Sunday 18 February 2024

शिवाजी विद्यापीठातून आता करता येणार ऑनलाइन एम.बी.ए.

 अभ्यासक्रम असणारे महाराष्ट्रातील एकमेव दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र

 


कोल्हापूर, दि. १८ फेब्रुवारी: ‘नॅक’चे ‘ए++’ मानांकन प्राप्त झाल्यानंतर शिवाजी विद्यापीठ हे विद्यापीठ अनुदान आयोगाचे विविध ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू करण्यास पात्र झाले आहे. आयोगाच्या मान्यतेनुसार आता विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामार्फत येत्या शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन एम.बी.ए.चा अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे, अशी माहिती कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी दिली.

कुलगुरू डॉ. शिर्के यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठ नॅक ‘ए++’ मानांकनप्राप्त असल्याने  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यतेने एम.बी.ए., एम.कॉम., एम.एस्सी (गणित), एम.एस्सी. (कॉम्प्युटर सायन्स) इत्यादी अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने सुरू करण्यास पात्र ठरले. हे अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या वतीने सुरु आहे. यातील ऑनलाईन एम.बी.ए. अभ्यासक्रम सुरू करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाची मान्यता नुकतीच प्राप्त झाली आहे. त्यामुळे ऑनलाईन एम.बी.ए.चा अभ्यासक्रम सुरू करणारे शिवाजी विद्यापीठ हे महाराष्ट्रातील एकमेव राज्य विद्यापीठ ठरले आहे, ही अभिमानाची बाब आहे. त्यामुळे इच्छुक विद्यार्थी-विद्यार्थिनींसह नोकरदार, गृहिणी आदी वर्गांनाही आपापले कामाचे व्याप सांभाळत ऑनलाइन एम.बी.ए. अभ्यासक्रमाची पदवी घेता येणार आहे. अभ्यासक्रम प्रवेश, अध्ययन, परीक्षा व निकालापर्यंतची सर्वच शैक्षणिक प्रक्रिया ऑनलाइन स्वरुपाची असणार आहे. ही पदवी अन्य मान्यताप्राप्त विद्यापीठांच्या पदवीशी समकक्ष आहे.

या ऑनलाईन अभ्यासक्रमासाठी सुसज्ज अशा लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीमद्वारे (एल.एम.एस.) विषय तज्ज्ञांनी विकसित केलेले व्हिडीओ लेक्चर्स, ई–बुक्स, लाईव्ह कौन्सिलिंग सेशन, डिस्कशन फोरम, प्रॅक्टीस टेस्ट आदी अध्ययन-अध्यापन सामग्री प्रवेशित विद्यार्थ्यांना उपलब्ध करण्यात येणार आहे. आहे. तसेच विद्यापीठाच्या प्लेसमेंट सेलच्या माध्यमातून त्यांना पुढील रोजगार संधींचा लाभही घेता येईल.

विद्यापीठाचे दूरशिक्षण व ऑनलाइन शिक्षण केंद्र विद्यार्थी, गृहिणी, कामगार, शेतकरी, उद्योजक, बंदीजन, सैनिक तसेच शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचारी, अपूर्ण शिक्षण पूर्ण करण्याची इच्छा असणारे आणि शिक्षणापासून वंचित असणाऱ्या घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याच्या हेतूने कार्यरत आहे.

नवी दिल्ली येथील विद्यापीठ अनुदान आयोग, दूरशिक्षण परिषद तसेच ए.आय.सी.टी.ई. या संस्थांकडून मान्यताप्राप्त बी.ए., बी.कॉम., एम.ए. (मराठी, हिंदी, इंग्रजी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र व इतिहास), एम.कॉम., एम.एस्सी.(गणित) आणि एम.बी.ए. असे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि ग्रामीण पत्रकारिता, ग्रंथालय व्यवस्थापन, टुरिझम आणि ट्रॅव्हल्स, बिझनेस मॅनेजमेंट आदी प्रमाणपत्र अभ्यासक्रम या दूरशिक्षण केंद्रात पारंपरिक बहिस्थ: पद्धतीने सुरू आहेत. त्यांचाही आजवर लाखो विद्यार्थ्यांनी लाभ घेतला आहे. ऑनलाईन एमबीए अभ्यासक्रमाचाही इच्छुक विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी सज्ज व्हावे, असे आवाहनही कुलगुरू डॉ. शिर्के यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment