Wednesday, 28 February 2024

शिवाजी विद्यापीठात आता पिकणार ‘मोत्यांची शेती’

शिवाजी विद्यापीठाच्या मोती उत्पादन, संशोधन केंद्राचे उद्घाटन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत (डावीकडून) डॉ. सरिता ठकार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. आशिष देशमुख, डॉ. नितीन कांबळे, दिलीप कांबळे 
 

शिवाजी विद्यापीठाच्या मोती उत्पादन, संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी गोड्या पाण्यातील मोत्यांच्या निर्मितीविषयी दिलीप कांबळे यांच्याकडून जाणून घेताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. सरिता ठकार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. आशिष देशमुख, डॉ. नितीन कांबळे


शिवाजी विद्यापीठाच्या मोती उत्पादन, संशोधन केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत (डावीकडून) डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. नितीन कांबळे, दिलीप कांबळे, डॉ. एस.आर. यन्कंची,डॉ. सरिता ठकार, डॉ. आशिष देशमुख, डॉ. सुनील गायकवाड आदी

(मोती उत्पादन व संशोधन केंद्राच्या उद्घाटनाची लघु-चित्रफीत)


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: अभिनव आणि नवोन्मेषी उपक्रमांना सातत्याने पाठबळ देणारे शिवाजी विद्यापीठ आता खऱ्याखुऱ्या मोत्यांची शेती पिकविण्यास सिद्ध झाले आहे. विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र अधिविभागाने घेतलेल्या पुढाकारातून गोड्या पाण्यातील मोती संवर्धन, संशोधन आणि उत्पादन केंद्राचे आज कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या उत्साहाच्या वातावरणात उद्घाटन झाले.

कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांना सडोली दुमाला येथील मोती उत्पादक व प्रशिक्षक दिलीप कांबळे यांच्याविषयी माहिती समजल्यानंतर त्यांनी प्राणीशास्त्र अधिविभागाला त्यांच्याशी संपर्क साधून अशा प्रकारचे प्रशिक्षण केंद्र विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी उभारण्याविषयी चाचपणी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार आज विद्यापीठात हे मोती पिकविणारे केंद्र श्री. कांबळे यांच्याच सहकार्यातून उभे राहिले आहे. विभागातील प्राणीशास्त्रज्ञ डॉ. नितीन कांबळे हे त्याचे समन्वयक म्हणून काम पाहात आहेत.

प्राणीशास्त्र अधिविभागाच्या सकारात्मक प्रतिसादातून हे केंद्र उभे राहिले, त्याबद्दल उद्घाटन प्रसंगी विभागाचे अभिनंदन करून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, विद्यापीठाचा प्राणीशास्त्र अधिविभाग अनेक वर्षांपासून अनेकविध समाजाभिमुख उपक्रम राबवित आहे. त्याचा विद्यार्थ्यांनाही लाभ होतो आहे. विभागातील रेशीमशेतीचा सॉईल टू सिल्क प्रकल्प, फुलपाखरू उद्यान आणि अलिकडच्या काळात सुरू केलेला शोभेच्या मत्स्यउत्पादनाचा प्रकल्प ही याची काही उदाहरणे आहेत. आपल्या विभागातील विद्यार्थी आणि नागरिक यांना सगळे समुद्रीजीव एकाच ठिकाणी पाहता येतील, अशा पद्धतीचे भव्य मत्स्यालय उभारण्याचाही मनोदय आहे. आज कार्यान्वित करण्यात आलेले गोड्या पाण्यातील मोत्यांच्या उत्पादन व संशोधनाचे केंद्र हेही या मालिकेतील महत्त्वाचे पाऊल आहे. ही मोत्यांची शेती विद्यापीठ पैशांसाठी करीत नसून ज्ञानसंवर्धनासाठी करीत आहे. पर्ल फार्मिंग या विषयाचा आपल्या अभ्यासक्रमात समावेश करावा आणि किमान दर वर्षी काही उद्योजक, व्यावसायिक आपल्या विद्यार्थ्यांमधून निर्माण व्हावेत, अशा प्रकारे त्यांना प्रशिक्षित करावे, अशी सूचनाही त्यांनी या प्रसंगी केली.

यावेळी डॉ. नितीन कांबळे आणि दिलीप कांबळे यांनी कुलगुरूंसह उपस्थितांना मोत्यांचे फार्मिंग कशा प्रकारे करण्यात येते, याचे सविस्तर प्रात्यक्षिक करून दाखविले. तत्पूर्वी, कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते केंद्राच्या नामफलकाचे अनावरण करण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते दिलीप कांबळे यांना ग्रंथ भेट देऊन गौरव करण्यात आला.

या प्रसंगी अधिविभाग प्रमुख डॉ. आशिष देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, डॉ. एस.आर. यन्कंची, डॉ. माधुरी वाळवेकर, डॉ. सुनील गायकवाड यांच्यासह प्रशासकीय सेवक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment