बी.ए., बी.एस्सी.च्या पाच पुस्तकांचे प्रकाशन
कोल्हापूर, दि. ७ ऑक्टोबर: शिवाजी विद्यापीठ विद्यार्थ्यांना दर्जेदार पाठ्यपुस्तके उपलब्ध करून
देण्यास कटिबद्ध असून या प्रयत्नांना सर्व अधिकार मंडळांचे, शिक्षकांचे मोठे
सहकार्य लाभत आहे, असे शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज
सांगितले.
राष्ट्रीय शैक्षणिक
धोरणास अनुसरून विद्यापीठांनी पाठ्यपुस्तके मातृभाषेत अनुवादित करून विद्यार्थ्यांना
पुरवावीत, असे निर्देश शासनाने दिले. तथापि, त्यामधील तांत्रिक अडचणी लक्षात
आल्याने कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठाने विविध
विषयांच्या अभ्यासक्रमाची पाठ्यपुस्तके स्वतः निर्माण करण्याचा निर्णय घेतला.
त्यानुसार विविध अभ्यास मंडळांनी तयार केलेल्या विद्यापीठाच्या पहिल्या पाच
पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन आज कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते करण्यात आले.
त्यावेळी ते बोलत होते.
कुलगुरू डॉ. शिर्के
म्हणाले, सुरवातीच्या टप्प्यात दूरशिक्षण केंद्राकडील अभ्यास साहित्याचा अनुवाद
करून ती विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्यापुढे जाऊन
विद्यापीठाची स्वतःची क्रमिक पुस्तके निर्माण करावीत, असा विचार मनी आला. त्याला
सर्वच अधिकार मंडळांनी पाठिंबा दिला आणि सर्व अभ्यास मंडळे आणि शिक्षकांच्या
सहकार्यातून ती आता साकार होऊ लागली आहेत. अत्यंत ध्येयनिष्ठपणे व तन्मयतेने ते हे
काम करीत आहेत. पहिल्या पाच विविध पाठ्यपुस्तकांचे लोकार्पण करताना मोठा आनंद होतो
आहे. उर्वरित पाठ्यपुस्तकांची कामेही गतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुसऱ्या
सत्राची पुस्तके सत्रारंभीच विद्यार्थ्यांना उपलब्ध व्हावीत, असा प्रयत्न आहे. ‘शिवाजी युनिव्हर्सिटी
प्रेस’ या नामाभिधानाखाली विद्यापीठाचे मुद्रणालय ही पुस्तके प्रकाशित करीत
असल्याचेही त्यांनी सांगितले.
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद
पाटील म्हणाले, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत शिवाजी विद्यापीठ राज्यात
अग्रेसर असून त्यामध्ये सर्व घटकांना सोबत घेऊन काम करण्यात येत आहे.
पाठ्यपुस्तकांच्या निर्मितीसोबतच स्वयम्, महास्वयम् आदी ऑनलाईन मंचांसाठी
ई-कन्टेन्ट निर्मिती करण्यासाठीही विद्यापीठ प्रयत्नशील आहे.
कुलगुरू डॉ. शिर्के
यांच्या हस्ते आज बी.एस्सी. भाग-१ सत्र-१ च्या रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र आणि
संख्याशास्त्र या विषयांच्या अनुक्रमे वॉटर अॅनालिसिस, अॅनिमल डायव्हर्सिटी आणि एलिमेंटरी प्रॉबॅबिलीटी
थिअरी या पाठ्यपुस्तकांचे, तर बी.ए. भाग-१च्या मानसशास्त्राच्या ‘मैत्री आणि प्रेमाचे मानसशास्त्र’ आणि ‘आरोग्याचे मानसशास्त्र’ या दोन पाठ्यपुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कुलसचिव
डॉ. विलास शिंदे, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन
विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, आयक्यूएसी संचालक डॉ. सागर डेळेकर यांच्यासह प्राणीशास्त्र अभ्यास मंडळ
अध्यक्ष डॉ. सुनील गायकवाड, रसायनशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. जी.बी. कोळेकर,
संख्याशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष डॉ. शशीभूषण महाडिक, मानसशास्त्र अभ्यास मंडळ
अध्यक्ष डॉ. विकास मिणचेकर तसेच पाठ्यपुस्तकांचे लेखक व संपादक उपस्थित होते.
यामध्ये डॉ. भारत नाईक, डॉ. डी.के. दळवी, डॉ. जी.एच. निकम, डॉ. अर्जुन पन्हाळे,
डॉ. भारती वाली, डॉ. वर्षा कुंभार, डॉ. के.जी. पोतदार, डॉ. राहुल कश्यप, डॉ. शिरीष शितोळे, डॉ. विनायक होनमारे, डॉ. चैत्रा
राजाज्ञा, डॉ. विनोद कांबळे आदी उपस्थित होते. अधिष्ठाता डॉ. महाजन यांनीही मनोगत व्यक्त केले. कुलसचिव डॉ. शिंदे यांनी आभार
मानले.
No comments:
Post a Comment