Friday, 21 August 2020

शिवाजी विद्यापीठातील शिक्षण संधी-१४: हिंदी अधिविभाग

भाषा प्रौद्योगिकीच्या अत्याधुनिक शिक्षणासाठी प्रसिद्ध


शिवाजी विद्यापीठात हिंदी विभागाची स्थापना सन १९९३ मध्ये झाली. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विविध पुरस्कारांनी गौरविल्या गेलेल्या प्राध्यापकांच्या अध्यापनाचा व प्रशासकीय कामकाजाचा समृद्ध वारसा हिंदी अधिविभागास लाभला आहे. हिंदी अधिविभागाने एम.ए. हिंदी व एम.ए. भाषा प्रौद्योगिकी अभ्यासक्रम राबविणारा व गुणवत्तापूर्ण तसेच अत्याधुनिक शिक्षण देणारा विभाग म्हणून नावलौकिक मिळविला आहे. याचबरोबर विभागात पदव्युत्तर पदविका व लघु अवधीचे अर्थार्जनप्राप्तीस उपयुक्त असे अभ्यासक्रमही आहेत. एम.फिल. व पीएच.डी.सारखे संशोधन अभ्यासक्रम व त्यांचेसाठी आवश्यकतेनुसार कोर्स वर्क व ब्रिज कोर्स विभागात आयोजित केले जातात.

एम.ए. हिंदी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता ६० असून सदर अभ्यासक्रम सी.बी.सी.एस. प्रणालीनुसार पूर्ण करण्याची सुविधा आहे. एम.ए. भाषा प्रौद्योगिकी अभ्यासक्रमाची प्रवेश क्षमता १५ आहे. पदव्युत्तर हिंदी अनुवाद पदविकापदव्युत्तर संगणक तथा भारतीय भाषा सॉफ्टवेअर अनुप्रयोग पदविका अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कौशल्याचे अध्यापन व प्रशिक्षण देतात. सदर अभ्यासक्रमांस वार्षिक परीक्षा पद्धती असते. उक्त सर्व अभ्यासक्रमांमुळे हिंदी अधिविभागातील विद्यार्थ्यांना आधुनिक व अत्याधुनिक भाषा प्रवाहांशी जोडले जाते.

सध्या हिंदी विभागात डिजिटल क्लासरूम व स्मार्ट क्लासरूम आहेत. ३० संगणक क्षमता असलेली भाषा संसाधन सॉफ्टवेअरयुक्त व इंटरनेट सुविधेने परिपूर्ण संगणक प्रयोगशाळा आहे.

अधिविभागातील अनेक माजी विद्यार्थी देशभरातील नामवंत महाविद्यालयांत अध्यापन करतात. तसेच काही विद्यार्थी भारतीय भू-सेना, विविध बॅंका, केंद्रीय विद्यालये, शासकीय विद्यालये, अशासकीय विद्यालये, भारतीय रेल्वे इत्यादी आस्थापनांत विविध पदांवर कार्यरत आहेत. विभागातील विविध अभ्यासक्रमांचा लाभ विविध राज्यांतील विद्यार्थ्यांबरोबरच विदेशी विद्यार्थ्यांनीही घेतला आहे. काही विदेशी विद्यार्थी पीएच.डी.चे संशोधन कार्यही करत आहेत. विभागातील अनेक विद्यार्थी सेट व नेट उत्तीर्ण आहेत.

हिंदी अधिविभागात देश-विदेशांतील हिंदी विषयातील प्रख्यात तज्ज्ञांच्या व्याख्यानांचे आयोजन केले जाते. चर्चासत्रे, परिषदा, संगणक भाषा संसाधन कार्यशाळा (राष्ट्रीय इलेक्ट्रोनिकी आणि सूचना प्रौद्योगिकी संस्थान, औरंगाबाद आणि सी-डॅक, पुणे यांच्या सहकार्याने भाषा, साहित्य और प्रौद्योगिकी’, अभिकलनात्मक भाषाविज्ञान तथा भारतीय भाषा संगणन’, हिंदी तथा अन्य भारतीय भाषा सॉफ्टवेर उपकरणों के अनुप्रयोग’, भारतीय भाषाओं में संगणन इ. अत्याधुनिक विषयांवर परिषदा व कार्यशाळा आयोजित केल्या आहेत. तसेच सी-डॅक, पुणे यांच्या सॉफ्टवेअर अभियंतांबरोबर स्काईप सत्रांच्या माध्यमातून अनुवाद, स्थानीकीकरण (Localization) यांसारखे प्रयोग सुरू करण्याचा प्रथम मान हिंदी विभागास मिळाला आहे.), सेट/नेट कार्यशाळा आदींचे आयोजन केले जाते. हिंदी दिवसाच्या निमित्ताने विशेष व्याख्यान व साहित्य सौरभ भित्तिपत्रिकेचे प्रकाशन केले जाते. ऑनलाइन व्याख्यान, लघुपट निर्मिती व पटकथालेखन, ‘मूल्यवर्धन अभ्यासक्रम: भारतीय ओपन ऑफिस असे विविध उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी वेळोवेळी आयोजित केले जातात. स्टाफ सिलेक्शन कमिशन व विविध हिंदी अधिकारी पदांच्या परीक्षांसाठी वेळोवेळी तज्ज्ञ व्यक्तींच्या (बँका, रेल्वे मंडल, भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई इत्यादी विविध ठिकाणी कार्यरत असलेले राजभाषा अधिकारी) मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन केले जाते. अधिविभागातर्फे शोधहिंदी या ऑनलाईन पत्रिकेचे प्रकाशन केले जाते.

 हिंदी विभागाचे सामंजस्य करार (MoU)


·           आंतरराष्ट्रीय:

Ø  सबरगमुवा विद्यापीठ, श्रीलंका : २००६ ते निरंतर २०१६ 

Ø  भारतीय विद्या संस्थान, वेस्ट इंडिज : २०११ ते निरंतर २०१८ ते २०२३ 

Ø  तुरिन विश्वविद्यालय, इटली : २०१५  ते २०२०

Ø  अमेरिकन युनिवर्सिटी ऑफ हिंदू नॉलेज, फ्लॉरिडा -  अमेरिका २०१८ – २०२३ 

Ø  युरोपियन हिंदी समिती, लेदन, नेदरलैंड : २०१८  – २०२३  


·           राष्ट्रीय:

Ø  सी-डॅक, पुणे : २०१५ पासून

Ø  प्राग्-ज्योतिष विद्यापीठ, गोहाटी, आसाम : २०१८ – २०२३ 

सामंजस्य करारांतर्गत विदेशी विद्वानांची ऑनलाइन व प्रत्यक्ष व्याख्याने आयोजित केली जातात. सन २०१५ मध्ये तुरीन विद्यापीठ, इटली येथील बी.ए.च्या विद्यार्थिनींनी हिन्दी विभागात उपस्थित राहून इंटर्नशीप पूर्ण केली. विदेशी व भारतीय विद्यार्थ्यांसाठी विभागातील प्राध्यापकांनी ऑनलाईन माध्यमातून व्याख्याने दिली आहेत. तसेच, तुरीन विद्यापीठातील संशोधन करणार्‍या विद्यार्थ्यांनी सुद्धा संशोधन कार्यास मार्गदर्शन घेतले आहे. भारतीय विद्या संस्थान, त्रिनिदाद आणि टोबगो-वेस्ट इंडिज या संस्थेचे महानिदेशक प्रवासी भारतीय साहित्यकार प्रा. हरिशंकर आदेश हे हिन्दी विभागात सहयोगी प्राध्यापक (Adjunct Professor) म्हणून कार्यरत आहेत. विभागात विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या ऑनलाइन व्याख्यानांचे आयोजन करण्यात येत असते.

सामंजस्य करारेतर उपक्रमांमध्ये तेल अविव विद्यापीठ, इस्रायल येथील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी सन २०१५ मध्ये विभागास भेट दिली व हिंदी भाषेतून इस्रायली संस्कृती व हिंदी अध्ययन इ. ची माहिती दिली. हिंदी भाषा व साहित्याची माहिती घेतली. याचसोबत विस्कॉन्सिन विद्यापीठ, मॅडीसन येथील स्पॅनिश भाषेचे प्राध्यापक यांनीही सन २०१६मध्ये विभागास भेट दिली व अनुवादासंबंधी चर्चा केली. तसेच ऑक्सफर्ड विद्यापीठातील हंगेरीयन भाषी हिंदी प्राध्यापक यांनी सन २०१६-१७, २०१९-२० मध्ये विभागास दोन वेळा भेट देऊन व्याख्याने दिली आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्या Global Initiative of Academic Networks (ग्यान) योजनेअंतर्गत हिंदी भाषा तथा साहित्य का प्रशिक्षण: विदेशी छात्रों के संदर्भ में नावाचा आठ दिवसांचा कार्यक्रम सन २०१६-१७ मध्ये राबविला. सदर कार्यक्रमाचे प्रशिक्षण विदेशी हिन्दी प्राध्यापिका अॅलेसान्द्रा कोंसोलारो (तुरीन विद्यापीठ, इटली) यांनी दिले. तसेच, विद्यापीठ अनुदान आयोग, नवी  दिल्ली यांचेकडून बाराव्या पंचवार्षिक योजनेअंतर्गत हिंदी विभागाच्या सक्षमीकरणासाठी व आधुनिकीकरणासाठी विभागाच्या प्रस्तावास मान्यता मिळाली. यासाठी सन २०१६-१७ मध्ये रु. ५४ लाख मंजूर झाले. या अंतर्गतच सन २०१६-१७ पासून एम.ए. भाषा प्रौद्योगिकीपदव्युत्तर संगणक तथा भारतीय भाषा सॉफ्टवेअर अनुप्रयोग पदविकाअभ्यासक्रम सुरू करण्यात आले.

 

अधिविभागातील अभ्यासक्रम व त्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता:  

अभ्यासक्रम

शैक्षणिक अर्हता

एम.ए. हिंदी

बी.ए. हिंदी

एम. ए. भाषा प्रौद्योगिकी

बी.ए.हिंदी

हिंदी अनुवाद पदविका

कोणत्याही शाखेची पदवी

संगणक तथा भारतीय भाषा सॉफ्टवेयर अनुप्रयोग पदविका

कोणत्याही शाखेची पदवी

 

लघु अवधी अभ्यासक्रम (BOS मान्यताप्राप्त):

·       हिंदी संप्रेषण कौशल प्रमाणपत्र अभ्यासक्रम (कालावधी तीन माह)

·       भारतीय भाषा संगणन प्रमाणपत्र अभ्यासक्रम (कालावधी तीन माह)

·       कार्यालय स्वचालन (बहुभाषी) प्रमाणपत्र अभ्यासक्रम: सी- डॅक, पुणे च्या PACE’ योजनेअंतर्गत (As Per C-DAC)

·       इनडिझाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रम: सी- डॅक, पुणे च्या PACE’ योजनेअंतर्गत (As Per C-DAC)

 

हिंदी विषय व भाषा प्रौद्योगिकी या विषयांतील विविध संधी:

अध्यापक, अनुवादक, पटकथा लेखक, संवाद लेखक, कॉर्पस निर्माता, राजभाषा अधिकारी, लिप्यंतरणकर्ता, उपशीर्षककर्ता, कोश निर्माणकर्ता, धृति संसाधक, लघुपट निर्माता, निवेदक, वृत्त लेखक, वृत्त संपादक, मुद्रण दोष सुधारक, वृत्त वाचक, कथा लेखक, गीतकार, भाषा प्रबंधक, जाहिरात लेखक, क्रीडा समालोचक, पर्यटन मार्गदर्शक, स्तंभलेखक, मुलाखतकार इ. सारख्या अनेक नोकरीच्या संधी आहेत. या कौशल्यांमुळे स्वयंअर्थार्जन संधीसुद्धा प्राप्त करता येतात.

 

अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी संपर्क:

प्रा.(डॉ.) प्रतिभा पाटणकर

प्रभारी विभागप्रमुख,

हिंदी अधिविभाग,

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

दूरध्वनी क्रमांक : ०२३१ -२६०९१९६

भ्रमणध्वनी क्रमांक : ९९६०१९२१०३    

‘–मेल : hindi@unishivaji.ac.in


No comments:

Post a Comment