Sunday, 20 October 2024

लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी

प्रा. आर.के. पुरी यांच्या स्मरणार्थ पाच लाख

 

शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती वसतिगृहासाठी प्रा. आर.के. पुरी यांच्या स्मरणार्थ पाच लाख रुपयांचा धनादेश कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द करताना डॉ. विजया पुरी. सोबत प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व डॉ. जे.बी. यादव.


कोल्हापूर, दि. २० ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठाच्या प्रस्तावित लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉ. आर.के. पुरी यांच्या स्मरणार्थ पाच लाख रुपयांच्या निधीचा धनादेश त्यांच्या पत्नी प्रा. विजया पुरी यांनी नुकताच कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्याकडे सुपूर्द केला.

शिवाजी विद्यापीठाने लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृह हा सुमारे शंभर विद्यार्थिनींच्या निवास व्यवस्थेसाठीचा प्रकल्प प्रस्तावित केला आहे. हे वसतिगृह लोकांच्या सहभागातून उभारावे आणि त्यातून लोकांच्या स्मृती जतन केल्या जाव्यातअशा हेतूने विद्यापीठाने या वसतिगृहाची संकल्पना मांडली. लोकांनी आपले कुटुंबआप्तस्वकीय यांमधील प्रिय व्यक्तीच्या नावे ठराविक निधी विद्यापीठाकडे द्यावयाचा आणि त्या व्यक्तीच्या नावे निवासी खोल्यांची उभारणी करावयाचीअशी ही संकल्पना आहे.

डॉ. पुरी यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या लोकस्मृती विद्यार्थिनी वसतिगृहासाठी देणगी देण्याचा निर्णय आम्ही कुटुंबियांनी घेतला असून या माध्यमातून विद्यापीठाच्या परिसरात डॉ. पुरी यांच्या स्मृती चिरंतन राहतील, अशी भावना डॉ. विजया पुरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केली.

त्यांच्या या हृद्य भावनांचे कुलगुरू डॉ. शिर्के यांनी स्वागत केले. लोकस्मृती वसतिगृहाच्या संकल्पनेमागे दात्यांच्या आणि त्यांच्या आप्तेष्टांच्या स्मृती जपणे हीच भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. जे.बी. यादव उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment