शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना रिझर्व्ह बँकेचे संचालक सतीश मराठे. मंचावर (डावीकडून) डॉ. राजन पडवळ, निपुण कोरे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि संजय परमणे. |
कोल्हापूर, दि. ५ ऑक्टोबर: उत्तम कामगिरीचे प्रदर्शन करणाऱ्या नागरी सहकारी बँकांच्या बाबतीत रिझर्व्ह
बँकेने नेहमीच सकारात्मक धोरण अवलंबले आहे, असे भारतीय रिझर्व्ह बँकेचे संचालक
सतीश मराठे यांनी आज येथे सांगितले.
शिवाजी विद्यापीठाचे
गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार सहकार प्रशिक्षण केंद्र आणि जिल्हा नागरी सहकारी
बँक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने इनामदार यांच्या जयंतीनिमित्त ‘सहकारी बँकांसमोरील
प्रश्न व रिझर्व्ह बँक’ या विषयावर चर्चा आयोजित करण्यात आली. त्यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून
ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर
कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशनचे अध्यक्ष निपुण कोरे प्रमुख उपस्थित होते.
श्री. मराठे म्हणाले, देशातील
आर्थिक परिसंस्था अधिकाधिक मजबूत करण्याकडे रिझर्व्ह बँकेचा कल आहे. त्या
प्रयत्नांना बँकांची चांगली साथ लाभल्याने चांगले परिणामही दिसून येऊ लागले आहेत. आपले
प्रश्न आपण संस्थात्मक पातळीवर सोडवून देशाच्या विकासाला चालना देण्याच्या या प्रयत्नांमध्ये
सहभाग नोंदविण्यासाठी सिद्ध होण्याची गरज आहे. नागरी सहकारी बँकांच्या
प्रश्नांबाबत रिझर्व्ह बँक सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले. मराठे यांनी
आपल्या भाषणात नागरी सहकारी बँकांच्या समग्र कामगिरीचा तपशीलवार वेध घेतला.
निपुण कोरे यांनी सतीश
मराठे हे नागरी सहकारी बँका आणि रिझर्व्ह बँक यांमधील कणखर दुवा असल्याचे
गौरवोद्गार काढले. सर्वच बँका सक्षम होण्याच्या दृष्टीने सार्वत्रिक प्रयत्नांची
गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, आर्थिक संस्थांनी पुढील किमान पाच वर्षांच्या
वाटचालीची दिशा निर्धारित करणाऱ्या बृहत्आराखड्याची निर्मिती करावी. त्यासाठी
विद्यापीठातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल. अशा प्रकारचे
विधायक सुसंवाद यापुढील काळातही सातत्याने घडून यायला हवेत. त्यासाठीही विद्यापीठ
नागरी सहकारी बँकांना सर्वोतोपरी मदत करेल.
कार्यक्रमाचे स्वागत व
प्रास्ताविक केंद्राचे संचालक डॉ. राजन पडवळ यांनी केले. अधिसभा सदस्य संजय परमणे
यांनी गुरूवर्य लक्ष्मणराव इनामदार यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला.
मान्यवरांच्या हस्ते सुरवातीला इनामदार यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमास वैशाली आवाडे, अनिल देसाई, सुधार जाधव यांच्यासह नागरी सहकारी बँकांचे
चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक, अधिकारी, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment