शिक्षणशास्त्र अधिविभाग |
शिवाजी विद्यापीठात दि. ७ नोव्हेंबर
१९७९ रोजी शिक्षणशास्त्र अधिविभाग स्थापन
झाला व जून १९८० पासून विभागाच्या
शैक्षणिक कामकाजाला सुरवात झाली.
अभ्यासक्रम:
शिक्षणशास्त्र अधिविभागात एम.एड. (एक वर्ष नियमित अभ्यासक्रम- सन १९८० ते २०१४ पर्यंत),
एम.फिल. (शिक्षणशास्त्र), पीएच.डी. (शिक्षणशास्त्र), एम.एड. (सुटीतील- १९८६ ते २००० पर्यंत), बी.एड. (सुटीतील- १९८६ ते २००० पर्यंत), डिप्लोमा
इन हायर एज्युकेशन हे अभ्यासक्रम राबविण्यात येत होते. सन २००५ पासून पी.जी. डिप्लोमा इन टिचर ट्रेनिंग एज्युकेशन, पी.जी. डिप्लोमा इन मास कम्युनिकेशन एज्युकेशन व सन २०१५ पासून एन.सी.टी.ई अधिनियम २०१४ नुसार दोन
वर्षांचा एम.एड. नियमित अभ्यासक्रम
राबविण्यात येत आहे. सन २०१५मध्ये एन.सी.टी.ई. ने शिक्षणशास्त्र
अधिविभागात बी.एड.-एम.एड
(एकात्मिक) अभ्यासक्रमाला मान्यता दिली. त्यानुसार सन २०१८ पासून हा
अभ्यासक्रम नियमित सुरु झाला.
शिक्षणाच्या सर्वच स्तरावर शिक्षकांचे स्थान
आजही अबाधित आहे. विशिष्ट अशा ध्येयनिष्ठेने शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या व शिक्षणाची
बांधीलकी असणाऱ्या ध्येयनिष्ठ शिक्षकांना अध्यापनशास्त्रीय दृष्ट्या व भविष्यातील शिक्षणाची आव्हाने पेलण्यासाठी
सक्षम बनविण्याचे काम शिक्षणशास्त्र कार्यक्रमातून होत असते. पदव्युत्तर शिक्षणशास्त्र अभ्यासक्रमामधून अध्यापन, शिक्षक प्रशिक्षण, संशोधन, शैक्षणिक प्रशासन व व्यवस्थापन क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीच्या शैक्षणिक व व्यावसायिक अशा एकात्मिक विकासावर भर देण्यात येतो. या अभ्यासक्रमामध्ये शैक्षणिक संशोधन या सारखे मूलभूत विषय तर आहेतच, पण त्याचबरोबर संप्रेषण
कौशल्ये, माहिती तंत्रज्ञान, शैक्षणिक तंत्रज्ञान हे साधन अभ्यासक्रम व अध्यापन शास्त्र शिक्षक - शिक्षण शैक्षणिक मूल्यमापन, शैक्षणिक
तंत्रज्ञान, शैक्षणिक व्यवस्थापन, शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन विशिष्ट गरजा असलेल्यांसाठी सर्वसमावेशक शिक्षण हे विषयाशी संबधित देखील पाठयक्रम आहेत. याबरोबरच
विद्यार्थ्यांना शोधनिबंधदेखील सादर करावा लागतो.
शिक्षणशास्त्र अधिविभागाची तात्विक पार्श्वभूमी:
अध्यापक व्यवसायाचा दर्जा टिकवून ठेवणे व त्याच्या
विकासाचा सातत्यपूर्ण प्रयत्न करणे हे शिक्षणशास्त्र अधिविभागाचे ध्येय आहे. विविध
संशोधने हाती घेऊन संशोधनामधून प्राप्त झालेल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या शैक्षणिक
प्रगतीसाठी करणे यासाठी शिक्षणशास्त्र विभाग सदैव कटिबद्ध आहे. शिक्षणशास्त्रामधील पद्व्युतर शिक्षण घेतलेले, ज्ञान व सद्गुण या दोन्हींच्या दृष्टीने परिपूर्ण असलेले विद्यार्थी निर्माण करणे
हा विभागाचा मुख्य हेतू आहे. या विद्यार्थ्यांना जीवनासाठी उपयुक्त असे शिक्षण मिळेल. तसेच, स्वतःच्या अध्यापनाचा विषय व त्यासंबंधित संशोधन क्षेत्रे यांचे स्पष्ट आकलन होईल, असे प्रयत्न
शिक्षणशास्त्र विभागाकडून केले जातात. विद्यार्थ्यांमध्ये तर्कनिष्ठ विचार, उत्तम संप्रेषण कौशल्ये, स्वतःचे विचार कृतींमध्ये आणण्याची क्षमता, सृजनशीलता, ज्ञानलालसा
व जबाबदारीची जाणीव असावी, त्यांना स्वतःच्या व्यवसायाबद्दल अभिमान व निष्ठा असावी. तसेच त्यांनी नैतिकतेची कास धरावी, या विचाराने शिक्षणशास्त्र विभाग कार्यरत आहे.
अध्ययन-अध्यापन:
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये एम.एड., एम.फिल. स्तरावरील
अध्यापनासाठी सुरूवातीपासूनच शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. याशिवाय गटचर्चा, पोस्टर शेअरिंग, संकल्पना
आरेखन, डायलॉग मोड, ब्रेन-स्टॉर्मिंग, सेमिनार, सिनॅरिओ बेस्ड् लर्निंग, सिम्यूलेटेड
प्रॅक्टिस यांसारख्या सहभागी अध्ययन-अध्यापन
पद्धती तसेच लर्निंग ऑब्जेक्ट डिपॉझिटरी, वेब-2 तंत्रज्ञान, एज्यु-ब्लॉगर, ब्लेंडेड
लर्निंग यांसारख्या माहिती तंत्रज्ञानावर आधारित अध्ययन-अध्यापन पद्धती वापरल्या जातात.
विद्यार्थ्यांसाठी सुविधा:
शिक्षणशास्त्र अधिविभागात सभागृह, अधिविभागाचे स्वतंत्र ग्रंथालय, यु.जी.सी.च्या दहाव्या पंचवार्षिक योजनेच्या निधीतून बांधण्यात आलेली सुसज्ज माहिती-तंत्रज्ञान प्रयोगशाळा आहे. याशिवाय ओव्हरहेड प्रोजेक्टर, स्लाईड प्रोजेक्टर, फिल्म प्रोजेक्टर, व्हिडिओ रेकॉर्डींग सेट, व्हिडिओ प्लेईंग सुविधा, टेप रेकॉर्डर, फोटोग्राफी कॅमेरा व इपिडीयास्कोप ही शैक्षणिक तंत्रज्ञान उपकरणे उपलब्ध
आहेत. ही सर्व उपकरणे विद्यार्थी स्वतः हाताळतात. याशिवाय, विभागात दुर्मिळ अशा मानसशास्त्रीय चाचण्या उपलब्ध आहेत. त्यांचा उपयोग एम.एड., एम.फिल. व पीएच.डी.चे विद्यार्थी संशोधनासाठी व इतर प्रात्यक्षिकांसाठी करतात.
संशोधन:
शिक्षणशास्त्र विद्याशाखेमधून आजतागायत तीनशेहून अधिक
विद्यार्थ्यांना विद्यावाचस्पती पदवी (पीएच.डी.) व ११० विद्यार्थ्यांना एम.फिल. पदवी शिवाजी विद्यापीठामार्फत देण्यात आलेल्या आहेत. एम.एड. अभ्यासक्रमामध्ये
सुरवातीपासूनच शैक्षणिक संशोधन हा विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे. एम.एड.च्या विद्यार्थ्यांना देखील शोधनिबंध सादर करावा लागतो.
शिक्षणशास्त्र अधिविभागामध्ये युजीसीचे चार बृहद संशोधन प्रकल्प व दोन लघु संशोधन प्रकल्प पूर्ण झाले आहेत.
त्याचप्रमाणे न्यूपा (NUEPA), एन. सी. ई. आर. टी. (NCERT), एस. सी. ई. आर. टी. (SCERT), महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तक
निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे या संस्थांच्या सहकार्याने संशोधने पूर्ण झालेली आहेत.
उपक्रम:
शिक्षणशास्त्र अधिविभागाने सुरवातीपासूनच स्थानिक, राज्य व राष्ट्रीय पातळीवर अनेक कार्यशाळा, परिषदा व चर्चासत्रे आयेजित केलेली आहेत. विभागाचे
अविष्कार व सायंशिया ही भित्तीपत्रके एम.एड. विद्यार्थ्यांमार्फत प्रकाशित केली जातात. यामधून विद्यार्थ्यांच्या
कलाविष्काराला संधी दिली जाते. शिक्षणशास्त्र
अधिविभागाने दोन फॅकल्टी डेव्हलपमेंट कार्यक्रम, तसेच शिवाजी
विद्यापीठातील नव्याने नियुक्त झालेल्या शिक्षकांसाठी तीन उद्बोधन कार्यशाळा आयोजित केल्या.
शिक्षणशास्त्र अधिविभाग व जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, डाएट, कोल्हापूर
यांच्यात २०१६मध्ये सामंजस्य करार करण्यात आला. या
मार्फत प्राथमिक शिक्षकांसाठी टेक्नोसेव्ही शिक्षक या विषयावर आधारित दोन कार्यशाळा देखील घेण्यात आल्या होत्या.
दरवर्षी विभागात प्रज्ञा शोध, शिक्षक दिन, जागतिक शिक्षक
दिन, जागतिक लोकसंख्या दिन, जागतिक महिला दिन, आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन, संविधान दिन, विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन कार्यक्रम व अधिविभाग स्थापना दिन यांसारखे
अनेक उपक्रम राबविले जातात.
दरवर्षी शिक्षक दिनी आदल्या वर्षीचे एम.एड. उत्तीर्ण विद्यार्थी, एम. फिल., पीएच.डी. पद्वीप्राप्त विद्यार्थी, रोजगारप्राप्त विद्यार्थी, सेट/नेट उत्तीर्ण विद्यार्थी यांना आमंत्रित केले जाते. या समारंभाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे या कार्यक्रमास आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त शिक्षकांनाही निमंत्रित केले जाते. त्यांचा सन्मान
केला जातो. अध्यापक व्यवसाय
निष्ठेची शपथ घेतली जाते.
शिक्षणशास्त्र विषयातील रोजगाराच्या संधी:
एम.एड. पदवी प्राप्त विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्रांत रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा देणे, खाजगी व विनाअनुदानित शाळा, अध्यापक विद्यालये, महाविद्यालये यांमध्ये शैक्षणिक सल्लागार, कोर्पेरेट
प्रशिक्षण, ई -कंटेट विकसित
करणे, वेगवेगळ्या विषयांसाठी मोड्युल्स तयार करणे, शैक्षणिक व्यावसायिक लेखन, व्यक्तिमत्व
विकास कार्यशाळा, विविध विषयांच्या अध्यापन शास्त्रावर मार्गदर्शन, संशोधन सेवा
किंवा सल्ला, पालक शिक्षण, संदर्भ पुस्तक
व पाठयपुस्तक लेखन, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पूर्वपरीक्षांसाठी मार्गदर्शन, शिक्षणातील नवीन विचार प्रवाह यावर उदबोधन वर्गाचे
आयोजन, विविध अभ्यासक्रमांचे मार्केटिंग, शिक्षणशास्त्र विषयातील संशोधनाचे मार्केटिंग, विशेष शाळांमधून मार्गदर्शन, अनेक शैक्षणिक
कार्यक्रमांचे व्यवस्थापन करणे इत्यादी.
No comments:
Post a Comment