे. लॅपटॉपसुद्धा एप्रिल २०२६पर्यंत युएसबी टाइप-सीने
सुसज्ज असतील. ई-कचऱ्याचे संकलन करून त्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात आणण्यासाठी
अशी अनेक ठोस धोरणे अंमलात आणण्याची गरज आहे.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील म्हणाले, भावी पिढ्यांसाठी सुद्धा जग हे
राहण्याचे एक चांगले ठिकाण म्हणून राखावयाचे असल्यास शाश्वत विकास या संकल्पनेची
कास धरणे आवश्यक आहे. पर्यावरणस्नेही व पर्यावरण सुसंगत धोरणे आखून ई-कचऱ्याचे
व्यवस्थापन करण्याची आवश्यकता आहे. रिड्यूस-रियुज-रिसायकल यांच्यापुढे जाऊन आता
अपसायकलिंगचाही विचार केला जाणे हितावह आहे. मात्र, त्यासाठी मोठ्या प्रमाणात नवोन्मेषी
संशोधन करायला हवे. प्लास्टीकचा धोका व प्रदूषण टाळण्यासाठी संशोधक त्यापासून
ग्राफाईट निर्मितीचा विचार करतात आणि ते प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रचंड संशोधन
करतात, हे अपसायकलिंग आहे. हा नव्या जगाचा नवा मंत्र आहे. समस्येकडे पाहण्याची
दृष्टी आणि दृष्टीकोन त्यासाठी बदलायला हवा आणि त्यातून संशोधनाचा नवी दिशा
द्यायला हवी, असे मत त्यांनी व्यक्त केले.
उद्घाटनपर मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, मानवाचे जीवन अधिकाधिक
सुखकर करण्याच्या नादात आपण काही अनिष्ट बाबी केल्या. कचरानिर्मिती हा त्यातील
महत्त्वाचा घटक आहे. आता प्रगतीने आपल्याला ई-कचऱ्याच्या समस्येपर्यंत आणून सोडले
आहे. या समस्येवर मात करणे शक्य आहे. त्यासाठी प्रत्येक उत्पादन हे ई-कचरा
व्यवस्थापनाच्या प्रोकॉलसहच बाजारात दाखल व्हायला हवे. ई-कचऱ्याचे अपव्यवस्थापन ही
जागतिक समस्या आहे. ती सोडविण्यासाठी व्यापक संशोधनाबरोबरच ठोस व कडक धोरणे
आखण्याचीही गरज आहे. घनकचरा व ई-कचरा तयरा करणाऱ्यांकडून अतिरिक्त कर वसूल करून तो
स्थानिक आस्थापनांकडे सुपूर्द करावा. संगणक आणि मोबाईल संचांमुळे अतिरिक्त ई-कचरा
तयार होतो. त्यावर प्रक्रिया करून तो पुनर्वापरात आणण्याची जबाबदारी उत्पादक
कंपन्यांवरच सोपवायला हवी. कमीत कमी ई-कचरा तयार होईल, अशा पद्धतीने इलेक्ट्रॉनिक
वस्तूंचे डिझाईन करण्याला प्रोत्साहन द्यायला हवे. शाश्वत विकासाच्या
उद्दिष्टांनुरुप पर्यावरणाला हानी पोहोचविणे कमी करीत नेण्याच्या दृष्टीने जागतिक
धोरणे आखली जाणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
सुरवातीला कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते रोपट्यास पाणी वाहून वेबिनारचे
उद्घाटन करण्यात आले. इलेक्ट्रॉनिक्स अधिविभागाचे प्रमुख डॉ. पवन गायकवाड यांनी
स्वागत केले. वेबिनारचे समन्वयक डॉ. मुरलीधर भानारकर यांनी प्रास्ताविक केले. योगिता
खोपर्डे व स्वप्नाली बांगडे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. एस.एम.
मस्के यांनी आभार मानले. यावेळी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. पी.ए. कदम, डॉ. एस.ए. शिंदे, एम.के. पंधारे
यांच्यासह शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment