Tuesday, 30 August 2022

विद्यापीठाच्या परीक्षांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर

कडक कारवाईचे पोलीस अधीक्षकांचे निर्देश

 

कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांना निवेदन सादर करताना शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव व उपकुलसचिव निवास माने.


कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षांबाबत समाजमाध्यमांद्वारे चुकीची माहिती तसेच अफवा पसरविणाऱ्या प्रवृत्तींविरोधात कडक कारवाई करण्याचे निर्देश कोल्हापूरचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे यांनी आज येथे दिले.

शिवाजी विद्यापीठाच्या सध्या सुरू असलेल्या परीक्षेच्या अनुषंगाने काही अज्ञात समाजकंटकांनी शिवाजी विद्यापीठाच्या वेबसाईटवरील परिपत्रकात फेरफार करून दि. २३ ऑगस्ट रोजीचा एम.एस्सी.चा फिजिकल केमिस्ट्रीचा पेपर रद्द केल्याचे समाजमाध्यमांद्वारे व्हायरल केले. तसेच, एका वृत्तपत्रातील बातमीही अशाच प्रकारे फेरफार करून समाजमाध्यमांतून व्हायरल केली. यामुळे परीक्षार्थींसह महाविद्यालये, प्राचार्य आदी घटकांत मोठा संभ्रम निर्माण झाला. तो दूर करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाला ऐन परीक्षेच्या कालखंडात मोठी धावपळ करावी लागली. शिवाजी विद्यापीठासारख्या नामांकित शैक्षणिक संस्थेच्या परीक्षाविषयक गंभीर, गोपनीय आणि अतिमहत्त्वाच्या कामाविषयी समाजात चुकीचा संदेश जाण्याबरोबरच विद्यापीठाचे बोधचिन्ह आणि लेडरहेड यांचाही गैरवापर केल्याचे आढळून आले. सदर प्रकरणी पोलीस प्रशासनाने अद्ययावत सायबर सेलमार्फत चौकशी करून समाजातील या विकृत मनोवृत्तीला आळा घालण्याच्या उद्देशाने दोषी व्यक्तींना शोधून काढून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन आज शिवाजी विद्यापीठाच्या वतीने परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. बलकवडे यांना आज प्रत्यक्ष भेटून दिले. त्यांच्यासमवेत परीक्षा विभागाचे उपकुलसचिव निवास माने होते.

शैक्षणिक क्षेत्रासह शिवाजी विद्यापीठाच्या लौकिकाला बाधा आणणाऱ्या या गंभीर प्रकाराची पोलीस प्रशासनामार्फत सखोल चौकशी करण्यात येईल आणि अशा समाजविघातक प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही डॉ. बलकवडे यांनी दिली. संबंधितांना या संदर्भातील कारवाई तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

 

माहितीची शहानिशा करण्याचे परीक्षा संचालकांचे आवाहन

विद्यार्थी तसेच सर्व संबंधित घटकांनीही अशा समाजमाध्यमांद्वारे व्हायरल होणाऱ्या बाबींवर पटकन विश्वास न ठेवता आपापले महाविद्यालय तसेच विद्यापीठ प्रशासन यांच्याशी संपर्क साधून त्याची शहानिशा करावी. असे प्रकार होत असल्याचे आढळून आल्यास ते व्हायरल करण्याऐवजी ते तातडीने प्रशासनाच्या निदर्शनास आणावे, म्हणजे अफवा पसरण्यास आपला हातभार लागणार नाही. तसेच संबंधित गैरप्रकारांना आपोआपच आळाही घातला जाईल, असे आवाहन या पार्श्वभूमीवर परीक्षा संचालक डॉ. जाधव यांनी केले आहे.

अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाचे भूमिपूजन

मारुलकर दांपत्याच्या दातृत्वाच्या अनुषंगाने

शिवाजी विद्यापीठाकडून १५ दिवसांत कार्यवाही

 

अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ उभारावयाच्या संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाचे कोनशिला अनावरण देणगीदार रजनी व पंडित मारुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत विद्यापीठाचे अधिकारी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, वसतिगृह अधीक्षक आदी.

अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ उभारावयाच्या संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाच्या भूमीपूजन प्रसंगी पहिली कुदळ मारुन बांधकामास प्रारंभ करताना पंडित मारुलकर. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत विद्यापीठाचे अधिकारी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, वसतिगृह अधीक्षक आदी.

अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ उभारावयाच्या संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाच्या भूमीपूजन प्रसंगी रजनी व पंडित मारुलकर यांच्यासमवेत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्यासमवेत विद्यापीठाचे अधिकारी, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, वसतिगृह अधीक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थिनी.



कोल्हापूर, दि. ३० ऑगस्ट: आपल्या विकलांग मुलीच्या भवितव्यासाठी कष्टाचा पै न् पै साठवून ३५ लाख रुपयांची बचत तिच्या अकाली निधनानंतर शिवाजी विद्यापीठाकडे सुपूर्द करणाऱ्या मारुलकर दांपत्याच्या दातृत्वाचा सन्मान करीत अवघ्या १५ दिवसांत शिवाजी विद्यापीठाने या दांपत्याच्याच हस्ते अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ उभारावयाच्या शिवाजी विद्यापीठ हीरकमहोत्सवी संशोधक विद्यार्थिनींसाठीच्या वसतिगृहाचे आज भूमिपूजन केले. विशेष म्हणजे पंडित मारुलकर आणि रजनी मारुलकर या दांपत्याच्याच हस्ते हे भूमिपूजन करून या इमारतीच्या बांधकामास प्रारंभ करण्यात आला.

अस्मिता मारुलकर या आपल्या विकलांग मुलीच्या भवितव्याची तरतूद म्हणून रजनी व पंडित मारुलकर या दांपत्याने सुमारे ३५ लाख रुपयांची बचत केलेली होती. तथापि, तिच्या अकाली निधनानंतर अस्मिताचाच अधिकार असलेला हा निधी स्वतःसाठी न वापरता समाजासाठी वापरण्याचा निर्णय या ज्येष्ठ दांपत्याने घेतला आणि शिवाजी विद्यापीठाकडे गेल्या १५ ऑगस्ट रोजी ३५ लाखांचा हा निधी सुपूर्द केला. कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी या निधीमधून संशोधक विद्यार्थिनींसाठी वसतिगृह उभे करेल आणि त्याच्या कोनशिलेवर अस्मिता मारुलकर यांच्या स्मरणार्थ असा उल्लेख केला जाईल, याची ग्वाही दिली.

यानंतर आज अवघ्या १५ दिवसांत कमवा व शिका विद्यार्थिनी वसतिगृहाशेजारीच या संशोधक विद्यार्थिनी वसतिगृहाचे भूमिपूजन करण्यात आले. मारुलकर दांपत्याच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आले. भूमीपूजनासाठीची पहिली कुदळ मारण्याचा मानही पंडित मारुलकर यांना देण्यात आला. मारुलकर दांपत्यांनी खास या प्रसंगासाठी भूमीला अर्पण करण्यासाठी स्वतःच्या बागेतील फुले आणली होती. तीही या प्रसंगी वाहण्यात आली. त्यांच्यानंतर कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांनी भूमीपूजन केले. यावेळी प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले यांच्यासह व्यवस्थापन परिषदेच्या सर्व सदस्यांनीही भूमीपूजन कार्यक्रमात सहभाग घेतला.

यावेळी कुलगुरू डॉ. शिर्के यांनी या निधीबद्दल मारुलकर दांपत्याचे पुनश्च एकदा आभार मानले. त्याचप्रमाणे, सदर वसतिगृहाचे काम गतीने सुरू होण्यासाठी व्यवस्थापन परिषदेचा सकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत असल्याचे सांगितले. हे काम पूर्ण करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न राहील, याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. श्री. मारुलकर यांनीही सद्गदित अंतःकरणाने विद्यापीठ प्रशासनाला मनःपूर्वक धन्यवाद दिले.

Friday, 26 August 2022

शिवाजी विद्यापीठाच्या वस्तुसंग्रहालय संकुलाचे लोकार्पण

शाहूकालीन वैभवशाली वारशाचा बाबा कल्याणी यांच्याकडून गौरव

 

शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलाचे कोनशिला अनावरणाने उद्घाटन करताना ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व अन्य मान्यवर. 

शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलामध्ये फीत कापून प्रवेश करताना ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व अन्य मान्यवर.

शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलामधील राजर्षी शाहू लोकजीवन कला दालनाचे उद्घाटन करताना ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व अन्य मान्यवर.

शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलामधील राजर्षी शाहू लोकजीवन कला दालनाची पाहणी करताना ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील. सोबत कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील व अन्य मान्यवर. माहिती देताना डॉ. भारती पाटील व डॉ. नीलांबरी जगताप.


कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाने वस्तुसंग्रहालय संकुलाच्या उभारणीतून एका उत्तम कार्याची सुरवात केली आहे. त्याद्वारे कोल्हापूरच्या शाहूकालीन वैभवशाली ऐतिहासिक वारसा लोकांना कायमस्वरुपी पाहण्यास खुला झाला आहे, असे गौरवोद्गार भारत फोर्ज उद्योगसमूहाचे चेअरमन तथा शिवाजी विद्यापीठाच्या सल्लागार मंडळाचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योगपती बाबा कल्याणी यांनी आज येथे काढले.

शिवाजी विद्यापीठ वस्तुसंग्रहालय संकुलाचे लोकार्पण आज श्री. कल्याणी यांच्या हस्ते आणि राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यावेळी ते बोलत होते. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यावेळी प्रमुख उपस्थित होते.

श्री. कल्याणी यांनी आपल्या भाषणात एका वैयक्तिक हृदयस्पर्शी प्रसंगाचे वर्णन केले. ते म्हणाले, कोल्हापूरशी माझ्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे नाते जडल्याचा हा महत्त्वाचा प्रसंग आहे. शंतनुराव किर्लोस्कर यांच्या सल्ल्याने १९६५मध्ये माझ्या वडिलांनी भारत फोर्जची स्थापना करण्याचे ठरविले. मात्र, निधीची अडचण होती. शंतनुरावांच्या पत्नी या कोल्हापूरच्या. त्यांनी कोल्हापूरच्या महाराजांना भेटण्यास सुचविले. त्यावेळी कोल्हापूर संस्थानच्या भागीदारीतून भारत फोर्जची सुरवात झाली, याची कृतज्ञ जाणीव आजही माझ्या मनी आहे. त्यामुळे या वास्तूचे आणि येथील राजर्षी शाहू दालनाचे लोकार्पण करण्याचे भाग्य मला लाभले, याचा मोठा आनंद आहे. विद्यापीठाने या संग्रहालयाच्या उभारणीसाठी घेतलेल्या परिश्रमाचेही कल्याणी यांनी कौतुक केले.

विद्यापीठाचा ४० कोटींचा निधी लवकरच: मंत्री चंद्रकांतदादा पाटील

शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त राज्य शासनाने ५० कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली होती. त्यापैकी १० कोटी रुपये प्रदान करण्यात आले. आता उच्च व तंत्रशिक्षण विभाग माझ्याकडे आला असल्यामुळे हा उर्वरित ४० कोटी रुपयांचा निधी लवकरात लवकर प्रदान करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी दिली.

विद्यापीठाने येथून पुढल्या काळात या वस्तुसंग्रहालयाचा विस्तार होत राहावा, यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले. त्याचप्रमाणे स्थानिक महापुराच्या समस्येवर कायमस्वरुपी तोडग काढण्यासाठी विद्यापीठाने या विषयावरील शोधनिबंधांची एक स्वतंत्र स्पर्धाच आयोजित करावी, असे आवाहनही मंत्री पाटील यांनी यावेळी केले.

या कार्यक्रमाच्या सुरवातीला श्री. कल्याणी आणि मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते कोनशिलेचे अनावरण करून तसेच फीत कापून वस्तुसंग्रहालय संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते राजर्षी शाहू लोकजीवन कलादालनाचे उद्घाटन करण्यात आले. सर्वांनी फिरून दालनाची पाहणी केली आणि प्रशंसा केली.

यावेळी मंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.आर. पाटील, वास्तुविशारद विजय गजबर आणि कंत्राटदार अनिकेत जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के यांनी प्रास्ताविक केले. सुस्मिता खुटाळे यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी आभार मानले.

यावेळी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले,  वस्तुसंग्रहालय संकुल समितीच्या अध्यक्ष डॉ. भारती पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. श्रीकृष्ण महाजन, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार, मानव्यशास्त्र विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. महादेव देशमुख, आंतरविद्या विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. मेघा गुळवणी, डॉ. नीलांबरी जगताप, यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, शिक्षक, अधिकारी व कर्मचारी, विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राजर्षी शाहू लोकजीवन कलादालनात...

या कलादालनामध्ये शाहूकालीन लोकजीवनाचे प्रतिबिंब पाहावयास मिळते. राजर्षींच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकणारी छायाचित्रे, माहिती यांसह तत्कालीन घरगुती वापराच्या वस्तू, चामडी वस्तू, कोल्हापुरी चपला, शस्त्रास्त्रे, सोन्या-चांदीचे दागदागिने, संगीतवाद्ये, मातीची व धातूची भांडी, खेळणी इत्यादी बाबी पाहता येतात. त्याखेरीज संग्रहालयात अन्य दालने उभारण्याचाही मानस असल्याचे डॉ. भारती पाटील व डॉ. नीलांबरी जगताप यांनी यावेळी सांगितले.

पर्यावरणपूरक ‘बीज’गणेशमूर्ती कार्यशाळेत ७५ विद्यार्थ्यांचा सहभाग

 

शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण अधिविभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मूर्तीकार गौरव काईंगडे.


शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण अधिविभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थी.


शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण अधिविभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत मूर्ती बनविण्यात तल्लीन झालेला विद्यार्थी.

शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण अधिविभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत मूर्ती बनविल्यानंतर सहभागी विद्यार्थ्याच्या चेहऱ्यावर असा आनंद झळकला.

शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण अधिविभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी बनविलेली मूर्ती.

शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण अधिविभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत सहभागी विद्यार्थ्यांनी बनविलेली मूर्ती.


शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरण अधिविभागाच्या वतीने आयोजित पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत बनविलेल्या मूर्तीसमवेत अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार आणि डॉ. आसावरी जाधव.

शिवाजी विद्यापीठाच्या उपक्रमाचे स्वागत

कोल्हापूर, दि. २६ ऑगस्ट: सध्या सर्वत्र गणेशोत्सवाच्या तयारीचे वातावरण आहे. त्यातही गणेशमूर्तींच्या निर्मितीचे कामही वेगात सुरू आहे. हीच गणेशमूर्ती स्वतःच्या हातांनी बनविलेली असेल आणि त्यातही ती जर पर्यावरणपूरक आणि संवर्धक असेल, तर त्याची मजा काही आगळीच असेल. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन शिवाजी विद्यापीठात काल (दि. २५) पर्यावरणपूरक बीजगणेशमूर्ती बनविण्याची विशेष कार्यशाळा आयोजित केली. तिला तरुणांसह शालेय विद्यार्थ्यांचाही मोठा प्रतिसाद लाभला. ७५ जण त्यात सहभागी झाले.

शिवाजी विद्यापीठाचा पर्यावरणशास्त्र अधिविभाग गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याच्या अनुषंगाने जनजागृती व उपक्रम आयोजित करते. गणेशोत्सव काळात ध्वनी, जल व वायू प्रदूषणाच्या बाबतीत जनजागृतीबरोबरच मूर्तीदान, विसर्जनासाठी कृत्रिम तलावनिर्मिती, निर्माल्यकुंड, स्वच्छता, प्रदूषण पातळीची मोजणी असे उपक्रम विभाग घेते. त्यामध्येच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा हाही एक महत्त्वाचा उपक्रम आहे. दरवर्षी या उपक्रमाला वाढता प्रतिसाद लाभतो आहे, हे या उपक्रमाचे यश आहे. यंदाही या बीजगणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळेत विविध अधिविभागांतील ५० विद्यार्थ्यांसह २५ शालेय विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. टेराकोटा मूर्तीकार गौरव काईंगडे यांनी या कार्यशाळेत सहभागींना मार्गदर्शन केले.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या किंवा रासायनिक रंगांच्या मूर्तीमुळे मोठ्या प्रमाणात निसर्गाचे प्रदूषण होते. ते टाळण्यासाठी शाडूच्या मूर्ती स्वतःच्या हातांनी बनवायच्या. ही शाडूची गणेश मूर्ती वाळल्यानंतर त्यात विविध फुलझाडांच्या बिया खोवल्या जातात. ही मूर्ती घरी प्रतिष्ठापित केली जाते. विसर्जनावेळी तिचे घरीच एखाद्या कुंडीमध्ये विसर्जन करून त्यावर पाणी घातले की, पुन्हा या मूर्तीची माती बनते आणि त्यात खोवलेल्या बिया कुंडीत रुजतात. त्यांचे रुपांतर आकर्षक फुलझाडात होते आणि ही फुले पुन्हा आपल्याला आनंद देत राहतात. या संकल्पनेतून निसर्गाच्या घटकांपासून तयार केलेली गणेश मूर्ती पुन्हा निसर्गात कोणत्याही हानीविना विसर्जित करणे आणि ती परत करताना त्यातून पुन्हा निसर्ग फुलविणे, हे या कृतीतून साध्य होते.

या कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेच्या प्रभारी अधिष्ठाता डॉ. सरिता ठकार यांच्या हस्ते झाले. मात्र, केवळ उद्घाटन करूनच न थांबता त्यांनीही या मूर्ती निर्मितीचा आनंद घेतला. अधिविभागाच्या प्रमुख डॉ. आसावरी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. पल्लवी भोसले यांनी या कार्यशाळेचे संयोजन केले. अनिरुद्ध व प्रांजली या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले.

Wednesday, 24 August 2022

स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजीचे

आठ विद्यार्थी करणार परदेशांत पीएचडी

 

परदेशांतील विद्यापीठांत पीएचडी करण्यासाठी निवड झालेल्या नॅनोसायन्स व तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करताना शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे. सोबत डॉ. किरणकुमार शर्मा, डॉ. प्रमोद कसबे आदी.

दक्षिण कोरिया आणि जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये निवड

कोल्हापूर, दि. २४ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी येथील सात विद्यार्थ्यांची दक्षिण कोरियामधील तर एकाची जपानमधील प्रतिष्ठित विद्यापीठांमध्ये पीएच.डी.चे संशोधन करण्यासाठी निवड झाली आहे.

शरद सुनील माने (रा. कोळोली, कोल्हापूर) यांची जपानमधील ओसाका विद्यापीठ (जागतिक क्रमवारी ६८) येथे निवड झाली आहे. जिनेश ललितकुमार चौहान (रा. कोल्हापूर) यांची कोरिया विद्यापीठ, सेऊल (जागतिक क्रमवारी ७४), धनंजय दत्तात्रय कुंभार (रा. सुळगांव, बेळगांव) यांची ग्योंगसांग राष्ट्रीय विद्यापीठ, जिंजू (जागतिक क्रमवारी ३०१), ओमकार येल्लोसा पवार (रा. कोल्हापूर) आणि ज्ञानेश्वर हिंदुराव घाटगे (रा. चिंचवाड, कोल्हापूर) यांची जीऑनबुक राष्ट्रीय विद्यापीठ, सेऊल (जागतिक क्रमवारी ५५१), पवन मल्लेशाम कोडम (रा. सोलापूर) यांची चोन्नम राष्ट्रीय विद्यापीठ, योंगबोंग (जागतिक क्रमवारी ७५१), चंद्रशेखर संभाजी पाटील (रा. कुरणी, कोल्हापूर) यांची जेजू राष्ट्रीय विद्यापीठ, जेजू (जागतिक क्रमवारी १००१) आणि योगेश दादासो डांगे (रा. आष्टा, सांगली) यांची गॅचोन विद्यापीठ, सेओंगनाम, दक्षिण कोरिया येथे भरघोस विद्यावेतनासह निवड झाली आहे. या सर्व विद्यार्थ्यांनी बी.एस्सी.- एम.एस्सी. नॅनो सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा पाच वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये पूर्ण केलेला आहे.

शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी अधिविभागाचे प्रभारी संचालक डॉ. किरणकुमार शर्मा सर्व शिक्षकांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.