शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांचे संशोधन; युके पेटंट प्राप्त
डॉ. नाना गावडे |
डॉ. महादेव सुवर्णकार |
डॉ. संतोष बाबर |
कोल्हापूर, दि. ९ ऑक्टोबर: कोल्हापूर जिल्ह्यात, विशेषतः इचलकरंजी परिसरात
मोठ्या प्रमाणात वस्त्रोद्योग आहेत. या वस्त्रोद्योगांमधून विषारी रंगद्रव्यांचे मोठ्या
प्रमाणात प्रदूषण होते. मात्र, आता या पर्यावरणाला हानिकारक अशा रंगद्रव्यांवर सूर्यप्रकाशाच्या
सहाय्याने प्रक्रिया करून ती पूर्णतः नष्ट करून अगदी पिण्यायोग्य पाणी तयार
करण्याचे संशोधन शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्रज्ञांनी यशस्वी केले आहे.
नुकतेच त्यांच्या या संशोधनाला युके पेटंट प्राप्त झाले आहे.
शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील डॉ. के. एम. गरडकर आणि त्यांचे सहकारी डॉ. नाना गावडे, डॉ. संतोष बाबर आणि डॉ. महादेव सुवर्णकार यांनी या संदर्भातील संशोधन साकारले आहे. प्रा. गरडकर यांच्या चमूने युके पेटंटप्राप्त असणाऱ्या या संशोधनांतर्गत पर्यावरणपूरक मेटल ऑक्साईड नॅनोकम्पोझिट अत्यंत सोप्या पद्धतीने तयार करून त्यांचा वापर उत्प्रेरक म्हणून केला. ही संपूर्ण प्रक्रिया सूर्यप्रकाशात घडवून आणली जाते.
याअंतर्गत पर्यावरणाला हानिकारक असणारी रंगद्रव्ये पूर्णपणे नष्ट करून पिण्यायोग्य पाणी तयार केले जाते. ही प्रक्रिया फारशी खर्चिक नसल्याने वस्त्रोद्योगांसाठी एक
प्रकारे वरदानच ठरणार आहे.
डॉ. गरडकर यांनी दिलेल्या
माहितीनुसार, वस्त्रोद्योगांसह सर्वच उद्योगांत रसायने आणि नैसर्गिक संसाधनांचा व्यापक वापर केला जातो. कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या औद्योगिक सांडपाण्यामध्ये
नैसर्गिकदृष्ट्या नष्ट न होऊ शकणारे अजैविक, रासायनिक सेंद्रिय घटक असतात. ते कित्येकदा कोणत्याही
प्रक्रियेविना थेट नद्या, नाले आणि समुद्रात सोडले जातात. त्यामुळे जलप्रदूषणाची समस्या ही जागतिक पातळीवर एक डोकेदुखी
होऊन बसली आहे. या प्रकारचे जलप्रदूषण टाळण्यासाठी औद्योगिक सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते शुद्ध करून पुनर्वापरायोग्य करणे आवश्यक आहे. औद्योगिक सांडपाणी शुद्ध करण्यासाठी नॅनोमटेरियल फोटोकॅटॅलिस्ट हा एक प्रभावी आणि आर्थिकदृष्टया किफायतशीर पर्याय आहे. त्या दिशेने संशोधनाची दिशा केंद्रित करून सूर्यप्रकाशात रंगद्रव्यांवर
प्रक्रिया करण्याची पद्धती शोधून काढण्यात यश आले. भविष्यात देखील सोप्या हरित पद्धतीने आणि सूर्यप्रकाशात काम करणारे आणखी क्रियाशील नॅनोमटेरियल फोटोकॅटलिस्ट तयार करून पर्यावरणाची हानी टाळण्याच्या दृष्टीनेही संशोधन
करण्यात येत आहे.
डॉ. के. एम. गरडकर हे रसायनशास्त्र अधिविभागातील
वरिष्ठ प्राध्यापक असून नुकत्याच जाहीर झालेल्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या जागतिक
आघाडीच्या दोन टक्के संशोधकांमध्ये त्यांचा समावेश आहे. केवळ नॅनोमटेरियल या
विषयावर त्यांचे १५० हून अधिक शोधनिबंध विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
शोधपत्रिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. या सर्व संशोधकांचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के,
प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि अधिविभागप्रमुख डॉ.
कैलास सोनवणे यांनी अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment