Tuesday, 15 October 2024

विद्यापीठासह सर्व महाविद्यालयांत

एकाच वेळी शिवराज्याभिषेकाचा स्मृतीजागर

 वाचन प्रेरणा दिनाच्या अनोख्या उपक्रमात हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग

शिवाजी विद्यापीठात डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह मान्यवर अधिकारी व शिक्षक


शिवाजी विद्यापीठात वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात शिवराज्याभिषेकाशी संबंधित उताऱ्यांचे मूकवाचन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासह (डावीकडून) डॉ. तानाजी चौगुले, डॉ. रघुनाथ ढमकले, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डॉ. धनंजय सुतार.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झालेले पाटण येथील बाळासाहेब देसाई महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झालेले वडूज येथील दादासाहेब गोडसे महाविद्यालयातील विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमानिमित्त इचलकरंजी येथील जयवंत महाविद्यालयाच्या वतीने काढण्यात आलेली ग्रंथदिंडी.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झालेले लोणंद येथील शरदचंद्र पवार महाविद्यालयातील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने आयोजित वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमात सहभागी झालेले कोल्हापूरच्या न्यू कॉलेज येथील शिक्षक, विद्यार्थी व कर्मचारी



 

(शिवाजी विद्यापीठातील वाचन प्रेरणा दिन कार्यक्रमाची लघुचित्रफीत)

कोल्हापूर, दि. १५ ऑक्टोबर: या युगीं सर्व पृथ्वीवर म्लेंच्छ बादशहा. मऱ्हाटा पातशहा येवढा छत्रपती जाला, ही गोष्ट काही सामान्य जाली नाही... छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे प्रत्यक्षदर्शी बखरकार कृष्णाजी अनंत सभासद यांनी या सोहळ्याचे महत्त्व विषद करणारे उपरोक्त विधान केले. आज वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने शिवाजी विद्यापीठासह संलग्नित २९७ महाविद्यालयांतील हजारो विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सकाळी १०.४५ ते ११.०० या पंधरा मिनिटांच्या कालावधीत शिवराज्याभिषेक दिनाच्या स्मृतींचा जागर करण्यात आला.

शिवाजी विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. यंदाच्या वर्षापासून त्याची व्याप्ती महाविद्यालयांपर्यंत वाढवून सर्व संबंधित घटकांना सामावून घेऊन वाचन प्रेरणा दिन साजरा करण्याचे नियोजन करण्यात आले. आज सकाळी १०.३० ते ११ वा. या कालावधीत हा उपक्रम विद्यापीठासह सर्व संलग्नित महाविद्यालयांत एकाच वेळी राबविण्यात आला. यंदाच्या वाचन प्रेरणा दिनाच्या निमित्ताने यावर्षी छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे वर्णन असणारा मजकूर विद्यापीठामार्फत सर्व अधिविभाग व महाविद्यालयांना पाठविण्यात आला. याच मजकुराचे १०.४५ ते ११ वाजेपर्यंतच्या कालावधीत वाचन करून विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी आदी संबंधित घटकांनी शिवराज्याभिषेकाच्या स्मृती जागविल्या.

शिवाजी विद्यापीठात सकाळी ठीक साडेदहा वाजता कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी एकत्र जमून डॉ. सदानंद मोरे संपादित शिवराज्याभिषेक या ग्रंथातील सोहळ्याशी संबंधित उताऱ्यांचे मूकवाचन केले. वाचन प्रेरणा दिन समितीचे अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. रघुनाथ ढमकले यांनी स्वागत करून उपक्रमाचा हेतू विषद केला. राष्ट्रीय सेवा योजना संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले. या कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, आयक्यूएसी संचालक डॉ. सागर डेळेकर, डॉ. मच्छिंद्र गोफणे, डॉ. शिवराज थोरात, डॉ. प्रकाश बिलावर, डॉ. राजेंद्र खामकर, डॉ. के.डी. कुचे, डॉ. एस.एस. कुंभार, डॉ. जे.पी. खराडे, डॉ. जे.पी. भोसले, एस.डी. थिटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिविभागांसह महाविद्यालयांतही विविध उपक्रम

वाचन प्रेरणा दिनाचा हा उपक्रम विद्यापीठाच्या सर्व अधिविभागांसह संलग्नित महाविद्यालयांतही मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला. महाविद्यालयांनी आपापल्या परिसरात ग्रंथदिंडीसह अनेकविध उपक्रम राबविले. महाविद्यालयांतील सभागृहे, मैदाने यांसह विविध वर्गांमध्येही सकाळी १०.३० ते ११ या वेळेत विद्यार्थी व शिक्षकांनी एकत्रितपणे शिवराज्याभिषेकाशी संबंधित उताऱ्यांचे वाचन केले.

 

No comments:

Post a Comment