Monday, 30 June 2025

‘प्राध्यापक’ दिगंबर शिर्के यांनी अधिविभागात घेतले अखेरचे लेक्चर!

 



(फोटोओळ- उपरोक्त सर्व फोटोंसाठी) शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात शिक्षक म्हणून अखेरचे लेक्चर घेताना कुलगुरू तथा प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के. 

(प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के यांच्या निवृत्तीदिवशी अधिविभागातील अखेरच्या व्याख्यानाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. ३० जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू तथा संख्याशास्त्र अधिविभागाचे प्राध्यापक डॉ. दिगंबर शिर्के यांनी त्यांच्या शिक्षक म्हणून अखेरच्या दिवशी विद्यार्थ्यांसमोर लेक्चर देऊन अधिविभागाचा निरोप घेतला. नियत वयोमानानुसार डॉ. शिर्के आज संख्याशास्त्र अधिविभागातून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले.

आजचा काळ स्मार्ट क्लासरुम शिक्षणाचा असला तरी सच्चा हाडाच्या शिक्षकासाठी मात्र खडू, फळा आणि डस्टर या साधनांचेच आकर्षण असते. साधारण ४० वर्षांपूर्वी जून १९८५ मध्ये डॉ. शिर्के हे विद्यार्थी म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संख्याशास्त्र अधिविभागात दाखल झाले. तेथपासून ते आजतागायत त्यांची संपूर्ण कारकीर्द शिवाजी विद्यापीठातच घडली, साकार झाली. विद्यार्थीदशेत असतानाच डॉ. शिर्के यांनी खडू, फळा आणि डस्टरधारी शिक्षक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते पूर्णही केले. शिक्षकापासून ते अधिविभाग प्रमुख पदापर्यंत आणि प्रशासनातील कुलसचिव पदापासून ते कुलगुरू पदापर्यंत त्यांनी सर्व पदे यशस्वीरित्या भूषविली. प्रशासनात असतानाही त्यांनी वेळोवेळी अधिविभागामध्ये जाऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, अध्यापन केले. शिक्षक म्हणून आपल्या अखेरच्या दिवशीही आपण विद्यार्थ्यांसमोर खडू, फळ्यावर लेक्चर घ्यावयाचे, अशी सुप्त इच्छा डॉ. शिर्के यांच्या मनी होती. ती त्यांनी आज त्यांच्या शिक्षक पदाच्या अखेरच्या दिवशी पूर्ण केली.

सदर व्याख्यानासाठी ते नेहमीप्रमाणे अर्धा तास आधीच संख्याशास्त्र अधिविभागात उपस्थित झाले. शिकवावयाच्या विषयाचा अभ्यास केला. आवश्यक नोट्स तयार केल्या आणि वर्गात प्रवेश केला. त्यांनी "स्टॅटिस्टिकल सिम्युलेशन अँड इट्स अॅप्लीकेशन्स" या विषयावर अतिशय सोप्या पद्धतीने, सुसंगत उदाहरणांसह व्याख्यान दिले.

या व्याख्यानात त्यांनी अमेरिकन स्टॅटिस्टिकल असोसिएशनच्या दि अमेरिकन स्टॅटिस्टिशियन या मान्यताप्राप्त शोधपत्रिकेमध्ये १९९१ साली प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातील आयलस कॉन्स्टंट (e) संदर्भातील संख्याशास्त्रीय सिद्धांत, संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवल्या. त्या संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि विद्यार्थ्यांच्या आकलनास अनुरूप अशा शब्दांत मांडल्या.

विशेष म्हणजे, अधिविभागात स्मार्ट क्लासरुम आणि स्मार्ट बोर्ड असतानाही त्यांनी हा विषय खडू आणि फळा अशा पारंपरिक पद्धतीने शिकविण्याचा आनंद घेतला. विद्यार्थ्यांनीही त्यांना उत्तम प्रतिसाद दिला. या विषयावर आधारित पुढील अभ्यास आणि संशोधनाच्या दिशांचे स्वरुप याविषयीही त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन प्राध्यापक शिर्के यांनी आपल्या अधिविभागातील शिक्षक म्हणून अखेरच्या व्याख्यानाचा समारोप केला. कोणताही औपचारिक निरोप नाही, समारंभ नाही, पुष्पगुच्छांची देवाणघेवाण नाही, झाली ती केवळ विचारांची देवाणघेवाण. कुलगुरू पदाचा बडेजाव न मिरविता एक शिक्षक म्हणून आपले कर्तव्य बजावत असताना किती निरलस भावनेने निवृत्तीकडे सरकता येते, याचा वस्तुपाठच जणू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या निमित्ताने घालून दिला.

Friday, 27 June 2025

कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना ‘करवीर भूषण’ पुरस्कार प्रदान

 

शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ करवीर यांचा 'करवीर भूषण' पुरस्कार प्रदान करताना राजूभाई दोशी. सोबत क्लबचे पदाधिकारी व सदस्य.


कोल्हापूर, दि. २७ जून: शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव तथा विज्ञान लेखक डॉ. विलास शिंदे यांना रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने नुकताच करवीर भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रोटरी क्लब ऑफ करवीर यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे ३६ व्या चार्टर नाईट सोहळा झाला. या प्रसंगी क्लबचा "करवीर भूषण" हा प्रतिष्ठेचा पुरस्कार कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांना राजूभाई दोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देऊन पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉ. शिंदे यांनी शिक्षण, प्रशासन व पर्यावरण या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान करण्यात आला.

डॉ. विलास शिंदे यांनी पुरस्काराबद्दल रोटरी क्लब ऑफ करवीरचे आभार मानले. आज खऱ्या अर्थाने आज करवीरवासी झाल्यासारखे वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

क्लबचे असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी यांनी क्लबने वर्षभर विविध केलेल्या कार्याचा उल्लेख केला. अध्यक्षीय भाषणामध्ये प्रमुख पाहुणे राजूभाई दोशी यांनी रोटरी क्लब ऑफ करवीरने गेल्या पस्तीस वर्षांमध्ये अतिशय उल्लेखनीय कार्य केले आहे. भविष्यात क्लबमार्फत एखादा समाजोपयोगी कायमस्वरुपी भरीव प्रकल्प उभा करण्यासंदर्भात विचारविमर्ष करावा, असे आवाहन त्यांनी केले.

सुरवातीला क्लबचे अध्यक्ष कुशल पटेल यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर पर्यावरणविषयक लघुपट 'फाकड्या'चे प्रदर्शन करण्यात आले. त्याचे निर्माते व अभिनेते उत्तम पवार यांचा क्लब तर्फे मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी दिलीप शेवाळे आणि डॉ. संदीप पाटील यांनी पाहुण्याचा परिचय करून दिला. निशिकांत नलवडे यांनी सूत्रसंचालन केले, तर सेक्रेटरी नारायण भोई यांनी उपस्थितांचे आभार मानले.

कार्यक्रमास असिस्टंट गव्हर्नर गिरीश जोशी, अध्यक्ष कुशल पटेल, सेक्रेटरी नारायण भोई, खजिनदार निलेश भादुले, माजी अध्यक्ष सुभाष आलेकर, संभाजी पाटील, दिलीप शेवाळे, दिलीप प्रधाने, निशिकांत नलवडे, हरेष पटेल, उदय पाटील, संजय पाटील, शितल दुग्गे, पंडित जाधव, चंद्रकांत कागले, क्लबचे सर्व सदस्य आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

विद्यापीठाच्या ‘बांध’ एकांकिकेचे विविध स्पर्धांत यश

तंत्रज्ञान अधिविभागात कौतुकाचा वर्षाव

'बांध' एकांकिकेमधील कलाकार विद्यार्थ्यांचे अभिनंदन करताना तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉ. अजित कोळेकर.


शिवाजी विद्यापीठाच्या 'बांध' एकांकिकेने महाराष्ट्रातील विविध नामांकित स्पर्धांमध्ये भरीव यश प्राप्त केले.



कोल्हापूर, दि. २७ जून: तंत्रज्ञान अधिविभागाच्या कलासंपन्न विद्यार्थ्यांनी बांध या एकांकिकेच्या माध्यमातून सृजनशीलता आणि सांघिक भावना जोपासल्यानेच त्यांना विविध स्पर्धांत घवघवीत यश संपादन करता आले, असे कौतुकोद्गार अधिविभागाचे संचालक डॉ. अजित कोळेकर यांनी काढले.

शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या बांध” या एकांकिकेने या वर्षी विविध नामवंत सांस्कृतिक स्पर्धांमध्ये दर्जेदार कामगिरीचे प्रदर्शन करीत उल्लेखनीय यश मिळविले आहे. अधिविभागाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने सादर झालेल्या या एकांकिकेने जी.एस.  रायसोनी करंडक, पुरुषोत्तम करंडकासह मनोरंजन करंडक, सकाळ करंडक, लोकसत्ता लोकांकिका करंडक अशा प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये भाग घेत प्रभावी ठसा उमटवला. त्या निमित्ताने या विद्यार्थ्यांचा अधिविभागात गुणगौरव करण्यात आला. त्यानिमित्त डॉ. कोळेकर बोलत होते.

डॉ. कोळेकर म्हणाले, अभियांत्रिकीचे विद्यार्थी असूनही कलागुणसंपन्नतेचे उत्तम प्रदर्शन घडविले आहे. हे यश केवळ स्पर्धात्मक नाही, तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचेही उदाहरण आहे. सादरीकरण, अभिनय, संगीत, आणि प्रकाश योजना यांचा सुंदर मिलाफ साधत “बांध” एकांकिकेने प्रेक्षकांसह परीक्षकांचीही मने जिंकली. तंत्रज्ञान अधिविभागासह विद्यापीठाला या गुणवत्तापूर्ण सादरीकरणाचा अभिमान आहे.

या एकांकिकेमध्ये दृप्ता कुलकर्णी, वेदांत मोरे, नेहा सावंत, ज्ञानेश पाटील, शुभम भिलारे, श्रीधर निंबाळकर, वेदांत कारंडे, साक्षी जाधव, गणेश मडिवाल, भूषण चांदणे, हर्षदा लोंढे, श्रुतिका शेळके, हर्षिता परब, पूर्वा सावंत, रेणुका घरात, सौरभ जगताप या कलाकार विद्यार्थ्यांनी विविध भूमिका केल्या आहेत.

या एकांकिकेने सांघिक स्तरावर जी.एस. रायसोनी करंडक (विभागीय द्वितीय क्रमांक), सकाळ करंडक (द्वितीय क्रमांक) आणि लोकसत्ता लोकांकिका करंडक (द्वितीय क्रमांक) असे यश प्राप्त केले आहे. तर, वैयक्तिक गटात दृप्ता कुलकर्णी (वाचिक अभिनय- पुरुषोत्तम करंडक, उत्कृष्ट अभिनेत्री - सकाळ व लोकसत्ता करंडक), नेहा सावंतउत्कृष्ट अभिनेत्री प्रमाणपत्र (पुरुषोत्तम करंडक), ज्ञानेश पाटील, शुभम भिलारे (उत्कृष्ट प्रकाश योजना- सकाळ व लोकसत्ता करंडक) आणि वेदांत कारंडे (उत्कृष्ट पार्श्वसंगीत- लोकसत्ता करंडक).

३२०० विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण; ४५० हून अधिक जणांना नामांकित कंपन्यांत रोजगार संधी

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाची कामगिरी

 

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षातर्फे आयोजित एका कॅम्पस ड्राईव्हसाठी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी. (फाईल फोटो)

शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षातर्फे आयोजित एका कॅम्पस ड्राईव्हअंतर्गत ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थिनी. (फाईल फोटो)

कोल्हापूर, दि. २७ जून: शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाने गत वर्षभरात प्रभावी कामगिरीची नोंद करीत एकूण ७४ विविध कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविले, त्या माध्यमातून विद्यापीठासह संलग्नित महाविद्यालयांतील ३२०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. त्याच बरोबर ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना नामांकित उद्योग, व्यवसायांमध्ये रोजगार संधीही उपलब्ध करून देण्यात यश प्राप्त केले आहे.

विद्यापीठाच्या मध्यवर्ती रोजगार कक्षाच्या गत वर्षभरातील कामगिरीविषयी जाणून घेण्यासाठी कक्षाचे समन्वयक डॉ. राजन पडवळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही माहिती दिली.

डॉ. पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विद्यापीठ विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनविण्यासाठी मध्यवर्त रोजगार कक्षाच्या माध्यमातून अविरत प्रयत्नशील आहे. विद्यार्थी नोकरीक्षम बनण्यासाठी त्यांच्यात निरनिराळ्या कौशल्यांची वृद्धी करणे आवश्यक असते, हे लक्षात घेऊन कक्षाने त्यांना प्रशिक्षणासाठी वर्षभराचे वेळापत्रक आखले. त्यानुसार पूर्ण वर्षभरात एकूण ७४ प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले आणि त्या माध्यमातून ३२०० विद्यार्थ्यांना प्रशिक्षित केले. या प्रशिक्षणामध्ये रिझ्युमे लिहिणे, मुलाखतीचे तंत्र, कॉर्पोरेट कल्चर अशा अनेकविध बाबींचा समावेश होता. त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे मॉक इंटरव्ह्यू घेऊन त्यांच्या मनातील मुलाखतीविषयी असणारी भीती नष्ट केली. परिणामी, सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षात शिवाजी विद्यापीठातील ४५० हून अधिक विद्यार्थ्यांना विविध नामांकित कंपन्यांत रोजगार संधी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये इन्फोसिस, अॅक्सिस बँक, एन.पी.सी.आय., अदानी समूह, अमूल इंडिया, गद्रे मरिन एक्स्पोर्ट्स, टॅको इत्यादी प्रथितयश कंपन्यांचा समावेश आहे. मध्यवर्ती रोजगार कक्षाने आतापर्यंत १२५ विविध नामवंत कंपन्यांना आमंत्रित करून कॅम्पस रिक्रुटमेंट ड्राईव्हचे आयोजन केले आहे. यातील काही कंपन्या पुनश्च: रिक्रुटमेंट ड्राईव्ह घेण्यास उत्सुक आहेत.

शिवाजी विद्यापीठ आपल्या परिक्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून त्यांना विविध कौशल्याधारित प्रशिक्षणांमधून रोजगारक्षम बनवले जावे, यासाठी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह सर्वच अधिकारी आणि अधिकार मंडळे यांच्या सहकार्याने आवश्यक ते उपक्रम वर्षभर नियमितपणे राबविले जातात. त्यामुळे देशातील आघाडीच्या कंपन्या रिक्रूटमेंट ड्राईव्हसाठी येत आहेत, ही आनंदाची बाब असल्याची प्रतिक्रियाही डॉ. पडवळ यांनी व्यक्त केली.

Thursday, 26 June 2025

शाहू महाराजांच्या हृदयात दीनदलितांसाठी करुणेचा झरा: डॉ. जयसिंगराव पवार

असे होते आपले शाहू महाराज या चरित्रग्रंथाच्या मराठीसह पाच भाषांतील आवृत्ती प्रकाशित

शिवाजी विद्यापीठात डॉ. नंदकुमार मोरे लिखित 'असे होते आपले शाहू महाराज' या चरित्रग्रंथाचे प्रकाशन करताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. मंचावर (डावीकडून) चित्रकार अन्वर हुसेन, हिंदी अनुवादक डॉ. गोरख थोरात, डॉ. अवनीश पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, डॉ. पवार, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

शिवाजी विद्यापीठात डॉ. नंदकुमार मोरे लिखित 'असे होते आपले शाहू महाराज' या चरित्रग्रंथाच्या प्रकाशन समारंभात बोलताना ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार. मंचावर (डावीकडून) डॉ. अवनीश पाटील, डॉ. नंदकुमार मोरे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व कुलसचिव डॉ. विलास शिंदे.


(शाहू जयंती व प्रकाशन समारंभाची लघुचित्रफीत)




कोल्हापूर, दि. २६ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या हृदयात दीनदलितांसाठी बुद्धाप्रमाणे करुणेचा झरा आणि आईप्रमाणे ममत्वभाव ओसंडून वाहात होता. डॉ. नंदकुमार मोरे यांच्या चरित्रग्रंथाच्या माध्यमातून या करुणासागराच्या संस्कारकथा बालकुमारांपर्यंत पोहोचणार आहेत, याचा मोठा आनंद वाटतो, असे उद्गार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी आज येथे काढले.

विद्यापीठाच्या मराठी अधिविभागाचे प्रमुख डॉ. नंदकुमार मोरे यांनी लिहीलेल्या असे होते आपले शाहू महाराज या चरित्रग्रंथासह त्याच्या इंग्रजी, हिंदी, कन्नड आणि गुजराती अनुवाद ग्रंथांचेही आज राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त डॉ. पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते, तर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील प्रमुख उपस्थित होते. इतिहास अधिविभागाच्या वतीने कार्यक्रमाचे संयोजन करण्यात आले.

एकाच वेळी एकाच पुस्तकाच्या मराठीसह पाच भाषांतील अनुवाद प्रकाशित होण्याची विद्यापीठाच्या इतिहासातील पहिलीच वेळ असल्याचे सांगून डॉ. जयसिंगराव पवार म्हणाले, असे होते आपले शाहू महाराज हे पुस्तक शिवाजी विद्यापीठामार्फत बालकुमारांसाठी प्रकाशित होणे ही अभिनव घटना आहे. डॉ. मोरे यांनी बालकुमार वयोगटातील मुलांचे मानसशास्त्र आणि आकलनक्षमता उमजून घेऊन लिहीलेले हे चरित्र आहे. अत्यंत सुबोध, रसाळ आणि साहित्यिक मूल्य व दृष्टी असणारे असे हे चरित्र झाले आहे. शाहू महाराजांच्या संस्कारकथा मुलांच्या मनावर बिंबविण्याच्या कामी ते मोलाची भूमिका बजावेल, अशी खात्री वाटते.

डॉ. पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचताना दरवेळी वेगळा ध्वनी, वेगळा अन्वयार्थ आढळतो. शाहूचरित्राच्या बाबतीतही तसेच होते. दरवेळी शाहू महाराज नव्याने सामोरे येतात, गवसत जातात. प्रजेबद्दल अपार करुणा आणि माया हे लोककल्याणकारी राजाचे लक्षण असते. हे लक्षण या दोन्ही राजांमध्ये समान होते. शाहू महाराज हे त्यांना भेटणाऱ्या प्रत्येक घटकाची सातत्याने चिंता वाहात असत. मुलांबद्दल त्यांना विशेष ममत्व होते. त्यांच्यातील गुणवत्तेचा ते सतत शोध घेत. भाई माधवराव बागल यांच्यापासून अनेक मुलांमधील सुप्त गुण हेरून त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम महाराजांनी केले. पुढे विविध क्षेत्रांमध्ये या गुणवंतांनी आपली चमक दाखवून महाराजांचा विश्वास सार्थ केला.

लेखक डॉ. नंदकुमार मोरे म्हणाले, शाहू महाराजांच्या या चरित्रग्रंथावर काम करीत असताना त्यांचे अनेक पैलू सामोरे आले. बुद्धापासून ते कबीर, तुकाराम, महात्मा गांधी, विनोबा भावे या साऱ्यांची आठवण झाली. एक तत्त्वचिंतक म्हणून राजर्षी शाहू महाराज सामोरे आलेच, पण त्याचबरोबर आईचे हृदय असणारा ममताळू माणूस म्हणूनही ते भावले. विशाल जीवनदृष्टी असणारे त्यांचे व्यक्तीत्व होते. बुद्धाने ज्याप्रमाणे जगातील दुःख दूर करण्यासाठी चिंतन आणि प्रयत्न केले, त्याचप्रमाणे वंचित, शोषित, बहुजन, दलित, स्त्रिया, मुले इत्यादी सर्वच घटकांचे दुःख, दैन्य दूर करण्यासाठी शाहू महाराज प्रयत्नशील राहिले. करुणा, दया, वात्सल्य, कर्तव्यबुद्धी यांच्या बरोबरीनेच निर्भयता आणि समन्यायी दृष्टी ही त्यांच्या व्यक्तीमत्त्वाची अविभाज्य अंगे होती. त्यामुळेच ते अन्य राजांपेक्षा वेगळे उठून दिसतात. शाहू महाराजांचे चरित्र लिहीण्याची संकल्पना मांडून ती पूर्णत्वास नेण्यासाठी सातत्याने प्रोत्साहित केल्याबद्दल कुलगुरू डॉ. शिर्के यांच्याप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शाहू महाराजांचा हा चरित्रग्रंथ म्हणजे मराठी साहित्य, इतिहास आणि कला यांचा त्रिवेणी संगम आहे. शिक्षणाच्या प्रथामिक पायरीपासून उच्चशिक्षणापर्यंत सर्वच स्तरांसाठी विद्यापीठांनी सहसंबंध प्रस्थापित केले पाहिजेत, ते दृढ करीत राहिले पाहिजेत, याचे अधोरेखन करणारा हा प्रकल्प ठरला आहे. बालकुमार घटकांमध्ये मूल्यशिक्षण रुजविणारे हे पुस्तक आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

यावेळी पुस्तकाच्या हिंदी आवृत्तीचे अनुवादक डॉ. गोरख थोरात, चित्रकार अन्वर हुसेन यांनी या प्रकल्पाचे काम करीत असताना आपण संपूर्णपणे शाहूमय होऊन गेल्याची भावना व्यक्त केली. इतिहास अधिविभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील यांनी कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रांजली क्षीरसागर यांनी सूत्रसंचालन केले, तर कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

कार्यक्रमास परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, डॉ. राजन गवस, डॉ. अरुण भोसले, डॉ. भारती पाटील, डॉ. वसुंधरा पवार, डॉ. मंजुश्री पवार, डॉ. भारत जाधव, डॉ. नीलांबरी जगताप, डॉ. शरद गायकवाड, डॉ. अनिल गवळी, डॉ. गोमटेश्वर पाटील, किरण गुरव, डॉ. जी.पी. माळी, डॉ. अरुण शिंदे यांच्यासह विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडलांचे सदस्य, अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्राचार्य कणबरकर यांच्या पुस्तकाच्या अनुवादग्रंथाचेही प्रकाशन



शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य रा.कृ. कणबरकर यांचे ग्लिम्प्सेस ऑफ राजर्षी शाहू महाराज हे इंग्रजी पुस्तक शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केले आहे. या पुस्तकाचा मराठी अनुवाद डॉ. धनंजय देवळालकर यांनी केला. त्यांच्या या शाहू महाराजांचे दर्शन या अनुवादग्रंथाचे प्रकाशनही आज डॉ. जयसिंगराव पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रकाशनादिवशीच पुस्तकाच्या हजार प्रतींची विक्री

असे होते आपले शाहू महाराज या ग्रंथाच्या सुमारे एक हजार प्रतींची आज प्रकाशनाच्या दिवशीच विक्री झाली. विद्यापीठाने या पहिल्या आवृत्तीची किंमत प्रत्येक समाजघटकाला परवडेल अशी म्हणजे अवघी ५० रुपये इतकी ठेवली आहे. त्यामुळे शाहू जयंतीचे औचित्य साधून आज दिवसभरात अनेक शाहूप्रेमींनी या पुस्तकाची खरेदी केली. अनेकांनी भेट देण्यासाठीही एकाहून अधिक प्रती खरेदी केल्या.

शाहू महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन


राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिवाजी विद्यापीठात आज सकाळी त्यांच्या प्रतिमेस कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, वसुंधरा पवार यांच्यासह कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी जाधव, अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, डॉ. महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले, क्रीडा संचालक डॉ. शरद बनसोडे, आजीवन अध्ययन केंद्र संचालक डॉ. रामचंद्र पवार, तंत्रज्ञान अधिविभाग संचालक डॉ. अजित कोळेकर यांच्यासह विविध अधिविभागांचे प्रमुख, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी व सेवक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी प्रांजली क्षीरसागर यांनी छत्रपती शाहू महाराज यांनी काढलेल्या सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाच्या जाहीरनाम्याचे वाचन केले.



Wednesday, 25 June 2025

शाहू महाराजांप्रती बहुजन समाजाने कृतज्ञ असावे: इंद्रजीत सावंत

शिवाजी विद्यापीठात छत्रपती शाहू जयंतीनिमित्त विशेष व्याख्यान

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंतीनिमित्त 'वदले शाहू छत्रपती' या विषयावर बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत. मंचावर (डावीकडून) शुभम शिरहट्टी, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, खासदार शाहू छत्रपती, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, डॉ. तानाजी चौगुले.

शिवाजी विद्यापीठात राजर्षी शाहू जयंतीनिमित्त 'वदले शाहू छत्रपती' या विषयावर बोलताना इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत. 

(श्री. इंद्रजीत सावंत यांच्या व्याख्यान कार्यक्रमाचा व्हिडिओ)


कोल्हापूर, दि. २५ जून: राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारकार्यामुळेच या देशातील दलित, बहुजनांच्या अस्तित्वाला अर्थ प्राप्त झाला आहे. त्याबद्दल आपण त्यांच्याप्रती कृतज्ञ असायला हवे, असे प्रतिपादन इतिहासाचे गाढे अभ्यासक, संशोधक इंद्रजीत सावंत यांनी आज येथे केले.

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५१ जयंतीच्या पूर्वदिनास शिवाजी विद्यापीठ आणि शाहू सेना यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात समता परिषदेअंतर्गत श्री. सावंत यांचे वदले शाहू छत्रपती या विषयावर व्याख्यान झाले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास खासदार श्रीमंत शाहू छत्रपती प्रमुख उपस्थित होते, तर अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के होते. मंचावर प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, कुलसचिव डॉ. विलास शिंदे होते.

श्री. सावंत यांनी शाहू महाराज यांची भाषणे आणि पत्रव्यवहार यांमधून प्रतीत होणारी त्यांची नीती, सामाजिक कार्य यांवर सविस्तर प्रकाशझोत टाकला. ते म्हणाले, छत्रपती शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे सच्चे वारसदार होते. या दोघांच्या जीवनकार्यात, उद्दिष्टांत बहुतांश साम्य आहे. आपल्या सैन्यामुळे शेतकरी रयतेच्या भाजीच्या देठालाही धक्का लागता कामा नये, त्याचप्रमाणे मोबदला आदा करूनच लागेल तो शिधा, धान्य रयतेकडून घ्यावा, अशी छत्रपतींची आज्ञापत्रे आहेत. त्याचप्रमाणे शाहू महाराजांनी सुद्धा आपल्या पहिल्या जाहीरनाम्यातच रयतेकडून सामग्रीचा पुरवठा होत असताना त्याचा मोबदला पुरवठादारास जागेवरच आदा करण्याच्या अनुषंगाने विविध नियम घालून दिल्याचे दिसते. यामुळे शिवछत्रपतींच्या आज्ञापत्रांची आठवण झाल्याखेरीज राहात नाही. विस्मरणात गेलेल्या शिवराज्याभिषेक शकाचे पुनरुज्जीवन करण्याचे महत्त्वाचे कार्यही त्यांनी केले. महाराजांना शेतकरी, मजूर अशा कष्टकरी जनतेविषयी ममत्वभाव होता. आपल्या हाडीमासी शिपाईगडी आणि शेतकऱ्याचे रक्त भिनले असल्याचे ते म्हणत. आपल्या माणुसकीच्या हक्कांसाठी आरंभलेल्या सामाजिक लढाईची तुलना त्यांनी त्या काळी झालेल्या पहिल्या महायुद्धाशी केली आहे. जातिद्वेष हा या समाजाला ग्रासलेला जुनाट रोग असून जातीभेद नष्ट करून धार्मिक, सामाजिक समता प्रस्थापनेसाठी ते आग्रही होते. महाराष्ट्रात शिक्षणाचा पाया महात्मा फुले यांनी घातला आणि तो महाराष्ट्रभर विस्तारण्याचे महत्कार्य शाहू महाराजांनी केले. विविध समाजघटकांतील पात्र युवकांच्या सैन्यभरतीसाठी सिमल्यापर्यंत याचिका दाखल करण्यासाठी महाराज गेले, यातून त्यांच्या हृदयातील ओलावाच दिसून येतो. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात महाराजांनी समाजासाठी चांगले काम करणारी माणसे तयार केली, हे त्यांचे मोठे योगदान आहे.

शिवाजी विद्यापीठाने शाहू महाराजांविषयी दस्तावेजीकरणात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे सांगताना श्री. सावंत म्हणाले, शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांनी शाहू महाराजांशी संबंधित दस्तावेजांचे मोठ्या प्रमाणात संकलन केले. त्यांच्या नंतर डॉ. विलास संगवे यांनीही त्यामध्ये कळीची भूमिका बजावली आणि महाराजांशी निगडित कागदपत्रांचे दहा खंड निर्माण केले. डॉ. आण्णासाहेब लठ्ठे यांनी लिहीलेले शाहू महाराजांच्या पहिल्या चरित्राचे डॉ. जयसिंगराव पवार यांनी संपादन केले, तेही शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केले. शिवाजी विद्यापीठामुळे शाहू महाराजांचा इतिहास खऱ्या अर्थाने लोकांसमोर आला, असे कौतुकोद्गार त्यांनी काढले.

अध्यक्षीय मनोगतात कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के म्हणाले, शाहू महाराजांनी शैक्षणिक क्षेत्रासाठी केलेले कार्य खूप मोठे आहे. पी.सी. पाटील यांच्यापासून ते कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यापर्यंत महाराष्ट्र घडविणारी आणि सर्वदूर प्रभाव टाकणारी मंडळी त्यांनी तयार केली. दुःखाच्या मुळापर्यंत जाण्याची महाराजांची वृत्ती होती. समाजातील दुःख, दैन्य शोधून ते कमी करण्याबरोबरच त्यावर जालीम औषध योजना करण्याचे कसबही त्यांच्याकडे होते. त्यामुळे ते लोकराजा आणि माणूस म्हणूनही मोठे ठरले.

कार्यक्रमात सुरवातीला खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते रोपास पाणी घालून परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. शाहू सेनेचे अध्यक्ष शुभम शिरहट्टी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, तर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. तानाजी चौगुले यांनी आभार मानले.

Tuesday, 24 June 2025

शिवाजी विद्यापीठाकडून बी.ए. भाग-२ साठी इतिहासाची पुस्तके प्रकाशित

दर्जेदार ई-कन्टेन्टही तयार करावा: कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांची अपेक्षा

शिवाजी विद्यापीठात बी.ए. भाग-२ च्या इतिहासाची पुस्तके व स्वयंअध्ययन साहित्याचे प्रकाशन करताना कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के. सोबत कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. चंद्रवदन नाईक, डॉ. महादेव देशमुख, डॉ. अवनीश पाटील, डॉ. सुरेश शिखरे, विभा अंत्रेडी यांच्यासह पुस्तकांचे लेखक व संपादक.

 

कोल्हापूर, दि. २४ जून: शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाने ज्या गतीने क्रमिक पुस्तकांची निर्मिती केली, त्याच पद्धतीने आता दर्जेदार ई-कन्टेन्ट निर्मिती करण्यासाठीही प्रयत्न करावेत, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी आज केले.

शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास अभ्यास मंडळाच्या वतीने बी.ए.- भाग २ साठी तयार करण्यात आलेल्या सहा क्रमिक पुस्तके आणि तीन स्वयंअध्ययन साहित्य पुस्तकांचे आज दुपारी व्यवस्थापन परिषद सभागृहात कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. चंद्रवदन नाईक यांनी केलेल्या आवाहनाला इतिहासाच्या शिक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिल्यामुळेच प्रवेश प्रक्रिया सुरू असतानाच क्रमिक पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे या लेखन प्रक्रियेमध्ये १५ ते २० शिक्षकांचा सहभाग असणे ही सुद्धा महत्त्वाची बाब आहे. विद्यापीठाच्या दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षण केंद्राकडील स्वयंअध्ययन साहित्याचे क्रमिक पुस्तकांमध्ये रुपांतर करण्याचा निर्णय कळीचा ठरला. त्यामुळे विद्यापीठाची अधिकृत पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करता येऊ शकत आहेत. इतर अभ्यास मंडळांनीही आपापली क्रमिक पुस्तकांची कामे सत्वर मार्गी लावावीत. त्याचप्रमाणे इतिहासाच्या शिक्षकांनी आता व्यापक ज्ञाननिर्मितीसाठी दर्जेदार ई-कन्टेन्ट निर्माण करण्याच्या दिशेनेही पावले टाकावीत.

या प्रकाशन समारंभाला कुलसचिव डॉ. विलास शिंदे, मानव्यविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, इतिहास अभ्यास मंडलाचे अध्यक्ष डॉ. चंद्रवदन नाईक, इतिहास अधिविभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील, दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील, अभ्यास मंडळे विभागाच्या प्रभारी उपकुलसचिव विभा अंत्रेडी, डॉ. कविता गगराणी, दीपक काशीद, विनय शिंदे, उमेश भोसले, दिलीप मोहाडीकर, डॉ. नितीन रणदिवे, डॉ. मुफीद मुजावर, डॉ. चांगदंव बंडगर, योगेश पवार यांच्यासह पुस्तकांचे लेखक व संपादक उपस्थित होते.

आज प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांमध्ये बी.ए. भाग-२ च्या सत्र ३ व ४ साठीच्या पुढील पुस्तकांचा समावेश आहे. कंसात लेखकांची नावे दिली आहेत.

१. अतुल्य भारत (डॉ. धीरज शिंदे, डॉ. स्वाती सरोदे) २. मराठा लोककला (डॉ. सुरेश शिखरे) ३. आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती (डॉ. तानाजी हवलदार, डॉ. रणजीत माने, डॉ. स्वाती सरोदे) ४. पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा (डॉ. मधुकर विठोबा जाधव, डॉ. रामचंद्र घुले) ५. आधुनिक भारताचा इतिहास (डॉ. आरती नाडगौडा, डॉ. अजितकुमार जाधव, डॉ. संदीप जाधव, डॉ. सुरेश शिखरे) ६. वस्तुसंग्रहालयाची ओळख (डॉ. सुरेश शिखरे). या पुस्तकांचे संपादनाचे कार्य डॉ. चंद्रवदन नाईक यांनी पाहिले आहे.

दूरशिक्षण आणि ऑनलाईन शिक्षक केंद्राच्याही मराठा लोककला, आधुनिक भारताचा इतिहास तसेच आधुनिक महाराष्ट्राची निर्मिती आणि आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास या तीन स्वयंअध्ययन साहित्य पुस्तकांची निर्मिती करण्यात आली आहे. या साहित्याचे डॉ. चंद्रवदन नाईक यांच्यासह डॉ. सुरेश शिखरे, डॉ. सुरेश चव्हाण आणि डॉ. तानाजी हवलदार यांनी संपादन केले आहे.