Monday 21 October 2024

कवी-साहित्यिकांनी संवेदनांचे संवर्धन करावे: भारत सासणे

 अनुराधा पाटील, वीरधवल परब यांना काळसेकर पुरस्कार प्रदान

शिवाजी विद्यापीठाचा सन २०२४ चा सतीश काळसेकर काव्य पुरस्कार कवयित्री अनुराधा पाटील यांना प्रदान करताना ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे. सोबत (डावीकडून) विप्लव काळसेकर, डॉ. नंदकुमार मोरे, वीरधवल परब, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि डॉ. रणधीर शिंदे


शिवाजी विद्यापीठाचा सन २०२४ चा ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार कवी वीरधवल परब यांना प्रदान करताना ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे. सोबत (डावीकडून) विप्लव काळसेकर, डॉ. नंदकुमार मोरे,प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, अनुराधा पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे


शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२४ च्या सतीश व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार वितरण समारंभात बोलताना ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे. सोबत (डावीकडून) विप्लव काळसेकर, डॉ. नंदकुमार मोरे, वीरधवल परब, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, अनुराधा पाटील आणि डॉ. रणधीर शिंदे






कोल्हापूर, दि. २१ ऑक्टोबर: कवितेच्या माध्यमातून परतत्त्वाचे संरक्षण आणि संवेदनांचे संवर्धन करण्याचा आजचा कालखंड असून त्याद्वारे समाजाची सर्वंकष समज वाढविण्याचा कवी-साहित्यिकांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांनी आज येथे केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सन २०२४च्या सतीश काळसेकर व ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कारांच्या प्रदान समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते.

शिवाजी विद्यापीठाच्या वि.स. खांडेकर भाषा भवन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांना काव्य क्षेत्रातील मौलिक योगदानाबद्दल सतीश काळसेकर काव्य पुरस्कार, तर वेंगुर्ल्याचे प्रसिद्ध कवी वीरधवल परब यांना आश्वासक कवितालेखनासाठीचा ऋत्विज काळसेकर काव्य पुरस्कार डॉ. सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. पुरस्काराचे स्वरुप अनुक्रमे २१ हजार रुपये व १० हजार रुपये आणि शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह असे आहे.

भारत सासणे म्हणाले, कवितेमधून कवीचे स्वतःचे नितांत स्वरुप दिसते, भेटते. अशा भेटींतूनच उत्तम साहित्यकृती निर्माण होण्याच्या शक्यता वृद्धिंगत होतात. कवीमध्ये अंगभूत सहृदयता, दयाभाव असतो. म्हणूनच माफ करणारा कवी हा सर्वश्रेष्ठ असतो. ज्या परिस्थितीत जगणे कठीण झालेले असते, अशा वेळी संवेदनाहीन मनांपर्यंत कविता, कवितेच्या, मानवतेच्या वेदना पोहोचत नाहीत, म्हणून कवीने खंत जरुर बाळगावी; परंतु, संवेदनशील मनांसाठी त्याने लिहीते राहणे खूप आवश्यक असते.

कवयित्री अनुराधा पाटील यांनी समकाळाविषयी भाष्य करणाऱ्या कविता सादर करतानाच समाजाचा घटक म्हणून कवीने अस्वस्थता व्यक्त करणे आवश्यक असल्याचे सांगितले. त्या म्हणाल्या, कवितेची विविध रुपे असतात, तितक्याच तिच्या व्याख्याही असू शकतात. जाणीव-नेणिवेच्या सीमारेषेवरील धूसर भाग म्हणजे कविता, असेही म्हणता येते. कविता ही जगणे सहजसोपे करणारी बाब आहे. माणसांचे बोन्साय होण्याच्या कालखंडात माणूस म्हणून आपण समाजाच्या वेदना, संवेदनांकडे पाहणे आवश्यक आहे. भोवतालाकडे सजगपणे पाहात असताना त्याविषयीची स्वीकारशीलता मान्य करीत मानवी दुःखाचा पैस सृजनाच्या अंगाने मांडत त्याला वाचा फोडण्याची जबाबदारी कवींनी घेतली पाहिजे. अभावग्रस्त, चेहऱा नसणाऱ्या समूहांविषयी कलावंताचे उत्तरदायित्व मोठे असते, याची जाणीव सदोदित बाळगली पाहिजे.

कवी वीरधवल परब यांनी सतीश काळसेकर आणि ऋत्विज काळसेकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. जगण्यातील सांकेतिकता आणि नियमबद्धता यांच्याशी बेफिकीरपणे वागूनही सृजनाची वाट चोखाळणारा अस्वस्थ कवी म्हणजे ऋत्विज काळसेकर होता. आजच्या अस्वस्थ कालखंडात सम्यकदृष्टीने आणि विवेकाची कास धरीत रचनात्मक कामे करण्यासाठी समाजाला प्रेरित करण्याची जबाबदारी कवी, साहित्यिकांवर आलेली आहे.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. शिर्के यांनीही सतीश काळसेकर यांच्या साहित्यिक योगदानाला उजाळा दिला. ते म्हणाले, काळसेकरांचे समग्र साहित्य विद्यार्थ्यांनी अभ्यासावेच, पण त्यांचे वाचणाऱ्याची रोजनिशी हे पुस्तक तरी आवर्जून वाचावे. वाचणाऱ्यांसाठी कसे वाचावे, याचा वस्तुपाठच काळसेकरांनी त्यातून घालून दिलेला आहे. पुस्तकाबरोबरच माणसे वाचण्याचे कसबही त्यांनी आत्मसात केले होते. त्यांचा आदर्श घेऊन वास्तव शब्दांत पकडण्याचे कौशल्य विद्यार्थ्यांनी विकसित करावे. कवीचा, त्यांच्या साहित्याचा गौरव करणे ही सामाजिक-सांस्कृतिक जबाबदारी मानून शिवाजी विद्यापीठ हे पुरस्कार प्रदान करीत असल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली.

यावेळी विप्लव काळसेकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मराठी अधिविभाग प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी केले. डॉ. रणधीर शिंदे यांनी पुरस्कारामागील भूमिका व पुरस्कार विजेत्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमास आदित्य काळसेकर, डॉ. अशोक चौसाळकर, डॉ. राजन गवस, कौतिकराव ठाले-पाटील, डॉ. सुनीलकुमार लवटे, वसंत गायकवाड, प्रवीण बांदेकर, गोविंद काजरेकर, कृष्णात खोत, अनिल गवळी, राजेंद्र मुठाणे, किसन कुराडे, मंगेश नारायण काळे आदींसह शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment