Sunday, 2 August 2020

अण्णाभाऊ हे रशिया-भारताच्या सांस्कृतिक सौहार्दाचे दूत : डॉ. ग्युजेल स्रिल्कोवा


कोल्हापूर, दि. २ ऑगस्ट: अण्णाभाऊ साठे हे रशियन आणि भारतीय संस्कृती-सौहार्दाचे दूत होते, असे गौरवोद्गार मॉस्को विद्यापीठातील डॉ. ग्युजेल स्रिल्कोवा यांनी काल येथे काढले. शिवाजी विद्यापीठाचे अण्णाभाऊ साठे अध्यासन व विदेशी भाषा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या अण्णाभाऊ साठे: साहित्य आणि विचार या विषयावरील आंतरराष्ट्रीय महाजाल चर्चासत्राच्या उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी सांगता समारोपानिमित्त चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

श्रीमती डॉ. स्रिल्कोवा म्हणाल्या, अण्णाभाऊंच्या लेखनात शेतकरी, कामगारांच्या जीवनसंघर्षाचे चित्रण मोठ्या प्रमाणात आहे. रशियन जीवनात अण्णाभाऊंचे  लेखन  विशेष लोकप्रिय आहे. त्यांचा लेनिनग्राडचा पोवाडा, कथा, कादंबऱ्या अनुवादरूपाने  वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. त्यामुळे अण्णाभाऊंच्या साहित्याने रशिया आणि भारत यांच्यादरम्यान सांस्कृतिक सौहार्दाचे पूल बांधण्याचे काम केले आहे.

चर्चासत्रात नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील डॉ मिलिंद आव्हाड यांनी जात वर्ग अंत लढा आणि अण्णाभाऊंचे लेखन या संबंधी विचार मांडले. डॉ. दिलीप चव्हाण, नांदेड यांनी अण्णाभाऊ साठे व समकालीन सांस्कृतिक पर्यावरण यासंबंधी विचार मांडले. कॉ सुबोध मोरे, मुंबई यांनी अण्णाभाऊ साठे यांचा वैचारिक प्रवास याविषयी मांडणी केली. अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याकडे व वाङ्मयाकडे नव्या दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. सामाजिक परिवर्तन लढ्यासाठी अण्णाभाऊंचे वाङ्मय आजही प्रेरक असल्याची मांडणी सर्वच वक्त्यांनी केली. दि वायर या संकेतस्थळावरून सदर चर्चासत्राचे प्रक्षेपण करण्यात आले. अध्यासनाचे समन्वयक डॉ रणधीर शिंदे यांनी प्रास्ताविक केले, तर डॉ. मेघा पानसरे यांनी चर्चासत्र आयोजनामागील भूमिका मांडली. याप्रसंगी सुभाष ब्रह्मे व सुशील लाड उपस्थित होते.

 


No comments:

Post a Comment