Tuesday, 29 October 2024

शिवाजी विद्यापीठाचा भारतीय वायू दलासमवेत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार

 अधिकारी, जवानांना उच्चशिक्षण घेण्याची संधी मिळणार


शिवाजी विद्यापीठाने भारतीय वायू दलासमवेत सामंजस्य करार केला. याप्रसंगी कराराच्या प्रतींचे हस्तांतरण करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि एअर व्हाईस मार्शल राजीव शर्मा. सोबत (डावीकडून) विंग कमांडर बी.एम. जोसेफ, डॉ. महादेव देशमुख, विंग कमांडर विनायक गोडबोले, ग्रुप कॅप्टन रचना शर्मा, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रभंजन माने, डॉ. राजश्री बारवेकर आदी.




(सामंजस्य करार कार्यक्रमाची लघुचित्रफीत)


कोल्हापूर, दि. २९ ऑक्टोबर: भारतीय वायू दलाच्या (इंडियन एअर फोर्स) जवानांना सेवेवर कार्यरत असतानाही आपले उच्च शिक्षण पूर्ण करण्याची संधी शिवाजी विद्यापीठासमवेत झालेल्या सामंजस्य कराराद्वारे प्राप्त होणार आहे, ही अतिशय मौलिक बाब असल्याचे मत भारतीय वायू सेनेचे एअर व्हाईस मार्शल राजीव शर्मा यांनी आज येथे व्यक्त केले.

भारतीय वायू सेना आणि शिवाजी विद्यापीठ यांच्यामध्ये आज एक अत्यंत महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. त्यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. तर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह वायू सेनेच्या ग्रुप कॅप्टन रचना जोशी, विंग कमांडर विनायक गोडबोले, विंग कमांडर बी.एम. जोसेफ प्रमुख उपस्थित होते.

छत्रपती शिवाजी महाराज हे एक महान योद्धे होते आणि त्यांचे नाव धारण करणाऱ्या विद्यापीठासमवेत सामंजस्य करार करीत असताना भारतीय वायू सेनेला अत्यंत आनंद होत असल्याची भावना सुरवातीलाच व्यक्त करून एअर व्हाईस मार्शल श्री. शर्मा म्हणाले, या सामंजस्य कराराकडे मी केवळ अधिकारी आणि जवान यांच्याच कल्याणासाठीचा म्हणून पाहात नसून वायू सेनेच्या समग्र परिवाराचे शैक्षणिक उत्थान साधणारा हा करार आहे. देशातील अवघी २१ विद्यापीठे, शैक्षणिक संस्थांसमवेत वायू दलाने करार केले त्यात शिवाजी विद्यापीठासह तीन संस्थांचा समावेश आहे. दहावी, बारावीनंतर सैन्यदलात भरती होणारे जवान, अग्नीवीर यांना त्यांचे पदवीचे शिक्षण घेता येईल, अधिकाऱ्यांना त्यांचे उच्चशिक्षण घेता येईल किंवा आवश्यक कौशल्याचे ज्ञान संपादन करता येईल, तसेच त्यांच्या परिवारातील मुलांनाही शिक्षण घेता येईल. वायू दल आणि विद्यापीठ या उभय बाजूंमध्ये सुसंवाद प्रस्थापित होऊन त्याचा वायू दलाशी संबंधित घटकांना लाभ व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझ्या निळ्या युनिफॉर्ममधील सहकाऱ्यांना या कराराचा लाभ होणार असल्याचा आनंद मोठा आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पाटील यांनी शिवाजी विद्यापीठाचे डीआरडीओ, डीआरडीई, डीएई, बीआरएनएस, बीएआरसी, आयआयजी, इस्रो इत्यादी विविध संरक्षण संस्थांशी संशोधकीय बंध प्रस्थापित झाले असल्याची माहिती दिली. अवकाश विज्ञान, हवामान शास्त्र, जिओ-इन्फॉर्मेटिक्स इत्यादी क्षेत्रांत विद्यापीठ मोठ्या प्रमाणात संशोधन करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचा भारतातील सैन्यदलासमवेत होणारा असा हा पहिलाच सामंजस्य करार असल्याने तो ऐतिहासिक महत्त्वाचा असल्याचे सांगितले. ते म्हणाले, भारतीय वायू दलातील अग्नीवीर, जवानांना उर्वरित शिक्षण पूर्ण करण्यासाठी विद्यापीठ मदत करेलच. पण, त्यापुढे जाऊन वायू दलाने त्यांच्या शैक्षणिक गरजा कळविल्यास त्यास अनुसरून अभ्यासक्रमही निर्माण करता येतील. काही अभ्यासक्रम हे ऑनलाईन व ऑफलाईन अशा हायब्रीड स्वरुपात राबविण्यात येऊ शकतील. त्याखेरीज आवश्यकतेनुसार अल्प कालावधीच्या काही कार्यशाळाही आयोजित करता येतील. अशा प्रकारे सामंजस्य कराराच्या कक्षा वर्धित करता येऊ शकतील.

यावेळी सामंजस्य करारावर विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी, तर भारतीय वायू दलाच्या वतीने एअर व्हाईस मार्शल श्री. शर्मा यांनी स्वाक्षरी केल्या. विद्यापीठाच्या इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी स्वागत केले. इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने यांनी प्रास्ताविक केले, तर कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार मानले.

माजी विद्यार्थ्याची भूमिका महत्त्वाची

विंग कमांडर विनायक गोडबोले हे विद्यापीठाच्या इंग्रजी अधिविभागाचे २१ वर्षांपूर्वीचे माजी विद्यार्थी आहेत. भारतीय वायू दलासमवेत आजचा सामंजस्य करार होण्यामध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची ठरली. गेल्या सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ उभय पक्षांमध्ये योग्य समन्वय राखून आजचा सामंजस्य करार त्यांनी घडवून आणला. मातृसंस्थेचे ऋण काहीअंशी फेडण्याचा आपला हा प्रयत्न असून हा क्षण आपल्यासाठी अत्यंत भावनिक स्वरुपाचा असल्याचे श्री. गोडबोले यांनी यावेळी सांगितले.

सामंजस्य कराराविषयी थोडक्यात...

या सामंजस्य करारान्वये, भारतीय वायू दलातील पात्र जवानांना शिवाजी विद्यापीठाच्या ऑनलाईन व दूरस्थ शिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रमाणपत्र, पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेता येईल. त्यांना दलाच्या शिफारशीनुसार काही सवलतीही प्रदान केल्या जातील. वायू दलाच्या अधिकाऱ्यांना पदव्युत्तर शिक्षणासाठी काही जागा विद्यापीठात राखीव ठेवण्यात येतील. त्याचप्रमाणे इच्छुक अधिकाऱ्यांना यूजीसी निकष पूर्ततेच्या अधीन पीएच.डी.साठीही प्रवेश देण्यात येईल. याखेरीज, सैन्यदलात कार्यरत, निवृत्त अथवा शहीद जवान, अधिकारी यांच्या मुलांनाही शिक्षणासाठी काही सवलती देण्यात येतील.

या सामंजस्य करार प्रसंगी मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, इंग्रजी अधिविभागातील डॉ. अक्षय सरवदे, डॉ. चंद्रकांत लंगरे, डॉ. राजश्री बारवेकर, डॉ. एम.एस. वासवानी आदी उपस्थित होते.

Monday, 28 October 2024

एमबीएच्या विद्यार्थ्यांच्या विपणन सहकार्यामुळे

‘चेतना’च्या उत्पादनांची ४ दिवसांत ४२ हजारांची विक्री

 

शिवाजी विद्यापीठाच्या एमबीएच्या विद्यार्थ्यांनी 'चेतना'च्या उत्पादनांच्या विक्रीचा स्टॉल जिल्हा परिषद आवारात लावला. त्याला मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांनी आपल्या सहकाऱ्यांसह सदिच्छा भेट दिली.

शिवाजी विद्यापीठाच्या एमबीएच्या विद्यार्थ्यांनी लावलेल्या 'चेतना'च्या उत्पादनांच्या स्टॉलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.


शिवाजी विद्यापीठाच्या एमबीएच्या विद्यार्थ्यांनी शिवबाजार येथे लावलेल्या 'चेतना'च्या उत्पादनांच्या स्टॉलला विद्यार्थी व ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला.



विद्यार्थ्यांच्या सेवाभावातून दिवाळी झाली गोड

कोल्हापूर, दि. २८ ऑक्टोबर: समाजातील सक्षम नागरिकांनी अक्षम नागरिकांना सहकार्याचा हात पुढे केला, तर सामाजिक-आर्थिक विषमता दूर होण्याबरोबरच सामाजिक सौहार्द प्रस्थापित होण्यासही मदत होते, याचे बोलके उदाहरण शिवाजी विद्यापीठाच्या एमबीए अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे. कोल्हापुरात बौद्धिक अक्षम मुलांसाठी कार्यरत असलेल्या चेतना अपंगमती विकास संस्थेच्या चेतना उत्पादन केंद्रातील मुलांनी दिवाळीनिमित्त तयार केलेल्या विविध उत्पादनांच्या विक्रीसाठी एमबीएच्या विद्यार्थ्यांनी आपली विपणन व विक्री कौशल्यांचे सहाय्य पुरविले आणि अवघ्या चार दिवसांत ४२ हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री करण्यात यश मिळविले.

शिवाजी विद्यापीठाच्या एम.बी.. अधिविभागातील विद्यार्थ्यांनी समाजाभिमुख उपक्रमांतर्गत चेतना अपंगमती विकास संस्थेसोबत हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवला. या उपक्रमाचा उद्देश 'चेतना उत्पादन केंद्र' यांच्या उत्पादनांचा प्रचार करणे आणि विक्री वाढविणे होता. चेतना अपंगमती विकास संस्था गेली ३९ वर्षे कोल्हापुरात बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांसाठी कार्यरत असून संस्थेमध्ये चेतना विकास मंदिर ही बौध्दिक अक्षम मुलांची शाळा, चेतना व्यवसाय प्रशिक्षण व उत्पादन केंद्र हे उदयोग केंद्र चालविण्यात येते. संस्थेत सध्या २२० विदयार्थी असून विविध स्वरूपाच्या शिक्षण आणि पुनर्वसनात्मक उपक्रमातून त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जातात. संस्थेच्या कार्यशाळेत मुले विविध वस्तूंचे उत्पादन करतात आणि त्यांच्या विक्रीतून काही हिस्सा या मुलांना विद्यावेतन म्हणून देण्यात येतो. या मुलांना आपल्या पायावर उभे करण्याकरिता असे प्रयत्न करण्यात येतात.

यंदा चेतनाच्या या उपक्रमाला जोड मिळाली ती शिवाजी ‍विद्यापीठातील एम.बी.. अधिविभागाच्या विदयार्थ्यांच्या कौशल्यांची. सध्या दिवाळीच्या निमित्ताने चेतना संस्थेच्या विद्यार्थ्यांनी 'चेतना स्पेशल गिफ्ट बॉक्स', आकर्षक पणत्या व आकाशकंदील, उटणे, साबण, धुप-अगरबत्ती, लक्ष्मीपूजन पुडा, सुवासिक अभ्यंग तेल आदी विविध उत्पादने तयार करून विक्रीसाठी उपलब्ध केली. एम.बी..च्या विद्यार्थ्यांनी ही उत्पादने व वस्तू विक्रीसाठी २१ ऑक्टोबरपासून शिवाजी विद्यापीठाच्या शिवबाजार, हॉटेल के-स्क्वेअरजवळील स्थानक आणि जिल्हा परिषद मैदान येथे ठेवली. या वस्तूंची प्रभावीपणे विक्री करण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्यावसायिक पध्दतीने विक्री योजना आखून डिजीटल मार्केटींगही केले. परिणामी, अवघ्या चार दिवसांत एकूण ४२ हजार रुपयांच्या उत्पादनांची विक्री करण्यात या विद्यार्थ्यांना यश आले. एमबीएच्या विद्यार्थ्यांनी हा उपक्रम ना नफा, ना तोटा या तत्तवावर राबविल्याने त्यांचे व्यवस्थापन कौशल्य सेवाभावी कार्यासाठी उपयोगी ठरले.

या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांना एम.बी.. अधिविभागाच्या संचालक डॉ. दीपा इंगवले यांचे मार्गदर्शन लाभले, तर डॉ. तेजश्री घोडके, जयश्री लोखंडे, डॉ. परशराम देवळी आणि प्रशासकीय कर्मचारी यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

इंडियन कॉमर्स असोसिएशनकडून

डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचा फेलो म्हणून सन्मान

 

डॉ. श्रीकृष्ण महाजन

कोल्हापूर, दि. २८: शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांना त्यांच्या वाणिज्य व्यवस्थापन क्षेत्रातील योगदानाबद्दल इंडियन कॉमर्स असोसिएशनने फेलो म्हणून सन्मानित केले आहे. उदयपूर येथे नुकत्याच पार पडलेल्या ७५ व्या अखिल भारतीय वाणिज्य परिषदेत गुरू गोविंद जनजातीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही. के. माथूर यांच्या हस्ते प्रा. महाजन यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी उच्च शिक्षण क्षेत्रात वाणिज्य व्यवस्थापन विषयामध्ये केलेले अध्ययन, अध्यापन, संशोधन विस्तारकार्य याबद्दल त्यांना गौरविण्यात आले आहे.

प्रा. महाजन यांनी अकौंटन्सी फायनान्स या विषयांचे अध्यापन केले आहे. अकौंटन्सी, फायनान्स, उद्योजकता विकास, काजू प्रक्रिया अन्न प्रक्रिया उद्योग, ग्रामीण व्यवस्थापन या विषयांवर संशोधन केले आहे. विद्यापीठ अनुदान आयोग, भारतीय सामाजिक विज्ञान अनुसंधान परिषद तसेच शिक्षण मंत्रालयाच्या इम्प्रेस या योजनेचे अनुदान त्यांच्या संशोधन प्रकल्पांना प्राप्त झाले. उद्योजकता विकास वित्तीय समावेशन या विषयावर हे संशोधन प्रकल्प त्यांनी पूर्ण केले आहेत. २० विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच. डी.चे संशोधन पूर्ण केले आहे.

डॉ. महाजन सध्या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आहेत. विद्यापीठाच्या वाणिज्य व्यवस्थापन अधिविभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अकरा वर्षे काम पाहिले आहे. संशोधनामध्ये विभागाचा विद्यापीठाचा नावलौकिक वाढविला आहे. वित्तीय व्यवस्थापन अधिकोशीय अनुसंधान या विषयातील दि युनायटेड वेस्टर्न बँकेचे रा.ना. गोडबोले अध्यासनाचे प्राध्यापक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन विकास केंद्राचे संचालक तसेच विद्यापीठ अनुदान आयोग स्थापित सामाजिक समावेशक धोरण अभ्यास केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या अंमलबजावणीमुळे उच्च शिक्षण क्षेत्रात होणाऱ्या बदलांच्या संदर्भात त्यांनी महाराष्ट्रभर अनेक व्याख्याने दिली आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठीय धोरण निर्मितीमध्येही त्यांचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. अकौंटन्सी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष असताना त्यांनी अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांचा समावेश करण्यासाठी आग्रहपूर्वक प्रयत्न केले. कुलगुरू प्र-कुलगुरु यांच्या मार्गदर्शनाखाली एम. बी. . ऑनलाइन, बी. कॉम. (बी.एफ.एस.आय.) बी. बी. . - एम. बी. . (इंटिग्रेटेड) असे नवीन अभ्यासक्रम सुरू करण्यामध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.