Friday, 28 February 2025

नेहरुंच्या विज्ञानवादी दृष्टीकोनामुळेच भारत स्वयंपूर्ण: डॉ. श्रीराम पवार

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीराम पवार.
 
शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानात बोलताना डॉ. श्रीराम पवार. मंचावर डॉ. प्रल्हाद माने आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे


कोल्हापूर, दि. २८ फेब्रुवारी: पंडित जवाहरलाल नेहरू यांचे भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या विकासामधील योगदान फार मोलाचे आहे. त्यांच्या विज्ञानवादी दृष्टिकोनामुळे भारत स्वयंपूर्ण बनला, असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार, संपादक डॉ. श्रीराम पवार यांनी केले. शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

डॉ.पवार म्हणाले, नेहरूंना समजून घेणे म्हणजे आधुनिक भारत समजून घेणे आहे. नेहरूंनी भाक्रा-नानगल धरण प्रकल्प, आय.आय.टी सारख्या शिक्षण संस्था, परमाणू ऊर्जा आयोग आणि इस्रोसारख्या संस्थांची पायाभरणी करून भारताच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राचा विकास केला. कृषी, उद्योग आणि अंतराळ क्षेत्रातील त्यांचे द्रष्टेपण हे भारताच्या आधुनिकतेला नवे परिमाण प्राप्त करून देणारे ठरले. नेहरूंनी शस्त्रास्त्र स्पर्धेपेक्षा विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे देशाच्या स्वयंपूर्णतेवर भर दिला. त्यांच्या धोरणांमुळे भारत विज्ञान क्षेत्रात आत्मनिर्भर बनला.

डॅा.पवार यांनी नेहरूंच्या तुरुंगवासातील चिंतन, लेखन आणि विज्ञानवादी विचारसरणीवर देखील प्रकाश टाकला.

अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिंदे म्हणाले, भारताच्या जैवविविधतेचे, वनस्पतींच्या जातींच्या सर्वेक्षणाचे धोरण नेहरूंनी आखले होते. भारताच्या कृषी जगताला वेगळी ओळख देवून हे राष्ट्र सुजलाम - सुफलाम बनवण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केले. अणुऊर्जा, अंतराळ अभ्यास क्षेत्रामध्ये भारत सरस ठरण्यापाठीमागे नेहरुंचे कार्य कारणीभूत आहे.

कार्यक्रमाला डॅा.जगन कराडे यांच्यासह शिक्षक, संशोधक विद्यार्थी उपस्थित होते. नेहरु अभ्यास केंद्राचे समन्वयक डॅा.प्रल्हाद माने यांनी प्रास्ताविक केले. मतीन शेख यांनी सूत्रसंचालन केले. सुहास रोमणे यांनी आभार मानले.

Thursday, 27 February 2025

प्रांत, भाषेची बंधने तोडून यशस्वी उद्योजक होणे शक्य: सुहास पालेकर

‘उद्योजकतेला प्रोत्साहन आणि सामाजिक समावेशन’ राष्ट्रीय परिषदेस सुरुवात

शिवाजी विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय परिषदेत सुहास पालेकर यांचे स्वागत करताना कुलुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत डॉ. श्रीकृष्ण महाजन.


कोल्हापूर, दि. २६ फेब्रुवारी: प्रांत, भाषा यांची बंधने झुगारून यशस्वी उद्योजक होता येते. त्यासाठी प्रबळ इच्छाशक्ती आवश्यक असते. कोणत्याही प्रकारच्या व्यवसाय व उद्योजकतेची पार्श्वभूमी नसलेले व्यक्तींनी विविध क्षेत्रातील उद्योग व व्यवसायामध्ये नेत्रदीपक यश मिळविले आहे, असे प्रतिपादन जेष्ठ विचारवंत व मार्गदर्शक सुहास पालेकर यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्या वतीने आयोजित ‘उद्योजकतेला प्रोत्साहन आणि सामाजिक समावेशन’ या विषयावरील  राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बीजभाषक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते.

सुहास पालेकर यांनी आपल्या बीजभाषणामध्ये जगभरातील व देशातील यशस्वी उद्योजक व व्यावसायिक यांची यशोगाथा व त्यांनी त्यासाठी घेतलेली मेहनत आणि वापरलेले कौशल्य व तंत्रज्ञान याची माहिती दिली. आपणही यशस्वी उद्योजक होऊ शकता, असा आत्मविश्वास त्यांनी विद्यार्थ्यांत निर्माण केला. टाटा, गोदरेज, अमूल डेअरी, कॉटन किंग, इन्फोसिस, माणदेशी फौंडेशन, झोमाटो, अपना बझार इत्यादी उद्योगांची सुरुवात ही शून्यातूनच झालेली आहे. त्यांच्याकडून आपण प्रेरणा घेऊन आपला व्यवसाय वा उद्योग यशस्वी कसा होईल यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक अभ्यास केंद्राचे संचालक डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी केले.

कुलगुरू डॉ. शिर्के अध्यक्षीय मनोगतात म्हणाले, प्रत्येक व्यक्ती यशस्वी उद्योजक होऊ शकते. विद्यार्थ्यांनीसुद्धा आता मी यशस्वी उद्योजक होणारच हे गृहीतक मनाशी बाळगून त्याप्रकारची स्वप्ने बाळगून ते प्रत्यक्षात येण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे. उद्योजकतेतून जास्तीत- जास्त लोकांना रोजगार मिळणे व त्यातून सामाजिक समावेशन शक्य आहे. 

या राष्ट्रीय परिषदेस देशभरातून प्राध्यापक, संशोधक व अभ्यासक सहभागी झाले असून त्यांनी उद्योजकता विकास, उद्योजकता विकासाला पूरक संस्था व आवश्यक वातावरण निर्मिती, महिलांसाठी उद्योजकता विकास, कृषी विकास आणि शास्वत विकासाचे धोरण, उद्योजकतेद्वारे सामाजिक समावेशन, शिक्षण आणि कौशल्य विकास, उद्योजकतेसाठी आवश्यक अर्थसाह्य, सर्वसमावेशक विकासासाठी सूक्ष्म उद्योजकता इत्यादी विषयावर ते शोधनिबंध सादर केले. तसेच, या विषयातील तज्ज्ञ व अभ्यासक प्रा. भूमित शहा, प्रा. तेजपाल मोहरेकर यांनी मांडणी केली.

अविनाश भाले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. तेजपाल मोहरेकर यांनी आभार मानले. यावेळी डॉ. प्रकाश कांबळे, डॉ. दीपा इंगवले, डॉ. केदार मारुलकर, डॉ. भूमित शहा, प्रा. एस. एस. भोला आदी उपस्थित होते.

कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी: प्रा. राजेंद्र दास

 शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह

शिवाजी विद्यापीठात मराठी भाषा गौरव दिनानिमित्त काढण्यात आलेल्या ग्रंथदिंडीमध्ये सहभागी झालेले कुलगरू डॉ. दिगंबर शिर्के, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रा. राजेंद्र दास, डॉ. महादेव देशमुख, डॉ. नंदकुमार मोरे आदी

शिवाजी विद्यापीठात आयोजित व्याख्यानमालेत बोलताना प्रा. राजेंद्र दास. मंचावर डॉ. अक्षय सरवदे आणि डॉ. नंदकुमार मोरे

 

(मराठी भाषा गौरव दिन- व्हिडिओ)

 

कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: कुसुमाग्रजांची कविता शाश्वत सत्य मांडणारी आहे, असे प्रतिपादन प्रा. राजेंद्र दास यांनी आज केले. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठातील मराठी अधिविभागात आयोजित कवी कुसुमाग्रज व्याख्यानमालेत कवी कुसुमाग्रज यांची कविता या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के अध्यक्षस्थानी होते.

प्रा. दास म्हणाले की, कुसुमाग्रज यांच्या कवितेने मराठी कवितेत एका युगाची निर्मिती केली. त्यांची कविता वर्धिष्णु स्वरूपाची आहे. भव्य, दिव्य आणि मंगलतेची पूजा करणारा कवी म्हणून कुसुमाग्रज मराठी काव्यविश्वाला परिचित आहेत. कुसुमाग्रजांनी मराठी कवितेला मोलाचे योगदान दिले आहे. मराठी मनाची स्पंदने त्यांनी आपल्या कवितेतून मांडली.

मराठी अधिविभाग प्रमुख डॉ.काग्रजांनी आपल्या ले की. सहणून कुसु कविता या वि नंदकुमार मोरे यांनी प्रास्ताविक केले. अमोल देशमुख यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुखदेव एकल यांनी आभार मानले. कार्यक्रमाला इंग्रजी अधिविभाग प्रमुख डॉ. प्रभंजन माने, डॉ. अक्षय सरवदे, डॉ. दीपक भादले तसेच संत बाळूमामा भजन मंडळाचे (हुपरी) वारकरी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

ग्रंथदिंडीचा उत्साह

मराठी भाषा गौरव दिनाचा उत्साह शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांमध्ये सकाळपासूनच ओसंडून वाहात होता. मराठी अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी मुख्य प्रशासकीय इमारतीपासून वि.स. खांडेकर भाषा भवनापर्यंत ग्रंथदिंडीचे आयोजन केले. मुख्य इमारतीसमोर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. पालखीमध्ये भारतीय संविधान, श्री ज्ञानेश्वरी, श्री नामदेव गाथा, तुकारामबोवांच्या गाथेचे निरुपण हे ग्रंथ ठेवण्यात आले होते. पालखीपूजनानंतर विद्यापीठ प्रांगणातून ज्ञानबा-तुकारामच्या गजरात दिंडी काढण्यात आली. हुपरीच्या संत बाळूमामा भजनी मंडळाचे लिंगाप्पा मुधाळे, चंद्रकांत ऐनापुरे, भीमराव जाधव, काकासो हांडे, धोंडीराम मुधाळे, दिग्विजय खोत, संजय लवटे, दीपक मर्दाने, विजय गोरे, जयसिंग घोरपडे, विनायक मानकापूर, सौरभ मधाळे, विजय लोकरे आदींनी दिंडीमध्ये मोठी रंगत आणली.


‘स्पार्क’मुळे विद्यार्थ्यांत सर्जनशील जाणिवा: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के

 विद्यापीठात दोनदिवसीय चित्रपट महोत्सवास प्रारंभ

शिवाजी विद्यापीठाच्या स्पार्क चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के.


शिवाजी विद्यापीठाच्या स्पार्क चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात बोलताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. मंचावर डॉ. शिवाजी जाधव आणि अनुप जत्राटकर

शिवाजी विद्यापीठाच्या स्पार्क चित्रपट महोत्सवासाठी जमलेले रसिक प्रेक्षक, मान्यवर आणि निर्माते व दिग्दर्शक.

(स्पार्क फिल्म फेस्टीव्हल उद्घाटन समारंभ- व्हिडिओ)

कोल्हापूर, दि. २७ फेब्रुवारी: फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी सर्जनशीलतेच्या वाटा जाणतेपणाने चोखाळाव्यात, यासाठी स्पार्क चित्रपट महोत्सव महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज व्यक्त केला.

शिवाजी विद्यापीठाच्या बी.ए. फिल्म मेकिंग अभ्यासक्रमांतर्गत आजपासून दोनदिवसीय स्पार्क चित्रपट महोत्सवाला प्रारंभ झाला. या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, कोल्हापूर ही भारतीय चित्रपटसृष्टीची जन्मभूमी आहे. हा वारसा जपण्याबरोबरच या ठिकाणी कालसुसंगत राहण्यासाठी फिल्म मेकिंगचा अभ्यासक्रम विद्यापीठाने सुरू केला. चित्रपट क्षेत्राशी निगडित करिअरच्या आणि कौशल्याच्या वेगळ्या वाटा या निमित्ताने विद्यार्थ्यांसाठी खुल्या होतील. कमीत कमी साधनस्रोतांमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त उत्तम काम करता आले पाहिजे. स्पार्क चित्रपट महोत्सवामध्ये कोल्हापुरात निर्माण होऊन विविध राष्ट्रीय पुरस्कारांवर मोहोर उमटविणाऱ्या लघुपट, माहितीपटांचा समावेश करण्यात आला आहे. या निमित्ताने या चित्रपटकर्त्यांशी संवादातून विद्यार्थ्यांना चांगले काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि भविष्यात त्यांच्या हातूनही उत्तमोत्तम चित्रकृती घडाव्यात, अशी अपेक्षा आहे. फिल्म मेकिंगचे विद्यार्थीच या पुढील काळात सदर अभ्यासक्रमाचे खरे दूत असतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

उद्घाटन सत्रात बी.ए. फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या मेटाफोर या लघुपटाचे सादरीकरण करण्यात आले. त्याचे कुलगुरू डॉ. शिर्के यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. यावेळी अभ्यासक्रमाचे समन्वयक डॉ. शिवाजी जाधव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर सह-समन्वयक दिग्दर्शक अनुप जत्राटकर यांनी आभार मानले.

यावेळी डॉ. सुमेधा साळुंखे, डॉ. जयप्रकाश पाटील, माहिती अधिकारी वृषाली पाटील, दिग्दर्शक संजय दैव, रोहित कांबळे, राजेंद्र मोरे, मेधप्रणव पोवार, नितेश परुळेकर, स्वप्नील पाटील, अनिल वेल्हाळ, जयसिंग चव्हाण, चंद्रशेखर गुरव, विशाल कुलकर्णी, प्रशांत भिलवडे, अवधूत कदम, सागर वासुदेवन्, दादू संकपाळ, दिग्विजय कोळेकर, मतीन शेख यांच्यासह चित्रपट रसिक नागरिक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 25 February 2025

संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाची ‘शिवस्पंदन’मध्ये विजयाची हॅटट्रिक

शिवाजी विद्यापीठात शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाच्या सर्वसाधारण विजेतेपदाचा चषक संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागास प्रदान करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत मान्यवर आणि अधिविभागाचे विद्यार्थी-विद्यार्थिनी

शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन महोत्सवात सादरीकरण करताना विद्यापीठात शिकणारे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी-विद्यार्थिनी.

शिवस्पंदन महोत्सवातील वारकरी नृत्य


(फोटोओळ - उपरोक्त दोन फोटोंसाठी) शिवस्पंदन महोत्सवात सादर झालेले दीपनृत्य

(शिवस्पंदन महोत्सव अंतिम दिवस सादरीकरण व पारितोषिक वितरण- व्हिडिओ)



कोल्हापूर, दि. २५ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठाच्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवात सलग तिसऱ्या वर्षी सर्वसाधारण विजेतेपद मिळवित संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाने हॅटट्रिक नोंदविली आहे. आज सायंकाळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते शिवस्पंदन महोत्सवाचे पारितोषिक वितरण करण्यात आले.

गेले तीन दिवस शिवाजी विद्यापीठात सुरू असलेल्या शिवस्पंदन सांस्कृतिक महोत्सवाचा कळसाध्याय आज गाठला गेला. संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थ्यांनी शोभायात्रेसह एकल नृत्य, नकला, रांगोळी, स्थळचित्रण, सुगम गायन, लघुनाटिका, भारतीय समूहगीत आणि समूहनृत्य प्रकारांत प्रथम क्रमांक मिळवित सर्वसाधारण विजेतेपदावर सलग तिसऱ्यांदा आपले नाव कोरले. शिवाजी विद्यापीठात शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी प्रथमच शिवस्पंदन महोत्सवात केलेले सादरीकरण आजच्या अखेरच्या दिवसाचे तसेच महोत्सवाचेही वैशिष्ट्य ठरले.

आज महोत्सवात अखेरच्या दिवशी राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात एकल नृत्य आणि समूहनृत्य स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धांतील सादरीकरणांना तसेच पारितोषिक वितरण समारंभाला विद्यार्थी-विद्यार्थिनींचा अत्यंत उत्साही प्रतिसाद लाभला. विशेषतः श्रद्धा शुक्ला हिने नजाकतीने सादर केलेल्या ठसकेबाज लावणीला आणि संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या दीपनृत्याला उपस्थितांची प्रचंड दाद मिळाली. त्याखेरीज जोगवा नृत्य, वारकरी नृत्य, तांडव नृत्य आदी सादरीकरणांनाही उत्तम प्रतिसाद लाभला.

या स्पर्धांनंतर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, महोत्सव समन्वयक डॉ. नितीन कांबळे, माजी संचालक डॉ. प्रकाश गायकवाड, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पोवार, डॉ. विनोद ठाकूरदेसाई, डॉ. एस.एम. भोसले, डॉ. प्रतिभा देसाई, डॉ. एस.टी. कोंबडे, डॉ. कविता वड्राळे यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मीना पोतदार यांनी विजेत्यांची नावे घोषित केली. विद्यार्थी विकास मंडळाच्या डॉ. सुरेखा आडके, विजय इंगवले, विशाल म्हातुगडे, अभिषेक केंबळीकर यांनी यशस्वी संयोजन केले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल असा- 

शोभायात्रा - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : राज्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ १: भूगोल अधिविभाग, उत्तेजनार्थ २ : मास कम्युनिकेशन अधिविभाग

लोकवाद्यवादन (एकल) - प्रथम : यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अधिविभाग, द्वितीय : संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, तृतीय : संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ २ : तंत्रज्ञान अधिविभाग

एकल नृत्य - प्रथम : संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग, द्वितीय : राज्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २ : रसायनशास्त्र अधिविभाग

नकला - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : एम.बी.ए.अधिविभाग, तृतीय : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ : पर्यावरणशास्त्र अधिविभाग

रांगोळी - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : समाजशास्त्र अधिविभाग, तृतीय : समाजशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: रसायनशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २: वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभाग

स्थळचित्र - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हल्पमेंट अधिविभाग, उत्तेजनार्थ १: रसायनशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २: तंत्रज्ञान अधिविभाग

सुगम गायन - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : समाजशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: सूक्ष्मजीवशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २: संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

लघुनाटिका - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : पर्यावरणशास्त्र अधिविभाग, तृतीय : एम.बी.ए. अधिविभाग, उत्तेजनार्थ १: अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ २: यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट अधिविभाग

मूकनाटय - प्रथम : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, द्वितीय : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, तृतीय : पर्यावरणशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ: भूगोल अधिविभाग

भारतीय समूहगीत - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : पर्यावरणशास्त्र अधिविभाग, तृतीय : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, उत्तेजनार्थ: रसायनशास्त्र अधिविभाग

समूहनृत्य - प्रथम : संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग, द्वितीय : अन्न व तंत्रज्ञान अधिविभाग, तृतीय : पर्यावरणशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ १: वनस्पतीशास्त्र अधिविभाग, उत्तेजनार्थ २: भूगोल अधिविभाग

 

 

लावणी नृत्य सादरीकरणाने पोलंडच्या तरुणाईने जिंकली मने

 शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद

शिवाजी विद्यापीठात लावणी नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थिनीसमवेत नृत्यात सहभागी झालेले पोलंडचे युवक-युवती


शिवाजी विद्यापीठात भारतीय नृत्याविष्कार पाहण्यात आणि त्यांच्या स्मृती छायाचित्रांकित करण्यात रमलेले पोलंडचे विद्यार्थी


शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, केंद्रीय युवा व क्रीडा मंत्रालयाचे यूथ ऑफिसर समंतकुमार यादव, डॉ. तानाजी चौगुले यांच्यासह पोलंडचे युवा शिष्टमंडळ


(पोलंड शिष्टमंडळाची शिवाजी विद्यापीठास भेट- व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २५ फेब्रुवारी: महाराष्ट्राचा लावणी हा नृत्यप्रकार पाहण्यास जितका सोपा, सादरीकरणास मात्र तितकाच अवघड. त्यातली नजाकत, अदाकारी, ठेका हे सारेच वेगळे. मात्र, पोलंडच्या युवक, युवतींनी मात्र शिवाजी विद्यापीठाच्या युवा कलाकारांसमवेत लावणी नृत्यात घेतलेला सहभाग पाहून सारेच चकित झाले आणि आनंदलेही. या सादरीकरणाने त्यांनी उपस्थितांची मने जिंकली.

पोलंड या देशाचे युवा शिष्टमंडळ सध्या भारताच्या शैक्षणिक-सांस्कृतिक दौऱ्यावर आहे. वळिवडेसह कोल्हापूर परिसरातील आपल्या पूर्वजांच्या स्मृती जागविण्यासाठी, त्यांच्याप्रती आदरांजली वाहण्यासाठी पोलंडच्या राजशिष्टाचार अधिकाऱ्यांसह नागरिक अतिशय भावनापूर्ण आत्मियतेने येथे येत असतात. यंदाही २१ युवक-युवतींचे शिष्टमंडळ कोल्हापूरमध्ये आले असून त्यांनी या भेटीअंतर्गत काल (दि. २४) शिवाजी विद्यापीठास भेट देऊन राष्ट्रीय सेवा योजनेसह विविध अधिविभागांतील विद्यार्थ्यांशी अत्यंत मनमोकळा संवाद साधला.

राजर्षी शाहू सभागृहात झालेल्या या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने काही सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण केले. यावेळी एक विद्यार्थिनी लावणी नृत्य सादर करीत असताना शिष्टमंडळातील काही कलाकार तिच्या नृत्यात सामील झाले. तिच्याप्रमाणे लावणी करण्याचा त्यांनी अत्यंत यशस्वी प्रयत्न केला. त्यांच्या या सहनृत्याविष्काराने सर्वच उपस्थितांची मने त्यांनी जिंकून घेतली.

भारत-पोलंडमध्ये सांस्कृतिक साम्य

यावेळी उपस्थित भारतीय विद्यार्थ्यांशी शिष्टमंडळातील तरुणाईने आत्मियतेने संवाद साधला. पोलंडचे भारताशी भावनिक नाते असून या दोन्ही देशांत बरेचसे सांस्कृतिक साम्य आहे. या दोन्ही देशांमधील राजकीय, सामाजिक संबंध अत्यंत दृढ स्वरुपाचे आहेत. पाहुण्यांप्रतीची आतिथ्यशीलता हेही फार महत्त्वाचे साम्यस्थळ असल्याचे शिष्टमंडळातील युवकांनी सांगितले. पोलंडमध्ये हिंदी चित्रपट आवडीने पाहिले जातात आणि अमिताभ बच्चन, शाहरूख खान आणि सलमान खान हे तेथील तरुणाईतही लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. शिष्टमंडळातील काही विद्यार्थी हिंदी आणि संस्कृतही शिकत असून त्यांनी काही संस्कृत श्लोकही यावेळी सादर केले.

या संवादानंतर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनीही शिष्टमंडळातील विद्यार्थ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी भारत सरकारच्या युवा व क्रीडा मंत्रालयाचे यूथ ऑफिसर सुमंतकुमार यादव यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.  सहाय्यक कक्ष अधिकारी कपिल कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी रोहित आनंद, भरत चव्हाण उपस्थित होते. पोलंडच्या शिष्टमंडळात हेलेना कॅटरझिना, सँड्रा सॅनियर, पिटर डॅनिकी, मिया स्प्लिट, ओलीविया कोलासा, जाकूब सेरेडेनस्की, अन्टोनी सेरेडेनस्की, वॅरोनिका वॅलूपिक, वॅरोनिका ड्रोड, कॉन्स्टॅन्टी क्सूबिकी, डॉमिनिकी गिझीकी, पॅटरिझा चोडोरोवॉस्का आदींचा समावेश होता. विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

Monday, 24 February 2025

विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीचे

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन

 

शिवाजी विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीचे भूमीपूजन करताना कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर. सोबत कुलगरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि अन्य अधिकारी व मान्यवर

शिवाजी विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी कोनशिला अनावरण प्रसंगी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर. सोबत कुलगरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, अन्य अधिकारी व मान्यवर

शिवाजी विद्यापीठात सर्वांगीण विद्यार्थी विकास इमारतीच्या भूमीपूजन प्रसंगी इमारतीच्या आराखड्याची कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांना माहिती देताना कुलगरू डॉ. दिगंबर शिर्के.

मंत्री प्रकाश आबिटकर यांना शिवाजी विद्यापीठाच्या प्रगतीविषयी अहवाल सादर करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत उपस्थित अधिकारी

शिवाजी विद्यापीठातील आढावा बैठकीला संबोधित करताना कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर

शिवाजी विद्यापीठातील आढावा बैठकीला संबोधित करताना कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर. 

(मंत्री प्रकाश आबिटकर यांची विद्यापीठ भेट- व्हिडिओ)




कोल्हापूर, दि. २४ फेब्रुवारी: शिवाजी विद्यापीठात आज राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्राच्या इमारतीचे भूमीपूजन करण्यात आले.

शिवाजी विद्यापीठ मुद्रणालय व सबस्टेशन क्र. १ जवळील परिसरात शिवाजी विद्यापीठाने सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र उभारण्याचे ठरविले आहे. प्रस्तावित इमारतीमध्ये केंद्रीय रोजगार कक्ष, कौशल्य विकास कक्ष, संशोधन व विकास कक्ष, संस्थात्मक नवोन्मेष मंडळ, सेमिनार कक्ष, परिषद सभागृह, एसयूके संशोधन व विकास फौंडेशन, आंतरराष्ट्रीय व्यवहार कक्ष, नवोन्मेष क्लिनिक, प्रयोगशाळा प्रशासक इत्यादी कक्षांचा समावेश असणार आहे.

या इमारतीचे आज दुपारी मंत्री श्री. आबिटकर यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले. त्याचप्रमाणे इमारतीच्या कोनशिलेचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी मंत्री महोदयांना प्रकल्पाच्या आराखड्याविषयी माहिती दिली. त्याचप्रमाणे प्र-कलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कलसचिव डॉ. विलास शिंदे आणि इनोव्हेशन, इनक्युबेशन व लिंकेजेस केंद्राचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी या इमारतीमधील विविध कक्षांची वैशिष्ट्ये आणि महत्त्व याविषयी माहिती दिली.

यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. धनंजय सुतार, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, उपकुलसचिव रणजीत यादव, अमित कांबळे, विजय पोवार, वैभव आरडेकर यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी, विविध अधिकार मंडळांचे सदस्य, बांधकाम समिती सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रस्तावित इमारतीबाबत थोडक्यात...

सर्वांगीण विद्यार्थी विकास आणि संगणक सुविधा केंद्र इमारतीच्या कामासाठी केंद्र सरकारच्या पीएम-उषा या योजनेअंतर्गत निधी मंजूर झाला असून या इमारतीचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत ठेव अंशदान योजनेअंतर्गत करण्यात येणार आहे. इमारतीसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपये इतका खर्च प्रस्तावित आहे. सध्या तळमजला अधिक पहिला मजला असे बांधकाम प्रस्तावित असून त्यांचे क्षेत्रफळ अनुक्रमे ९४९.४९ चौरस मीटर आणि ९१०.६१ चौरस मीटर असे एकूण १८६०.१० चौरस मीटर इतके असेल.

विद्यापीठात सृजनात्मक, नवोन्मेषी कार्य व्हावे: मंत्री प्रकाश आबिटकर

भूमीपूजन समारंभानंतर व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी मंत्री प्रकाश आबिटकर यांच्यासमोर विद्यापीठाच्या वाटचालीविषयी सादरीकरण केले. यामुळे श्री. आबिटकर प्रभावित झाले. ते म्हणाले, मी स्वतः शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी असल्यामुळे विद्यापीठाने केलेल्या वाटचालीचा मला अभिमान आहे. आपण सर्वांनी मिळून या विद्यापीठाचे भवितव्य अधिक उज्ज्वल होण्यासाठी प्रयत्न करू या. त्यासाठी शासन स्तरावरही सर्वोतोपरी सहकार्य करण्याची भूमिका राहील. विद्यापीठाने सृजनात्मक आणि नवोन्मेषी स्वरुपाचे काम येथून पुढील काळात अधिक गतीने करावे, अशी अपेक्षा श्री. आबिटकर यांनी व्यक्त केली. यावेळी विद्यापीठाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.