शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय गणित दिनानिमित्त आयोजित विविध उपक्रमांत महाविद्यालयांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभागही लक्षणीय ठरला. |
कोल्हापूर, दि. २२ फेब्रुवारी: राष्ट्रीय गणित दिन ही एक दिवसाची औपचारिकता न मानता दोन महिन्यांहून अधिक
काळ विविध गणितीय उपक्रम आयोजित करून त्यामध्ये विद्यापीठासह महाविद्यालये तसेच शालेय
विद्यार्थी आणि शिक्षकांना सामावून घेऊन खऱ्या अर्थाने गणिताच्या लोकप्रियता
वाढीसाठीचे प्रयत्न शिवाजी विद्यापीठाच्या गणित अधिविभागाने केले. या उपक्रमांना
उत्तम प्रतिसादही लाभला. विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या अधिष्ठाता तथा गणित अधिविभागप्रमुख डॉ. सरिता ठकार यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपक्रम पार पडले.
भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत असणारे राष्ट्रीय
विज्ञान व तंत्रज्ञान संप्रेषण मंडळ (एनसीएसटीसी), राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान आयोग, आणि शिवाजी विद्यापीठाचा गणित
अधिविभाग यांनी राष्ट्रीय गणित दिनानिमित्त १८ डिसेंबर २०२३ ते १७ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत विविध कार्यक्रम आयोजित केले. १८ डिसेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय गणित सप्ताह साजरा करण्यात आला. २२ डिसेंबर २०२३ रोजी ‘विविध भारतीय गणिततज्ञ आणि त्यांचे गणितातील योगदान’ या विषयावरील
सादरीकरणाने राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला. नांदेडच्या स्वामी
रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील डॉ. सुरेंद्रनाथ रेड्डी यांचे ‘डिफरंट काईंड्स ऑफ प्रूफ्स’ या विषयावर व्याख्यान झाले. १५ फेब्रुवारी रोजी ‘रिप्रेझेंटेशन थिअरी’ या विषयावर विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आली. कार्यशाळेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डॉ. हेमंत भाटे यांचे मार्गदर्शन लाभले. १७ फेब्रुवारी रोजी शिवाजी विद्यापीठांतर्गत पदव्युत्तर गणित विभागांसाठी प्रश्नमंजुषा, निबंध, सेमिनार स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ५ पदव्युत्तर विभागांतील ३२ विद्यार्थी सहभागी झाले. गणितात रुची असणाऱ्या कोल्हापूर शहरातील शालेय विद्यार्थ्यांसाठी भित्तीपत्रक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ११ शाळांमधील १३ शिक्षकांसह इयत्ता आठवी आणि नववीच्या ३१ विद्यार्थ्यांनी भित्तीपत्रक प्रदर्शन आणि स्पर्धा यांत सहभाग घेतला. शालेय विद्यार्थी आणि शिक्षक यांना गणित ऑलिंपियाडची माहिती आणि या स्पर्धांसाठीची तयारी यासंबंधी पुण्याच्या प्रा. नौरोसजी वाडिया कॉलेजमधील डॉ. सी. एस. निमकर यांचे विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले.
विलिंग्डन, विवेकानंद महाविद्यालयांसह विद्यापीठ हायस्कूलचे
यश
यावेळी झालेल्या भित्तीपत्रक स्पर्धेत अनुक्रमे विद्यापीठ हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, राजर्षी छत्रपती शाहू महाराज हायस्कूल आणि महाराष्ट्र हायस्कूल यांनी पारितोषिके मिळवली. तसेच निबंध स्पर्धेत विलिंग्डन महाविदयालय (सांगली) आणि सेमिनार स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय (कोल्हापूर) विजयी झाले. प्रश्नमंजुषा स्पर्धेत विवेकानंद महाविद्यालय (कोल्हापूर) यांनी प्रथम तर शिवाजी विद्यापीठ चमूने द्वितिय क्रमांक पटकावला.
या कार्यक्रमासाठी गणिताचे निवृत्त
प्राध्यापक डॉ. सी. एस. मांजरेकर, स्कूल ऑफ नॅनोसायन्सचे डॉ. पी.जे.पाटील, यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे डॉ. एस. एस. सुतार, पर्यावरण शास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. आसावरी जाधव, आणि डॉ. सी. एस. निमकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अधिविभागातील प्राध्यापक डॉ. एम. टी. गोफणे, डॉ. के. डी. कुचे, डॉ. जे. पी. खराडे, डॉ. एस. एस. कुंभार, जे. पी. भोसले, डॉ. एस. के. खराडे, एस. डी. थिटे यांनी परिश्रम घेतले.
No comments:
Post a Comment