कोल्हापूर, दि. १७ ऑगस्ट: शिवाजी विद्यापीठाच्या नॅनो सायन्स व
तंत्रज्ञान अधिविभागाकडून कोरोना विषाणूच्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी उपयुक्त
अशा स्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक यंत्राची निर्मिती करण्यात आली आहे. गेल्या
महिन्यातच या अधिविभागाच्या सेंटर फॉर नॅनो-फॅब्रिक्सच्या संशोधकांनी सादर
केलेल्या ‘व्हायरस
कवच फॅब्रिक स्प्रे’च्या
संशोधनानंतर हे आणखी एक महत्त्वाचे संशोधन विद्यापीठाच्या संशोधकांनी सादर केले
आहे.
नॅनो सायन्स व तंत्रज्ञान अधिविभागातील
सहाय्यक प्राध्यापक व संशोधक डॉ. तुकाराम डोंगळे यांनी इचलकरंजी येथील प्रा. परेश
मट्टीकल्ली यांच्या सहकार्याने 'स्पर्शविरहित
स्वयंचलित तापमापक यंत्र' विकसित
केले आहे. ‘मुख्यतः
हे यंत्र कोविड योद्ध्यांमध्ये वाढणाऱ्या संक्रमणाला आळा घालण्यासाठीच्या
प्रतिबंधात्मक गरजा लक्षात घेऊन विकसित केले असल्याची माहिती डॉ. डोंगळे यांनी
दिली आहे.
कोरोना विषाणूपासून बचाव,
सुटका, प्रतिबंध आणि नियंत्रण करण्यासाठी
संपूर्ण जगभरात विविध संशोधक समूहांचे प्रयत्न सुरु आहेत. त्याच अनुषंगाने शिवाजी
विद्यापीठातील स्कूल ऑफ नॅनोसायन्स अँड टेक्नॉलॉजी या अधिविभागातील संशोधक
प्राध्यापकांनी अथक परिश्रम घेऊन दिलासादायक संशोधन केले आहे.
डॉ. डोंगळे यांनी दिलेल्या
माहितीनुसार, स्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक उपकरणाची कार्यप्रणाली ही जागतिक आरोग्य
संघटनेने कोविडसाठी ठरवून दिलेल्या मानकांवर आधारलेली
आहे. त्यानुसार एखाद्या व्यक्तीच्या तापमानाची नोंद निर्धारित तापमानापेक्षा अधिक झाली,
तर हे उपकरण अलार्मच्या माध्यमातून त्याची सूचना देते, जेणे करून पुढील योग्य त्या
दक्षतेसाठी त्याची मदत होते.
असे
आहे याचे तंत्रज्ञान:
मुख्यतः हे यंत्र सेन्सर तंत्रज्ञानावर
आधारित असून यात अल्ट्रासोनिक आणि इन्फ्रारेड असे दोनही प्रकारचे सेन्सर्स
वापरलेले आहेत. अल्ट्रासोनिक सेन्सर समोर आलेली व्यक्ती आणि यंत्रामधले अंतर ओळखते
आणि मायक्रोकंट्रोलरला संकेत पाठविते. मायक्रोकंट्रोलर पुढे इन्फ्रारेड सेन्सरला
त्या व्यक्तीचे तापमान मोजण्यासाठी एक संकेत पाठवते. त्यानुसार सेन्सरी डेटा
मिळाल्यानंतर मायक्रोकंट्रोलरमध्ये त्या डेटावर प्रक्रिया होऊन एलसीडी डिस्प्लेवर संबंधित
व्यक्तीचे तापमान दर्शविले जाते. व्यक्तीचे तापमान जागतिक आरोग्य
संघटनेच्या निर्धारित निकष पायरीहून अधिक नोंद झाले असेल
तर लगेच अलार्म वाजतो आणि लाल रंगाची एलईडी लाईट लागते. या यंत्राची बॅटरी एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर
किमान ५ दिवस सक्षमपणे कार्य करते.
यातील महत्त्वाची बाब म्हणजे हे यंत्र
मानवी हस्तक्षेपाशिवाय चालत असल्याने स्वतंत्र व्यक्तीकडून तापमानाचे सतत मापन व निरीक्षण
करण्याची आवश्यकता भासत नाही. साहजिकच एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे होणारे रोगसंक्रमण
टाळण्यासाठी हे उपकरण उपयुक्त ठरते. त्यामुळे तापमान मोजणाऱ्या आशा वर्कर्स,
नर्सेस, डॉक्टर्स तसेच सार्वजनिक ठिकाणी तत्सम
सेवा देणारे स्वयंसेवक यांना होऊ शकणाऱ्या रोगसंक्रमणापासून वाचवता येऊ शकेल. बॅटरीवर
कार्यान्वित होणारे हे स्पर्शविरहित यंत्र कोठेही सहज ठेवले जाऊ शकते. विविध कार्यालये,
हॉस्पिटल्स, शाळा,
कॉलेजेस, विद्यापीठे, मॉल्स
व इतर सार्वजनिक ठिकाणी हे उपकरण
उपयुक्त ठरू शकते.
सदर यंत्राच्या व्यापक निर्मितीसाठी
विद्यापीठाने काही उद्योगसमूहांशी संपर्क साधला असून लवकरच ते अल्प दरात सर्वत्र उपलब्ध होईल, अशी
माहितीही डॉ. डोंगळे यांनी दिली आहे. सदर
संशोधनासाठी अधिविभागाचे संचालक प्रा. डॉ. प्रमोद पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन
लाभले आहे.
दरम्यान, अधिविभागाच्या 'सेंटर
फॉर नॅनोफॅब्रिक्स'चे सहयोगी
प्राध्यापक डॉ. किरणकुमार शर्मा यांनी 'व्हायरस
कवच फॅब्रिक स्प्रे' तंत्रज्ञानाची निर्मिती
केली. त्याचे देशभरात सर्वस्तरीय कौतुक व स्वागत झाले. लवकरच हे उत्पादन
'इकोसायन्स इनोव्हेशन्स' कंपनीमार्फत
सर्वत्र उपलब्ध होणार असल्याची माहितीही विभागामार्फत देण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment