विद्यापीठात जनमानसातील अन्नाविषयीचे संभ्रम दूर करणारे प्रदर्शन
जागतिक अन्न दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या अन्नशास्त्र व तंत्रज्ञान अधिविभागातर्फे आयोजित विशेष पोस्टर प्रदर्शन पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली होती. |
कोल्हापूर, दि. १८ ऑक्टोबर: मनुष्य आपल्या राहणीमानाविषयी तसेच खानपान सवयींविषयी अधिक जागरूक झाला
आहे. त्याच्यावर विविध माध्यमांतून चांगल्या आरोग्यासाठी हे करा, ते करू नका; हे खा, ते खाऊ नका अशा
प्रकारच्या संदेशांचा भडिमार सुरू असतो. त्यामुळे आपल्या मनात अनेक प्रकारचे
संभ्रम निर्माण होतात. नेमके हेच संभ्रम दूर करणारे एक महत्त्वाचे पोस्टर प्रदर्शन
शिवाजी विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात अन्नशास्त्र व तंत्रज्ञान
अधिविभागाच्या वतीने आयोजित करण्यात आले आहे. उद्या (दि. १९) दुपारपर्यंत हे
प्रदर्शन खुले राहणार आहे.
जागतिक अन्न दिनाच्या
निमित्ताने ‘चांगले आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्य यासाठी अन्नाचा अधिकार’ या विषयावर अन्नशास्त्र
व तंत्रज्ञान अधिविभागातर्फे विशेष पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
अन्नाच्या हक्काबद्दल जागरूकता वाढविण्याबरोबरच अन्न प्रक्रिया व अन्नाशी संबंधित
मिथके, विविध अन्नपदार्थांच्या अनुषंगाने जनमानसात प्रचलित गैरसमज आणि प्रत्यक्ष
वस्तुस्थिती याविषयी माहिती विद्यार्थ्यांकडून देण्यात येत आहे. आज सकाळी कुलगुरू
डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ.
विलास शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर
सर्व मान्यवरांनी प्रदर्शनाची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांनी अतिशय महत्त्वाच्या
विषयाची प्रबोधनासाठी निवड केल्याचे सांगून अभिनंदन केले. यावेळी विभागप्रमुख डॉ. प्रवीणकुमार पाटील
यांच्यासह समन्वयक डॉ. अभिजीत गाताडे, डॉ. हर्षवर्धन कांबळे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रदर्शनाविषयी थोडक्यात...
आपल्या मनात खाद्यपदार्थांविषयी
अनेक शंकाकुशंका असतात. आरोग्यासाठी साखरेपेक्षा गूळ चांगला, अॅल्युमिनिअमच्या भांड्यात अन्न शिजवल्याने अल्झायमर्स
होतो, कृत्रिम चवीपेक्षा नैसर्गिक चवीचे पदार्थ चांगले, फळांवरील मेणाचा थर घातक,
लांबट स्नॅक्स पदार्थांत प्लास्टीक असते, बेकरीचे पदार्थ आरोग्याला घातक,
तेलापेक्षा तुपातील पदार्थ अधिक आरोग्यदायी, अजिनोमोटो (मोनोसोडियम ग्लुटामेट)
चांगला की वाईट, प्रक्रिया केलेल्या मधापेक्षा कच्चा मध उत्तम अशा अनेक धारणा आणि
संभ्रमही असतात. अशा सर्व शंकांचे निराकरण करणारे सादरीकरण २२ विविध स्टॉल्सच्या
माध्यमातून १००हून अधिक विद्यार्थी-विद्यार्थिनींनी केलेले आहे. उद्यापर्यंत
चालणाऱ्या या प्रदर्शनाचा इच्छुकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रवीणकुमार पाटील
यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment