शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसीचे संपादक डॉ. अभिजीत कांबळे. मंचावर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के व डॉ. शिवाजी जाधव. |
शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसीचे संपादक डॉ. अभिजीत कांबळे. |
कोल्हापूर, दि. २१ ऑक्टोबर: लोकशाही टिकण्यासाठी
माध्यमांची विश्वासार्हता टिकविणे आवश्यक आहे. माध्यम क्षेत्रात करिअर करू
इच्छिणाऱ्या युवा पिढीने ही जबाबदारी पेलण्यासाठी स्वतःला तयार केले पाहिजे, असे
प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा बीबीसी (नवी दिल्ली)चे संपादक डॉ. अभिजीत कांबळे
यांनी आज येथे केले.
शिवाजी विद्यापीठाच्या
मास कम्युनिकेशन विभागात ‘माध्यमांची विश्वासार्हता’ या विषयावर आयोजित विशेष व्याख्यानात डॉ. कांबळे बोलत होते. अध्यक्षस्थानी
कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.
डॉ. कांबळे यांनी आपल्या
कारकीर्दीतील अनेक अनुभवांचा दाखला देऊन माध्यमांच्या विश्वासार्हतेचे महत्त्व
पटवून दिले. ते म्हणाले, पराकोटीची स्पर्धा आणि बाह्यशक्तींचा दबाव यातून
माध्यमांच्या विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण झाला आहे. ‘ब्रेकिंग न्यूज’ या प्रकरणाचा त्यात मोठा हात आहे. हे थांबले
पाहिजे. सर्वात आधी बातमी देण्याची घाई विश्वासार्हतेला बाधा आणते. यावर उपाय
म्हणजे घाई न करता संयत आणि खंबीर पत्रकारिता करणे. या माध्यमातून लोकांच्या
प्रश्नांना भिडणारी पत्रकारिता करावी. सखोल अभ्यास करून व्यवस्थेला लोकाभिमुख
धोरणात्मक बदल घडविण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या पत्रकारितेची आवश्यकता आहे.
माध्यम
क्षेत्राला चांगल्या मनुष्यबळाची आवश्यकता असल्याचे सांगून डॉ. कांबळे म्हणाले,
माध्यम ही ग्लॅमर इंडस्ट्री नाही. इथल्या लोकप्रियतेला भुलून येणाऱ्यांना इथे
स्थान नाही. लोकांच्या प्रश्नांविषयी आस्था असणाऱ्या पत्रकारांना इथे करिअर संधी
आहेत. त्यासाठी विचारांत स्पष्टता असणारे, चौफेर वाचन आणि ज्ञानसंपादनाची आस
असणारे पत्रकार हवेत. अधिकाधिक सर्वसमावेशकतेचे भान असणारे पत्रकार खूप गरजेचे
आहेत. न्यूज रुममध्येही लिंग संतुलन, पत्रकारांचे स्थान, पार्श्वभूमी यांमधील
वैविध्यता यांनाही आता महत्त्व येऊ लागले आहे. असे लोक सामाजिक जाणीवा आणि
संवेदनांतून पत्रकारिता करण्यास प्राधान्य देतील आणि स्वाभाविकपणे विश्वासार्हता
वृद्धिंगत होईल. लोकांचे आयुष्य आणि देशाचे भवितव्य बदलण्याची ताकद
पत्रकारितेमध्ये आहे. तिची ही ताकद ओळखून काम करणाऱ्या युवा पत्रकारांना येथे
निश्चित संधी आहे.
अध्यक्षीय मनोगतात
कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, केवळ पत्रकारिताच नव्हे, तर जीवनाच्या प्रत्येक
क्षेत्रामध्ये विश्वासार्हतेला अतीव महत्त्व आहे. डॉ. कांबळे यांचे व्याख्यान
म्हणजे पत्रकारितेच्या विद्यार्थ्यांसाठी एका आदर्श व्याख्यानाचा वस्तुपाठ आहे.
आपल्याला पत्रकारितेसह अशा विविध क्षेत्रांचा विश्वासार्हतेचा निर्देशांक निश्चित
करता येईल का, या दृष्टीनेही विचार करण्याची, संशोधन करण्याची वेळ येऊन ठेपली आहे,
असे त्यांनी सांगितले.
अधिविभागाचे समन्वयक डॉ.
शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. जयप्रकाश पाटील यांनी आभार मानले.
कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार संपादक डॉ. श्रीरंग गायकवाड, डॉ. सुमेधा साळुंखे,
अनुप जत्राटकर, महावितरणचे जनसंपर्क अधिकारी विश्वजीत भोसले, मतीन शेख यांच्यासह
विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment