Monday 17 August 2020

शिवाजी विद्यापीठातील शिक्षण संधी–१०: संगीत व नाट्यशास्त्र अधिविभाग

उत्तर भारतीय संगीत, नाट्यासह कलांच्या शास्त्रशुद्ध प्रशिक्षणासाठी प्रसिद्ध

 

शिवाजी विद्यापीठाच्या निसर्गरम्य वातावरणातील संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाची इमारत.

संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या उपक्रमांना कलाकारांचा सदैव उत्स्फूर्त प्रतिसाद लाभतो.

सर्व कलांना उत्तेजन व प्रोत्साहन देणाऱ्या छत्रपती शाहू महाराजांच्या कलानगरी कोल्हापूरमध्ये २० जुलै १९८४ रोजी प्रसिद्ध गायक पंडित मल्लिकार्जुन मन्सूर यांच्या हस्ते शिवाजी विद्यापीठाच्या संगीत अधिविभागाची स्थापना झाली. १९८६ साली प्रसिद्ध लेखक, नाटककार व अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे धनी पु. ल. देशपांडे यांच्या हस्ते नाट्यशास्त्र विभागाचे उद्घाटन झाले. त्याचबरोबर १९९१ साली प्रसिद्ध तबलानवाज उस्ताद अल्लारखा खासाहेब यांच्या हस्ते वाद्यसंगीत विभाग सुरु झाला. अशा प्रकारे एकाच छताखाली संगीत, नाटक तसेच तबला, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य, चित्रकला इत्यादी अभिजात कलांचे शास्त्रशुद्ध, गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देणारी संस्था तथा विभाग म्हणून शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचा नावलौकिक आहे.

विभागातर्फे शास्त्रीय संगीत (कंठ संगीत), वाद्यसंगीत (तबला, हार्मोनियम), चित्रकला, शास्त्रीय नृत्य (भरतनाट्यम, थ्थक) या विषयांमध्ये पदविका, नाटक या विषयात पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविले जातात. त्याचबरोबर शास्त्रीय संगीत, नाटक व वाद्यसंगीतामध्ये ब्रिज कोर्स (एक वर्ष) तसेच एम्.पी.ए. (दोन वर्ष) हे नियमित अभ्यासक्रम अधिविभागामार्फत राबविले जातात. संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टीने संगीत व नाट्यशास्त्र विषयांत पीएच.डी. अभ्यासक्रमाची देखील सोय विद्यार्थ्याना उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सर्व अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्याक्षिकांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर व भरपूर सरावावर भर देण्यात येतो.

निसर्गरम्य जलाशयाच्या किनारी स्थित संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागात एक डिजिटल क्लासरूम, स्टेट ऑफ द आर्ट ऑडिओ-व्हिज्युअल स्टुडि, सर्व रंगमंचीय सुविधांनी सुसज्ज असे अधिविभागाचे स्वतंत्र सभागृह, प्रशस्त स्वतंत्र क्लासरूम, आवश्यक वाद्ये इत्यादी महत्त्वपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत.

या विविध सुविधांचा लाभ घेऊनच अधिविभागातील अनेक माजी विद्यार्थी उत्तम व्यावसायिक गायक, वादक, संगीतकार, नाटककार, लेखक, अभिनेते तसेच वेगवेगळ्या कलासंस्था, शाळा, महाविद्यालये, विद्यापीठ अधिविभागांमध्ये शिक्षक, प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. अधिविभागातील  वीसपेक्षा अधिक विद्यार्थी संगीत व नाट्यशास्त्र विषयातील नेट परीक्षा उत्तीर्ण झाले असून २५ विद्यार्थ्यांनी विद्यावाचस्पती (पीएच.डी) ही संशोधन पदवी संपादन केली आहे.

विभागातील अनुभवी व निष्णात प्रध्यापकांबरोबरच विविध कलांतील तज्ज्ञ व्यक्तींना अध्यापनासाठी  निमंत्रित केले जाते. सांस्कृतिक बांधिलकी व विद्यार्थांच्या दृष्टीने अधिविभागातर्फे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. शाहू संगीत रजनी (सलग १२ वर्षे), ३० सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर २००१ असे पाच दिवसीय घराणा संमेलन, लक्ष्मीबाई जाधव स्मृतिसमारोह, नाटय-चर्चासत्र, संवादिनी सम्मेलन, सुगम संगीत कार्यशाळा त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे जयोस्तुते, वंदेमातरम्, दीपसंध्या, गीतबहार, उत्सव माय मराठीचा, रवितेजाचे कवडसे शा विविध महोत्सवांचे आयोजन संगीत व नाट्यशास्त्र विभागातर्फे केले गेले आहे. अधिविभागाच्या विविध महोत्सवांमध्ये गानसरस्वती किशोरी आमोणकर, पं. भिमसेन जोशी, पं. राजन-साजन मिश्रा, श्रीमती गंगुबाई हगल, मालिनी राजुरकर, अश्विनी भिडे-देशपांडे, आरती अंकलीकर-टिकेकर, पं.जसराज, पं. जितेन्द्र अभिषेकी, पं. हरिप्रसाद चौरासिया, उस्ताद अल्लारखाँ, उस्ताद झाकिर हुसेन या आणि अशा अनेक आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांनी अधिविभागातर्फे आयोजित केलेल्या विविध उपक्रमांना उपस्थित राहून आपल्या कलेचे दर्शन घडविले आहे. २००५ साली झालेल्या लोककला महोत्सवा श्रीमती सुलोचना चव्हाण, शाहिर विठ्ठल उमप, पं. ज्ञानोबा उत्पात अशा अनेक दिग्गज व लोकप्रिय लोककलाकारांनाही निमंत्रित केले होते. स्वयंवर, शहा-शिवाजी, संशयकल्लोळ, सौभद्र, मानापमान . संगीत नाटके व नाटयप्रवेशही विभागातर्फे सादर झाले आहेत. दिल्ली येथे झालेल्या ३३ व्या बृहनमहाराष्ट्र सांस्कृतिक विभागातर्फे आयोजित संगीत नाटक स्पर्धेत अधिविभागातर्फे आयोजित संगीत स्वयंवर या नाटकाला एकूण ४५ पारितोषिके मिळाली होती. दरवर्षी अधिविभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या संगीत-नाटक महोत्सवाच्या माध्यमातून देशातील विविध संगीत व नाटयक्षेत्रातील अनेक मान्यवर गायक, नाटयसमीक्षक, लेखक, अभिनेते यांना निमंत्रित करण्यात येते. दरवर्षी विभागातर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या व्हॅल्य अॅडेड कोर्सच्या माध्यमातून अनेक तज्ज्ञ व्यक्तींना निमंत्रित करण्यात येते.

२०१४ साली Recent Trades In Theatre Arts या विषयावर राष्ट्रय सेमिनार घेण्यात आला होता. २०१९ साली विभागातर्फे प्रसिद्ध नाटककार गिरीश कर्नाड यांचे तुघलक हे नाटक सादर करण्यात आले. याशिवाय  शाहू एकांकिका महोत्सव, पुरुषोत्तम, महाराष्ट्र राज्य नाटय स्पर्धा, युवा सकाळ यांसारख्या अनेक स्पर्धांमध्ये विभागाला बक्षिसे मिळाली आहेत.

अधिविभागातील अभ्यासक्रम व आवश्यक शैक्षणिक पात्रता:

·         डिप्लोमा इन क्लासिकल म्युझिक (व्होकल)/ डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटल म्युझिक (तबला, हार्मोनियम)/ डिप्लोमा इन क्लासिकल डान्स (कथ्थक, भरतनाट्यम्)/ डिप्लोमा इन पोर्ट्रेट, लॅंडस्केप एँड कम्पोझिशन

- शैक्षणिक अर्हता: किमान १० वी पास

·         डिप्लोमा इन ड्रामॅटिक्स / सर्टिफिकेट कोर्स इन ड्रामॅटिक्स

- शैक्षणिक अर्हता: किमान १२ वी पास

·         ब्रिज कोर्स इन व्होकल म्युझिक / इंस्ट्रुमेंटल म्युझिक (तबला, हार्मोनियम), ड्रामॅटिक्स (कालावधी १ वर्ष)

- शैक्षणिक अर्हता:

१. कोणत्याही शाखेची पदवी

२. संगीत विशारद किंवा शिवाजी विद्यापीठाचा डिप्लोमा किंवा बी.ए. म्युझिक/ नाटयशास्त्रासाठी डिप्लोमा किंवा राज्यनाटय स्पर्धेतील ५ सहभाग प्रमाणपत्रे.

·         एम्.पी.ए. इन व्होकल म्युझिक / इंस्ट्रुमेंटल म्युझिक (तबला, हार्मोनियम), ड्रामॅटिक्स (कालावधी २ वर्षे)

- शैक्षणिक अर्हता: ब्रिज कोर्स किंवा बी.पी.ए. (चार वर्षे)

सदर कोर्सेससाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्वपूर्ण बाबी:

·         प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे प्रवेश निश्चित केला जातो.

·         सविस्तर माहितीसाठी शिवाजी विद्यापीठाच्या www.unishivaji.ac.in या संकेतस्थळावरील ‘Admission 2020’ या लिंकला भेट दया.

संगीत व नाट्यशास्त्र विषयातील करियरच्या संधी:

संगीत व नाट्यशास्त्र या आंतरविद्याशाखीय विषयातील पदविका व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर विद्यापीठ किंवा महाविद्यालयीन पातळीवर सहाय्यक प्राध्यापक, विविध शाळांमध्ये शिक्षक, एफ.एम. वाहिन्या, टेलिव्हिजन, रेडिओ इत्यादी ठिकाणी म्युझिक डायरेक्टर, अरेंजर, आर्टिस्ट, प्रोग्राम इन्चार्ज, विविध वृत्तपत्रासाठी कला-साहित्यविषयक लेखक, सिनेमाथिएटर आर्टिस्ट, खाजगी क्लासेस किंवा व्यावसायिक कलाकार इत्यादी अनेक संधी उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी व प्रवेशासाठी संपर्क :

डॉ.अंजली निगवेकर,

अधिविभागप्रमुख,

संगीत व नाटयशास्त्र अधिविभाग

शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर

दूरध्वनी क्र.०२३१-२६०९२२१ / मो.नं. ९०११६१९२००

ई-मेल : music.dramatics@unishivaji.ac.in

श्री. निखिल भगत – सहाय्यक प्राध्यापक – मो.नं. ८०८७२८२८१६

डॉ. विनोद ठाकूरदेसाई – सहाय्यक प्राध्यापक - मो.नं. ९३२५६०२०१६


No comments:

Post a Comment