Wednesday, 23 October 2024

शिवाजी विद्यापीठात शिष्यवृत्तीविषयक कार्यशाळेत ४५० जणांचा सहभाग

 

शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना कुलसचिव डॉ. विलास शिंदे. मंचावर (डावीकडून) उपकुलसचिव तानाजी कुंडले, सचिन परब व सुहास भोसले


कोल्हापूर, दि. २३ ऑक्टोबर: महाराष्ट्र शासनाने गुणवत्ताधारक, पात्र आणि गरजू विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या उच्चशिक्षणासाठी अनेक महत्त्वाच्या सवलत, शिष्यवृत्ती योजना जाहीर केलेल्या आहेत. विद्यार्थ्यांनी त्यांची योग्य माहिती घेऊन वेळेत अर्ज भरून त्यांचा लाभ घेणे आवश्यक आहे, असे आवाहन शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी काल (दि. २२) येथे केले.

शासनाच्या वतीने महाडीबीटी संकेतस्थळावर विविध प्रकारच्या शिष्यवृत्ती योजना राबविल्या जात आहेत. त्या अनुषंगाने विद्यापीठ अधिविभागात सन २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थी, विद्यार्थिनींना विविध शिष्यवृत्ती  योजनांची माहिती देण्यासाठी काल विद्यापीठाच्या राजर्षी शाहू  सभागृहात अधिविभागातील शिक्षक, लेखनिक व विद्यार्थी यांच्यासाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली. त्यावेळी अध्यक्षीय मनोगतात ते बोलत होते. कार्यशाळेचा लाभ ४५० हून अधिक जणांनी लाभ घेतला.

सदर कार्यशाळेस समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाचे जिल्हा समन्वयक सचिन परब, न्यू कॉलेजचे प्रयोगशाळा सहाय्यक सुहास भोसले, पदव्युत्तर प्रवेश विभागाचे उपकुलसचिव तानाजी कुंडले, सहाय्यक कुलसचिव आर. आय. शेख, अधीक्षक उमेश भोसले उपस्थित होते.

राकेश डोंगरे यांनी कार्यशाळेचा उद्देश विषद केला. सचिन परब यांनी समाजकल्याण कार्यालयाच्या विविध योजनांची, शिष्यवृत्त्यांची माहिती दिली. सुहास भोसले यांनी महाडीबीटी संकेतस्थळावरील विविध शिष्यवृत्तींविषयी प्रात्यक्षिकांसह माहिती दिली. कार्यक्रमाची सुरवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. उपकुलसचिव कुंडले यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. सहाय्यक कुलसचिव शेख यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment