समाजशास्त्र अधिविभागातर्फे आयात-निर्यातविषयक कार्यशाळा
शिवाजी विद्यापीठात आयोजित कार्यशाळेत बोलताना डॉ. ओंकार हरी माळी. मंचावर (डावीकडून) डॉ. प्रकाश राऊत, डॉ. सागर डेळेकर, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. प्रतिमा पवार व डॉ. प्रल्हाद माने. |
कोल्हापूर, दि. ८ ऑक्टोबर: आयात आणि
निर्यातविषयक उद्योगांमध्ये रोजगाराच्या अनेक संधी आहेत. कष्ट करण्याची तयारी
असणाऱ्या युवकांनी जरुर यामध्ये उतरावे, त्यांना सर्वोतोपरी सहकार्य व मार्गदर्शन
करण्यात येईल, असे उद्यमी महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ओंकार हरी
माळी यांनी आज येथे सांगितले.
शिवाजी विद्यापीठाचा समाजशास्त्र
अधिविभाग, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड लिंकेजेस केंद्र आणि शिवाजी युनिव्हर्सिटी रिसर्च अँड डेव्हलपमेंट
फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. माळी यांचे “आयात-निर्यात” या विषयावर
विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या
अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील होते.
डॉ. माळी म्हणाले, आयात-निर्यात
व्यवसायाचे
उद्योग क्षेत्रात महत्वाचे स्थान आहे. राष्ट्रीय अर्थकारणात अत्यंत महत्त्वाचे
योगदान असणाऱ्या या व्यवसायाविषयी युवक युवतींना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे
आहे. देशासह, महाराष्ट्रासोबत स्वतःचा
आर्थिक व सामाजिक विकास साधण्यासाठी या क्षेत्रामध्ये
तरुणांनी करिअर करण्यासाठी पुढे येणे गरजेचे आहे. त्यासाठी कंपनी रजिस्ट्रेशन, आवश्यक
परवाने, टर्म्स पेमेंट-ॲडव्हान्स
पेमेंट, इन्सेंटिव्ह्ज, मार्केटिंग अँड सोर्सिंग, इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट, प्रोजेक्ट प्रेझेंटेशन, इंटरनॅशनल ट्रेड, ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स, ग्लोबल बिझनेस
इन्वायर्नमेंट, फॉरेन एक्सचेंज
मॅनेजमेंट यासारख्या आयात-निर्यात व्यवसायाशी संबंधित आवश्यक तांत्रिक बाबींचा
योग्य अभ्यास गरजेचा आहे. हा अभ्यास, कष्ट आणि जिद्द या बळावर या व्यवसायात यशस्वी
होता येते. त्यासाठी उद्यमी महाराष्ट्र युवकांना सर्वोतोपरी मदत करते.
अध्यक्षीय मनोगतात
प्र-कुलगुरू डॉ. पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी नोकरी व सेवा क्षेत्रापलिकडे चाकोरीबाहेरील
उद्योग-व्यवसायांमधील करिअर संधींचा विचार करणे गरजेचे आहे. शिक्षण घेत असतानाच
अशा संधींचा शोध घेणे आणि त्यासाठी आवश्यक तयारी करणे, या बाबी करायला हव्यात. या
वयात अंगी स्वयंशिस्त बाळगली की आपोआपच आयुष्यभर तो सवयीचा भाग बनतो आणि आपल्याला
ही बाब यशाच्या अधिकाधिक जवळ घेऊन जाते.
समाजशास्त्र अधिविभागप्रमुख
डॉ. प्रतिमा पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. मयुरेश पाटील यांनी
पाहुण्यांचा परिचय करून दिला. आकाश ब्राह्मणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतिमा
देसाई यांनी आभार मानले. कार्यक्रमास डॉ. सागर डेळेकर, डॉ. प्रकाश राऊत, डॉ. जगन
कराडे, डॉ. प्रल्हाद माने, डॉ. राजेंद्र सोनकवडे यांच्यासह विद्यार्थी-विद्यार्थिनी
मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment