शिवाजी विद्यापीठात गांधी जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात बोलताना प्राचार्य डॉ. विश्वास पाटील. |
कोल्हापूर, दि. ३ ऑक्टोबर: शिक्षण हा मानवी जगण्याचा, झुंजण्याचा आणि समर्पणाचा
विषय आहे. शिक्षणाने माणूस खऱ्या अर्थाने मूल्यसमृद्ध बनतो. मूल्याधारित शिक्षणासाठी
महात्मा गांधी आग्रही राहिले. त्यांच्या या शिक्षणाच्या संकल्पनेतूनच उद्याचा
उज्ज्वल भारत उभा राहील, असे प्रतिपादन गांधीवादी साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक प्राचार्य
डॉ. विश्वास पाटील यांनी काल (दि. २) येथे केले.
शिवाजी विद्यापीठाचे गांधी अभ्यास केंद्र आणि राज्यशास्त्र अधिविभाग
यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी जयंतीनिमित्त दोनदिवसीय डॉ. उषा मेहता
स्मृती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली. या व्याख्यानमालेत ‘महात्मा गांधी यांची शिक्षण पद्धती’ या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.
विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित
होते.
डॉ. विश्वास पाटील म्हणाले, शिक्षण म्हणजे आत्मभान आणि आत्मसन्मान असे
गांधीजी मानत असत. त्यांचे जीवन सतत शिकण्याचे आणि जगाला शिकवण्याचे मूर्तीमंत प्रतीक
होते. शिक्षण हे प्रयोगशील असावे. ते केवळ शब्दप्रधान नव्हे, तर अर्थप्रधान असावे, अशी गांधीजींची धारणा
होती. त्यांचे शिक्षण हे संघर्ष आणि रचना यावर आधारित होते. त्यांच्या ज्ञानाने
व्यवस्थेच्या मुळावर घाव घातला.
कार्यक्रमाला ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. सुनीलकुमार लवटे, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम
पवार उपस्थित होते. राज्यशास्त्र अधिविभाग प्रमुख डॉ. प्रकाश पवार यांनी
प्रास्ताविक केले. डॉ. नेहा वाडेकर यांनी परिचय करून दिला. अक्षय जहागीरदार यांनी सूत्रसंचालन
केले. डॉ. जयश्री कांबळे यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment