शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. बबन जोगदंड. मंचावर (डावीकडून) डॉ. कैलास सोनवणे व डॉ. जगन कराडे. शिवाजी विद्यापीठात आयोजित विशेष व्याख्यानात बोलताना डॉ. बबन जोगदंड.
कोल्हापूर, दि. १६ ऑक्टोबर: आजचे हे जग निव्वळ स्पर्धेचे नसून ते
संवाद कौशल्य, सादरीकरण, तंत्रज्ञान आणि
व्यवस्थापनविषयक ज्ञान मिळविण्याचे आहे. विद्यार्थ्यांनी यशस्वी होण्यासाठी ते
आत्मसात केले पाहिजे. सकारात्मक विचाराने प्रेरित होऊन अभ्यासात सातत्य, जिद्द, चिकाटी आणि कष्ट केल्यास यशप्राप्ती शक्य
आहे, असे प्रतिपादन पुणे येथील 'यशदा'चे
संशोधन अधिकारी डॉ. बबन जोगदंड यांनी काल (दि. १५) केले.
शिवाजी विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्राच्या वतीने
मानव्यशास्त्र सभागृहात 'स्पर्धा परीक्षा आणि नोकरीच्या संधी' या विषयावर आयोजित व्याख्यानात डॉ.जोगदंड बोलत होते. कार्यक्रमास रसायनशास्त्र अधिविभागप्रमुख
डॉ. कैलास सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.
डॉ. जोगदंड म्हणाले, परीक्षार्थींनी राजहंसाप्रमाणे नीर-क्षीर
विवेकवृत्तीने आवश्यक तेच ज्ञान प्राशन करण्याची कला आत्मसात करणे अनिवार्य ठरते. स्पर्धा
परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी भिती आणि न्यूनगंड बाळता कामा नये. पुस्तके
स्वत: शांत राहून व्यक्तीस बोलायला, जगायला शिकवितात आणि आत्मविश्वास
देतात. आज प्रचंड संसाधने उपलब्ध आहेत, त्यांचा उत्तम उपयोग करून घेता आला पाहिजे. जर्मन, फ्रेंच,
जपानी या भाषा कौशल्यांसह पर्यटन आणि कार्यक्रम व्यवस्थापनाचेही उत्तम
ज्ञान असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर दुर्दम्य इच्छाशक्ती, त्याग,
चौकस बुद्धी, वेळेचे व्यवस्थापन आणि शिस्तीची जोड
असणे गरजेचे आहे. वाचन, मनन, लेखन,
चिंतन, एकाग्रता आणि आकलन यामधून उत्तम स्पर्धक
घडू शकतात. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना विद्यार्थी किती अंतर कापतो, यापेक्षा तो
कोणत्या दिशेने जातो, याला खूप महत्त्व असते. विद्यार्थ्यांनी वर्तमानपत्रांचे बारकाईने
वाचन केले पाहिजे. विशेषत: इंग्रजी वर्तमानपत्रे वाचण्याचा सराव केला पाहिजे. वक्तृत्व
व लेखनशैली सुधारणेही गरजेचे आहे. वाचन करणे, नोटस् काढणे,
पठण, मनन करणे, आकलन आणि विश्लेषण करणे या पध्दतीने
अभ्यासाचा क्रम ठेवल्यास यशाचा मार्ग सुकर होतो.
यावेळी स्पर्धा परीक्षा आणि मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ.जगन कराडे
यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. पवन कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास
विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment