Wednesday 19 August 2020

प्रासंगिक लेख

डॉ. जे. बी. जाधव : आदर्श ग्रंथपाल, उत्तम गुरू

(शिवाजी विद्यापीठाचे माजी ग्रंथपाल डॉ. जे.बी. जाधव यांचे गेल्या ४ ऑगस्ट रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या विद्यार्थिनी व शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्राच्या संचालक डॉ. नमिता खोत यांनी त्यांच्या आठवणी जागवित वाहिलेली शब्दांजली...)

 

डॉ. जे.बी. जाधव


“Google can bring you back 1,00,000 answers; a librarian can bring you back the right one.” - Neil Gaiman (English Author & Novelist)

ऑगस्टमध्ये (१२ ऑगस्ट) ग्रंथालयशास्त्राचे जनक डॉ. एस आर. रंगनाथन यांच्या स्मृतीनिमित्त शासनातर्फे ''ग्रंथपाल दिन'' साजरा केला जातो. या दिवशी ग्रंथालय आणि माहितीशास्त्र या क्षेत्रासाठी ज्यांनी विशेष योगदान दिले, अशा डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्यासह शबाहत हुसेन, डॉ. शां. ग. महाजन, डॉ. जकाती यांची नावे आपसूकच ओठी येतात. या नावांबरोबरच आणखी एक नाव आवर्जून घ्यावे असे वाटते ते म्हणजे डॉ. जिवाजी वसंतराव जाधव. यंदा याच महिन्यात (दि. ४ ऑगस्ट) त्यांचे वृद्धापकाळाने वयाच्या ८५ व्या वर्षी बागलकोट येथे निधन झाले. त्यांनी शिवाजी विद्यापीठात १९६५ ते १९९५ अशी सुमारे ३० वर्षे सेवा बजावली. या क्षेत्रातलेते माझे आदरणीय गुरू आहेत.

डॉ. जे. बी. जाधव हे ग्रंथालय व माहितीशास्त्राच्या क्षेत्रात ''जे. बी. सर'' म्हणूनच परिचित होते. ते मूळचे कर्नाटकातील शिगाव (ता. इंगळगी) इथले. त्यांनी बी.ए, बी.लिब. व एम.ए. या पदव्या धारवाड विद्यापीठातून घेतल्या. त्यानंतर डॉ. कावळेकर सरांच्या मार्गदर्शनाखाली राज्यशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली.

खरे तर १९६५ मध्ये डॉ. जे. बी. जाधव हे डॉ. जकाती सरांबरोबर त्यांना नोकरीवर रूजू करण्यासाठी आले होते. त्यावेळी तेव्हाचे कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार यांना भेटण्यासाठी गेले असता त्यांनी जाधव सरांचीही चौकशी केली आणि आपणही शिवाजी विद्यापीठात का नोकरीसाठी येत नाही, असे विचारले. तेव्हा जाधव सरांच्या खिशात एका नोकरीचे अपॉईटमेंट लेटर होते. तसेच, त्यांच्या मराठी भाषेचाही प्रश्न होताच. परंतु पवार साहेबांनी त्यांना ''इंग्लिश येते ना? मग हरकत नाही.'' असे म्हणून आग्रहाने शिवाजी विद्यापीठात नोकरीसाठी ''चीफ कॅटलॉगर'' पदावर रूजू करून घेतले. अशा रितीने कर्नाटकातील ही दोन्ही व्यक्तीमत्त्वे - डॉ. जकाती व डॉ. जे.बी. जाधव सर विद्यापीठाच्या ग्रंथालयाच्या जडणघडणीकरिता सज्ज झाली. त्यानंतर जाधव सरांनी प्रमोशनवर उप-ग्रंथपाल व डॉ. जकाती यांच्या निधनानंतर प्रमुख ग्रंथपाल म्हणून १९८५ ते १९९५ अशी दीर्घ सेवा बजावली.

सुरवातीला, ही कर्नाटकातील माणसे. यांना मराठी बोलता येत नाही, त्यांचा कसा निभाव लागणार, अशी परिस्थिती होती. परंतु या जोडगोळीने सर्व अडचणींचा सामना करीत विद्यापीठ ग्रंथालयाचा वेलू गगनावरी नेला. जकाती सरांचे अकाली निधन झाले; परंतु त्यांच्यानंतर जे. बी. सरांनी ग्रंथालयाची धुरा उत्तमरित्या सांभाळली. कुलगुरू डॉ. आप्पासाहेब पवार असोत किंवा प्राचार्य के भोगिशयन, डॉ. ए.टी. वरूटे, प्राचार्य आर के कणबरकर, बॅरिस्टर पी जी पाटील, प्रि. बी. एस भणगे, प्रा. के बी पवार, या सर्वच कुलगुरूंसोबत त्यांचे अत्यंत स्नेहाचे संबंध होते. या काळात विद्यापीठ प्रशासनाचे यु.जी.सी.मध्ये काही काम असेल, तर ते डॉ. जे. बी. जाधव सरांना बोलावून सांगितले जायचे. कारण एक तर त्यांचे इंग्रजी अस्खलित होते आणि सर्वांशी गोड बोलून उत्तम काम करवून घेण्याची कला त्यांना साधली होती. सरांचा स्वभाव फारच बोलका असल्याने दिल्लीतील युजीसीमध्येही सर्वांशी त्यांनी स्नेहपूर्ण संबंध निर्माण केले होते. त्यामुळेच विद्यापीठाची कामे ते झटपट करून आणत असत. युजीसीच्या अनुदानातून विद्यापीठ ग्रंथालयाची, स्टडी सेंटरची ''एरोप्लेन बिल्डिंग'' हे त्याचे मूर्तीमंत उदाहरण होय.

 विद्यापीठ ग्रंथालयाला बॅ. बाळासाहेब खर्डेकर हे नाव १९८१ मध्ये तत्कालीन कुलगुरू प्राचार्य आर. के. कणबरकर यांनी दिले. त्यामध्येही डॉ. जे. बी. जाधव यांची महत्त्वाची भूमिका राहिली. विद्यापीठ स्थापना झाल्यानंतर लगोलग सुरू झालेल्या अधिविभागांमध्ये ग्रंथालय व माहितीशास्त्र विभागही होता. डॉ जकाती व डॉ. जाधव सरांमुळेच हे शक्य झाले होते. जाधव सरांनी विभागाच्या विकासाकरिता तेथील विविध पदे मंजूर करून आणणे, एम.लिब. हा सेल्फ-सपोर्टिव्ह अभ्यासक्रम सुरू करणे यासाठी खूपच कष्ट घेतले. त्या बळावरच हा विभाग आजपर्यंतची वाटचाल करू शकला आहे.

जे.बी. सर १९९५ ला सेवानिवृत्त झाले. त्यानंतरही त्यांनी दोन वर्षे कोल्हापूरमधील छत्रपती शाहू इन्स्टिट्यूटमध्ये सल्लागार म्हणून सेवा दिली. तसेच विद्यापीठातील १४ कर्मचाऱ्यांच्या विधवांना सेवानिवृत्ती वेतनाचा लाभ मिळवून देण्याकरिता मुंबई उच्च न्यायालयापर्यंत लढा दिला आणि ती त्यांना मिळवून दिली. डॉ. जे. बी. जाधव सर असे प्रत्येकाला मदत करायला तत्पर असत, मग तो विद्यार्थी असो, प्राध्यापक असो किंवा नातेवाईक असो! सर विद्यापीठ परिसरातील क्वार्टरमध्ये राहात. त्यांच्या हसतमुख स्वभावामुळे तिथेही ते आणि त्यांचे कुटंबिय लोकप्रिय होते. त्यांना तीन कन्या- सौ. उषा पाटणकर, सौ. उमा माने व सौ.लक्ष्मी सुपाते. यापैकी सौ. उमा ग्रंथालय व माहितीशास्त्र या विषयातीलच पदवीधर आहेत. त्यांच्याकडेच सर पत्नीच्या निधनानंतर वास्तव्यास होते.

अलीकडेच एका व्हायवाच्या निमित्ताने एकत्र आल्यावर सरांचे काही जुने मित्र आणि मी त्यांच्या कोल्हापुरातल्या घरी भेटायला गेलो होतो. सरांकडे गेले की सरांनी बोलत राहायचे आणि इतरांनी फक्त श्रोत्यांची भूमिका बजावायची. त्यावेळीही वयाच्या ८३ व्या वर्षी सरांच्या बोलण्यात नेहमीप्रमाणे त्यांच्या अपॉइंटमेंटपासून ते रिटायरमेंटपर्यंतच्या सर्व गोष्टी होत्या. सर अजिबात थकले नव्हते. त्यांचा बोलका स्वभाव त्यांना या वयातही गप्प बसू देत नव्हता.

खरे तर, सरांना ही शब्दांजली केवळ विद्यापीठ ग्रंथपाल म्हणून वाहत नसून त्यांची मानसकन्या व विद्यार्थिनी म्हणून वाहते आहे. माझे वडिल माजी कुलगुरू प्राचार्य आर.के. कणबरकर आणि डॉ. जे. बी. जाधव सर यांच्यामुळेच मी आज या व्यवसायात आहे. त्यांच्या आग्रहामुळेच मी या क्षेत्रात आले, त्यांची विद्यार्थिनी झाले. त्यांनी मागे लागून मला पीएच.डी. करायला लावले नसते, तर कदाचित या पदावर मी दिसले नसते. माझे एम.लिब. झाल्यावर शिवाजी विद्यापीठात पीएच.डी.  करण्याची सोय नसल्यामुळे सरांनी मला ''कल्पना, तुम्ही पुणे विद्यापीठात रजिस्ट्रेशन करायचे व पीएच.डी. व्हायचे,'' असे सांगून सर्व मदत केली. ते नेहमी म्हणायचे, ''कल्पना, तुम्ही विद्यापीठ ग्रंथपाल झाले पाहिजे. तुम्ही होऊ शकता.'' माझी क्षमता ओळखून त्यांनी मला नेहमी प्रोत्साहन दिले. आज मी जे काही नाव कमावले आहे, ते सरांमुळेच. म्हणून सदैव त्यांच्या ऋणात राहणेच पसंत करीन.

पुढील बोधवाक्य सरांना तंतोतंत लागू पडते-

“I am a Librarian

Librarianship is my weapon

Libraries are my Temple,

And Catalogue is my key weapon,

To unlock the wealth of wisdom and

Knowledge stored in the Libraries.”

-          Salman Haider

(Librarian, Cataloguer, blogger)

No comments:

Post a Comment