विद्यार्थ्यांच्या आकर्षक सादरीकरणांनी भारावले वातावरण
कोल्हापूर, दि. १९
फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज
शिवजयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाला. तरुणाईकडून
उत्स्फूर्तपणे काढण्यात आलेली शोभायात्रा, लेझीम, ढोल व झांजपथकाचे उत्कृष्ट
सादरीकरण, जरीपटक्याचे मिरविणे यांमुळे विद्यापीठाचा परिसर आज पूर्णपणे शिवमय होऊन
गेला.
विद्यापीठात आज सकाळी ठीक साडेआठ वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या
हस्ते विद्यापीठ ध्वजास वंदन करण्यात आले. यावेळी राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व
विद्यापीठ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यानंतर कुलगुरू डॉ. शिर्के आणि
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह मान्यवरांनी विद्यापीठाच्या प्रांगणातील
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्यास पुष्प वाहून अभिवादन केले,
त्याचप्रमाणे शिवप्रतिमेसही पुष्पहार घालून अभिवादन केले आणि सर्व उपस्थितांना
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी विद्यापीठाच्या वसतीगृहातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसह राष्ट्रीय
सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी विद्यापीठ परिसरात ढोल-ताशाच्या निनादात भव्य
शोभायात्रा काढली. भगवे फेटे आणि शुभ्रवस्त्रांकित तरुणाईमुळे ही शोभायात्रा
लक्ष्यवेधी ठरली. शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आल्यानंतर
तेथे आणि मुख्य प्रशासकीय भवन इमारतीसमोर या विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्कारांचे
सुमारे दोन तास सादरीकरण केले. यामध्ये झांजपथकाचे सादरीकरण, लेझीम प्रात्यक्षिके,
जरीपटका नाचविण्याचा उपक्रम यांचा समावेश होता. सळसळत्या तरुणाईच्या उत्साहाने
विद्यापीठाचा परिसर पूर्णपणे शिवमय होऊन गेला. कुलगुरू डॉ. शिर्के व प्र-कुलगुरू
डॉ. पाटील यांच्यासह सर्वच अधिकाऱ्यांनी पूर्णवेळ उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या
या सादरीकरणाला प्रोत्साहन दिले. त्याचप्रमाणे त्यांच्या उत्साहपूर्ण
सादरीकरणाबद्दल कौतुकही केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.
अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ.
सुहासिनी पाटील,
विज्ञान व तंत्रज्ञान शाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, वाणिज्य व व्यवस्थापन
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे
अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. प्रकाश
गायकवाड, राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे,
बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, आजीवन अध्ययन केंद्राचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, इनोव्हेशन,
इनक्युबेशन व लिंकेजिस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनिश पाटील, डॉ.
नीलांबरी जगताप, डॉ. दत्तात्रय मचाले यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख,
शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
No comments:
Post a Comment