Tuesday 8 October 2024

गांधीविचारच जगाला तारेल : सुरेश द्वादशीवार

शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांशी संवाद

 

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात आयोजित ‘गांधी विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर बोलताना ज्येष्ठ विचारवंत सुरेश द्वादशीवार. सोबत (डावीकडून) डॉ. नंदकुमार मोरेडॉ. शिवाजी जाधव.


कोल्हापूर, दि. ८ ऑक्टोबर: महात्मा गांधी यांनी केवळ अहिंसाच शिकविली नाही, तर जगाला शांततामय मार्गाने जगण्याची दिशा दाखवली. सध्याच्या जागतिक अशांततेच्या आणि अस्वस्थतेच्या काळात गांधी विचारच जगाला तारणारा ठरेल, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत, गांधी विचारांचे अभ्यासक सुरेश द्वादशीवार यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या मराठी अधिविभागात ‘गांधी विचारांची प्रासंगिकता’ या विषयावर आयोजित मुक्त संवादामध्ये आयोजित द्वादशीवार यांनी महात्मा गांधी यांच्या विचारांतील अनेक बारकाव्यांचा उलगडा केला.

श्री. द्वादशीवार म्हणाले, गांधी विचार कधीच संपणार नाही. जितकी अनिश्चितता निर्माण होईल, तितका गांधी विचार जवळचा वाटेल. महात्मा गांधी आणि त्यांच्या समकालीन नेत्यांमध्ये मतभेद होते, असे चित्र रंगवले जाते. हे चित्र एकांगी आणि पूर्वग्रहदूषित आहे. महात्मा गांधी यांच्या भूमिका समकालीन नेत्यांना पटत नसल्या तरी गांधींनी त्यांच्याबद्दल कधीच आकस ठेवला नाही. उलट या नेत्यांना स्वातंत्र्यानंतर महत्त्वाच्या जबाबदार्‍या दिल्या. इंग्रजी राजवटीच्या विरोधात अहिंसक मार्गाने केवळ लोकांच्या सहभागातून त्यांनी लढा लढला. गांधींच्या लढ्यात सर्व घटकांतील लोक सहभागी होते, ही त्यांच्या विचारांची सर्वसमावेशकता आहे. सर्व धर्म, जाती, पंथ, प्रदेश आदींनी त्यांच्या लढ्यात सक्रीय योगदान दिले, याचाच अर्थ गांधी सर्वांना आपले वाटत होते. जगाच्या इतिहासात प्रथमच महिला मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाल्या, हे गांधींजींच्या लोकलढ्याचे वैशिष्ट्य राहिले.

द्वादशीवार पुढे म्हणाले, गांधीजींनी माणुसकी हा धर्म मानला होता. आपण सनातन हिंदू आहोत, असे गांधीजी म्हणत होते, पण त्याचवेळी ‘ईश्वर-अल्ला तेरो नाम’ ही प्रार्थनाही करत होते. यावरुन गांधीजींचे हिंदू असणे खूपच सहिष्णू आणि व्यापक होते. त्यांनी नेहमीच जातीय आणि धार्मिक सलोखा ठेवण्याचा आणि प्रसंगी त्यासाठी त्याग करण्याचा पुरस्कार केला. गांधीजींच्या विचारांनी जगभरात अनेक आंदोलने सुरु आहेत आणि ती लोकशाही, अहिंसक मार्गाने पुढे जात आहेत, यातच गांधीजींची प्रासंगिकता स्पष्ट होते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ.सुखदेव एकल यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. प्रमोद मुनघाटे, विदेशी भाषा विभाग प्रमुख डॉ. मेघा पानसरे, डॉ. रणधीर शिंदे, डॉ. शिवाजी जाधव, डॉ. सुखदेव उंदरे, डॉ. सुमेधा साळुंखे, जयप्रकाश पाटील यांच्यासह मराठी, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, वृत्तपत्रविद्या व जनसंज्ञापन, इंग्रजी आदी अधिविभागांचे विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment